Monday, June 12, 2023

पहिला पाऊस

उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पहिला पाऊस पडला ती तापलेली माती जी गंध घेऊन उठते त्याला तोड नाही. एका खोलीत बसून तो घ्यायचा नसतो. तो अनपेक्षित रीतीने यावा लागतो आणि तो वास घेताना उघड्यावर जाऊन तृप्त धरतीची तृप्तीही डोळे भरून पहावी लागते. उन्मत्त ढगातून वीज खेळायला लागल्यावर तिचा संचार तरुण शरीरातही व्हावा यात काय आश्चर्य? त्या जलधारात न्हाऊन निघालेल्या ललनांच्या स्वखुषीने प्रियकरांना दिलेल्या आलिंगनांच्या स्मरणानं चारुदत्तालाच काय पण कुणालाही, "तेचि पुरुष दैवाचे" असंच म्हणावसं वाटणार.

पहिला पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहण्याची उत्सुकता कधी संपू नये. रस्त्यातून बँड वाजत निघालेला पहायची हौस संपली की बालपण संपलं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पहायची हौस खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं समजावं. पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमकापुरता नाही. पाण्याने तहान भागते आणि गाण्याने श्रम हलके होतात. ही झाली नुसती उपयुक्तता. पण माणसाच्या जीवनाला उपयुक्ततेपलीकडचंही एक परिमाण आहे. म्हणूनच पाऊस कल्पनेच्या वेलींनाही फुले आणतो.

वर्षातला पहिला पाऊस आजही मला शाळकरी वयात घेऊन जातो. जून महिन्यातल्या पावसाच्या आठवणी जडल्या आहेत त्या नव्या छत्रीवर पडलेल्या पाण्याच्या वासाशी, नव्या क्रमिक पुस्तकांच्या वासाशी, कोवळ्या टाकळ्याच्या भाजीशी, उन्हाळ्यात फुटलेले घामोळे घालवायला पहिल्या पावसात भिजायला मिळालेल्या आईच्या परवानगीशी, रस्त्यातली गटारे तुडुंब भरून वाहू लागल्यावर त्यात लाकडाची फळकुटे टाकून त्याचा प्रवास कुठवर चालतो ते पाहत भटकण्याशी आणि आषाढात गावातल्या विहिरी काठोकाठ भरल्यावर आपापल्या आवडत्या विहिरींवर आवडत्या मित्रांबरोबर जाऊन मनसोक्त पोहण्याशी.

पाऊस हा असा बालकांना नाचायला लावणारा, तरुणांना मस्त करणारा आणि वृद्धांना पुन्हा एकदा तारुण्याच्या स्मरणाने विव्हल करणार असतो. चार महिन्यांचा हा पाहुणा, पण प्रत्येक महिन्यात त्याच्या वागणुकीत किती मजेदार बदल होत असतो. म्हणूनच की काय, वयस्कर माणसं अनुभवांचा आधार देताना, "बाबा रे, मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत" असं म्हणतात.

पु. ल. देशपांडे
पुस्तक - पुरचुंडी

0 प्रतिक्रिया: