Thursday, October 14, 2021

॥ मी ब्रम्हचारी असतो तर... ॥

ब्रम्हचर्याच्या त्या स्वतंत्र अमदानीत आम्ही आमचे बादशहा होतो. आणि आज... पूर्वेला जाण्याचा विचार सुद्धा त्या सुर्यनारायणाच्या मनात येण्यापूर्वी आमच्या गृहलक्ष्मीचा गजर होतो : "उठा! दूध आणायच आहे. उशिरा जाता आणि मग दुध संपलं म्हणून सांगत येता!" ही भुपाळी! 

पूर्वीच्या बायका म्हणे सकाळी उठून सडासंमार्जन करून गाईची धार काढत होत्या. कुठं गेल्या त्या माऊल्या? आमचं कुटुंब पहाट फुटण्यापूर्वी आम्हांला धारेवर धरतं. दिवसा तिच्या एकूण अवतारामुळं तिच्या डोळ्याला डोळा देण्याचं धाडस मला होत नाही आणि रात्री तिच्या घोरण्यामुळं माझ्या डोळ्याला डोळा लागतं नाही. वर पुन्हा मीच घोरतो ही तीची तक्रार. स्वप्नातसुद्धा कधी घोरल्याचं मला आठवत नाही. आमच्या लग्नाला आता एक तप होत आलं. बारा वर्षांना एक तप कां म्हणतात हे मला आता लग्न झाल्यावर कळायला लागलं. वैवाहिक जीवनाचं हे एक तप खरोखरीच उग्र आणि खडतर आहे. काॅलेजमध्ये एक तप काढलं. शेवटच्या वर्षी म्हणजे इंटरला असताना माझ्या आराधनेला यश येण्याची संधी आली होती ; पण हुकली आणि शांत हिमकन्या गौरीची आराधना करावी आणि महिषासुरमर्दिनी प्रसन्न व्हावी असं काहीसं झालं. आपलेच दात आणि आपलेच ओठ! घरात बोलायची चोरी, बाहेर काय बोलणार? 

माझ्या कुठल्याही मताला विरोध करायचं तर तिनं कंकणच बांधलय! साधी बाब, मी कधीतरी खुषीत येऊन सांगायला जातो, " अग ऐकलंस का? गेल्या महिन्यात आपल्याला ते गणपतराव भेटले होते ना?.... 
लगेच तिचा विरोध : "गेल्या महिन्यातकुठले, परवा तर भेटले होते." 

मी : (नरमाईनं) हो. परवा आपण बघ सिनेमाला चाललो होतो- 

ती : परवा कुठले सिनेमाला चाललो होतो? सिनेमाला जाऊन झाले चार महिने! बंडूला दाखवायला नेलं नव्हतं का डाॅक्टरांकडे? 

मी : हो हो! डाॅक्टर जोशांच्याकडे- 

ती : डाॅक्टर जोशी कुठले? डॉक्टर जोशांकडे मी गेले होते-विमलच्या खेपेला! हे डाॅक्टर टेंबे- 

मी : हो- म्हणजे बुधवारातले. 

ती : बुधवारात केव्हा गेले ते? सदाशिव पेठेतच नाही का? हौदापाशी. 

मी : तेच, म्हणजे तुझी मावशी राहते तिथंच की समोर-- 

ती : मावशी राहते! काय मेलं जिभेला हाड? आज वरीस झालं मावशी जाऊन! मायेच्या माणसांच्या आठवणीसुद्धा राहात नाहीत कशा त्या बरोबर! माझ्या माहेरची ना माणसं? तुम्हाला ती रीतीभाती नसलेली तुमच्याच घरची माणसं हवीत. आपल्या लग्नात मेला खण दिला होता माझ्या आईला, तोसुद्धा सुती! इथून सुरवात होते आणि शेवट कसा होतो हे सुज्ञ जाणतातच-मी कशाला सांगू? बायको काही असं वेडंवाकडं बोलायला लागली की वाटतं, की मी ब्रम्हचारी असतो तर असल्या बायकोला चांगली वठणीवर आणली असती--पण... ब्रम्हचारी असतो तर बायको तरी कुठली म्हणा! मुद्दा चुकलाच जरासा! 

- रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका
पु.ल. देशपांडे 

1 प्रतिक्रिया:

गौरीशंकर said...

पुलं खरंच महान