Monday, November 11, 2019

मला नाचणारे तरुण आवडतात -- पु.ल.

आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?

अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.

तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?

युगानुयुगे माणसाला तारुण्यात जी आकर्षणं वाटत आली आहेत, तीच होती. पण आकर्षण सांगण्यापूर्वी तो काळ कसा होता, ते सांगायला हवं. तारुण्यातला स्वप्नरंजनाचा काळ. प्राप्त परिस्थितीविरुद्ध बंडखोरीनं उसळून येण्याचा काळ. भोवतालचं वातावरण विलक्षण विसंवादी. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीत कुटुंबात भांडणं मतभेद, डोक्‍यात राख घालणं असले प्रकार. आपण जिवंत असताना पोराने मिश्‍या काढल्या म्हणून त्याला घराबाहेर घालवून देण्याचा कर्मठ मूर्खपणा होता. कॉलेजमध्येच, काय पण हायस्कूलमध्येसुद्धा मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं हा गुन्हा होता. साक्षात भाऊ आणि बहीण एका शाळेत शिकत असतील, तिथे परस्परांशी ओळख सुद्धा दाखवायची नाही. असा दंडक आपली मुलं विचारांचे इंद्रिय बंद करून परंपरेच्या चौकटीतून आसपास जाऊ नयेत याची खबरदारी म्हणजे मुलांना वळणं ही पालकांच्या मनाची पक्की धारणा. हा धाक किती भयंकर होता याची आजच्या तरुणपिढीला कल्पना येणार नाही.

कुटुंबात बाप म्हणजे "हुकूमशहा' त्याला जाब विचारायची कुणाची टाप नसे. मुलींची अवस्था तर कमालीची केविलवाणी होती. आमच्या लहानपणी बायका नऊवारी लुगडी नेसायच्या. वयात आलेल्या मुली परकर-पोलक्‍यातून नऊवारीत शिरायच्या. त्या काळी नऊवारीऐवजी पाचवारी साडी नेसायचा काही बंडखोर महिलांनी प्रयत्न केला, तर या गोल साडीने संसाराचे वाटोळे केले, अशा प्रकारच्या आरोळ्या उठल्या होत्या. मुलींना आईवडिलांची आणि त्यांच्या पिढीच्या आप्तेष्टांची बोलणी खावी लागत होती. त्या अवस्थेपासून जीन्सपर्यंतच्या तरुणी पाहिल्या, की त्यावेळचा "सकच्छ की विकच्छ' हा वर्तमानपत्रे, मासिके, चर्चा ह्यांतून गाजलेला वाद मला आठवतो.

परंपरा, घराण्याची इभ्रत वगैरे कल्पना किती क्षुद्र गोष्टींवर आधारलेल्या होत्या याची कल्पना आजच्या तरुण पिढीला येणार नाही. आजही "खानदान की इज्जत'चा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. तरुणपिढीचं भांडण मुख्यतः वडील पिढीच्या असल्या मतांविरुद्ध होतं. ते कुटुंबाच्या परिघातले होते. अशा काळात आपल्या देशात एक अभूतपूर्व घटना घडली, ती म्हणजे महात्मा गांधींचा उदय. महाराष्ट्रापुरतं बोलायचे म्हणजे सुशिक्षित मराठी माणसाला लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' ही प्रतिज्ञा दिली होती. लोकमान्यांचं निधन झालं आणि महात्माजींचा उदय झाला. स्वराज्याची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोचायला लागली.

समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असं वाटणाऱ्या तरुणांना गांधीजींनी निरनिराळ्या प्रकारच्या विधायक कार्यात ओढून घेतलं. तरुण पिढीपुढे एक निराळं आकर्षण उभं राहिलं. मुलामुलींनी एकत्र येणं, गप्पा मारणं, एकत्र खेळणं, आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात एखादं भावगीत म्हणणं हे अब्रण्यम्‌ होतं. देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाल्याबरोबर हजारो तरुणी पुढे आल्या आणि त्यांनीही स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. इंग्रज सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. स्वराज्याला पर्याय नाही अशा भावनेने तरुणपिढी राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊन लागली. रोजच्या चर्चेत सिनेमा नटनटींच्या ऐवजी गांधी, नेहरू, सरदार पटेल ही नावं ऐकू यायला लागली. बेचाळीसची चळवळ तर अनेक दृष्टींनी युवकांची चळवळ ठरली. गांधी, नेहरू, पटेलांची थोरवी मान्य करूनही अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, अरुणा असफअली, युसुफ मेहेरअली ही जवळजवळ समवयस्क वाटावी अशी मंडळी अधिक जवळची वाटायला लागली.

तरुण मनाला भूल पाडावी असं त्यांची देखणेपण होतं. तासन्‌तास ऐकत राहावं आणि पाहत राहावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. मनात आणलं असतं तर सरकारी नोकरीत उच्च स्थानावर बसून ऐषआरामात राहाता आलं असतं. सुबक संसार करता आला असता. आय.सी.एस. होणं ही परतंत्र भारतातल्या सुशिक्षितांची एकमेव महत्त्वाकांक्षा होती. आय.सी.एस.मध्ये निवड होऊनही त्या नोकरीला स्वातंत्र्याच्या चळवळीत पडण्यासाठी लाथ मारणाऱ्या सुभाषचंद्र बोसांनी तरुणांपुढे त्यागाचा नवा आदर्श उभा केला होता. सर्व राष्ट्रप्रेमी जनतेत असंतोष खदखदत होता. तरुणपिढी युद्धाला सज्ज झाली होती. रणशिंग केव्हा फुंकलं जाणार याची जणू काय वाट पाहात होती. अशा वेळी महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत सोडून चालते व्हा' असं हजारो लोकांच्या सभेत बजावून सांगितलं आणि तरुणांना "करा किंवा मरा' हा महान मंत्र दिला. त्या मंत्राने तरुणच काय; पण मध्यमवयीन वृद्ध सगळेच भारले गेले आणि लहानांच्या वानरसेनेपासून ते वृद्धांच्या पेन्शनरसेनेपर्यंत सारा भारतीय समाज आपल्या कुवतीप्रमाणे चळवळीत भाग घेऊ लागला.

"कॉलेज स्टुडंट' नावाचा बूट-सूट वापरून साहेबी ऐट मिरवणारा तत्कालीन पिढीतला लोकप्रिय नमुना आता सिनेमातला "हिरो होण्याऐवजी गांधीजींच्या चळवळीतला सत्याग्रही होण्यात धन्यता मानू लागला. केशभूषा आणि वेषभूषा यांचं स्थान गौण ठरलं. पोलिसांच्या लाठीमाराने कपाळावर झालेल्या जखमेला बांधलेल्या बॅण्डेजला तरुण-तरुणींच्या मनात विलायती हॅटपेक्षा शतपट अधिक महत्त्व आलं.

फ्रेंच लिनन्‌ आणि डबल घोडा सिल्क शर्टिंगऐवजी अंगावर जाडीभरडी खादी आली. कट्ट्यावर जमणारे तरुण स्टडी सर्कल्समध्ये गांधीवाद, मार्क्‍सवाद म्हणजे काय ते जाणून घ्यायला एकत्र जमू लागले. परंपरावादी कुटुंबप्रमुखाची भीती नाहीशी होत चालली. अर्थात निसर्ग आपलं काम चालू ठेवतच होता. स्टडी सर्कल्समध्ये एकत्र जमणाऱ्या तरुणतरुणींचे परस्परांबद्दलचं आकर्षण कमी झालं नव्हतं. सिनेमा, प्रेम, कविता यांचं आकर्षण टिकून होतं. पण स्वतंत्र्यांच्या चळवळीत तरुण मनं अधिक झपाटली गेली होती.

जे तरुण प्रत्यक्ष भूमिगत चळवळीत भाग घेऊ शकत नव्हते. ते आपल्या कडून झेपेल तितका हातभार लावत होते. चळवळीतल्या काळातला हा नवा नायक ना. सी. फडक्‍यांनासुद्धा आपल्या कादंबरीत आणावा असं वाटलं आणि "प्रवासी'तला देशभक्त नायकक त्यांनी स्वतःच्या साहित्यात आणला.

आई-वडील रागवायचे का? मारायचे का?

आईवडिलांकडून मार खाल्ल्याचं मला स्मरत नाही. वडील तर मुलांना मारण्याच्या अतिशय विरुद्ध होते. आपला एखादा वडील स्नेही असावं, तसं आम्ही भावंडांचं नातं होतं. आम्हाला लहानपणी कधी भारी कपडे मिळाले नाहीत. मॅट्रिक पास होऊन कॉलोजात जाईपर्यंत हाफ प्यांट आणि त्यात खोचलेला हाफ शर्ट हीच माझी आणि माझ्या शाळासोबत्यांची "ड्रेपरी' असे शाळेत गणवेष नव्हता. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः अशा जातीचं मद्रास मिलचं एक टिकाऊ कापड बाजारात यायचं. त्या "अ' फाट कापडाच्या अर्ध्या तुमानी दोन-दोन वर्ष टिकायच्या पोशाखाबिशाखाच्या बाबतीत जरी आमचे लाड पुरवले नाहीत, तरी माझी वाचनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला वेळेवेळी पुस्तकं आणून दिली. त्यांची फिरतीची नोकरी होती. प्रवास संपवून घरी येताना आम्हा भावंडांसाठी खाऊ आणि पुस्तक घेऊन येत.

अशाच एका प्रवासावरून परतताना त्यांचा मुक्काम पुण्यात होता. तिथून त्यांनी मेहेंदळ्यांच्या दुकानातून बाजाची पेटी आणली होती. बावीस रुपयांची ती पेटी होती. मुलांच्या संगीताच्या, लेखन, वाचनातल्या आवडीला प्रोत्साहन देणारे वडील मला लाभले. त्यांच्या हातून मार मिळण्याची शक्‍यताच नव्हती. शिवाय वर्गातही माझा नंबर असायचा. त्यामुळे माझ्यामागे अभ्यासाचा लकडा लावण्याची त्यांना जरुरीही भासली नाही.

शाळा-कॉलेजात अनेक मित्र लाभले. कोणाकोणाची म्हणून नावं सांगू? मैत्रिणीही होत्या. सुस्वभावी होत्या. काही सुंदरही होत्या. कथा, कादंबरी, कविता अशा विषयांवर आमच्या चर्चाही चालायच्या. पण हे सगळं परस्परांतलं सभ्य अंतर राखून. आज परिस्थिती अगदी निराळी आहे. कित्येकदा वैशालीतल्या अड्ड्यात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक दिसते आणि मुलं फारशी तोंड उघडून बोलताना दिसत नाहीत. तोंड उघडलंच तर ते मसाला डोसा खाण्यासाठी. आमच्यावेळी कॉलेजात तर मुलामुलींनी एकत्र येता कामा नये असा अलिखित नियम होता. असल्या गोष्टींवर प्राचार्यांची कडक नजर असे. खूप वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या मुख्य शहरात असलेल्या कॉलेजात गेलो होतो. कॉलेजला विस्तीर्ण मैदान होतं.

कडेला आंब्याचा एक डेरेदार वृक्ष होता. खोलीतून, ह्या मैदानाचा देखावा फार सुरेख दिसे. पण प्रिन्सिपलसाहेबांची खोली म्हणजे त्यांचा टेहेळणी बुरूज होता. त्या आंब्याच्या झाडाखाली कुणी एखादा विद्यार्थी आपल्या वर्गातल्या मुलीशी गप्पा मारत असलेला दिसला की प्रिन्सिपलसाहेब पहाऱ्यावरच्या गुरख्याला पाठवून त्या मुलामुलीला पांगवून टाकीत. हे प्राचार्य संस्कृत शिकवीत म्हणतात. कालिदासाने ह्यांची मुलामुलींसमोर, विशेषतः मुलींसमोर शिकवताना ठायीठायी काय गोची केली असेल ते देवी शारदाच जाणे.

पहिल्यांदा लिखाण केव्हा केलं? काय स्वरुपाचं होतं? त्याचं कौतुक वगैरे झालं का?

माझ्या घरातच ग्रंथप्रेमाचं वातावरण होतं. माझे आजोबा लेखक होते. आर्यांच्या सणांचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास, अभंग गीतांजली ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं. त्यांच्या भेटीला बरीच साहित्यिक मंजळी यायची. त्या मैफलीत मला मज्जाव नव्हता. त्यामुळे वाचनाबरोबर लेखनाचीही आवड होती. पण वक्तृत्वाची आवड सगळ्यात जास्त. कित्येक वक्तृत्व स्पर्धांत भाग घेऊन मी बक्षिसं मिळवलेली होती. भाषण विनोदी करण्याकडे जास्त ओढा असायचा. विशेषतः आपल्या वेळी सुचवलेल्या विषयावरच्या भाषणात. त्यामुळे लेखनाची सुरवातही विनोदी लेखनाने झाली. पस्तीस-छत्तीस मध्ये म्हणजे मी मॅट्रिकच्या वर्गात असताना "खुणेची शिट्टी' ही माझी गोष्ट "मनोहर' मासिकाच्या एका अंकात छापून आली. मागे एकदा ती पुन्हा वाचायला मिळाली. या मासिकांचे संपादक शं. वा. किर्लोस्कर यांनी ती विनोदी (?) गोष्ट केवळ भूतदयेपोटी स्वीकारून छापली असावी असं मला वाटतं.

एखाद्याचं नाव दैनिकांत किंवा मासिकांत छापून येण्याला त्या काळी खूप महत्त्व होतं. त्यामुळे माझं कौतुक वगैरे झालं. पण त्या आधी मी एक कारवारच्या प्रवासाचं वर्णन करणारा लेख किर्लोस्कर मासिकासाठी पाठवला होता. माझ्या आयुष्यात "साभार परत' आलेला तो पहिला आणि शेवटचा लेख. कौतुकाचं म्हणाल तर माझं खरं कौतुक व्हायचं पेटीवादनाचं. शाळेतल्या आणि स्काऊटच्या नाटकात किंवा मेळ्यात केलेल्या कामाचं. त्यामुळे लेखन हे आपलं क्षेत्र नसून, गाणंबजावणं, अभिनय या क्षेत्रातच आपण राहायला पाहिजे अशीच माझी धारणा होती.

चित्रपट पाहणं, खेळ खेळणं, कैऱ्या-चिंचा तोडणे, प्रेम करणं असे प्रसंग घडले का?

चित्रपटाचं तर मला वेडच होतं. दादरच्या कोहिनूर सिनेमाचे मी आणि माझे काही मित्र हे तीन आणे तिकिटांचे प्रमुख आश्रयदाते होतो. परळच्या भारतमाता सिनेमात सिनेमा सुरू होण्याआधी रंगीबेरंगी दिव्यांची स्टेजजवळ चमचम सुरू व्हायची. आणि अँग्लोइंडिया पोरींचा "ड्यान्स' सुरू व्हायचा. "ड्यान्स' या शब्दातल्या "न्स'चा उच्चार वन्स मधल्या "न्स' चा उच्चाराशी जुळणारा होता.

तो एकदा संपला, की थेटरात अंधार व्हायचा आणि "खामोष,' "अब टॉकी शुरू होती है' अशी अक्षरं यायची. बडबड करणारे पब्लिक खामोश व्हायचे आणि पुढले दोन एक तास कसे गेले ते कळायचंदेखील नाही. आमच्या पार्ल्यात सिनेमाचं थेटर नव्हतं. पण मूकपट तयार होत पार्ल्याच्या रेल्वे स्टेशनाशेजारी मोर बंगला नावाचा राजवाड्यासारखा प्रचंड बंगला होता. भोवताली बागेत संगमरवरी पुतळे, भला मोठा पोहण्याचा तलाव, उंच घनदाट वृक्ष अशी तत्कालीन स्टंटपटाला लागणारी बॅंक ग्राऊंड तयार होती. गडबड न करता उभं राहिलं तर शूटिंग पाहायची परवानगी मिळे. धीरूभाई देसाई तसे चांगले होते.

मिस गुलाब, मा. नवीनचंद्र, मा. आशिक हुसेन अशी नावं आजही मला आठवतात. बहुतेक मूकपटात फायटिंग घोडदौड ही अभिनयाची मुख्य अंग असायची. अधूनमधून एखादा गंमत करून जायचा. पुढे फियरलेस नादिया वगैरेचे बोलपट सुरू झाले. आणि विष्णू सिनेटोन बंद पडला. खेळांच्या बाबतीत माझी भूमिका मुख्यतः प्रेक्षकाची राहिली. मैदानी आणि बैठ्या या दोन्ही प्रकारात रमलो नाही. तासन्‌ तास गेले ते गाण्याच्या मैफिलीत किंवा पुस्तकांच्या संगतीत. तसा क्रिकेट वगैरे थोडेफार खेळलो. क्रिकेट पाहायचो मात्र खूप! सी. के. नायडू, विजय मर्चंट, लाला अमरनाथ, मुश्‍ताक अली, अमरसिंग, खंडू रांगणेकर, निसार, अमर इलाही अशा नामवंत खेळाडूंचा खेळ पाहिला. अजूनही क्रिकेट पाहण्याची आवड टिकून आहे. पण प्रत्यक्ष स्टेडियममध्ये न जाता घरी टीव्हीवर पाहतो (एक गोष्ट मात्र निश्‍चित - क्रिकेट अधिक आकर्षक व्हायचा तो बॉबी तल्यारखानच्या "आखों देखा हाल'मुळे) क्रिकेटचा असा समालोचक पुन्हा होणे नाही. शनिवार, रविवार, आमच्या पार्ल्यातल्या पोरांचे अत्यंत आवडते उद्योग होते.

जावरू, लॉरेन्स असल्या नावाच्या लोकांच्या वाड्या होत्या. चिंचा-कैऱ्यांची तिथं मुबलक झाडं, सिमेंट कॉंक्रिटच्या पार्ल्याने आंबे, चिंचा, बोरं, आवळे नेस्तनाबूत केले. वाडीवरच्या पहारेकऱ्याला चुकवून चिंचा-कैऱ्या पाडण्यात एकप्रकारचा थ्रिल होता. चोरून आणलेल्या कैरीची आणि बटली आंब्याच्या कच्च्या फोडीची चव बाजारातल्या आंब्याला नसे. हाय चोरून मिळवलेल्या कैऱ्या-चिंचांप्रमाणेच "प्रेम' हे देखील चोरून करण्याचं प्रकरणच होचं. परण ज्या मध्यमवर्गीय वातावरणात आम्ही वाढत होतो तिथं प्रेम करणं जाऊ द्या, प्रेम हा शब्द मोठ्याने म्हणायची चोरी होती.

चित्रपटातल्या आवडत्या नायक-नायिका कोण? त्यांच्या लक्षात राहिलेल्या मुख्य भूमिका कोणत्या?

- पहिल्यापासूनच नाटक, गाणं वाचन या गोष्टी अतोनात आवडायच्या. त्यामुळे चित्रपट पाहाणं हे आपलं कर्तव्य आहे. आपली खरी दुनिया तिचं अशीच भावना होती. प्रभात, न्यू थिएटर्स, हंस, कोल्हापूर सिनेटोन, नवयुग या चित्रपट निर्माण करणाऱ्या संस्था ही सांस्कृतिक तीर्थक्षेत्रे होती. माझ्या आधीच्या पिढीचं महाराष्ट्रात तरी नाटक मंडळीचं बिऱ्हाड हे असंच ठिकाण होतं. तीस पस्तीस सालानंतर नाटक मंडळ्या बुडल्या. प्रेक्षक चित्रपटांकडे ओढले गेले. प्रभात आणि न्यू थिएटर्सचे जवळ जवळ सगळे चित्रपट मी पाहिले आहेत. मराठी चित्रपटात मास्टर विनायक आणि हिंदीत मोतीलाल हे माझे आवडते नट होते. विनायकरावांचा "ब्रह्मचारी' आणि मोतीलालचा "मिस्टर संपत' हे माझे आवडते चित्रपट.

मराठीत शांता आपटे आणि हिंदीत देविकाराणी, ललिता पवार या आवडत्या नट्या. पण पश्‍चिमेकडील आवडायच्या त्या ग्रेटा गार्बो, क्‍लॉलेट कॉलबर्ट, मर्ल ओवेरॉन, नॉर्मा शिअरर, डॉरथी, लामूर मराठी हिंदी वगैरे चित्रपट काही आवडत. पण मनाचा कब्जा घेतला होता तो हॉलिवूडच्या चित्रपटांनी. "गुडबाय मिस्टर चिप्स' तर मी पुण्यातल्या अपोलो सिनेमा थेटरात ओळीने तीनदा पाहिला होता. म्हणजे तीनचा खेळ, संध्याकाळी सहाचा आणि नऊचा सलग बसलो होतो. त्या नटनट्यांनी मनावर असंख्य ठसे उमटवले. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल.

तारुण्यात सर्वात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती कोण? त्यांच्या काही आठवणी?

- जीवनाच्या अनेक क्षेत्रात मी वावरलो. प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज पाहायला मिळाले. त्यामुळे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची यादी खूप मोठी होईल. स्थूलमानाने सांगायचं झालं तर, साहित्यात राम गणेश गडकऱ्यांचा, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात बालगंधर्वांचा, अभिजात संगीताच्या क्षेत्रात मल्लिकार्जून मन्सूरांचा, राजकीय क्षेत्रात साने गुरुजींचा प्रभाव माझ्यावर पडला.

दुसऱ्याच्या दुःखाने व्याकुळ झाल्यामुळे सहानुभूतीने झरणारा अश्रू हे निसर्गाने माणसाला दिलेले सर्वात मोठे देणे आहे हे साने गुरुजींनी स्वतःच्या आचरणाने सिद्ध करुन दाखवले. साने गुरुजींप्रमाणे मनावर तितकाच प्रभाव पाडणारी दुसरी व्यक्ती म्हणजे एस.एम. जोशी, "मी पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो' हे ज्यांच्याबद्दल अंतःकरणपूर्वक म्हणावं अशी ही देवदुर्लभ माणसं.

प्रेमविवाह या कल्पनेबद्दल काय वाटतं?

- प्रेम ही कल्पना मला खूप आवडणारी आहे. निरनिराळ्या संदर्भात ते प्रकट होतं. पण स्त्री-पुरुष प्रेम हा प्रकार निराळा आहे. इथं दोन जिवांच्या विसर्जीत होण्याची कल्पना आहे. हे प्रेम का निर्माण झालं? परस्परांविषयी इतकी ओढ का वाटायला लागली, स्त्रीपुरष सौंदर्य हे या प्रेमाला आवश्‍यक अशी अट आहे का? लैलाला, मजनूच्या डोळ्यांनी पहा म्हणजे ती किती सुंदर आहे ते तुम्हाला कळेल असं म्हटलं आहे. प्रेमाचं रसायन मनात कसं तयार होतं हे कोडं अजून उलगडायचंच आहे. मात्र लग्न ही माणसाने निर्माण केलेली समाजधारणेसाठी लागणारी गोष्ट आहे. प्रेम कुठलेही शिष्टमान्य नियम पाळायला बांधलेलं नाही. पण लग्न ही नियमांनी बांधलेली व्यवस्था आहे. तिचे कायदेकानून आहेत. हिंदूधर्मात "नाचिचरामि नातिचरामी-नातिचरामि' अशी शपध घेऊन वधूचा स्विकार केलेला आहे. मुसलमानी धऱ्मात तर लग्न हा इतर कुठल्याही करारासारखा करार आहे. इतर करारासारखीच तो मोडण्याची तिथे व्यवस्था आहे. इतर धर्मात लग्नाचे असे छोटेमोठे नियम आहेत.

आत्मविसर्जन या भावनेने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या तरुण तरुणींनी लग्नाचं बंधन स्विकारताना या व्यवहारात आपणा दोघांच्याही भूमिकेत बदल झाला आहे हे ओळखमे महत्वाचे आहे. आपल्या देशात आपला प्रियकर हा मालक होतो. स्वामी सेवक संबंधात रुढीने लादलेल्या नियमांना धरुन वागण्याची सक्ती असते. संवेदनशील स्त्रियांना ती जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रेमात पडलेल्या अवस्थेत जी धुंदी असते तिची जागा लग्नानंतर तडजोडीने घेतलेली असते.

गेली अनेक वर्षे तुम्ही तरुणांचे आवडते लेखक आहात याचं कारण काय असावं?

- माझ्या तरुण वाचक श्रोत्यांनी तर मला खूपच प्रेम दिलं आहे. पण सर्व वयोगटातल्या वाचकांच मला उदंड प्रेम लाभलं आहे. गेली पन्नासएक वर्षे मी लेखन करतो आहे. मुख्यतः विनोदी, मुक्तपणाने हसायला लावणार विनोद मुक्तपणाने हसणं हे तारुण्याचं व्यवच्छेद लक्षण आहे. किंबहूना एखादा वृद्ध माणूस मनमोकळेपणाने हसतो त्यावेळी तेवढ्या वेळेपुरतं का होईना त्याला तरुण झाल्यासारखं वाटतं. माझ्या लेखनातून संवाद साधला गेला असावा. त्यासाठी मी मुद्दाम काही अभ्यास वगैरे करून लिहायला बसत नाही. तसं पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षात समाजात किती कमालीचं परिवर्तन झालं आहे.

मला मात्र या परिवर्तनात बाह्य फरक असला तरी मूळचा मनुष्यस्वभाव हा युगानुयुगे सारखाच राहिला आहे असं वाटतं. नऊवारी साडी, नथ, निरनिराले दागिने घातलेली आणि लांब केसाची आकर्षक रचना केलेली पन्नास साठ वर्षापूर्वीची तरुणी काय किंवा तंद जीन्स घातलेली, केसांचा पुरुषी बॉयकट केलेली अत्याधुनिक युवती काय, आपण सुंदर दिसावं ही त्यामागची भावना समानच आहे. स्वतःला भूषवणारी आहे. सफाईच्या दुटांगी काचा मारलेले धोतर नेसणं ही एकेकाळची फॅशन होती. धोतरं गेली, तुमानी आल्या. आपण फाकडू दिसायला पाहिजे हीच भावना त्या काळातल्या धोतरव्यांच्या मनात होती. आणि आजच्या "मॉड' पोशाखातल्या तरुणींच्याही मनात आहे. नटणं हा स्थायीभाव आहे आणि युगानयुगे तो टिकून आहे. या बाह्याकारी गोष्टींना मी महत्व देऊन त्यावरुन नीती अनितीची गणितं मांडत बसलो नाही. त्यामुळे माझ्या वाचकांच वय काहीही असलं तरी त्यांच्यात आणि माझ्यात फार मोठी दरी असल्याचं मला कधीही वाटलं नाही.

जगताना मला जे जे भावलं, कधी मी कथा केली, नाटकं केली, प्रवासाच्या हकीकती सांगितल्या, कागदावरुन सांगितल्या, ध्वनिफितीवरुन सांगितल्या आणि असंख्य वाचकांना त्या ऐकाव्याशा वाटल्या. त्यांना त्या तशा का वाटल्या याचं उत्तर माझ्यापाशी नाही. पण माझ्या अपेक्षेपेक्षा शतपट प्रमाणात मला रसिकांचं प्रेम मिळालं. कदाचित या माणसाने आम्हाला हसवलं आणि हसवण्यासाठी भाषेचा अभद्र वापर केला नाही, त्यामुळे आपल्या हसण्याला आनंद डागळला नाही. अशीही भावना असावी.

सध्याच्या युवकाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तरुण पिढी बेशिस्त आहे का?

- मला युवक पिढीची चिंता वाटत नाही. पण साहसाची आवड, काहीसा बेशिस्तपणा, ही सारी तारुण्याची लक्षणं आहेत. त्यांनी थोडाफार दंगा केला तर त्याला आपण "यौवनमय अपराध्वते' असं म्हणू शकतो. ज्या वृद्धांनी तरुण पिढीपुढे आदर्श म्हणून उभं राहावं, त्यांच्या सत्तालोभाच्या आणि सत्ता मिळण्यासाठी लागणाऱ्या द्रव्यलोभाच्या हकीकती ऐकून धक्काच बसतो. जिथं विद्यार्थी खूप मोठ्या संख्येने ज्ञानोपासनेसाठी जमतात अशी विश्‍वविद्यालय ही भ्रष्टाचाराने सडत चाललेली दिसतात. पैसे टिकवून जिथं पदव्या मिळवता येतात, पैसे मोजून जिथे परिक्षेतल्या पेपरातले गुण भरमसाठ प्रमाणात वाढवले जातात अशा वातावरणात जगावं लागलेल्या तरुणांची मला चिंता वाटते. म्हणून मी निराश आहे असे नाही.

समाजहिताच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देणारे तरुण आणि तरुणी आजही भेटतात. सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी धडपडणाऱ्या या तरुणांची जिद्द पाहिली की मनाला समाधान वाटतं. वाटतं की हे ही दिवस जातील. पारतंत्र्याचे दिवं मला आठवतात. सगळीकडे अंधार होता. देश लुळापांगळा होऊन पडला होता. इंग्रजी सत्तेपुढे लाचार होऊन पडला होता. आणि यावच्चंद्र दिवाकरौ ही स्थिती बदलणार नाही असं मानतं होता. त्या अवस्थेतून बाहेर पडून इंग्रज राज्यकर्त्याला चालता हो असं समर्थपणे सांगणारा प्रचंड समाज उभा राहिला. स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून निघणाऱ्यामध्ये महत्वाचा वाट तत्कालीन तरुण पिढीने उचलला होता. "सूत कातून आणि चरखे फिरवून, उपास आणि सत्याग्रह करुन काय स्वराज्य मिळतं का?' असले कुत्सित उद्‌गार काढणाऱ्यांनी जेव्हा शनिवारवाड्यावरचा युनियन जॅक खाली येऊन तिरंगा वर चढताना पाहिला असेल तेव्हा त्यांना काय वाटलं असेल ते त्यांनाच ठाऊक.

तत्कालीन तरुणांनीच हा चमत्कार गांधींच्या "करा किंवा मरा' या निर्वाणीच्या संदेशातून घेतला होता. आजच्या तरुण पिढीतून मेधा पाटकरांसारखी तेजस्विनी निर्माण झालेली आपण पाहतो. मग देशाच्या भल्यासाठी "युवाशक्ती' अधिक जोमदार करणारं नेतृत्व लाभणारच नाही, असं वाटून हताश होऊन कशाला जगायचं?

दूरदर्शन, एम.टी.व्ही. सारख्या आक्रमणामुळे तरुणांची वाचनीयता, नैतिकता कमी होत आहे का?

- सध्याच्या तरुणतरुणींची वाचनाची आवड कमी होत आहे, असं मला वाटत नाही. मी कॉलेजात असताना म्हणजे सुमारे पंचावन्न वर्षांपूर्वी ही मुलं अभ्यासाला नेमलेल्या पुस्तकांखेरीज इतर फारसं वाचन करीत असतील असं मला वाटत नाही. त्याकाळी टी.व्ही. संगीताच्या ध्वनिमुद्रित फिती असल्या काही गोष्टी नव्हत्या म्हणून विद्यार्थी लायब्ररीत गर्दी करीत होते असं नाही. खेळ, गायन, चित्रकला यासारखीच वाचनाची आवड असावी लागते. ती नीटपणाने वाढीला लागायला एखाद्या ग्रंथप्रेमी मित्राचा किंवा शिक्षकांचा सहवास लागतो. तसा आजही मिळू शकतो.

सध्याच्या युवा पिढीबद्दल तुम्हाला सर्वाधिक खटकणारी व आवडणारी गोष्ट?

- युवा पिढी अशी घाऊक कल्पना मनात बाळगून तिच्यावर बरेवाईट शेरे मारणं मला योग्य वाटत नाही. तारुण्य हा समान घटक धरला तरी प्रत्येक एकाच साच्यातला गणपती नव्हे. तरीही मनाचा मोकळेपणा, साहसाची हौस, तरुणतरुणींना परस्परांविषयी वाटणारं आकर्षण, फार शिस्त लावू पाहणाऱ्या मंडळीविषयी थोडीफार भीती, थोडापार तिटकारा ही प्रतिक्रिया सनातन आहे. कॉलेजात असताना पुण्यातल्या "गुडलक'मध्ये आमचा अड्डा जमत असे. आताची पिढी वैशालीत जमते. प्राध्यापकांपासून ते बोलघेवड्या देशभक्तांपर्यंत आणि लेखकांपासून ते एखाद्या शामळू सिनेमा नटापर्यंत टिंगळटवाळी चालायची, नकाळत व्हायची, चांगल्या आणि फालतू विनोदांची, पाचकळ शाब्दिक कोट्यांची फैर झडायची. त्यामुळे कट्टा संस्कृती पाहिली की एक सुदृढ परंपरा आजतागायत चालू असल्याचा मला आनंद वाटतो. तत्कालीन पेन्शनरांना उनाड वाटणाऱ्या त्यामधल्या कित्येक तरुणांनी बेचाळीसच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं होतं.

तुरुंगवास सहन केले होते आणि तुरुंगातही देशाचे कसे होईल याची चिंता करीत न बसता तिथेही कट्टा जमवला होता. आजही मला तरुणतरुणींची कट्टाथट्टा रंगत आलेली दिसली, की ती मंडळी माझ्या स्वकीयांसारखीच वाटतात. आपण उच्चस्थानावर उभं राहून त्यांच्या त्या वागण्याची तपासणी करीत राहावं असं न वाटता त्या कट्टेबाजांच्या मैफिलीत हळूच जाऊन बसावं असंच वाटतं. त्यामुळे त्याचं ते मोकळेपणानं वागणं मला कधी खटकत नाही. पोशाखांच्या तऱ्हांची मला मजा वाटते. रस्त्यावरच्या भयंकर गर्दीत आपली स्कुटर चरुराईने घुसवणाऱ्या मुलींचं मला कौतुक वाटतं. मात्र अकारण उद्धटपणाने किंवा दुसऱ्या कुणाला ताप होईल असं वागणे हे मात्र मला खटकतं.

पुन्हा तरुण व्हायला मिळालं तर?

- खूप आवडेल. डोंगरदऱ्यातून मनसोक्त, गिरिभ्रमण करीन. मैदानी खेळात भाग घेईन. भरपूर पोहीन, चित्र काढीन, अशा अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत. त्या पूर्ण करायला मनाला शरीराची साथ मिळायला हवी. त्याबरोबरच त्या नवीन तरुण मनाला साजेल अशा जिद्दीने सामान्य माणसाच्या हिताचा प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करण्यामागे लागेन.

तरुणांना काय संदेश द्याल?

- संदेश वगैरे द्यायला मला आवडत नाही. तरीही आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्‍यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील. पण कलेशी जडलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

सकाळ
८ नोव्हेंबर २०१९

1 प्रतिक्रिया:

Rocky said...

Good collection..
Commendable job of blog