पु. ल. देशपांडे २००० सालात १२ जून रोजी आपण सर्वांचा निरोप घेऊन गेले. पण तमाम महाराष्ट्रातील जनता ‘निरोप आमचा कसला घेता’ जेथे विनोद तेथे पु. ल. असे म्हणत पु. ल. ची स्मृती कायम जागृत ठेवली.
पु. ल. म्हणजे विविध गुणांची खाणच. त्या खाणीतून आपण विनोदाचं गाठोड बाहेर काढलं व उघडलं तर त्यांच्या विनोदातील वैशिष्ट्ये त्यांच्या विनोदात विपुलतेने आढळतात. पु. ल. सबकुछ असं आपण नेहमी म्हणतो व वाचतो, तर हे सबकुछ कसं अवगत होत गेलं याचा मागोवा घेताना पु. ल. सांगतात, चार्ली चॅप्लीन आणि वॉल्ट डिस्ने यांना शांततेसाठी असणारं नोबेलचं पारितोषिक द्यायला पाहिजे होतं. त्यांनी जगाला जो आनंद दिला तितका आनंद दुसरं कोणीही देऊ शकलं नाही. पु. ल. च्या मनात दडलेला महापुरुष चार्ली चॅप्लीन.
आजूबाजूची माणसं, परिस्थिती माणसावर एक संस्कार करून त्याला घडवत असतात, असं सांगताना पु. ल. म्हणतात, पार्ल्याला घराच्या ओसरीवर गाण्याचा अड्डा नेहमीच जमत असे. गाण्याचे कार्यक्रम नेहमी होत असत. पण परीक्षा आली की त्यावर बंधनपण येत असे. परंतु परीक्षा दरवर्षी येते म्हणून काय गाणं चुकवायचं का म्हणणारे वडील पु. ल. ना मिळाले आणि म्हणून गाण्याचा कार्यक्रम असला की गाण्याला ‘जातो’ अनाऊंस करायचं.
पु. ल. नी एकदा नाटक बघायला गेले असताना सिगरेट ओढली. वडील पण त्याच नाटकाला आले होते. घरी आल्यावर वडिलांना विचारलं नाटक कसं झालं? वडील म्हणाले, ‘चांगलंच झालं शिवाय तुला सिगारेटचा ठसका नाही लागला.’ अशा मोकळ्या वातावरणात विनोद फुलत गेला. पु. ल. नी लेखक व्हावं असं आजोबांना वाटे. आजोबा साहित्यप्रेमी, तर वडील गाण्याचे शौकीन. पु. ल. चे मामा स्टोरी टेलर. ते गोष्टी रंगवून सांगत असत. गाण्याची, नाटकाची व साहित्याची आवड असणारे सगे सोयरे, साध्या वातावरणातील मध्यमवर्गीय कौटुंबिक परिसर ही पु. ल. च्या जीवनातील मोठीच देणगी होय. पु. ल. म्हणतात, विनोदाचं जीवनात नेमकं स्थान कोणतं?
विनोदाने काय दिले- या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांच्या शब्दात, ‘विनोदानं प्रमाणाची जाणीव दिली, आयुष्यात पहिलं काय आणि दुसरं काय हे शिकवलं.
विनोद हा परमेश्वराची देणगी असते. तो कळण्याकरिता विशिष्ट मानसिकता लागते. पु.ल. च्या जवळ सहज विनोद आहे. तसेच उत्स्फूर्त विनोद हा पु. ल. च्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा विशेष होता. हजरजबाबीपणा व विनोदाची अशी खास शैली पु. ल. जवळ होती व म्हणूनच खाजगी गप्पांची महफील गाजविताना त्यांच्या कोट्या, विनोद भान विसरून श्रोते मंडळींना त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटत असे. फटाफट हशा हा मैफिलीची रंगत वाढविण्यात नेहमी अग्रेसर राहत असे. कारण पु. ल. चे विनोद वा कोट्या गुदगुदल्या करून निर्मळ आनंद देणार्या असत. घरातील चार पिढ्या एकत्र बसून विनोदाचा आनंद लुटू शकतात.
त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीमुळे पु. ल. सहज विनोदाचे माध्यमातून लोकांमध्ये सुसाट वार्यासारखे पसरत. स्वत:वर कोटी व विनोद पु. ल. करीत. स्वत:चा व सुनीताबाईंचाही अपवाद करीत नसत. सुनीताबाई पु. ल. ना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पु. ल. त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकदा पु. ल. ना म्हणतात, तुमच्या घरी काय तुम्ही अन् सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार. पु. ल. नी गंभीर चेहरा करीत म्हटले, बायको तुमच्यावर तलवारीचे सारखे वार करते व तुम्ही ढाल धरून ते चुकवीत आहात असे चित्र असते. पु. ल. म्हणतात, आमच्या घरी नुसता हास्यकल्लोळ नसतो तर सर्व कल्लोळ असतात. अगदी संशयकल्लोळ सुद्धा.
विनोद हा पु. ल. च्या लेखनाचा स्थायीभाव. निखळ विनोद निर्मिती करून पु. ल. नी प्रेक्षकांचे मनात अढळ व मराठी भाषेत सम्राटपद मिळवलं आहे.
पु. ल. च्या विनोदी साहित्य क्षेत्रातील त्यांचे स्थान म्हणजे देदीप्यमान चमकणारा तारा आहे. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली अशी कितीतरी पुस्तकं विनोदाबरोबरच माणसं समजून घेण्याची मालिकाच आहे. जीवनाचा आनंद भरभरून लुटायचा असेल तर पु. ल. म्हणतात, एक बाजाची पेटी आणि ओंजळभर फुलं कायम घ्यावीत म्हणजे सूर आणि सुगंध यांनी जीवन सुंदर होते. अशा सुंदर जीवनात आयुष्यभर सर्वांना आनंद देत हसवीत हसवीत ते निघून गेले. पण असं तरी का म्हणायचे. कारण त्यांच्या विनोदी साहित्य रूपाने ते आपल्यात आहेतच. कवी कुसुमाग्रज म्हणत, पु. लं. चे साहित्य म्हणजे एक ‘पुलबाग’ आहे. कवी मंगेश पाडगावकरांनी पु. लं. च्या अमृत महोत्सव प्रसंगी लिहिले ते असे.
‘पु. ल. स्पर्श होताच दु:खे पळाली
नवा दूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतूनी माणसे मुक्त झाली
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली’
पु. ल. स्वत:बद्दल म्हणत की, ब्रह्मदेवानं त्यांना ‘हसवण्याचा गुण’ एवढेच भांडवल देऊन इहलोकी पाठवलं, जीवनातले चांगले पाहून ते आनंदले, तो आनंद त्यांनी भरभरून वाटला.
त्यांच्या साहित्यरूपी आनंदयात्रेत सामील होणं, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेऊन आनंद लुटणं हे त्यांच्या स्मृतिदिनाचे दिवशी खरे स्मरण होय.
आरती नाफडे
तरुण भारत
१३ जून २०१४
2 प्रतिक्रिया:
Now Pu La Deshpande Kathakathan is available on android mobiles and can be downloaded from Google play store. All volumes are free of cost.
Volume 1 : Sakharam Gatane, Mi Ani Maza Shatrupaksha, Chitale Master
Volume 2 : Paliv Prani, Peston Kaka
Volume 3 : Hari Tatya, Maze Poushtik Jeevan, Tumhala Kon Vhayachay
Volume 4 : Narayan, Rao Saheb
Volume 5 : Antu Barva, Mhais
Volume 6 : Apurvai, Paanwala
Volume 7 : Gacchisaha Zalich Pahije, Kahi Nave Grahayog
All apps can be downloaded Google Play Strore https://play.google.com/store/search?q=nivdak%20pu%20la%20vol&hl=en
First volume is also available on AppStore for iphone https://itunes.apple.com/in/app/nivdak-pu-la-part-1/id872505969?mt=8
लाखोंनी ज्ञानेश्वरीची पारायणं करावी, हजारोंनी त्यावर पीयचडी तसं पुलंच लेखण त्याविषयी लिहावं आणि बोलावं तेवढं थोडंच.
आणखी एक ब्लॉगचे विजेट कोड कसे बनवावे या विषयी मार्गदर्शन कराल ? shendgevijay2@gmail.com
Post a Comment