‘माझे जीवनगाणे’ हे गाणं ऐकतांना गाण्यातल्या पहिल्या तीन शब्दांबरोबर एकाच वेळी अभिषेकीबुवा, पु. ल. देशपांडे आणि मंगेश पाडगावकर या तीन महान व्यक्तींचं स्मरण होतं. एखादं गाणं असं जन्मत:च रत्नजडित स्वरमुकुट लेवून येतं. अनमोलत्वाचं बिरुद घेऊनच जन्माला येतं. तसंच या गाण्याचं झालं असं वाटतं... गाणं सुरू झाल्याबरोबर रसिकमनात आनंदलहरी उमटू लागतात. आपलं अवघं भावजीवन व्यापून टाकणारे मंगेश पाडगावकरांचे शब्द, अभिषेकीबुवांचे स्पष्ट उच्चार आणि लयकारीनं नटलेली गायकी आणि ‘पुलं’चं हवंहवंसं, रसिकांना आपलंसं करणारं, नव्हे पुलकित करणारं संगीत म्हणजेच ‘माझे जीवनगाणे’ हे गीत. रसिकहो हे लिहिता लिहिताच गाणं कानामनात सुरू झालंय...
माझे जीवनगाणे
व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा ना दिसू दे
गात पुढे मज जाणे... माझे जीवनगाणे...
कुणाचं आहे हे स्वगत? कवी पाडगावकरांचं, बुवांचं की ‘पुलं’चं ? आत्ता या क्षणी वाटतंय, की तिघांचंही... पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन. उद्या म्हणजे आठ नोव्हेंबरला ‘पुलं’चा जन्मदिन... या दिग्गजांच्या स्मरणयात्रेत कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांची पालखी मन:चक्षूंपुढे झुलत चाललीय. खरंच हे गाणं ऐकणं म्हणजे एक अलौकिक अनुभव! शब्दांचा, स्वरांचा आणि गायनाचा... हा त्रिवेणी संगम आकाशवाणीतच व्हावा हा किती सुंदर योगायोग. ‘पुलं’ आकाशवाणीतच नाट्यनिर्माते होते, पाडगावकरही आकाशवाणीत कार्यरत होते आणि अभिषेकीबुवांनीही एका मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांनीही जवळजवळ साडेनऊ वर्षं आकाशवाणीत काम केलं होतं. ‘रेडिओत नसतो, तर असं चौफेर मी काहीच करू शकलो नसतो. नाटक, संगीत, दिग्दर्शन, स्वररचना या सगळ्या गोष्टी मी रेडिओमुळे मी करू शकलो,’ असं त्यांनी म्हटलं होतं. अभिषेकीबुवा १९४२च्या सुमारास पुण्यात आले. ‘गाणं हेच आपलं जगणं’ हाच ध्यास घेऊन बुवा मार्गक्रमण करत राहिले. अभिषेकीबुवांबद्दल ‘पुलं’ म्हणायचे, की दत्तगुरूंसारखे २१ गुरू त्यांनी केले. अभिषेकीबुवांनी विविध घराण्यांचा अभ्यास केला. मिंड, मुरकी, तान अशा प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास केला, प्रचंड मेहनत आणि रियाजानं कमावलेला आवाज ही बुवांची वैशिष्ट्यं. या सर्व वैशिष्ट्यांनिशी बुवांचं गाणं बहरत गेलं.
कधी ऐकतो गीत झऱ्यातून
वंशवनाच्या कधी मनातून
कधी वाऱ्यातून कधी ताऱ्यातून
झुळझुळतात तराणे... माझे जीवनगाणे...
‘पुलं’ नाट्यनिर्माते म्हणून आकाशवाणीत असताना त्यांनी ‘भिल्लण’ ही संगीतिका केली होती. मंगेश पाडगावकरांचं काव्य, ‘पुलं’चं संगीत, मुख्य गायक पं. जितेंद्र अभिषेकी, विदुषी किशोरी आमोणकरही होत्या. आकाशवाणीवरून ही संगीतिका प्रसारित झाली होती, तेव्हा रसिक श्रोत्यांना श्रवणसुखाची पर्वणी अनुभवायला मिळाली असेल! आसमंतात ध्वनिलहरींऐवजी आनंदलहरी प्रसारित झाल्या असतील. ही संगीतिका प्रसारित होणार होती, तेव्हा बुवांनी आपल्या आईला, बहिणीला मोठ्या अभिमानानं सांगितलं होतं, ‘आज रात्री साडेआठ वाजता रेडिओ ऐका. तुम्हाला कळेल, की मी कोणत्या कामात गुंतलो होतो.’ रेडिओवर संगीतिका प्रसारित झाली आणि त्या संगीतिकेतील गाण्यांच्या आनंदलहरींवर आजतागायत मराठी मनं पुलकित होताहेत.
‘पुलं’ नेहमी म्हणायचे, की माझं पहिलं प्रेम संगीत! आणि मग साहित्य... बालगंधर्वांचं गाणं बालपणी कानावर पडलं आणि चांगल्या गाण्याचा बालमनावर झालेला संस्कार कधीही पुसला गेला नाही. गवई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही; पण उत्तम संगीतकार म्हणून ‘पुलं’ची ओळख अवघ्या संगीतविश्वाला झाली. ‘मी गाणं शिकतो’ या ‘पुलं’च्या एका लेखात त्यांच्या गाणं शिकण्याच्या धमाल गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. मुंबईला गेल्यावर पांडुबुवांकडच्या गायनाच्या क्लासच्या गमती वाचून आपली हसून हसून पुरेवाट होते. पांडुबुवा सगळ्यांना ‘देवराया’ म्हणायचे. हे सांगून ‘पुलं’नी गाण्याच्या क्लासमधल्या गंमती सांगताना त्यांच्यातला एक मजेदार संवाद लिहिलाय.
‘आवाज आणि आवाजी यात फरक कोणता?’ मी तसा चेंगट आहे.
‘तसा फरक नसतो देवराया.’
‘पण मग आवाज केव्हा म्हणायचा न् आवाजी केव्हा म्हणायचं ?’
‘हे पहा, एखाद्या बाईला बाई केव्हा म्हणायचं न् बया केव्हा म्हणायचं, याचा काही कायदा आहे का? पोराला पोरगंही म्हणतात, कार्टंही म्हणतात. आमचंच बघा ना, गायन क्लासला कधी आम्ही कलेची सेवा म्हणतो, तर कधी पोट जाळण्याचा धंदा म्हणतो. आता ‘सा’ लावा देवराया.’
‘का हो बुवा, ‘सा’ला ‘सा’ का म्हणतात?’
‘देवराया, आता आपलं डोकं...’
‘काय?’
‘नाही, उदाहरणार्थ... आपलं डोकं..’
‘माझं डोकं, त्याचं काय?’
‘आपल्या डोक्याला काय म्हणतात?’
‘डोकं’
‘डोकं, खोकं का नाही म्हणत? तसंच ‘सा’ला ‘बा’ म्हणून कसं चालेल ?’
आणि मग मी ‘सा’ लावला.
‘पुलं’च्या गळ्यातल्या ‘सा’ऐवजी पेटीवरचा ‘सा’ मात्र फुलत गेला. त्या ‘सा’ने त्यांची आयुष्यभर संगत केली. संगीतातला ‘सा’ आणि साहित्यातला ‘सा’ त्यांचं जीवनगाणं बनून राहिले. पार्ल्यातल्या अजमल रोडवरच्या त्रिंबक सदनात २२ रुपयांना विकत घेतलेली पेटी ‘पुलं’ना खूप प्रिय होती. पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या नुसत्या नावानं मराठी मन हरखून जातं. तुसड्या, माणूसघाण्या चेहऱ्यावरही स्मितरेषा उमटवणारं नाव म्हणजे ‘पुलं’! जिवंतपणी दंतकथा होण्याचं भाग्य लाभलेलं नाव म्हणजे ‘पुलं’! संगीतकलेबद्दल विलक्षण प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता असणाऱ्या ‘पुलं’नी संगीताविषयी भरभरून लिहिलंय. आपल्या भाषणांमधून सांगितलंय. भावगीत गायनाबद्दल अतिशय तळमळीनं त्यांनी लिहिलंय, ‘भावगीत गायन हा संगीत प्रकार टिकावा, असं गायकांना वाटत असेल, तर अभिजात संगीताचा अभ्यास अपरिहार्य आहे. त्याशिवाय लयीची आणि स्वरांची मूल्यं समजणं अशक्यच आहे.’
पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आज स्मृतिदिन आणि उद्या ‘पुलं’चा जन्मदिन साजरा करताना कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेली आणि या दोन दिग्गजांच्या संगीतकलेनं मोहरलेली कविता गुणगुणत राहू या...
गा विहगांनो माझ्या संगे
सुरावरी हा जीव तरंगे
तुमच्या परी माझ्याही सुरातून
उसळे प्रेम दिवाणे... माझे जीवनगाणे...
- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४
(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
https://www.bookganga.com/R/7W56G
मूळ स्रोत --> https://www.bytesofindia.com/
0 प्रतिक्रिया:
Post a Comment