Thursday, October 31, 2024

चाळीची साठी - (सुनील शिरवाडकर)

१६ फेब्रुवारी १९६१.
स्थळ..भारतीय विद्या भवन,मुंबई.
'इंडियन नैशनल थिएटर'(आय एन टी) चा महोत्सव.
रिकाम्या रंगमंचावर फक्त एक कलाकार.. त्याचा एक मफलर.. आणि एक बाकडं.
बस्स एवढ्या सामग्रीवर अडिच तीन तास लोकांना खिळवुन टाकलं त्या कलाकारानी.
तो कार्यक्रम होता..'बटाट्याची चाळ'.
आणि तो सादर केला पु.ल.देशपांडे यांनी.

'बटाट्याची चाळ' चा हा पहिला प्रयोग. दोन वर्षापासून आयएनटी वाले मागे लागले होते. आपल्या महोत्सवात पु.लं.नी एखादा कार्यक्रम सादर करावा. त्यावेळी पु.ल. दिल्लीत दुरदर्शन केंद्रावर काम करत होते. त्यांना त्या कामातुन अजिबातच फुरसत मिळत नव्हती. लागोपाठ दोन वर्षे नकार दिल्यानंतर मात्र आयएनटी वाले ऐकुन घेईनात. पुलंसाठी महोत्सव पुढे ढकलण्याची तयारी त्यांनी दाखवली. मग मात्र पुलंची पुरती नाकेबंदी झाली. आणि त्यांनी या महोत्सवासाठी एक नवीन कार्यक्रम बनवण्याचे ठरवले

खरंतर 'बटाट्याची चाळ' चा हा प्रयोग...प्रयोग म्हणण्यापेक्षा या पुस्तकाचे वाचन त्यांनी तीन वर्षापुर्वीच केले होते. त्यावेळी पु.ल. लंडनमध्ये होते. बीबीसी ची कार्यपद्धती आणि ब्रिटिश रंगभूमीचा अभ्यास यासाठी माहिती आणि प्रसारण खात्याने त्यांना इंग्लंडला पाठवले होते.

लंडनमधील मराठी भाषिक दिवाळी साजरा करतात.आता पु.ल. इथे आलेलेच आहे तर त्यांनी एखादा कार्यक्रम सादर करावा अशी त्यांची इच्छा. 'कोणालाही नाराज करायचे नाही' हे पुलंचे ब्रीद.
लंडनमधील कॉर्नवॉल स्ट्रीटवरच्या एका हॉलमध्ये त्या दिवशी पु.लं.नी बटाट्याच्या चाळीतले काही भाग वाचुन दाखवले. कार्यक्रम तुफान रंगला.वाक्यावाक्याला हशा आणि टाळ्या. पुढेही कितीतरी दिवस लंडनमधील मराठी बांधवांमध्ये याच कार्यक्रमाची चर्चा.

आणि मग त्यानंतर तीन वर्षांनी झालेला 'चाळी' चा अधिक्रुत पहिला प्रयोग. त्यादिवशी खरंतर पु.लं.तापाने फणफणले होते.घशात कोरड पडलेली. सारखे विंगेत जाऊन पाणी प्यायचे.आपल्याकडुन प्रयोग होईल की नाही असंही त्यांना वाटलं.असा घोट घोट पाणी पीत केलेला तो प्रयोग अपेक्षेप्रमाणे रंगलाच असणार यात नवल नाही.

आणि मग दर शनिवार रविवार चाळीचे प्रयोग सुरु झाले. दर आठवड्याला दिल्लीहून महाराष्ट्रात यायचं..प्रयोग करायचे.. तसं पाहिलं तर हे सगळंच खुप दमवणारं होतं.पण प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादाने पु.लं.चं मन भरुन येई.

पु.लं.या प्रयोगाला'बहुरूपी खेळ' असं म्हणत.'एकपात्री' हा शब्द त्यांना आवडत नसे.जुन्या काळातील कथेकरी,किंवा किर्तनकार कशी वेगवेगळी उदाहरणे देत,गोष्टी सांगत कथा पुढे नेत..आणि मग शेवटी आपल्या मुळपदावर येत..अगदी तसाच प्रयोग पु.ल. करत.चाळीचं शेवटचं चिंतन याच प्रकारचं होतं.

चाळीच्या पुर्वार्धात 'उपास',आणि 'भ्रमणमंडळ'..तर उत्तरार्धात 'संगितिका', आणि 'चिंतन' यांचे अंश ते सादर करत.त्रिलोकेकर,कोचरेकर,काशिनाथ नाडकर्णी ही पात्र ते अक्षरशः जिवंत करीत.त्यात मधुन मधुन गायन..तेही विविध ढंगाचं.हे सगळंच तसं पाहिलं तर खुप थकवणारं होतं.आणि शेवटचं चिंतन? ते तर अक्षरशः प्रेक्षकांना हेलावून सोडत असे.

'बटाट्याची चाळ' चं बुकिंग सुरु झालं की काही तासातच हाऊसफुल्ल चा बोर्ड हॉलवर लागत असे. शेवटी ठरवण्यात आले..एका प्रेक्षकाला फक्त चारच तिकिटे मिळतील.मराठी रंगभूमी साठी हे सगळंच नवीन होतं.त्याहीपेक्षा पु.लं.साठी तर खासच.तिकिटांचे दर असायचे ७-५-३-आणि २रुपये. असं असुनही खुप मोठी रक्कम जमा व्हायची. पु.लं.च्या आयुष्यात एवढी मोठी कमाई करण्याची ही पहीलीच वेळ. सुनीताबाई तर म्हणाल्याही होत्या..
"बटाट्याची चाळ हा भाईसाठी अकाउंट पेयी चेक होता"

पु.लं.जेव्हा लंडनमध्ये होते.. तेव्हा त्यांनी एम्लिन विल्यम्स चा एक शो पाहीला होता.'A boy growing up' या नावाचा.हे असंच..एक काळा पडदा, एक खुर्ची, एक नट.अडीच तास हसु आणि आसुचा खेळ.बटाट्याच्या चाळीचा शो बसवताना त्यांच्या डोळ्यासमोर हाच एम्लिन विल्यम्स होता.तो एकदा भारतात आला. पु.लं.नी त्याला चाळीचा शो पहाण्यासाठी बोलावले. तो तर थक्कच झाला. त्याला अजुन एका गोष्टीचे कौतुक वाटले की या कलाकाराला स्क्रिप्टसाठी दुसर्या वर अवलंबुन रहावे लागत नाही.तो पु.लं ना म्हणालाही..तुझे स्क्रिप्ट तुच लिहु शकतोस ही केवढी मोठी सोय आहे.

बटाट्याच्या चाळीला पुलंना अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. पण जशी प्रेम करणारी माणसे असतात. तशी द्वेष करणारीही असतातच ना. तर अश्याच एका शो च्या मध्यंतरातली ही घटना. खरंतर मध्यंतरात पुलंना भेटायची परवानगी कोणालाही नसायची. तसा दंडकच सुनीताबाईंनी घातला होता. पुलंची एकाग्रता भंग होऊ नये हा त्यांचा उद्देश. एकदा एक तथाकथित पु.ल. भक्त मध्यंतरात आला. सुनीताबाईंना भेटला. त्याने सोबत पुलंना आवडणारा पानाचा विडा आणला होता. तो पुलंना द्यावा अशी विनंती केली. या भक्ताचा फारच आग्रह झाला. म्हणून सुनीताबाईंनी तो घेतला. आत जाताना त्यांनी तो विडा सहजच उघडून पाहिला. तर त्यात काही खिळे आणि चुका भरलेल्या होत्या. पुलंनी हे पान तोंडात घातलं असतं तर कसलं मोठं संकट ओढवलं असतं.

तर अशी ही 'बटाट्याच्या चाळी' ची कहाणी. तो शो कालांतराने पुलंनी थांबवला. पुलंनी म्हणण्यापेक्षा सुनीताबाईंनी. कारण भाईसारख्या असाधारण प्रतिभेच्या कलाकाराने आत्मत्रुप्त राहु नये.. स्वतःच्या यशाच्या आव्रुत्त्या काढत बसु नये.. नवनवीन आव्हाने स्विकारावी..आणि ती पेलावी यावर त्या ठाम होत्या. आणि मग त्यांनी बटाट्याच्या चाळीचे शो थांबवले.

बटाट्याच्या चाळीचे शो थांबले.. नंतर पु.लं ही गेले. पण ही चाळ पुस्तक रुपाने मात्र मराठी मनात कायमस्वरुपी घर करुन बसली आहे.

शेवटी जाता जाता एक आठवण..

बटाट्याच्या चाळीचा शो पाहण्यासाठी एकदा आचार्य अत्रे आले.प्रयोग संपल्यानंतर रंगमंचामागे गेले.. पु.लं.ना कडकडुन मिठी मारली. तोंडभरून कौतुकही केले. घरी गेले. एक अग्रलेखही लिहीला.त्यानंतर झोपले. पण झोप काही येईना. डोळ्यासमोर चाळ..चाळीतले भाडेकरू.. आणि ती पात्रे जिवंत करणारे पु.ल.

शेवटच्या रात्री दोन अडीचच्या सुमारास त्यांना काही राहवेना. त्यांनी थेट पु.लं.ना फोन लावला. काय चाललंय वगैरे विचारलं.

"अहो झोपलोय.रात्रीच्या दोन अडीचला सभ्य माणूस दुसरं काय करणार?
पण तुम्ही फोन कशासाठी केलाय एवढ्या रात्री?"

त्यावर अत्रे म्हणाले..

मी प्रयोग बघुन आलो.मला झोपच नाही. वा वा वा...पुल..खरं सांगु तुला,
सगळं पाहीलं..हसलो.. डोळ्यात अश्रू आले. सगळं झाल्यावर म्हटलं,आता वाटतं.."

"काय? काय वाटतं..?

"वाटतंय की झालंय माझ्या आयुष्याचं सार्थक..काय पहायचं राहीलंय?आता मी मरायला मोकळा झालो"

सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८

0 प्रतिक्रिया: