Sunday, September 11, 2022

वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंचे एक सुंदर पत्र

पुलंच्या प्रचंड पत्रव्यवहारातील हे एक वेगळे पत्र. वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल पुलंनी अतिशय समजुतीच्या सुरात लिहिलेल्या या पत्राचे म्हणूनच महत्त्व. या पत्रातील नावे मुद्दाम बदलण्यात आली आहेत.

सुमन,

मुंबईहून परत आल्यावर तुझे पत्र मिळाले म्हणून उत्तर पाठवायला उशीर झाला. तुझे पत्र वाचून खूप वाईट वाटले. अत्यंत समंजस सुशिक्षित सुसंस्कृत अशा तुमच्यासारख्या तरुण जोडप्याच्या आयुष्यात ही अशी विपरीत घटना का घडून यावी हे समजत नाही. त्यातून पती-पत्नी संबंधांचे धागे इतके नाजूक आणि गुंतागुंतीचे असतात की त्यातून दुःखदायक तणाव नेमके कशामुळे निर्माण झाले हे त्रयस्थाला कळणं जवळजवळ अशक्य असतं. अशावेळी हे धागे जोडून ठेवावे की तोडून ठकावे याबद्दलचा सल्ला द्यायला आपण खरोखरीच समर्थ आहोत का, असा विचार मनाला कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचू देत नाही.

परदेशात लग्न हा एक करार आहे. इतर कराराप्रमाणे तो कोरडेपणाने तोडला जातो. पण वरपांगी तो जरी कोरडेपणाने तोडला गेल्यासारखा वाटला तरी पती-पत्नी या नात्याने एकदा एकत्र आल्यावर ते नाते करारासारखे कोरडे राहूच शकत नाही. कारण कितीही नाकारले तरी त्यात एकमेकांच्या सहवासात काढलेल्या सुखदुःखाच्या, सुख द्विगुणित केल्याच्या दुःख विभागून हलके केल्याच्या आठवणी मनात रुजलेल्या असतात. त्या संपूर्णपणाने उपटून टाकता येत नाहीत. एखाद्या संगीताच्या मैफिलीचा आस्वाद जोडीने घेतलेला असतो. एखादी सुरेख कलाकृती जोडीने पाहून तिचा आस्वाद घेतलेला असतो. एखादी कविता जोडीने वाचलेली असते. एखादा सूर्योदर्य / सूर्यास्त सोबतीने पाहिलेला असतो. एखाद्या क्षणी झालेल्या स्पर्शाने अंगावर काटा फुललेला असतो. या सार्‍या सुखद अनुभूती जाळून नष्ट करता येत नाहीत. पती- पत्नी म्हणून एकत्र नांदले नाही तरी जोडीने काढलेल्या आयुष्यातल्या या आठवणी पुन्हा त्या दिवसांत मनाने नांदायला घेऊन जातच असतात. अशा नाजूक नात्यात विकल्प निर्माण होण्याची कारणेही अनेक असू शकतात. आणि आजवर या परिस्थितीत सापडलेल्या पती-पत्नीमधील दुरावा नाहीसा करण्याच्या प्रयत्नांत माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे ती म्हणजे हा दुरावा नेमका कशामुळे निर्माण झाला याचा पत्ता त्रयस्थाला लागतच नाही: 'पटत नाही तर घटस्फोट घ्या' असा उपदेश करणारे तुला भेटतील. पण मला मात्र हा उपाय तुझ्यासारख्या चारित्र्य, शील इत्यादी मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या कुटुंबातल्या उत्तम संस्कारात वाढलेल्या मुलीला पुढील आयुष्यात सुखकारक ठरेल असे वाटत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यापूर्वी झाले-गेले विसरून जाण्याचे सर्व मार्ग मिटले आहेत की काय, याचा शांत मनाने विचार करावा.

ज्या कारणांमुळे आपले एकत्र राहणे शक्‍य वाटत नाही, ती कारणे खरोखरीच दूर करण्यासारखी नाहीत की काय, याची खात्री करावी, शेवटी संसार म्हणजे तडजोड आणि तडजोड याचा अर्थ अन्याय निमूटपणाने सहन करणे असा नव्हे आपला अहंकार काही ना काही कारणाने दुखावला जातो आणि प्रेमाचे दुवे तुटल्यासारखे वाटतात. ज्यामुळे आपला अहंकार दुखावला गेला ते कारण लग्नबंधन तोडण्याइतके महत्त्वाचे आहे का, याचा विचार करायला हवा. अशा प्रकारचे आत्मपरीक्षण ज्याचे त्यानेच करायचे आहे. सुदैवाने माझी तुझ्या सासू-सासऱ्यांशीही ओळख आहे. इतर ठिकाणी आपण ऐकतो त्याप्रमाणे तुला वाटणारा त्रास हा तुझ्या किंवा तुझ्या वडिलांकडून द्रव्य उपटण्याच्या लोभावून होत असेल असे चुकूनही मला वाटणार नाही. त्यांचे शत्रूदेखील त्यांच्यावर अशा प्रकारच्या स्वार्थाचा आरोप करणार नाहीत. उलट तुमच्या वैवाहिक जीवनाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये हीच त्यांची इच्छा असणार तुझ्या वडिलांचीही तुझा संसार मोडला जाऊ नये हीच इच्छा असणार. अशा परिस्थितीत मला सुचतो तो उपाय असा... तू. तुझे आई-वडील, उमेश व त्याचे आई-वडील एवढ्यांनीच एकत्र बसून आपली मने एकमेकांपुढे त्या बैठकीत मोकळी करावीत. बैठकीला बसताना हे संबंध तोडायचे नसून जोडायचेच आहेत या भावनेने एकत्र यावे. It is never too late to mend human relations याबाबतीतही लागू आहे. तोडून टाकण्यात आपल्या अहंकाराला समाधान लाभते. पण अहंकार पोसणे एवढे एकच सुखाचे साधन नसते. तू अजून लहान आहेस. पण एका मुलाची आई आहेस. त्या मुलाचा तुला कायदेशीर ताबा मिळेल. पण त्याची मानसिक वाढ होताना आपल्याला वडील नाहीत- या आघाताचा त्याच्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आपल्या समाजात पाश्चात्यांप्रमाणे घटस्फोटिता माता ही घटना सहजपणाने स्वीकारली जात नाही. अशा स्त्रीशी आणि तिच्या मुलाशी आजूबाजूची माणसे पुष्कळदा तऱ्हेवाईक रीतीने वागतात. त्याचा मानसिक जाच फार होतो. या सार्‍या भावी यातनांची शक्‍यता टाळता येण्यासारखी स्थिती उरलीच नाही का, याचा विचार करायला हवा.

दुर्दैवाने आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. ती परिस्थिती बदलण्याची चिन्हे मला दिसत नाहीत. त्यामुळे घटस्फोटानंतर एका जाचणाऱ्या बंधनातून स्त्रीला मुक्ती मिळाली तरी तिला आपला परंपराप्रिय समाज सुखाने जगू देत नाही असाच अनुभव आहे. सदैव एक प्रकारचे असुरक्षित आयुष्य तिला कंठावे लागते. परत विवाह केला तरी पूर्वानुभव प्रतिकूल असल्यामुळे नव्या वैवाहिक जीवनाच्या यशापयशाबद्दलही मन साशंकच राहते. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की दोन माणसांना एकत्र राहायचे असेल तर तडजोड ही अपरिहार्य आहे. आणि परस्परांत प्रेमभाव असला की ती तडजोड आपण दुय्यम भूमिकेवर आहोत असे आपणाला वाटूच देत नाही. तसं पाहिलं तर समाजात जगताना सर्वस्वी मुक्‍त रीतीने कुणी जगूच शकत नाही. अनेक आवश्यक-अनावश्यक बंधने पाळतच जगावे लागते. पदोपदी तडजोड करावी लागते, पडते घ्यावे लागते. 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम्‌ त्यजाति पंडितः' म्हणतात तसे काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यातूनच आपण बचावतो. मात्र, ज्या तडजोडीसुळे आपण ज्या जीवनमूल्यांना पवित्र मानून जगत आलो तीच टाकून द्यावी लागत असतील तर तसली तडजोड करण्यापेक्षा आपल्या मूल्यांना उराशी धरल्यासुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना अधिक सुखदायक ठरतील. तेव्हा तुझा हा झगडा तुला सर्वात महत्त्वाच्या वाटणाऱ्या मूल्यांचा आहे, की केवळ तपशिलातीलच 'भेदातून निर्माण झालेला आहे की संपूर्ण गैरसमजावर आधारलेला आहे हे तुमच्या या चर्चेतून निष्पन्न होईल आणि तुला निर्णय घेता येईल. तो निर्णय दुरावलेले संबंध पुन्हा जुळवणारा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आज उभा राहिलेला पेचप्रसंग तात्पुरता ठरो आणि तुझे जीवन सुखाचे जावो, हीच शुभेच्छा.

माझे हे पत्र सुरेशला दाखवायला माझी हरकत नाही.

तुझा,
पु. ल. देशपांडे
(आणखी पु.ल. - लोकसत्ता)

1 प्रतिक्रिया:

Dr Deshmukh said...

जीवनमूल्ये असणं ही बाबच नवीन आहे आजच्या पिढीला. तस काहीं असत हे माहीतच नाही. कितीही नवे सिनेमे किंवा वेब सिरीज पहिल्या तरीही ही बाब काही सापडत नाही. किती तरी दिवसांनी खूप भरून वाटलं.