
सुनीताबाईंचे वडिल, सदानंद ठाकूर हे फार मोठे वकील होते. काँग्रेसमधे असणार्या त्यांच्या मामांनी १९४२मध्ये भुमीगत रेडिओ पुन्हा सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. परंतु काही कारणांस्तव ते काम पूर्ण झाले नाही. सुनीताबाईंनी मोर्चाचे नेतृत्वही केले होते. आणि मुख्य म्हणजे त्या एकदा मिलिट्रीच्या गाड्यांच्या ताफ्यालाही सामोर्या गेल्या होत्या! वाटतं, की कदाचित याच सगळ्या अनुभवसंचितातून त्यांच्यामधे एक अढळ कणखरता निर्माण झाली असावी. नाहितर, अवघ्या अस्तित्वावर कवितेचा हळवा संवेदन धागा तोलून धरताना अशी कणखरता आणि खरंतर शिस्तही सांभाळणं किती अवघड आहे! शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रत्नागिरीहून मुंबईला स्थायिक झाल्या. तिथे त्या ओरिएंटल हायस्कूलमधे शिकवत होत्या. आश्चर्य म्हणजे पु.ल.ही तेव्हा ओरिएंटल हायस्कूलमधे शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हा दोघांच्याही कवितेवरच्या नितांत प्रेमामुळे त्यांच्या मनाचा धागा जुळला, आणि दोघांच्याही जीवनाची कविता बहरुन आली! १२ जून १९४६ रोजी त्यांचा विवाह झाला. तोही नोंदणी पद्धतीने.
त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमधून उत्तम अभिनयही केला. 'नवरा बायको' या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. 'वंदे मातरम्' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रसिद्ध झाली. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला. 'सुंदर मी होणार' मधली दीदीराजे ही महत्वाची भूमिकाही त्यांनी साकारली. पु.लं. बरोबर त्यांनी अनेक नाटकं साकारली. 'वार्यावरची वरात' 'बटाट्याची चाळ' अशा अनेक नाटकांमधे त्यांनी भुमिका केल्या. सहचरणीच्या आपल्या भूमिकेत त्यांनी पु.लं.च्या कामात वेळोवेळी हातभार लावला. अर्थात्, त्यांच्यासरख्या इतक्या हरहुन्नरी माणसासोबत संसार करणं हेही कर्तृत्वच म्हणावं लागेल!
सुनीताबाईंना अवघा महाराष्ट्र पु.लं.ची पत्नी म्हणून मुख्यत्वे ओळखत असला, तरी पु.लं.च्या इतक्या भव्य यशामधे सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे यात संशय नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ जयंत नारळीकर म्हटले होते, की "पुलं पुरुषोत्तम झाले, ह्यामागचं कारण, त्यांना वेळोवेळी "सुनीत" करणाऱ्या सुनीताताई." या शब्दांतून, या विदुषीचं आपला व्यासंग सांभाळून पतीला अखंड साथ देण्याचं सहजव्रत स्पष्टपणे जाणवतं. पण पु.लं.च्या मनात सुनीताबाईंबद्दल नक्कीच एक सप्रेम आदर होता. तेच एकदा म्हटले होते, की “सुनीता फार बुद्धिमान आहे, मॅक्ट्रिकला गणिताला तिला शंभर पैकी शंभर मार्क मिळाले होते. नंतर बेचाळीसच्या चळवळीत गेली, संगिनी रोखून गोरे शिपाई समोर असताना मोर्चातील सर्व पळाले, ती एकदम ताठ उभी होती! तिला वजा केले, तर बाकी उरेल; पण चार लोकांची असते तशी. वारा प्यालेल्या वासरासारखी माझी अवस्था झाली असती. बंगल्यात राहिलो असतो. ए सी गाडीतून फिरलो असतो. बंगल्यासमोर नाना क्षेत्रातील कलावंतासमवेत मैफिली भरल्या असत्या. एकूण भोगाशिवाय कशाला स्थान राहिले नसते.”
यातूनच पुलंच्या जीवनातील सुनीताबाईंचा अविभाज्य वाटा दिसून येतो. या दांपत्याचं जीवन सर्वांगाने समृद्ध होतंच, पण लौकिक अर्थाने समृद्ध असूनसुद्धा सुनीताबाई फार काटकसर करत. त्यांचा हा स्वभाव हे पुलंच्या मिश्किल विनोदांचं अनेकवेळा मूळ होत.
कविता हा सुनीताबाईंचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय. मुळातच रसिकतेने काठोकाठ भरलेल्या मनाला कविता दूरची कशी बरं वाटेल? ती नेहमीच त्यांच्या जवळ रराहिली. त्यांची होऊन राहिली. अगदी शेवटपर्यंत! लहान मुलांंनी मुग्धपणे आनंदासाठी बडबड गाणी म्हणावीत, श्लोक, स्तोत्र वगैरे अस्खलित म्हणून दाखवावं तशाच त्या कविता म्हणत. त्याच आनंदात, त्याच आस्थेने. अगदी गोविंदाग्रजांपासून कित्तीतरी कवींच्या कविता त्यांना संपूर्ण तोंडपाठ असायच्या. त्या वारंवार म्हणताना, मनात खोलवर होत जाणारं त्याचं चिंतन याचा केवळ अंदाजच आपण बांधू शकतो. कवितेच्या याच उत्कट प्रेमामुळे पुढे पु.ल. आणि सुनीताबाईंनी मिळून काव्यवाचनाचे जाहिर कार्यक्रम सुरू केले. बा.भ. बोरकर, बा.सी. मर्ढेकर, आरती प्रभू अशा काही निवडक कविंच्या कवितांचा मागोवा घेणार्या या कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी होत असे. ते कार्यक्रम केवळ कवितेच्या प्रामाणिक प्रेमातून केले असले, तरी त्यातून सुनीताबाईंना बरेच नावलौकिक मिळाले. सुनीताबाईंचं मराठी भाषेवर प्रभुत्व तर होतंच, शिवाय बंगाली आणि उर्दू भाषेचाही त्यांचा उत्तम अभ्यास होता.
सुनीता देशपांडेंशी निगडीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जी.एं. सोबतचा पत्रव्यवहार. जी.ए. कुलकर्णींच्या लेखनाचं मोठेपण सुनीताबाई आणि पु.ल. जाणून होते. ते या दोघांच्याही आवडीचे लेखक होते. पण सुनीताबाई आणि जी.ए. कुलकर्णी या दोघांमधलं मैत्र हे काही विलक्षणच होतं. त्यांचा पत्रव्यवहार हा फार मोलाचा होता. पुस्तकांबद्दल, इतर चांगल्या साहित्याबद्दल, आणि अशा आणखी बर्याच गोष्टींबद्दल त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र म्हणजे वाचकाला समृद्ध करणारा संवाद आहे. तो पत्रव्यवहार २००३साली 'प्रिय जीए' या नावाने सुनीताबाईंनी प्रकाशितही केला आहे. 'समांतर जीवन' (१९९२), 'सोयरे सकळ' (१९९८), मनातलं आकाश, मण्यांची माळ (२००२) ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तकंही वाचकपसंतीस पात्र ठरली आहेत. सुनीता देशपांडेंचं पुस्तक म्हटल्यावर अनेकांना आठवतं ते 'आहे मनोहर तरी'. १९९० मधे प्रकाशित झालेलं सुनीताबाईंचं हे आत्मचरित्र त्याच्या नावानेही आपल्याला भुरळ घालतं! यामधे त्यांच्या सहजिवनाचा अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे व्यक्त केलेला आहे. हे पुस्तक प्रकाशित होताच त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता, अजूनही लाभतो आहे.

सुनीताबाईंच्या आणि खरंतर या दांपत्याच्या अगणित वैशिष्ट्यांपैकी आणखी एक म्हणजे औदार्य! अनेकानेक सामाजिक साहित्यिक संस्थांना त्यांनी भरभरुन देणग्या दिल्या. विशेष म्हणजे त्या प्रत्येक संस्थेला ती देणगी त्यांची असल्याचे अनुच्चारीत ठेवायला सांगून दिलेल्या त्या देणग्या म्हणजे सामाजिक कर्तव्याचं निर्मोहीपणे जपलेलं भान म्हणावं लागेल. पु.लं.च्या निधनानंतर त्यांनी 'पु.ल.देशपांडे' फाऊंडेशनची स्थापना करुन अशाच अनेक देणग्या निर्वाच्यता ठेऊन दिल्या. देणग्या योग्य त्या संस्थेच्या आणि योग्य त्या हातांतच जायला हव्यात हा त्यांचा कटाक्ष सदैव असे.
'इतकं समृद्ध जगल्यावर, मृत्यूही तितकाच वैभवशाली यावा. त्याने उगाच रेंगाळू नये. माणसाला केविलवाणं करु नये' असं एकदा त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या शेवटच्या दिवसांत ग्लानीत असतानाही त्यांच्या ओठांवर कविता असायची! माणसाने इष्टदेवतेचा अखंड जप करावा तसं ग्लानी अवस्थेतही त्यांचं कविता म्हणणं चालूच असे. आयुष्यसाराचं तीर्थ ओंजळीत वहाणारी कविता, तिच तर त्यांची देवता होती. शेवटच्या क्षणापर्यंत या विदुषीने तिला जपलं होतं. ७ नोव्हेंबर २००९ रोजी त्यांच्या देहातून कविता बाहेर पडली!
कविता जगणार्या विदुषीने शब्दांचा निरोप घेतला.
~ पार्थ जोशी
0 प्रतिक्रिया:
Post a Comment