Wednesday, August 4, 2021

वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार! - पु.ल.

आणीबाणीच्या वेळची ‘पुलं’ची एक आगळीवेगळी ओळख करून देणारी आठवण सांगत आहेत रत्नागिरीचे ऍड. धनंजय भावे
...............
सन १९७७. आणीबाणी समाप्तीची घोषणा झाली. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आणि ऐतिहासिक ‘जनता’ पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशभर प्रचाराची धूम उठली होती. मोहन धारियांसारखे तरुण तुर्क इंदिराजींना सोडून जनता पक्षाच्या प्रचारात उतरले होते. विशिष्ट ध्येयवाद मानणारे पु. ल. देशपांडे यात मागे कसे राहतील? महाराष्ट्राचा एवढा मोठा लाडका साहित्यिकही आणीबाणीच्या विरोधात उभा राहून प्रचारात उतरला होता.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बापूसाहेब परुळेकर जनता पक्षाचे उमेदवार होते आणि ‘अहो भाग्यम्!’ ‘पुलं’ची एक प्रचारसभा चक्क रत्नागिरीला मिळाली होती! कदाचित जावई म्हणून हा मान आम्हा रत्नागिरीकरांना मिळाला असावा. सभा संध्याकाळी पाच वाजता होती. सभेच्या आणि प्रचाराच्या व्यवस्थेमधील भाग म्हणून मी आणि अॅड. बाबासाहेब परुळेकर ‘पुलं’च्या सासुरवाडीला म्हणजे स्व. ठाकूर वकिलांच्या बंगल्यावर भेटायला गेलो होतो. मनात एक वेगळीच भावना होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटणार, त्यांच्याशी बोलायचे तरी कसे! पण ठाकूर वकील वडिलांच्या परिचयाचे म्हणून ‘पुलं’शी संभाषण कधी सुरू झाले ते कळलेच नाही. त्यात मी रत्नागिरीच्या मधल्या आळीतला. मग काय विचारूच नका; पण आणीबाणीविषयी आणि त्या अनुषंगाने दुर्गाबाई भागवतांचे त्या काळातील गाजलेले साहित्य संमेलन अशा अनेक गोष्टी ‘पुलं’कडून ऐकायचे भाग्य लाभले. मधूनच माजी सरकार कसे होते, याविषयी ‘पुलं’चे त्यांच्या खास शैलीतून उद्गार - ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ (संध्याकाळच्या सभेची टॅगलाइन बहुधा तीच असावी, असे त्या वेळी वाटले.)

राजकारणात न रमलेले ‘पुलं’... पण आंदोलन करताना कशाचे भान ठेवावे याबाबतीत त्यांनी सांगितलेली एक गोष्ट मला भावली. ते म्हणाले, आणीबाणी आता केव्हा आणि कशी संपणार, या निराशेच्या गर्तेत असलेले काही विद्यार्थी प्रतिनिधी त्यांना भेटायला आले होते. सत्याग्रह करून झाला, आणखी किती सत्याग्रहांमध्ये अटक करून घ्यायची, अशी त्यांची निराशाजनक तक्रार होती. ‘पुलं’नी त्यांना मोलाचा सल्ला देताना महात्मा गांधींचे उदाहरण दिले. त्यांनी सांगितले, की गांधीजींच्या सत्याग्रहांचा अभ्यास करा. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यामध्ये काही काळ लढा स्थगित केला होता. त्यांचे म्हणणे असे होते, की विरोधकांना तुमच्या ‘काही हालचाल न करण्याची’सुद्धा भीती वाटत राहिली पाहिजे. तुमच्या पुढील योजना काय चालल्यात, याच्या शोधात विरोधक राहिले तर तो एक प्रकारच दबावच असतो. संभाषणाच्या ओघात महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील यशाचे यापूर्वी न उलगडलेले एक मोठे सूत्र ऐकायला मिळाले आणि तेही ‘पुलं’सारख्या एका अ-राजकीय थोर साहित्यिकाकडून, हे भाग्यच म्हणायचे.

गोगटे कॉलेजच्या मैदानावर मंडणगड ते रत्नागिरी आणि जवळच्या लांजा, राजापूर विभागातून आलेल्या सुमारे २५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘पुलं’ स्टेडियमवर उभे राहिले आणि त्यांनी सभा पहिल्या १० मिनिटांतच जिंकली. ‘वजन ठेवल्यावर पुढे सरकते ते सरकार!’ हीच टॅगलाइन ठरली! त्यापूर्वी अशी सभा मी तरी पाहिलीच नव्हती. ‘पुलं’ची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने ‘पुलं’ची समाजाप्रति सजगता दाखविणारी ही एक आगळीवेगळी ओळख!

संपर्क : ऍडव्होकेट. धनंजय जगन्नाथ भावे – ९४२२० ५२३३०


1 प्रतिक्रिया:

Santosh said...

Kya baaat hai!!! :)