ह्या नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला श्री. पु.ल. देशपांडे ह्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यातील काही भाग -
"माणसाला तू मूर्ख आहेस म्हटलं तर राग येत नाही; पण तुला विनोदबुद्धी नाही असं म्हटलं तर भयंकर राग येतो, याचं कारण, हसणं हे तारुण्याचं लक्षण आहे. म्हातारं झाल्याचं नेमकं लक्षण म्हणजे - दुसरे हसल्यावर 'दात काढायला काय झालं?'"
"मला बोलीभाषेबद्दल अतोनात प्रेम ह्यासाठी आहे की जिव्हाळ्याची भाषा ही बोलीभाषाच आहे. शेवटी आपल्याला नाईलाज म्हणून एक प्रमाणभाषा तयार करावी लागते. तुम्ही कोकणातल्या खेड्यात गेल्यानंतर "आपण आलात आम्हाला अतोनात आनंद झाला" असं कुणी म्हंटल तर “जोडा आन रे इकडे मोठो चाकरमनी झालस काय" असं म्हणतील. त्याच्याऐवजी “झिला कवा ईलस" ह्याला खरोखरच अर्थ आहे. त्याच्यामध्येच सगळा गोडवा आहे त्याच्यामध्येच खरा जिव्हाळा आहे."
मला कुणीतरी सांगितलं हे बी.इ.एस.टी.त आहेत. तिथे काय करतात मला माहिती नाही, परंतु तिथे त्यांनी थोडा वेळ काम करायला हरकत नाही. तिथे काही लोक काम करतात असंही मी ऐकलं आहे; पण मी बी.इ.एस.टी.च्या अधिकाऱ्यांना सांगेन की, बी.इ.एस.टी.चं नाव उज्ज्वल व्हावं असं जर तुम्हांला वाटत असेल - बसेसनी तुमचं जे काय झालंय ते होऊ दे परंतु असले कलावंत जर नाटक दाखवायला लागतील तर लोक क्यूमध्ये भांडणतंटा करण्याऐवजी, "अरे, रणदिव्यांची बी.इ.एस.टी. आहे" असं म्हणायला लागतील.
आणखी एका गोष्टीबद्दल मी ह्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. ह्या सगळ्यांनी आजच्या प्रयोगाचं उत्पन्न बाबा आमटेंच्या प्रकल्पासाठी दिलेलं आहे. ह्याच्या मागची भावना मी समजू शकतो. आपण स्वतः आनंदामध्ये असताना दुसऱ्या कुणालातरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणं, हेच माणुसकीचं लक्षण आहे. ते ह्या कलावंतांना सुचलं.
- पाचामुखी






0 प्रतिक्रिया:
Post a Comment