Thursday, November 27, 2025

नाटक

एखाद्या बगीच्यात एकाच मातीतून नानातऱ्हेची रंगीबिरंगी फुले फुलावी तशी साहित्यातही जीवनाच्या अनुभवांतून येणारी नानातऱ्हेचीच फुले फुललेली असतात. त्यातील काही कथापुष्पे असतात, काही काव्यसमाने असतात, काही तत्त्वज्ञानाचे वटवृक्ष असतात. साहित्याच्या या बागेत नाटक नावाचा एक वृक्ष असाच फुललेला आहे.

इतर साहित्याप्रमाणे एखादा अनुभव सांगण्याची आणि तो ऐकणाऱ्याच्या मनाला आनंद देण्याची इच्छा हीच नाटक ह्या साहित्य प्रकारामागली प्रेरणा असते. पण इतर साहित्यप्रकार आणि नाटक यांच्यात एक मुख्य फरक असा आहे, की नाटक हे तो अनुभव जणू काय पाहणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष घडतो आहे, अशा रीतीने दाखवण्याच्या उद्देशाने जन्माला घातलेले असते.

नाटकाला प्रेक्षक येतो तो नुसता ‘ईक्षक’ म्हणजे पाहणारा नसतो. प्र अधिक ईक्षक असतो. म्हणजे विशेष चोखंदळपणाने पाहणारा असतो. संगीताला ‘श्रोता’ येतो. म्हणजे फक्त ऐकणारा. गवई डोळ्याला दिसला नाही तरी तो गायनाचा आनंद घेऊ शकतो. आणि कादंबरीतला वाचक असतो म्हणजे पुस्तक हाती घेऊन वाचणारा. वाचणारा किंवा वाचलेले फक्त ऐकणारा माणूस मनापुढे ती ती दृश्य आणतो.

नाटकाचा प्रेक्षक मात्र डोळ्यांनी पाहण्यासाठी आणि कानांनी ऐकण्यासाठी येत असतो. त्यामुळे नाटककाराला ती दृश्ये डोळ्यांपुढे रंगमंचावर आणून खरी आहेत असा आभास निर्माण करायचा असतो. हा आभास आहे हे प्रेक्षकाला ठाऊक असूनही तो क्षणभर ते खरे आहे असे मानण्याच्या तयारीने आलेला असतो. रंगभूमीवरचा महालाचा देखावा हा पडद्यावर रंगवलेला आहे हे ठाऊक असूनही तो त्याला नाटकापुरता खरा महाल मानायला तयार होतो. शिवाजी महाराज होऊन आलेल्या नटाने खोटी दाढीमिशी लावली आहे हे ठाऊक असूनही तो त्या आभासाला घटकावर सत्य मानायच्या तयारीने आलेला असतो. परंतु जर नटाने तो आभास आपल्या अभिनय कलेने टिकवला नाही तर मात्र त्याचे लक्ष उडते. म्हणजेच नाटक रंगमंचावर अवयशस्वी होते. म्हणून नाटकाचे लेखन उत्तम असून चालत नाही. ते प्रेक्षकापुढे आणणारे नट, नेपथ्यकार, त्या प्रसंगाला उठाव देणाऱ्या प्रकाशाची संयोजना करणारे कलावंत किंवा प्रसंगात व्यक्त केलेल्या भावनांना आणि वातावरणाला अधिक परिणामकारक करणारे संगीत-नियोजक ह्या सर्वांना आपली कला पणाला लावूनच ते दरवेळी उभे करावे लागते.

नाटकात जी माणसे दाखवली जातात त्यांना आपण नाटकातली ‘पात्रे’ म्हणतो. भांड्याला देखील ‘पात्र’ असा शब्द आहे. ही नाटकातली पात्रे देखील एका अर्थी भांड्यासारखीच असतात. म्हणजे त्या पात्रामध्ये जो रस भरलेला असतो, तो त्या पात्राचे जसे दर्शन घडते त्याला साजेसा हवा. करवंटीतून कोणी आमरस भरून घ्यायला लागला तर ते चमत्कारिक वाटेल किंवा सुंदर सुवर्णपात्रातून रॉकेल भरलेले ही रुचणार नाही. म्हणजे ते पात्र आणि त्याचे वागणे, बोलणेसवरणे हे एकमेकांच्या आतल्या आणि बाहेरच्या स्वरूपाशी एकरूप झालेले असले पाहिजे.

नाटकाला इंग्रजीत ‘प्ले’ म्हणजे खेळ म्हणतात. आपणही पूर्वी “नाटकाचे खेळ झाले” असे म्हणत होतो. जुन्या मराठीत नटांना ‘खेळीये’ म्हटले आहे. हा माणसामाणसांतल्या निरनिराळ्या कारणांनी निर्माण होणाऱ्या तेढीचा, मैत्रीचा, शत्रुत्वाचा, आकांक्षांच्या पुर्तीचा किंवा अपूर्तीचा जय-पराजयाचा खेळच असतो.
नाटककार रंगमंचावर जो खेळ दाखवतो तो आपल्या मनातही सुरू होतो.

कलेतून मिळणारा आनंद आणि समाजाचे आरोग्य किंवा समाजाचे हित साधणारी कला असली तर दुधात साखर.
तंबोऱ्याच्या षड्जाच्या दोन तारा एकमेकींशी तंतोतंत जुळल्या म्हणजे त्यातून आपोआप गंधार हा स्वर उमटतो. नाटकातला किंवा एकूणच कलेतला समाज हिताचा विचार हा असा आपोआप उमटला पाहिजे.

****

‘एक शून्य मी’ ह्या पु. लं. देशपांडे यांच्या पुस्तकातील, ‘नाटक’ ह्या लेखातील काही उतारे. पु.ल. हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांना भले स्वतःची ओळख ‘आम्हाला हसवणारा माणूस’ म्हणून करून घ्यायला आवडले होते, अर्थात ते सार्थही आहे. तरी त्या विनोदबुद्धी मागे खूप मोठा व्यासंग, प्रखर बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि कलोपासकता होती हे नक्कीच. या पुस्तकात त्या बुद्धीची धार जाणवून देणारे अनेक लेख आहेत त्यातीलच हा एक ‘नाटक’. आज रंगभूमी दिन आहे. तर त्यानिमित्ताने पुलंसारख्या एका श्रेष्ठ ( आणि माझ्या आवडत्या) नाटककाराचे नाटकाविषयीचे विचार इथे समोर ठेवले आहेत.‌ अन्य नाटककार, कलाकार, नेपथ्यकार, किंवा नाटकाशी संबंधित अन्य कलावंत यांच्याकरता तर ते महत्त्वाचे आहेतच परंतु एक प्रेक्षक म्हणूनही मला ते समृद्ध करणारे वाटले. म्हणूनच हा प्रपंच!

पूर्ण लेख ‘एक शून्य मी’ हे पुस्तक घेऊन त्यात वाचावा.

- प्रेरणा कुलकर्णी

0 प्रतिक्रिया: