१९७२ साली भयंकर दुष्काळ पडला होता आणि शेवटी दुष्काळाच्या छायेतुन महाराष्ट्र सुटल्यानंतर जून १९७३ साली संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आणिबाणीच्या जवळ देश चालला होता. पण तारणहार इंदिराजींवर १९७१च्या युद्धातील विजयाचा मद अजून होता. ‘गरिबी हटाव’ची सिंहगर्जना चालणार होती ती पुढे, पण याही परिस्थितीत अवर्षणग्रस्त महाराष्ट्र पावसामुळे सुखावला होता. त्याकाळात दिवाळीत स्वत: तयार केलेली, छापलेली, कलात्मक नाविन्यपुर्ण अशी ग्रिटींग कार्डस् सर्वजण प्रेमाने पाठवीत. परवडले न परवडली तरी! तेव्हा कुरिअरवाले म्हणजे पुण्यामुंबईत फिरणारे ऎकटे ‘प्रवसी’ होते. पण ते पुण्यामुंबई पुरते! आणि महाग!
आम्ही आमच्या ‘कैलास जीवन’ या आयुर्वैदीय औषधीच्या कंपनीची काही हजार ग्रिटिंग कार्डस् छापली त्यावर मजकूर होता ‘धनांधकारेषु इव दीपदर्शनम्!’ (मॄच्छकटिक) मला व्यापाराबरोबर सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्ती, संगीत, नाटक, शिल्प, साहित्य या विषयी थोडी अधिकच ओढ होती. गो. नी दांडेकरांशी चांगला परिचय सौ. वीणा देव (गो.नी. दांडेकरांची कन्या) मुळे झाला होता. (विणा आणि मी कॉलेज ते विद्यापीठापर्यंत एका वर्गात शिकलेले) मी अनेक साहित्यिक, कलाकार यांना हे ग्रिटिंग कार्ड पाठविले. कुमारजींना तसेच पु.लं. ना सुद्धा!
आणि आश्चर्य मला पु.लं. चे पत्र मिळाले. मी तुमच्या कैलास जीवनचा चाहता आहे. तुम्ही पाठविलेले ग्रीटिंग कार्ड सुद्धा अतिशय कालयोग्य आहे. कधीतरी भेटा. मग काय! आनंद! गगन ठेंगणे अशीच अवस्था झाली पु.लं.शी सबंध आला आणि वाढत गेला. त्यांच्या जवळ जाण्याचा योगही येऊ लागला. त्यानंतर आता पु.लं.च्या विषयी लिहिण्याबाबत आपले पत्र आले व लिहिण्याबाबत विचार करु लागलो आणि असे लक्षात आले की, पु.लं.च्या विषयी लिहिणे ही अवघड गोष्ट आहे.
त्यातही मी त्यांच्याविषयी आपल्याला काही लिहावे, बोलावे लागेल या (दूर) दॄष्टीने त्यांच्याकडे कधी पाहिले नाही. किंवा लिहून काढण्याचा माझा स्वभावही (हात ही) नाही. पण जसजसा मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो त्यांच्या बरोबर तासनतास घालवू लागलो, हिंडू फिरू लागलो किंवा लांबून त्यांना पाहू लागलो तसे तसे ते मला जास्तीत जास्त मोठे दिसू लागले. त्यांचे मोठेपण कळू लागले. कसे भेटत, भेटत, भेटी घेत, भेटी देत (भेटी टाळत) या सर्वांचा छान अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.
ऎके दिवशी ’रुपाली’मध्ये संध्याकाळी त्यांनी मला बोलावले होते, म्हणून गेलो. तर सात-आठ मुले, मुली त्यांच्या आणि सुनीताबाईंच्या भोवती गोळा झाल्या होत्या. मी आत शिरलो, मला म्हणाले ’बैस ऎक. बोलू नकोस.’ मी गप्प. काय चालले आहे ते पाहत होतो. ऎकत होतो. एक एक नवोदित कवी आपापली एक एक कविता या कवी (स) हृदयाचा दोघांना ऎकवत होता. पहिली फेरी केव्हाच झाली होती. ही त्यापुढची कितवी फेरी माहित नाही. पण कवी उत्साहात कविता म्हणत होते आणि पु.ल. व सौ. सुनीताबाई ऎकुन त्यावर आपले मत प्रदर्शित करीत होते. आनंदी होऊन वाहवा पण देत होते. कधी मिश्किलही होते. मी पोहचल्यानंतरही हा कार्यक्रम दोन तास चालला होता. शेवटी एका नवकवीने आयुष्यावर बोलण्यास सुरुवात केल्यावर मध्येच थांबवून कार्य सिद्धी झाली. मुले गेली. मला म्हणाले अरे बरीच पत्रे येतात. कविता ऎकवितो म्हणतात. नाराज करण्यापेक्षा ही युक्ती शोधुन काढली. एकाच वेळी सर्वांना बोलवुन ५/६ तास त्यांचे म्हणणे ऎकुन घेतले. आणि सुटका आणि ससेमिरा थांबवून टाकला. (का मागे लावून घेतलो?).
एकदा असाच रात्री उशीरा ‘रुपाली‘ मधून बाहेर पडलो. जोशी हॉस्पिटलमुळे स्कूटर, मोटारींची फार करीत माणसांनी भरलेली एक टेंपोट्रॅक्स ‘पु.ल. कुठे राहतात‘ चौकशी करत येत होती. मी पाहिले. जरा बावरलो. २०/२५ जण लातुर भागातून आले होते. रात्री १० चा सुमार होता. म्हटले चटदिशी पु.लं.च्या घरी जाऊन बेल दाबली. सुनीताबाईंशी बोललो. खाली येऊन त्यातल्या म्होरक्याशी बोललो. म्हणाले, ‘आमचे काम काही नाही, फक्त दर्शन घ्यायचे आहे. पायावर डोके टेकू आणि पाच मिनिटात पुढे लातूरकडे जाऊ.‘ हे सुनीताबाईंना सांगितले. पु.ल. खुर्चीवर बसले. एक एक पु.ल.प्रेमी पायावर डोके ठेवून बाहेर पडत होता. लेखकांच्या दर्शन वारीतील हे वारकरी दर्शन घेऊन आनंदून परत जाताना सुनीताबाई सुद्धा गहिवरल्या.
‘रुपाली‘मधलीच गोष्ट आहे. पु.ल. आणि कुमारजींचे नाते फारच निराळे होते. १९८५ च्या सुमारास कुमारजी पुण्यात असतान मला म्हणाले, ‘भाईकडे जाऊन येऊ‘. रात्री ८ च्या सुमारास प्रा. चिरमुलेंच्या घरून आम्ही निघालो. कुमारजी अचानक घरी आल्याचे पाहून सुनीताबाईंनी त्यांचे स्वागत केले. खुप गप्पा रंगल्या. पु.ल. जरा चुळबुळत बोलत होते. त्यांनी पटदीशी एक फोन केला आणि कुमारांना म्हणाले आपण बोलतोय ते ऎकायला दिनेश येतोय. आत्ताच मामाकडे गेला आहे. येईलच. दिनेश आला. खरोखरीच काही मिनीटात. त्याला जरा ताप होता. पण त्याला काहीतरी कुमारजींच्या तोंडुन ऎकायचे होते. तो पु.लं.शी त्याच दिवशी बोलला होता आणि अचानक कुमारजी आले होते. पु.लंनी दिनेशसाठी ‘म्हारा ओळगीया‘ गाण्याची विनंती केली. आपल्या पानाचा डबा काढून त्यावर ठेका दाखवत कुमारजींनी सहज स्वरात हे भजन असे गायले की आम्ही सारेच हरखून गेलो.
पु.लं.च्या विषयी किती सांगता येईल. मल्लिकार्जुन मन्सुरांच्या शेवटच्या काळात एक दिवस पूर्ण दिवस धारवाडमध्ये मन्सुरांच्या बरोबर आम्ही होतो. पु.ल. सुनीताबाई आणि मन्सूर हळूहळू जुन्या गाण्यात, आठवणीत रममाण झाले होते. मन्सुरांना मधुनच सिगरेट पु.ल. शिलगावून देत होते. मी पुण्यात आल्यावर त्यांना विचारले आता कधी कधी सिगरेट ओढावीशी असे वाटते का? त्यांनी सिगरेट सोडून अनेक वर्षे झाली होती. तिच्याकडे मी परत आकॄष्ट झालो नाही असे त्यांनी सांगितले, मनमोकळेपणानी!
त्यांच्या आणि वसंतराव, ज्योत्सनाबाई, कुमारजी, भीमसेन, मुकुल, श्री. पु. भागवत किती तरी जणांच्या संवादाची याद येते, आणि ‘अवस्था‘ लागते! आणि कुमारांची बंदिश प्रत्यक्ष अनुभुतीस येते ‘नयना भरायोरी‘.
(जिवनज्योत दिवाळी अंक २००९ मधून साभार)
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Monday, November 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment