Tuesday, April 21, 2020

सुनिताबाई एक साठवण - आरती

बरेच दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात सुनिताबाईंचा काव्यवाचनाचा मुंबईत एक कार्यक्रम झाल्याचे वाचले होते. त्यादिवशी पेपरची घडी घालता घालता 'किती चांगले कार्यक्रम निसटुन जातात' असा विचार मनात आल्यशिवाय राहिला नाही. आणि आश्चर्य म्हणजे आज परत तसेच घडत होते. त्याच कार्यक्रमाचे रेकॉर्डींग पु.ल. देशपांडेंच्या पुण्यतिथी निमीत्ताने यशवंतराव चव्हाण सभाग्रुहात दाखवण्यात येणार होते. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळची होती, तिकीटे उपलब्ध होती, कार्यक्रम पुण्यात होता आणि मी पण पुण्यातच होते. पण तरीही एक मोठ्ठेच प्रश्नचिन्ह होते, जावे की नाही ? कारण असे की सोमवारी माझी परिक्षा होती, फक्त दोनच दिवस माझ्या हातात होते. वर्षभर पुस्तके जणू सोवळ्यात आहेत अशी परिस्थिती होती. हे सगळे एका बाजुला आणि दुसरीकडे कार्यक्रमाचा मोह, तो काही सुटत नव्हता. या संभ्रमातच ऑफीसचा रस्ता संपला आणि जागेवर पोहोचल्या क्षणी मैत्रिणीला फोन करुन 'कार्यक्रमाला जात आहोत' असे सांगितले. कसा ते समजले नाही पण निर्णय झाला हे मात्र खरे.
साधारणपणे तीन तासांचा कार्यक्रम. अगदी सुरवातीपासून ते थेट शेवटापर्यंत क्षण अन क्षण डोळ्यात, कानात, मनात कुठे कूठे म्हणून साठवू असे काहीसे होवून गेले होते. उत्कृष्ठ काव्यवाचन आणि तितकीच सुरेख संवाद साधण्याची पद्धत. काही जुन्या आठवणी, अनुषंगाने आलेले एक दोन विनोदी किस्से, प्रत्येक कविचे एखादे खस असे वैशिष्ट्य. असे कार्यक्रमाचे स्वरुप, अगदी परिपूर्ण.

राम गणेश गडकरींपासून सुनिताबाईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली, ज्येष्ठ साहित्यिक म्हणुन गडकरींचा मान पहिला आहेच परंतु पु.ल. आणि सुनिताबाईंनी त्यांची काव्यवाचनाच्या कार्यक्रमांची सुरुवातही गडकरींच्या कवितांपासून केली होती. गडकरींच्या नाटकं व इतर गद्य लिखाणाचा वाचक वर्ग मोठा होता. परंतु त्यांच्या कविता तितक्याश्या लोकांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यांच्या या तिसर्‍या रुपाचे दर्शन रसिकांना घडावे या हेतुने पु.ल. व सुनिताबाईंनी त्यांच्या कवितावाचनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली.
'गडकरींच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला, चार चौघात जरी भाई हे गमतीने म्हणत असे तरी आत कुठेतरी त्याला या गोष्टीचा अभिमान होता' अशी गमतिशीर आठवण सांगून सुनिताबाईंनी गडकरींची 'मंगल देशा, पवित्र देशा' ही कविता सादर केली. .... मनात विचार आला खरच गडकरींचेच हे चौथे रुप नसेल कशावरुन ? पु.लं. चे लेखन क्षेत्र गडकरींपेक्षा संपूर्णपणे भिन्न होते. त्यांनी न हाताळलेला लेखन प्रकार पु.लं च्या रुपात पुर्ण झाला. म्हणुनच वाटते गडाकरी पु.लं.च्या रुपात आपल्यात नक्कीच आले असतील. एव्हढा मोठा आनंदाचा ठेवा घेउन, एक असामान्य कर्तुत्व, निर्लेप दातॄत्व घेउन. असेच पु.ल ही नक्कीच परत आले असतील. कारण ज्यांना माणसांची ओढ असते ते माणसांमधेच तर परत येणार. आपण फक्त 'पु.लं. च्या मृत्युनंतर नऊ महिन्यांनी माझा जन्म झाला' असे अभिमानाने सांगणार्‍याची वाट बघायची.

गडकरींनंतर आले मर्ढेकर. 'मर्ढेकर हा एकमेव सुटाबुटातला कवी' अशी सुनिताबईंनी मर्ढेकरांची ओळख करुन दिली. साधारणपणे साहित्यिक म्हंटले की अतिशय साधी रहाणी असे चित्र पूर्वी लोकांच्या डोळ्यासमोर होते. अभियांत्रीकी पार्श्वभूमी असलेल्या मर्ढेकरांनी नोकरीत मोठ मोठी पदे भुषविली होती. कविता त्यांची आवड होती, चरितार्थ नव्हता. कदाचित म्हणुनही हा फरक असेल. कुठल्याश्या कार्यक्रमाचे मर्ढेकर अध्यक्ष असताना, पु. ल. व सुनिताबाई त्यांना भेटण्यासठी म्हणुन व्यासपीठावर गेले होते. 'ही माझी बायको', अशी पु.लं नी सुनिताबाईंची ओळख करुन दिली, आणि सुनिताबाईंनी त्यांच्या स्वभावगुणाला अनुसरुन मर्ढेकरांना घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले. मर्ढेकरांनी पण लगेच येण्याचे कबुल केले, पण एका अटीवर, अट कोणती ? तर बेत पिठल भाकरीचा असावा आणि खाली पाटावर जेवायला वाढावे. प्रतिभावंतांमधे अभावानेच आढळणारा साधेपणाचा एक अनोखा रंग. सुनिताबाईंनी निवडलेल्या मर्ढेकरांच्या कविताही अशाच विवीध रंगी. 'या दु:खाच्या कढईचीगा, अशीच देवा घडण असु दे', या कवितेतून जितका मनाचा कणखरपणा प्रतीत होतो, तितकाच नाजुकपणा निथळतो 'दवात आलीस भल्या पहाटे, शुक्राच्या तोर्‍यात एकदा', या ओळींमधून. 'पोरसवदा होतीस काल परवा पावेतो' मधील अवखळपणा, 'असे काहीतरी व्हावे अशी होती दाट इच्छा, असे काहीतरी झाले पुरविते तेच पिच्छा' मधील अगतिकता, सुनिताबाईपण तेव्हढयाच सामर्थ्याने व्यक्त करतात. 'फलाटदादा, फलाटदादा' या कवितेतील 'बोल ना फलाटदादा' म्हणत सुनिताबाईंनी केलेले आर्जव ऐकुन खरंच आता फलाटदादा तरी बोलेल नाहीतर सुनिताबाईंच्या डोळ्यांमधुन अश्रुधारा वाहतील असेच वाटुन गेले. पण शेवटची ओळ संपताच त्या अगदी पूर्ववत होऊन जात. त्यांच असं प्रत्येक कवितेत आत-बाहेर येण-जाण ही तर फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे, लिहिण्या वाचण्याची नाहीच.

सगळ्यात जास्त रंगला तो खानोलकरांचा किस्सा. कवि चिं.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभु मूळ कोकणातले. त्यांच्य वडिलांची कोकणात खानावळ होती. वडिलांना मदत म्हणून खानोलकर गल्ल्यावर बसत असत. तिथे बसल्या बसल्या रिकाम्या वेळात कविता लिहीणे हा त्यांचा छंद होता. खानावळीत नियमीत येणार्‍यांपैकी दोघांची नजर गल्ल्यावर बसलेल्या ह्या तरुणावर असे. हा कागद पेन घेउन इतके पानेच्या पाने रोजच काय लिहीतो असा मोठाच प्रश्न त्या दोघांना पडला होता. मुलगा तरुण आहे आणि अगदी हरवून जाऊन लिहितो आहे म्हणजे नक्कीच प्रेमपत्र असणार, असा निष्कर्ष तर त्यांनी काढलाच पण खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी एके दिवशी त्यातले काही कागद पळवून आपल्या खोलीवर नेले. 'ऊभी लिहितात ती कविता आणि आडवे ते गद्य' एवढीच मराठी साहित्याची ओळख असलेल्या त्या दोघांना आपण पळवून आणल्या त्या, त्या मुलाने लिहिलेली प्रेमपत्रे नसून कविता आहेत असा अर्थबोध झाला. पुढे त्यातल्याच काही कविता त्यांनी मुंबईस मौज प्रकाशनात छापण्यासाठी पाठवल्या. अगदी खानोलकरांच्या नाव-पत्त्यासहित. परंतु तिन-चार महिने वाट पाहुनही जेंव्हा त्या छापून आल्या नाहीत तेंव्हा कविचे चिं.त्र्यं.खानोलकर हे विचित्र नावच त्याला कारणीभूत असावे असे समजून या महाशयांनी मग कविचे नाव बदलून पुन्हा नव्याने कविता छापण्यासाठी पाठवून दिल्या. आणि यावेळेस पत्ता जरी तोच होता तरी नाव होते 'आरती प्रभू'. आश्चर्य म्हणजे यावेळेस कविता छापुनही आल्या आणि स्वतःच्याच प्रतिभेपासून अनभिज्ञ असलेला एक थोर कवि महाराष्ट्राला मिळाला. अचानक मिळालेल्या या अफाट प्रसिद्धीमुळे खानोलकर थोडे विचीत्र मनस्थितीत सापडले. 'आपण कोणीतरी अद्वितीय आहोत' असा अहंकार आपल्यात निर्माण तर होणार नाही ना अशी भिती त्यांना वाटू लागली. आणि कविता जन्मली, 'येरे घना येरे घना, न्हाउ घाल माझ्या मना'. 'एका रिमझिम गावी, भासत आहे हृद्यस्थ तान, पण ...' , 'गेले द्यायचे ते राहून, तुझे नक्षंत्रांचे देणे ...' या सगळ्याच कवितांमधला नेमका भाव सुनिताबाई प्रेक्षकांपर्यंत अगदी थेट पोहोचवतात.

बा.भ.बोरकर, पु.ल व सुनिताबाईंवर त्यांचा विशेष लोभ होता. त्यामुळे बोरकरांच्या कविता त्यांनी अधिकच समरसुन वाचल्या. त्यांच्या आपल्यावर असलेल्या 'विशेष' प्रेमाची जाणीव कशी झाली याची आठवण सांगताना सुनिताबाईंनी सांगितलेला प्रसंग अगदी मन हेलावून टाकतो. बोरकर अगदी अंथरुणाला खिळून होते. या आजारातून आता ते उठत नाहीत, हे सगळे समजून चुकले होते. सुनिताबाई त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेल्या होत्या. बोरकरांना तर उठून बसणे पण शक्य नव्हते. वाचन तर लांबची गोष्ट. म्हणुन त्यांनी सुनिताबाईंना आपली 'समुद्राची' कविता म्हणुन दाखवण्याची विनंती केली. ती बोरकरांची अगदी सुरुवातीच्या काळातली कविता असल्यामुळे सुनिताबाईंना पाठ नव्हती. शेवटी बोरकरांच्या मुलीच्या मदतीने घरातच शोधाशोध करुन, पुस्तक मिळवून सुनिताबाईंनी बोरकरांना कविता वाचुन दाखवली. कविता संपता संपताच ते कोमात गेले आणि दोनच दिवसांनी ही दुनिया सुद्धा सोडून गेले. मृत्यूशय्येवरही 'समुद्र बिलोरी एना, सृष्टीला पाचवा महिना' सारखी अवखळ कविता एकण्याची इच्छा करणारा कवि किती तरुण मनाचा असेल याची कल्पना येते. यानंतर बोरकरांच्या एक से बढकर एक कवितांची उधळणच होती. 'सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग', 'हवा पावसाळी, जरा रात्र काळी', 'मी विझल्यावर त्या राखेवर', 'कळत जाते तसे, कसे जवळचेही होतात दूर', सगळ्याच कविता सुनिताबाईंनी अप्रतिम सादर केल्या.

कार्यक्रम कितीही रंगला तरी शेवट हा अपरिहार्यच असतो. या कार्यक्रमाचा शेवट सुनिताबाईंनी त्यांची प्रिय सखी 'पद्मा गोळे' यांच्या दोन कवितांनी केला. 'आता मी नसतेच इथे' ही कविता अगदी मनाला चटका लाउन गेली. सुनिताबाई त्यांच्या मनातले भाव तर बोलत नाहीत ना, असे काहीसे क्षणभर वाटून गेले. आज-काल त्यांचे एकटे-एकटे रहाणे आणि कवितेचा आशय यात कुठेतरी साधर्म्य जाणवले. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे 'चाफ्याच्या झाडा' या कवितेचे सादरीकरण, कविता अर्थातच पद्माबाईंची. पण ही माझीच कविता आहे असे सुनिताबाईंनी म्हंटल्यामुळे कोड्यात पडलेल्या प्रेक्षकांसमोर, त्या मागचे गुपीत उलगडत सुनिताबाईंनी ती कविता जेंव्हा सादर केली तेंव्हा अंगावरचे रोमांच टाळ्यांचे रुप घेउन प्रेक्षागृहात दुमदुमले.


'चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा,
का बरे आलास आज स्वप्नात ?
तेंव्हाच तर आपलं नव्हत का ठरल,
दु:ख नाही उरल आता मनात'.


[* माझी हिंमत अशी की, काही कामाने गेले असता, मी हे लिखाण सुनिताबाईंना वाचायला दिले. हे सगळे मी माझ्या स्मरणशक्तीच्या भरवश्यावर लिहिले होते. वरील लिखाणात मी कवियत्री पद्मा गोळे यांचा उल्लेख 'सुनिताबाईंची प्रिय सखी' असा केला आहे.
"तुमच्या लिखाणात एक चुकीचा संदर्भ आहे, त्या माझी सखी आहेत असे मी कधीच म्हंटलेले नाही. त्यांचा आणि भाईचा स्नेह होता" असा शेरा मला सुनिताबाईंकडून मिळाला. 😊*]

- आरती.
[२००३ च्या हितगुज दिवाळी अंकातुन]

पु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री ?

पुलस्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतून माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली


असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.

'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात "सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात" असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने 'पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला!' असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं.

व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे.

जगभरच्या अनेक देशांत
देशस्थ होऊन फिरले
पण मनातील मराठीपणा
कधी मावळला नाही -
दुनियेच्या बाजारपेठेत
मनमुराद वावरले
पण काळजातील बुद्ध
कधी काळजाला नाही


पुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फक्त एकाच लेखात बसवणं शक्य नाही. म्हणूनच पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनाचे विविध पैलू आपण यानंतरच्या भागांमधून बघणार आहोत. आपल्या ओळखीच्या पुलंची आणखी ओळख होईल. ज्यांना पुलं माहिती नाहीत त्यांनाही जाणून घेता येईल. पुलंच्या अनेक अनोळखी पैलूंची नव्याने ओळख होईल, प्रेम असेल ते आणखी डोळस होईल.

-आराधना जोशी
yashara@rediffmail.com

बळवंत मोरेश्वर पुरंदरे

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेब पुरंदरे वरील लेख

मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून एका पुस्तकाच्या दुकानात शिरलो. केवळ योगायोगाने काउंटरवर पडलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड हाती पडला. साऱ्या महाराष्ट्रातल्या शुभदेवतांना केलेल्या सुरुवातीच्या आवाहनानेच मनावरची धूळ झटकली. “सुदिन सुवेळ मी शिवराजाच्या जन्माचं व्याख्यान मांडलंय-आई, तू ऐकायला ये” ही तुळजाईला घातलेली हाक जिवाला चेतवून गेली. त्या शिवचरित्रातला ‘उदो उदो अंबे’चा जागर म्हणजे महाराष्ट्राचा पाना- दोन पानांत उभारलेला सांस्कृतिक इतिहास आहे. बळवंत मोरेश्वर पुरंदरे नामक कोण्या इतिहासकाराने लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला खंड वाचत मी काउंटरपाशीच खिळून राहिलो. ते दहाखंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले. आपण काही तरी अद््भुत अनुभवातून न्हाऊन बाहेर पडल्यासारखे वाटले. महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या धन्यतेने मी फुलून निघालो होतो.

जगण्यासाठी महत्त्वाची गोष्ट मिळवावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. पुरंदऱ्यांना हे प्रयोजन वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षीच गवसले. एका ड्रॉइंग मास्तराच्या बळवंत नावाच्या मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीचच ‘शिवाजी’ म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद, गोंडेदार भाषा लिहितो; पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही, वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.

पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोहायची ऐट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो, की “माझ्या रचनेतल्या चुका दाखवा. पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही. ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं असेल तर ते पाखडून फेकून द्यायला हवं! इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही.” त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, “शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा, असा ह्या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालीन.” आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत.

पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना-म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना-इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगतदार भाषेत बोलतानादेखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न अलिप्तपणा सांभाळू सकतात. आज इतकी वर्षे मी त्यांच्या तोंडून शिवचरित्रातले प्रसंग ऐकतो, पण कधी मुसलमान व्यक्तीचा मुसलमान म्हणून त्यांनी तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला मला स्मरत नाही. परधर्मीयांची कुचेष्टा नाही. अवहेलना नाही. इतिहास ही वस्तू अनेक जण अनेक कारणांनी राबवतात. खुद्द शिवाजी महाराजांचे चित्र दुसऱ्या महायुद्धात रिक्रूटभरतीसाठी राबवले होते. “सोळा रुपये पगार, कपडालत्ता फुकट…शिवाजी न्यायासाठी लढला” हे पोस्टर अजून आठवते. काहींना इतिहासातले नाट्य रुचते. काहींचा रोख आजवर झालेले इतिहास संशोधन चुकीचे होते आणि आपलेच कसे खरे हे अट्टहासाने दाखवण्यावर असतो. इतिहासाचे काही भक्त तर सदा उन्मनी अवस्थेतच असल्यासारखे वागतात. उगीचच ‘रायगड रायगड’ करीत उड्या मारण्याने शिवरायांवरची आपली निष्ठा जाज्वल्य असल्याची लोकांची कल्पना होते, अशी यांची समजूत असावी; पण शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असायला प्रत्येक किल्ल्याचा चढउतार केलाच पाहिजे, असे मानायचे कारण नाही.

दरवर्षी रायगडावर जाऊन डोळे गाळायचे ही शिवभक्ती नसून शिवभक्तीची जाहिरात आहे. आणि म्हणूनच गड-कोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळ सूत्र जो विवेक न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही-ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे “हरहर ! गेले ते दिवस!’’ असले उसासे टाकीत पाहिले नाही.

पुष्कळदा वाटते की, त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढग्रस्त! त्यातून पुरंदऱ्यांचे खानदान मोठे! वडील भावे स्कुलात ड्राॅइंग मास्तर. पर्वतीच्या पायथ्याशी पुरंदऱ्यांचा वाडाही आहे. भिक्षुकी, मास्तरकी हे व्यवसाय अफाट दैवी संपत्तीचे धनी करणारे. त्या धनातून मंडईतली मेथीची जुडीदेखील येत नसते. महागाईच्या खाईत भारत इतिहास संशोधक मंडळाकडून मिळणारे माहे पाऊणशे रुपये घेऊन पुरंदऱ्यांनी संसार सजवला. रुपयांचा अखंड शेकडा एकजिनसी न पाहिलेले ग. ह. खरे हे पुरंदऱ्यांचे गुरू. ऋषी हा शब्द फारच ढिलेपणाने वापरला जातो; पण ऋषी म्हणावे अशी खऱ्यांसारखी माणसे क्वचित आढळतात. खऱ्यांचे सहायक म्हणून पुरंदऱ्यांनी खूप वर्षे भारत इतिहास संशोधक मंडळात काम केले.

वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. हा माणूस किती शांतपणे माणसांच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्वदिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे. शब्दकळा तर अतिशय साजरी आहे. सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. “मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही, किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही” हे सांगायची त्यांनी भीती वाटत नाही.

इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रांइक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदऱ्यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद््गार काढावेत इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्यशाहिरासारखा. त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात. इतिहास हा “माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकी-सुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,” असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी – लोकशाहीला अत्यंत पोषक भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो.

वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून आजतागायत आपल्या सुखाचे, स्वास्थ्याचे नव्हे, तर आयुष्याचे दान देऊन गोळा केलेले हे शिवचरित्राचे हे धन. एका मास्तरचा हा मुलगा शिवरायाचे चरित्र आठवीत आडरानातल्या वडपिंपळाखाली पालापाचोळ्याचे अंथरूण आणि दगडाची उशी करून झोपला. हल्ली रस्त्यारस्त्यातून जिल्हा परिषदेच्या जीपगाड्या धावताना आढळतात.

शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा शोधत जाणाऱ्या पुरंदऱ्यांना कोण जीपगाडी देणार! पार्लमेंटात हात वर करण्यापुरते जागे असणाऱ्या सभासदांना आसेतुहिमाचल आगगाडीच्या पहिल्या वर्गाचा फुकट पास असतो. पुरंदरे कुठल्याशी गावी कागदपत्रं मिळायची शक्यता आहे, हे कळल्यावर थर्ड क्लासच्या खिडकीपाशी तिकिटासाठी रांग धरून उभे असतात !

निरनिराळ्या जागा धरून किंवा अडवून ठेवण्याच्या ह्या युगात उदात्त वेडाने झपाटलेली माणसे एकूणच कमी. बाराशे मावळे दीड लाख मोगली फौजेचा धुव्वा उडवीत होते. कारण ते बाराशे मावळे “हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा!” ह्या शिवाजीराजाने त्यांच्या कानी फुंकलेल्या मंत्राने झपाटलेले होते. कोणत्याही कार्याच्या सिद्धीला असा एखादा मंत्र लागतो; पण सिद्धीपेक्षा प्रसिद्धी मोठी, अशी भावना रुजायला लागते तेव्हा माणसांची बाहुली होतात. पुरंदरे शिवाजीचे चरित्र गाईन हा संकल्प सोडून जगताहेत. इतिहासाच्या त्या धुंदीत वावरणाऱ्या पुरंदऱ्यांना वर्तमान आणि भुताची चित्रे एकदम दिसतात. हे दिसणे भाग्याचे ! ही भाग्याची वेडे !

– पु. ल. देशपांडे

Friday, April 17, 2020

गल्ली चुकलं काय ओ ह्ये... पी. एल. ?

पाचवी-सहावीत असताना मामाने त्याच्या मित्राचा टेपरेकॉर्डर त्याच्याकडील कॅसेट सहित विकत घेतला व तो आमच्याच घरी आणला त्यावेळी गाण्याच्या कॅसेट्स मधून त्याने दोन कॅसेट मला दिल्या व म्हणाला, 'मंद्या तुझ्यासाठी ही 'पुलं' ची कॅसेट आणलीय ती ऐक ! त्यात एका कॅसेटवर 'बिगरी ते मॅट्रिक' व 'म्हैस' तर दुसऱ्या कॅसेटवर 'रावसाहेब' व 'अंतुबर्वा' होते. त्यानंतर पुढची कथाकथने वडीलांनी ऐकायला लावली. तेव्हापासून 'पुलंबागेत' प्रवेश केला. त्यानंतर आजतागायत त्यांची बरीच कथाकथने अतिशयोक्ती नाही हजारो वेळा ऐकली हे अभिमानाने सांगतो पण प्रौढी म्हणून नव्हे तर प्रांजळपणे ! 'पुलं' च्या 'बंदा' रुपयासारखं व रुपयाइतकं असलेल्या साहित्यांत मी फक्त 2-4 पैसेच साहित्य वाचलं-ऐकलं आहे. आजही 'पुलं' चे काही परवलीचे शब्द सर्रास वापरले जातात... घरात मुलींना सतत ऐकत जा म्हणून आग्रह होतो. गेलेल्या एखाद्या मागच्या पिढीतील कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांच्याबद्दल बोलले जाते. मुलींच्या मनातही त्यांची 'आजोबा' ही प्रतिमा तयार झाली आहे.

सध्या सगळीकडे गाजत असलेला 'भाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या पिक्चरला सहकुटुंब जाऊ असे ठरले. नाहीतर बाकीचे बरेच चित्रपट बघू निवांत, ही मानसिकता असते. त्यामुळे पिक्चरला थेटरात गेलो आणि 'गणित चुकल्यासारखा परत आलो' तसे बरेच चेहरे दिसले पण चौकात धाडकन पडल्यावर 'काय लागलं का रे ?' यावर प्रत्येकाचीच 'काय नाही - काय नाही' अशी अवस्था होते तशी झालेली काही 'पुलं प्रेमींची' दिसली ! बाकी पिक्चरमध्ये सुरुवातीचा डोळे ओलावणारा प्रसंग, भाई, आदरणीय सुनीताबाई, भीमसेनजी, गदिमा, कुमारजी, वसंतराव देशपांडे, आचार्य अत्रे, मा. बाळासाहेब ठाकरे, जब्बार पटेल, बाबा आमटे यांच्या भूमिका करणारे सर्वच कलाकार व झकासपैकी छप्पर उडवणारी शेवटची मैफिल एवढेच मनात घर करणारे होते मात्र 'गबाले' थोडंफार 'झेंडे' सारखंच बोलत होते. बाकी 'पुलं' च्या 'रावसाहेबांच्या' भाषेत 'गल्ली चुकलं काय ओ ह्ये पी. एल. ? असच होतं !

खरं तर 'श्यामची आई' नंतर कुणाला न दिसेल असं मुसमुसुन रडायला किंवा खळखळून हसायला गेलो होतो पण दोन्हीपैकी एकही पोटभर झालं नाही. एवढा ! 'अंतुबर्वा' व 'रावसाहेब' या व्यक्तिरेखा 'पुलं' च्या तोंडून ऐकल्यावर माझ्यासारख्या कलाक्षेत्रातील अडाणी माणसाला देखील कोणत्याही मैफिलीत पहिल्या रांगेत बसण्याचं धाडस 'पुलं' साहित्यानं होतं तर तुमच्यासारख्याना ते का कळू नये ? असा प्रश्न निर्माण होतो.

'शतकोनी' 'पुलं' कोणत्याही अंगाने दाखवू शकता त्याला दारू व सिगारेटचाच अट्टाहास कशाला ? प्रत्येकवेळी आपलं तुम्ही काय वाट्टेल ते दाखवायचं व आम्ही निमुटपणे बघायचं. घरी आल्या आल्या धाकटी कन्या म्हणाली 'काय ओ बाबा इतक्या जुन्या काळात 'पुलं' आईसमोर कसे सिगारेट ओढत होते ?' आता तिच्यासमोर काय म्हणून बोंबलायचे ? तुमचा जसा 'अंतुबर्वा' मधील प्रसंगासारखं 'आग्रह नाही आमचा' पिक्चर बघायला या असं म्हणणं असेल तर त्याच प्रसंगातील 'गावात आग्रहाचे बोर्ड टांगलेत' हे त्यावर उत्तर आहे ! त्यातीलच 'ओ जावाईबापू ' .. 'जमला काय एकच प्याला' ? .... 'लागे हृदयी' अगदीच पिचकवणी म्हटलं'...पुढचं 'कशी या त्यजू पदाला' जमले फक्कड तर थाळीत चार आणे जास्त टाकीन' या प्रसंगाचीच आठवण झाली ! 'जमत नाही तर हुंभपणा कशाला ? नवीन पिढीलासुध्दा 'भाई' साहित्यरुपाने प्रिय होतीलच यात माझ्यासारख्याच्या मतांची गरजच नाही. त्यापेक्षा 'पुलं' गेल्यावर तेंव्हाच्या अल्फा मराठीने संत कबिरांच्या दोह्याचं पं. कुमारजींच्या आवाजातील 'उड जायेगा हंस अकेला ।

जग दर्शन का मेला ।।' या टायटल वर एक biography काढलेली सर्वोत्तम होती. अशी एक 'पिंक' टाकतो ... बाकी आम्ही पटलं नाही तर अशाच 'पिंका' टाकणार ! पण 'यमकाचं' ज्ञान नसताना सुद्धा 'ते प्राचीला काय ते शिंदळीच म्हणाला ते त्यात तेवढं 'गच्ची' बसतं का बघा की' असा 'रावसाहेबासारखा' निरागसपणे आग्रहही करणार हे नक्की !

त्यांच्या अनेक साहित्यांमधून त्यांनी सूर्यप्रकाशाइतक स्वच्छ सांगितलं असताना जो दाखवायचा अट्टाहास केला हे बघून 'भाई' सारख्या महान विभूती बद्दल लिहिताना कवी 'संदीप खरे' च्या ओळी ओठांवर येतात -

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो .!

(विशेष सूचना - हा लेख लिहिण्यास मी कोणी मोठा लेखक, साहित्यिक, समीक्षक, दिग्दर्शन किंवा निर्मिती क्षेत्रातील जाणकार मुळीच नाही माझी डिग्री एकच ते म्हणजे 'पुलं प्रेमी' याची नोंद घ्यावी..!)

©मंदार मार्तंड केसकर, पंढरपूर
9422380146
mandar.keskar77@gmail.com

आनंदयात्री पु. ल.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कॅनव्हासवर चमकत राहणारं एक महत्वपूर्ण नाव

पु. ल. देशपांडे...

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...आपणा सर्वांचे लाडके भाई.

साहित्य, संगित , नाट्य क्षेत्रात केवळ स्वत:च्या आनंदासाठी स्वैर संचार करणारं व्यक्तिमत्व..

पु.ल सांगतात,उत्तम साहित्याचं वाचन, सुस्राव्य गायनाचं श्रवण आणि उत्तम नाट्याचं दर्शन या गोष्टी त्यांना चोरून कराव्या लागल्या नाहीत. त्या त्यांना सहजपणे प्राप्त झाल्या. केवळ स्वानंदासाठी ते त्यात रममाण झाले.मातुल घराणं दुभाषींच. आई, आजी , आजोबा सर्वच गायन वादन कलाप्रेमी. बालपणीच ग्रंथालयात जाऊन भाईंनी अनेक पुस्तके वाचली. ग.दि. माडगुळकर ,सुधिर फडके ( बाबुजी), यांच्या सोबत महाराष्ट्राच्या पवित्र भुमीत परमेश्वारानं आणखी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला घातलं. संतांच्या या भुमीला पावन केलं. तो दिवस होता ८ नोव्हेंबर १९१९. मराठी महिना कार्तिक. वेळ दुपारी अडीच. पु.लं.च्या आई सांगतात ,जन्मल्यावर काही सेकंद ते रडलेच नाहीत. सुईणीनं त्यांच्या हातावर , कपाळावर टोचलं. मग ते मोठ्यांदा रडले. ..जगाला हसविण्यासाठी जन्माला आलेलं मूल रडणार कसं?..वैद्यक शास्त्राच्या समाधानासाठी नवजात अर्भकाला रडवावं लागलं. रडलंही ते. आता हा जो निष्कर्ष मी काढला त्याची पु.लं नी हयात असते तर खिल्ली उडवली असती. मला थेट ‘ सखाराम गटणेच्या ‘ पंगतीत बसवलंअसतं. आपण काही ‘साहित्य साधना ‘ केल्याचं पु. ल. ना मंजूर नव्हतं. जे काही घडलं ती आनंदातातून आनंदासाठी आपोआप घडलेली क्रिया. पु.लं. चं म्हणणं, ब्रम्हदेवानं, आनंद निर्मितीसाठी मला पृथ्वीवर पाठवलं. स्वर्गारोहण झालंच आणि ब्रम्हदेवांनी विचारलं “ तू काय केलंस पृथ्वीवर ? आहे काही पुरावा?”..
तर सांगेन “ मी अनेकांना खळखळून हसवलं. ते आनंददायी हास्य हाच त्यासाठींचा पुरावा”. अशा या अद्वितीय व्यक्तीच्या जन्मशताब्धीचं हे वर्ष. नोव्हेंबर १९७९ ला पु. लं. ना साठ वर्षे पुरी झाली.त्यावेळी प्रसारीत झालेल्या ध्वनीफितीत ही माहिती उपलब्ध आहे.

केवळ हास्य आणि आनंद निर्मितीसाठी भाईंनी विविध कलांच्या क्षेत्रात मुशाफिरी केली. दिग्गजांनी त्यांच्या गुणांना हेरलं. त्यांचं स्वागत केलं. मी तर म्हणेन हा ईश्वर निर्मित योगायोग. तरूण वयात सुरांचे गंधर्व, बालगंधर्व, यांचे शेजारी बसून पेटी वाजविण्याचं भाग्य भाईंना लाभलं. बालगंधर्वांनी मान डोलवून पेटी वादनाला उत्स्फुर्त दाद दिली.आचार्य अत्रे हे पुलंचे आवडते वक्ते. श्रोत्यांशी भाषणातून संवाद साधण्याचं आचार्य अत्र्यांचं तंत्र आपल्याला भावल, असं पु.ल.नी आवर्जून नमूद केलंय. कवितांना चाली लावण्यातला चिरतरूण मनाचे कवी बा. भ. बोरकर यांचा काव्यअविष्कार भाईंना अतिशय आवडला. खुद्द बोरकरांच्या तोंडून कवितांना लावलेल्या चाली ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. चार्ली चापलीन आणि रविंद्रनाथ टागोर यांना पु.ल. आदर्श स्थानी मानीत. महाराष्ट्राच्या या प्रतिभासंपन्न साहित्यिकाच्या साहित्याची ओळख करून घेताना त्या मागची मानसिकता नीट लक्षात यावी या साठी वरील गोष्टी नमूद केल्या आहेत.


पु.ल. देशपांडेचं साहित्य काल होतं, आजही तितकंच टवटवीत आहे. येथून पुढेही ते तसंच, त्याच दिमाखात पुढच्या पिढीसाठी कायम टिकून राहणार . अशा साहित्याला ‘ ‘वांग.मय ‘ म्हणतात. सुप्रसिद्ध प्रवचनकार , विद्या वाचस्पती, शंकर अभ्यंकर यांनी या संदर्भात उदबोधक खुलासा केला आहे. साहित्य निर्माण होतं. काही काळ टिकतं. कालौघात विराम पावतं. नष्ट होतं. जे साहित्य भूत, वर्तमान आणि भविष्य काळातही टिकून राहतं, त्यालाच वाग.मय संज्ञा दिली जाते.

असो आता पु. लं. च्या साहित्यातील सौंदर्य स्थळ शोधण्याचा हा एक स्वल्प प्रयत्न....
सखाराम गटणे, चितळे मास्तर , हरी तात्या, नामू परीट ही सारी व्यक्तिचित्र पु. ल.नी वाचकांसमोर उत्तम प्रकारे सादर केली .मी तर म्हणेन त्या व्यक्तिचित्रात्मक कथाच आहेत. एक प्रमूख व्यक्ती आणि तिच्या सहवासात प्रसंगोपात येत रहणारी इतर माणसं या सर्वांना एका सुत्रात गुफंत प्रमूख व्यक्तीचं चित्र खुलवणं हाच प्रधान हेतू. वाचकांची पराकोटीची समरसता त्या पात्राला अजरामर करते. आजही पु.ल. म्हटलं की अंतू बर्वा , चितळे मास्तर इत्यादींची पटकन आठवण येते.

पु.ल. चं भाषा सौष्टव अप्रतिम.

ज्या प्रांतातील, प्रदेशातील कथानायक असेल तेथे बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेचा अगदी परिणामकारक वापर त्या पात्राच्या मुखातून ऐकताना वेगळीच अनुभुती येते. कथेतून विनोदाची मुद्दाम निर्मिती केल्यासारखी वाटत नाही. मात्र विसंगती अवतरते तेंव्हा ती प्रभावीप्रमाणे श्रोत्यांपर्यंत/ वाचकांपर्यंत पोहचल्याने ते खळखळून हसतात. पु.ल.नी रेखाटलेला कोणताही नायक मला विदुषकी थाटाचा वाटत नाही. मग सखाराम गटणे असो, हरीतात्या असो वा चितळे मास्तर असो. कुणीही आचरटपणा वा विदुषकी चाळे करून उगाचच हसविण्याचा लटका प्रयत्न करत नाही. विसंगती हेरून ती दाखविण्याचं पु.लं. च कसब फारच छान. त्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ दर्शन घडविण्यासाठी त्याची अंगीभूत विकृती दाखवली जाईल. ती हसण्यासाठी नसते तर वाचकाच्या / श्रोत्याच्या मनात ती कारूण्य भावच निर्माण करील. पु.ल. म्हणूनच तुम्ही ग्रेट आणि वेगळे वाटता. वर बऱ्याचदा मी ‘ वाचक/ श्रोता ‘ असा शब्द वापरलाय. मी पु.ल.चं साहित्य वाचलं. ते मला आनंद , समाधान देऊन गेलं. अगदी मनापासून सागतो माझा आनंद शेकडो प्रतीनं वृदिंगत झाला, जेंव्हा याच कथा त्यांच्या आवाजात कथाकथनातून ऐकल्या.पु.ल. तुम्ही उत्तम कथाकथनकार आहात..प्रत्येक कथाकथन हा एकपात्री प्रयोग.तुमच्या कथाकथानाच्या कॅसेट/सीडीज दिव्याऔषधीच .आलेला थकवा निघून जातो. गालातल्या गालात हसताना मन आनंदाने डोलू लागते.

हे सारं का घडतं?....कारण स्पष्ट आहे. लेखक तर तुम्ही आहातच. पण त्याचबरोबर तुम्ही उत्तम नट आहात. आवाजातील चढउतार, सुयोग्य फेरफार यांच्या द्वारे कथा समर्थपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचवता.‘ हरातात्या ‘ कथा ही याचे उत्तम उदाहरण.मुलांच्या डोक्यावर विकायच्या छत्र्यांचे ओझे. त्यांना घेऊन निघालेले गोष्टी वेल्हाळ हरीतात्या . रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर ही संतमंडळी. तसेच शिवाजी, संभाजी, इत्यादी इतिहासातील मंडळी.यासर्वांचं व्यक्ती दर्शन घडवताना हरीतात्यांच्या मुखातून पु. ल. जे बोलले ते वर्णन करून सांगणं मलाही अवघड वाटतंय.
तुम्ही ती सीडी ऐकाच. एका नटश्रेष्टाचं तुम्हाला दर्शन घडेल. पु. लं.ची गाजलेली ‘ म्हैस ‘ कथा.

या कथेत पु.लं. नी निर्माण केलेली वातावरण निर्मिती इतकीप्रत्ययकारी आहे की असं वाटावं की जणू काही आपण रस्त्यावर उभे आहोत आणि मधोमध आडव्या पडलेल्या बहुचर्चित म्हशीला पहात आहोत. असे आपले सर्वांचे लाडके पु. ल. साहित्य रुपात आपल्यात आहेत...चिरकाल रहातील. खरं सांगू का. पु. ल.नी ब्रम्हदेवाला आता काही पुरावा देण्याची गरज नाही. प्रत्येक साहित्य रसिक स्वर्गात पोहोचला तर भाटासारखा सांगत सुटेल.. पु.लं. नी आम्हाला हास,हास,हसवलंय. पुरावा गोळा करण्यासाठी तूच आम्हाला पृथ्वीवर घेऊन चल.....


पु.लं. च्या स्मृतींना शतश: वंदन
--सुरेश त्र्यंबक पाठक

Thursday, April 16, 2020

निवडक अ-पुलं - कुमार जावडेकर

पु, लं. चा विनोद आपल्याला पुनः पुन्हा हसवत असतो.
त्यांची आठवण, त्यांची पात्रं आणि त्यांच्यासारखी शैली पुनश्च वाचकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न! 'पु. ल. - अखेरचा अध्याय', 'बटाट्याची चाळ - बाजीराव आणि मस्तानी', इत्यादी कथांमधून.
आणि त्याचबरोबर थोडंसं अ-पुलंही! -
काळानुसार बदललेल्या अनेक नवीन व्यक्ती आणि वल्लींतून.
अन् प्रसिद्ध घटनांच्या आणि व्यक्तिमत्त्वांच्या उडवलेल्या खिल्लीतून!'पु. ल. - अखेरचा अध्याय' हा लेख कथाकथनाच्या स्वरूपात सादर केला त्याचा 'यू ट्यूब'चा दुवा.
समाजमने सांधणारा पूल

'बालगंधर्व'च्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान भूषविणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचा मोलाचा वाटा होता. बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती करायचे ठरल्यापासून त्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वास्तूचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना वेळोवेळी पुलंचे मार्गदर्शन लाभले. १९६२मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि १९६८मध्ये ती बांधून तयार झाली. या कालावधीत जातीने वास्तूला भेटी देऊन, रंगमंच, आसनव्यवस्था, नाटकासाठी लागणाऱ्या इतर तांत्रिक बाबींची पाहणी करून, 'पुलं'नी या नाट्यगृहाला पुण्याच्या वैभवात भर घालणारी वास्तू म्हणून उभे केले.

केवळ बालगंधर्वची वास्तू नाही, तर आजूबाजूचा परिसरही वेगवेगळ्या कलांसाठी समर्पित असावा, अशी 'पुलं'ची भावना होती. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, त्यांनी वास्तूच्या जडणघडणीवर जातीने लक्ष ठेवले होते. एखाद्या कलाकाराचा या वास्तूच्या निर्मितीत सहभाग असायला हवा, असा 'पुलं'चा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी 'बालगंधर्व'ची संकल्पना मांडून, त्याच्या निर्मितीप्रक्रियेत भरीव योगदान दिले. या नाट्यगृहाच्या माध्यमातून पुलंनी पुणेकरांना एका सांस्कृतिक केंद्राची भेट देऊन, पुढील अनेक वर्षे येथील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली.

सामाजिक भान अचंबित करणारे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे सामाजिक भानही अचंबित करणारे होते. या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना देणग्या दिल्या. मुस्लिम समाजातील पीडित महिलांना मदत व्हावी, या भावनेतून ८०च्या दशकात त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाला जवळपास ४० हजार रुपयांची मदत दिली. पुलंच्या सहधर्मचारिणी सुनीताबाई यांनी ही रक्कम मंडळाचा अध्यक्ष म्हणून माझ्या हवाली केली, असे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यद भाई यांनी सांगितले. ते म्हणाले, 'पुलं आणि सुनीताबाईंना मंडळाच्या कार्याची चांगलीच माहिती होती. लिमयेंच्या पूनम हॉटेलमध्ये लिमये, हरिभाऊ परांजपे, नंदा नारळकर यांच्यासोबत आमची पुलं, सुनीताबाईंशी भेट व्हायची. त्या वेळी मंडळाच्या कार्याचा तपशील ते जाणून घेत. तो काळ निराळाच होता. पुलंनी सढळ हस्ते मदत केली होती. ८० च्या दशकात सामाजिक सुधारणेसाठी काम करणाऱ्या संस्थेला ४० हजारांची देणगी देणे हेदेखील धाडसच. त्यांच्या कर्तृत्व व दातृत्वाला सलाम!'

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून, व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने डॉ. अनिता व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची २९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयातील एका वॉर्डमध्ये स्थापना केली. पुलंनी सुरुवातीला आर्थिक मदत केली आणि 'मुक्तांगण' हे नावही त्यांनीच सुचविले. याविषयी डॉ. अनिल अवचट म्हणाले, 'बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पुलंनी पुढाकार घेतला होता. तेथील वस्ती उठवून लोकांची कसलीही जबाबदारी न स्वीकारता प्रशासनाने काम सुरू केले. या विरोधात मी 'साधना' साप्ताहिकात लेख लिहिला. पुढे पुलंची भेट झाली. ते रागावले नाहीत, तर त्यांनी प्रेमाने जवळ घेतले आणि मी त्यांचा मुलगा झालो. मी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'गर्दचे ग्रहण' ही लेखमाला लिहिली होती. लेख वाचून पुलं अस्वस्थ झाले. त्यांनी आम्हाला बोलवून घेतले. ते दर वर्षी संस्थांना मदत करायचे. व्यसनाधीनतेच्या विरोधात आम्ही काम सुरू केले होते. सुनंदा (अनिता) म्हणाली, 'केंद्र काढू'; पण काहीच तयारी नव्हती. पुलंनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आधी एक लाख रुपये व नंतर अडीच लाख रुपये दिले. 'तुमच्या केंद्राला मी शुभेच्छा कशा देऊ,' असा प्रश्न करून, ते म्हणाले, 'हे काम संपून केंद्र लवकरात लवकर बंद पडावे आणि येथे एक सांस्कृतिक केंद्र उभे राहावे.' पुलं पेशंटचे अनुभव ऐकून गलबलून जायचे. 'यांच्या मुलांनी काय पाप केले आहे रे,' असे ते म्हणायचे. पुलंचा प्रभाव इतका, की त्यांनी मदत केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.'

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

अंधश्रद्धेच्या विरोधात व्यापक चळवळ उभी करायचे, असे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ठरवले, तेव्हा त्यांच्यामागे उभे राहिलेले पुलंच होते. ही आठवण दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितली. ते म्हणाले, 'डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. तेव्हा समितीच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. हा जाहीरनामा म्हणजे समितीची भूमिका, उद्दिष्ट आणि कर्तव्य स्पष्ट करणे होते. या जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी कुणी केली असेल, तर ती पुलंनी. ज्येष्ठ समाजवादी नेते ना. ग. गोरे यांच्याबरोबर पुलंनी पहिली स्वाक्षरी करून महाराष्ट्र अंनिसच्या कामाला पाठबळ दिले. 'का?' या विषयावरील लघुपटात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा याविषयी पुलंनी महत्त्वाची भूमिका मांडली. महाराष्ट्र अंनिसच्या स्थापनेआधी बाबांनी साताऱ्यामध्ये वंचित मुलांच्या शिक्षणासाठी एकता शिक्षण प्रसारक संस्था काढली, तेव्हा पुलंनी आर्थिक मदत केली.' 'साधना' साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, 'पुलंचे वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांच्याशी मैत्र होते. हे दोघेही 'साधने'चे संपादक! आणीबाणीच्या काळात पुलंचा 'साधने'शी संबंध आला. याच काळात जयप्रकाश नारायण यांनी तुरुंगातील अनुभवावर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद पुलंनी केला, जो साधनेने प्रसिद्ध केला.'

विद्यार्थी सहायक समिती

'तरुण वर्गात वैचारिक देवघेव करणारी वसतिगृह चळवळ महाराष्ट्रात फोफावली पाहिजे,' अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचा गौरव केला होता. पुलंचा विद्यार्थी सहायक समितीशी घनिष्ठ संबंध होता. ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या गरजू, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि भोजनाची सोय करण्यासाठी प्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी १९५५ मध्ये या समितीची स्थापना केली. 'अच्युतरावांचे हे कार्य पुलंना खूप भावले होते,' अशी आठवण समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी यांनी जागवली. 'दिवेकर नावाच्या गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून नवीन वसतिगृहात बांधलेल्या विंगचे उद्घाटन रावसाहेब पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पुलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर निर्मलाताई पुरंदरे यांच्या माध्यमातून पुलंनी समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रासाठी सहा हजार रुपये देणगी दिली. त्यांचे नावही या केंद्राला देण्यात आले आहे. पांडुरंगशास्त्री आठवलेंनी वसतिगृहात बुद्धिमंतांचा मेळावा घेतला होता. त्या वेळीही पुल उपस्थित होते. समितीच्या कार्याला पुलंचे नेहमीच पाठबळ असायचे,' असे तांबोळी यांनी आवर्जून नमूद केले.

याही चळवळींना मदत

'लेखक म्हणून मला मिळालेले एक लाख रुपये जुन्या अनमोल ग्रंथांच्या जपणुकीसाठी एशियाटिक सोसायटीला देत आहे,' असे पुलंनी लिहून ठेवले आहे. पुलंनी मिरजच्या खरे मंदिराला मुक्तांगण सभागृह बांधून दिले. राष्ट्र सेवा दलाशी त्यांचा जवळचा संबंध होता. याशिवाय भीमराव गस्ती करत असलेल्या देवदासी स्त्रियांच्या कामाला पुलंनी मदत केली. कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट, आनंदवन, लोकमान्य सेवा संघ पार्ले, मिरज विद्यार्थी संघ, मराठवाडा साहित्य परिषद, एनसीपीए, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रामबाल शिक्षा केंद्र, रमाबाई आंबेडकर मुलींची शाळा नाशिक, महाराष्ट्र विज्ञान परिषदेची प्रयोग शिबिरे, अस्मितादर्श नियतकालिक, विटा येथील रघुराज मेटकरी यांची संस्था अशा विविध संस्था व चळवळींना पुलंनी लाखो रुपयांची मदत केली आहे. पानशेत पूरग्रस्तांना व किल्लारी भूकंपग्रस्तांना त्यांनी मदतीचा हात दिला. याशिवाय पुलं व सुनीताबाईंनी अनेक संस्थांना आर्थिक मदत करण्याबरोबरच अनेक पुस्तके भेट दिली.

उद्यम मंडळास देणगी

महिलांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने १९५८ मध्ये 'उद्यम मंडळ' स्थापन केले होते. या उद्यम मंडळातून फाइल बोर्ड, बॉक्स फाइल्स तयार करण्याचे काम सुरू होते. साधारण १९९६ मध्ये पु. ल. देशपांडे यांनी मंडळाला दीड लाख रुपयांची देणगी दिली. त्यातून 'मुक्तांगण तंत्रनिकेतन'चे युनिट उभारण्यात आले. या युनिटच्या माध्यमातून 'इलेक्ट्रॉनिक असेंब्ली'चे काम सुरू करण्यात आले. त्या वेळी इलेक्ट्रॉनिक असेंब्ली फार क्वचित ठिकाणी होती. उद्यम मंडळात ही असेंब्ली असल्याने बहुराष्ट्रीय कंपनीचे काम करण्याची संधी सुमारे १०० मुलींना मिळाली. या मुलींना त्याचा रोजगाराच्या दृष्टीने खूप फायदा झाला. पु. ल. देशपांडे यांनी संस्थेला अधूनमधून जमेल तशी आर्थिक मदत केली आहे, असे संस्थेचे सचिव पी. व्ही. एस. शास्त्री यांनी सांगितले.

'पुलस्त्य' देणगी

पुलं आणि सुनीताबाई आणि जयंत आणि मंगला नारळीकर यांचा अनेक वर्षांचा स्नेह होता. पुण्यात आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राच्या (आयुका) उभारणीनंतर पुलं आणि सुनीताबाईंनी केंद्राला एक- दोनदा भेट देऊन, तेथून चालणाऱ्या विज्ञानप्रसार कार्यक्रमाची प्रशंसा केली होती.

२०००- २००१ च्या सुमारास आयुकाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमाला सुनीताबाईंनी पुलंच्या संमतीने २५ लाखांची देणगी दिली. त्या निधीतून 'आयुका'च्या विज्ञान प्रसाराची मुक्तांगण विज्ञान शोधिका ही स्वतंत्र इमारत २००४ मध्ये आकाराला आली. आयुकाने त्या इमारतीला सप्तर्षीतील 'पुलस्त्य' या ताऱ्याचे नाव दिले. त्याच्यात पुलंच्याही नावाचा समावेश होतो.

सुनीताबाईंनी स्वतःच्या सगळ्या, तर पुलंच्या काही पुस्तकांची रॉयल्टीही आयुकाच्या नावे केली. या पुस्तकांच्या रॉयल्टीमधूनही मोठी रक्कम जमा होत असते. तो निधी आयुकाचा विज्ञानप्रसार कार्यक्रम चालवण्यासाठी वापरला जातो. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, आजच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ घडावेत, यासाठी पुलं आणि सुनीताबाईंनी आयुकाच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमाच्या रूपाने कायमस्वरूपी तरतूद करून ठेवली. आज आयुकाच्या या कार्यक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना समजावून सांगण्यासाठी, त्यांना खगोलशास्त्राकडे आकर्षित करण्यासाठी वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. पुलं आणि सुनीताबाईंविषयी कृतज्ञता म्हणून आयुकाने गेल्या काही वर्षांपासून पुलंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, 'पुलस्त्य महोत्सव' सुरू केला आहे. या महोत्सवातून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ नागरिक आणि विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना खगोलशास्त्रातील शोधांविषयी मार्गदर्शन करतात.

- महाराष्ट्र टाईम्स

Saturday, April 11, 2020

तेजस्वी सुनीताबाईंविषयी...

# क्वारंटाईनडायरी 4

सुनीताबाई.. काही मोजके साहित्यप्रेमी वगळता त्या आता जणू सर्वांच्या विस्मरणातच गेल्याहेत. मंगला गोडबोले यांच्या " सुनीताबाई" या पुस्तकानं त्यांच्याबाबतच्या विचारांना चालना दिली. त्यानिमित्ताने हे लेखन....


पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं.

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.


त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.

" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.


***

बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे.


त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.

नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात.

हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.


मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं.

उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात,

" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला.

पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."


हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.

अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा.


एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद.


"रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."

आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.


***

सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना.

त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या.

पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत.


आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.

पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."

हे करणा-याही सुनीताबाईच असतात !


गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.


सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं.

डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं.


पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे!


पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही.


हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती.


आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता.


कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली.

एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.

आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात...


कधी सुखावतात... कधी अस्वस्थ करतात.

- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿

( टीप :-
१) मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाअखेरीस असलेला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख खास जपावा असाच. पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचा.
२) घरात बसून राहिल्यामुळेच हे असं लेखन शक्य होत आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा मी तरी ऋणी आहे. )