आपल्याकडे भगवंतापेक्षा भक्ताला मान मोठा आहे. जेव्हा पालखी येते, तेव्हा विठ्ठल-विठ्ठ्लपेक्षा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम - `ग्यानबा तुकाराम', ग्यानबा तुकाराम याचा गौरव जास्त होत असतो. इथं आज झालेला माझा जो गौरव आहे, तो मी गाण्याचा भक्त म्हणून झालेला आहे, हे मला निश्र्चितच कळतंय. मी सुरांसाठी जितकी भिक्षा मागितलेली आहे, तितकी इतर कशासाठीही मागितलेली नाही. हे सगळं कशासाठी? तर गाण्यासाठी. माझं भरून दुसरीकडे देण्यासाठी नव्हे, तर माझ्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी केलेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक ओळ आहे, `तू सरे लगायी आग'. तू सुरांची आग माझ्या प्राणाला लावलीस, असं म्हटलेलं आहे. ही मोठी माणसं जी असतात, ती आपल्या प्राणाला सुरांची आग लावून जात असतात. आपण जिवंत असेपर्यंत ती आग काही विझत नाही. ती आग लावल्याबद्दल आपण त्यांच्यावर रागावण्याऎवजी कृतज्ञ व्हावं, ही कलेची किमया आहे. आपण कोणीतरी मोठे झालोय, असं आपल्याला वाटतं. उत्तम गाणं ऎकल्यानंतर, आपण अधिक श्रीमंत झालो आहोत असं वाटतं. ही श्रीमंती या लोकांनी आपल्याला दिली आणि त्या श्रीमंतीचा हा हा गौरव आहे. हा स्विकारण्याचा गौरव नाही, देण्याचा गौरव आहे, असं मला वाटतं. आणि अशा रीतीनं हा कलावंताचा उत्सव इथे साजरा होणं, याला अर्थ आहे.
भारतीय संस्कृती म्हणा किंवा माणसाची संस्कृती म्हणा, दोन गोष्टींवर अधिष्ठीत आहे, असं मला वाटतं. एक म्हणजे आठवड्याचा बाजार आणि एक वर्षाचा उत्सव. आठवड्याचा बाजार हा तुमच्या शरीराच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो; आणि वर्षाचा उत्सव तुमच्या मनाच्या ज्या गरजा आहेत, त्या पुरवण्यासाठी असतो. एक फार सुंदर चिनी म्हण आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की, `तुम्हांला दोन पैसे मिळाले, तर एका पैशाचे धान्य आणा, आणि एक पैशाचं फूल आणा. एक पैशाचं धान्य तुम्हांला जगवेल आणि फूल तुम्हांला कशासाठी जगायचं हे कारण सांगेल.' संगीत तुम्हांला, का जगायचं याचं कारण सांगतं. तुम्हांला जगायचं आहे कशासाठी? मला मोगुबाई ऎकायच्या आहेत, मला भीमसेन ऎकायचे आहेत, मला किशोरीबाई ऎकायच्या आहेत, मला दिनानाथांचं गाणं ऎकायचं आहे. याच्यासाठी जगायचंय. सगळ्या कलांचा आनंद घ्यायचाय. मराठीमध्ये, आपल्या भाषेमध्ये, तो शब्द्सुद्धा तसाच हवा. आपण पोटासाठी जे काही करतो, त्याला `उपजीविका' म्हणतात. ती `जीविका' नाही. जीविका कशासाठी? तर चित्रकलेसाठी, आनंदासाठी, अभिनयासाठी, नर्तनसाठी. यासाठी जगणं ही खरी जीविका आहे, आणि ती जिविका कलावंत माणसं देत असतात, म्हणून हा उत्सव वर्षातून एकदा साजरा होणं, हे आपल्या परंपरेला धरून आहे. गोव्यातील लोकांना मी जत्रा, महोत्सव यांबद्दल सांगणं हे चुक आहे. हा सगळा उत्सवांचा प्रदेश आहे. बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे `माझ्या गोव्याचा भूमीत, येतं चांदणं माहेरा....' मला तर वाटतं, `माझ्या गोव्याच्या भूमीत येतं संगीत माहेरा,' असं म्हणायला पाहिजे. म्हणून माहेरवाशीणीचे जसे लाड होतात, तसे संगीताचे लाड या गोमंतकाच्या भूमीत झालेले आहेत. अनेक तऱ्हांनी इथं ते फुललेलं आहे. देवाच्या अर्चनेसाठी फुललेलं आहे, शेतात काम करण्यांसाठी फुललेलं आहे, होडीवरती फुललेलं आहे, मैफलीत फुललेलं आहे, बैठकीत फुललेलं आहे, सगळीकडे फुललेलं आहे. श्रीमंत आई-वडिलांनी आपल्या पोरीचे लाड करावेत, तिला असं नटवावं, तिला तसं नटवावं तशा रीतीनं लोकांनी या संगीताच्या कलेकडं पाहिलेलं आहे. आणी त्यातली देदीप्यमान रत्नं- दिनानाथांसारखी किंवा मोगूबाईंसारखी किंवा इतर अनेक आपण पाहत आलेलो आहोत. आणि आनंदाची गोष्ट अशी की, ही परंपरा संपलेली नाही. ही संपण्याइतपत लेचीपेची परंपरा नाही.
पुष्कळ लोक असं म्हणतात की, शाश्रीय संगीत टिकणार की नाही, याबद्दल शंका यायला लागली आहे. त्या लोकांना, चांदणे टिकणार की नाही. अशी शंका यावी इतकं ते मला हास्यास्पद वाटतं. कधीतरी मी बैठकीला जातो. एखादा भूप राग चालू असतो. माझ्या मनात विचार येतो की, हजारो वर्षांपूर्वी तयार झालेला हा राग - त्याचा असर आज १९८५ सालीसुद्धा आमच्या अंगावर तसाच पडतो. त्या वेळचं काय वातावरण असेल? लोक घोड्यावर बसून आलेले असतील, पार्टी करुन आलेले असतील. आणि तोच भूप ऎकतात. हा काय चमत्कार आहे? हे चिरंतनाचं काय आहे, हे अमरत्वाचं काय आहे. हे अमरत्व तुम्ही घालवूच शकणार नाही. आमचं जे अभिजात संगीत आहे, त्याचं स्वरूप लक्षात घेतलं, तर ते का विसरता येत नाही, हे आपल्या लक्षात येतं. एका अर्थी हा संगीत महोत्सव इथे कैवल्याचा व्हावा. हा योगायोग मला विलक्षण वाटतो. आपण इथं राहत असल्यामुळं आपल्याला कदाचीत माहीत नसेल. या गावाचं नाव `कैवल्यपूर' आहे. त्याचं आम्ही `कवळा' केलेलं आहे. जास्त जवळ कवळलंय त्याला. आपल्या बोली भाषेमध्ये ही एक गंमत असते. हे कैवल्यपूर आहे. आणि शास्त्रीय संगीत ज्याला म्हणतात, अभिजात संगीत ज्याला म्हणतात, त्याचं स्वरूप मुळी कैवल्यस्वरूप आहे. आमच्या शास्त्रीय संगीताचं मोठेपण याच्यातच आहे की, त्यात रागाला, सुराला, लयीला अर्थ नाही. ते निरर्थक असण्यामध्येच त्याचं मोठेपण आहे. जसं आकाशाला अर्थ नाही आणि म्हणून त्याचं मोठेपण आहे. चांदण्याला अर्थ विचारला तर त्याला अर्थ नाही म्हणून मोठेपण आहे. अर्थ आला की आपण व्यावहारिक पातळीवर यायला लागतो. म्हणून सगळ्यात मोठा आनंद. म्हणजे वचनामध्ये, शब्दामध्ये बद्ध करता येत नाही, असा तो अनिर्वचनीय आनंद. म्हणून हे अभिजात संगीत जे आहे, हे म्हणजे निर्गुणाशी, निराकाराशी चाललेला खेळ आहे. लयीला आणि सुराला आम्ही शब्दातून, साहित्यातून आकार देतो. शब्द मांडतो तिथं. नुसता आलाप केलेला असताना आपल्याला निर्मळ आनंद झालेला असतो. पण दुसरीकडे मी नाही डोलत असं म्हटलं तर त्याला वेगळा अर्थ तुम्ही चिकटवून टाकता. म्हणून जुन्या शास्त्रज्ञांनी. सांगितलंय की, तुम्ही तुमचं शरीर विणा आहे, असं समजा, विणेतून निघणारे जे सूर असतात, त्याला काही अर्थ नसतात. मला एकानं विचारलं, `तुमच्या गाण्याला अर्थ काय?' मी म्हटलं, `त्याला अर्थ नाहे, हाच सगळ्यात मोठा अर्थ आहे.'
*******
आज आमच्याकडे हे संगीत जे टिकून आहे, याचं कारण ती जी शिस्त आहे, ती कडक शिस्त कार्यक्रमांमध्ये पाळली आहे. भारतीय संगीताचं वैशिष्टच असं आहे की, प्रचंड कडक शिस्तीमध्ये आम्ही दंग असतो. संचार करायला मोकळे असतो. एकदा भूप गायला सुरूवात केली की भूपाचा कायदा पाळा आणि आकाशाला गवसणी घाला, पण भूप सोडू नका. तुम्हांला चांगला सोन्याचा दागिना करायचा असेल, तर त्यात चांदीबिंदी मिसळू नका. नुसत्या सोन्यातून करा. गाढव करा. घोडा करा पणं सोन्याचं सोनेपण त्याच्यामध्ये आम्हांला दिसलं पाहिजे. तसं भुपात काहीही करा, बिहागात काहीही करा, पण बिहागाचं बिहागापण तुम्ही सोडू शकत नाही. ते त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे. हे जे कमालीच्या शिस्तीत कमालीचं अनिर्बंध स्वातंत्र्य आहे, हा जो चमत्कार आहे, हे भारतीय संगीताचं व्यवच्छेदक लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ज्या वेळेला त्या रागाची सुरुवात होते, त्या वेळेला त्या माणसाचं नातं दोन हजार वर्षांच्या परंपरेशी असतं. दोन हजार वर्षांची परंपराच आपल्यापुढं तो उभा करीत असतो. असं केलं, म्हणून तर हे शास्त्रीय संगीत टिकलं. पण नुसती शिस्त पाळली नाही, तर त्यात आणखी कुठलंतरी वैशिष्ट्य असं आहे की, जे कुठलं आहे, ते मला सांगता येत नाही. आणि ज्यांना सांगता आलं असं वाटलं, त्यांचे लेख वाचल्यावर त्यांनाही सांगता आलं नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं ते सांगण्याचा प्रयत्न मी करणार नाही. जसं, सगळीच लहान मुलं आपल्याला खेळताना दिसतात, पण एखादं कार्टं असं असतं की, ते आपलं लक्ष सारखं ओढून घेत असतं. ते सुदंर असतं असं नाही. पण त्याच्यात तसा कुठला गुण असतो, हे सांगता येत नाही. पण त्याच्यात तसा कुठला गुण असतो, हे सांगता येत नाही. तसं या स्वरांमध्ये काय आहे? भीमपलास काय, सगळी दुनीया गाते. पण बालगंधर्वाचा भीमपलास हा त्यांना आंदण दिल्यासारखा वाटतो. किंवा बेगम अख्तरसारखी गझल गाणारी बाई जेव्हा `कोयलिया मत कर पुकार' म्हणते, तेव्हा तिनं तसं म्हटल्याबरोबर तो जो दादऱ्याचा साक्षात्कार होतो. तो त्यांना आंदण दिलाय, दत्तक दिलाय, असं आपल्याला वाटतं. ही जी कलेची किमया आहे, ही सांगणं मला तर शक्य होणार नाही.
- पु.ल. देशपांडे
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Sunday, January 27, 2008
कैवल्याचा आनंद
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं,
पुलकित लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 प्रतिक्रिया:
Thanks a lot. Please enlighten me whether this is a speech made at Mast. Dinanath Sangeet Sanmelan at Kavale-Goa and any more details like year.
Post a Comment