Monday, July 11, 2016

माझे पौष्टिक जीवन

"पंधरा पैशांचे ष्टांप द्या..."

"पलीकडच्या खिडकीत जा."

"अहो, पण..."

"पाटी वाचता येते ना?" माझ्या मुखमंडलात असा काय गुण आहे मला कळत नाही, पण बसकंडक्टर (सौजन्यसप्ताहातसुद्धा), पोष्ट-अगर-तारमास्तर, तिकीट-कलेक्टर, हॉटेलातले वेटर, कापड-दुकानातले पंचा-विभागातले लोक गुरकल्याशिवाय माझ्याशी बोलतच नाहीत. साऱ्या दिवसाचा उद्धटपणा माझ्यावर काढतात. अशावेळी आपण गेल्या जन्मी कोण होतो, म्हणून ह्या जन्मी हा भोग माझ्या नशीबी यावा, ह्या विचाराने मी हैराण होतो. आता हा पोष्टातला धाकटा मास्तर; त्याला "पाटी-वाचता-येते-ना?" असे कुत्सित बोलायचे कारण काय?
"पलीकडे जा. पब्लिकचा टाईम फुकट घालवू नका."

"अहो! पण ष्टांप कुठं मिळतात?"

"ते काय, 'चौकशी' असं लिहिलंय तिथं."

"पोष्टात ष्टांपाला 'चौकशी' म्हणायला लागले काय हल्ली?"

"विनोद घरी जाऊन करा!"

मी चौकशीच्या खिडकीपाशी गेलो. बाकी पोष्टाचे एक बरे आहे- ह्या खिडकीचा त्या खिडकीला पत्ता नसतो. 

"काय?" चौकशी-खिडकीत चौकशी झाली.

"पंधरा पैशांची एक चौकशी द्या." मी थंडपणाने सांगितले. 

"कायss" खिडकीमागून पूर्वीच्या नायिका फोडत तसली पण पुरुषी आवाजात 'अस्फुट आरोळी' आली. 

"पंधरा पैशांची चौकशी."

"चौकशी?"

"चौ-क-शी."

"काय मिस्टर, सकाळीच चढवून आलाय काय?"

"खिडकीबाहेर मुंडकं काढा, तुम्हांलाही चढवतो!"

शाळेत मी एकदा गणोजी शिर्क्याचे काम केले होते- तो आवाज पुन्हा लावला. अवघे पोष्ट हादरले. तारमास्तरच्या थरथरत्या बोटांतून 'कडकटृ'मधले नुसते कडकडकडकडकड एवढेच वाजलेले ह्या कानांनी मी ऐकले. 'क्यू'मधली दीड तासांची तपश्चर्या आणि चहाची टळलेली वेळ माझ्या संतापातून बोलत होती. शेवटी पब्लिकने "जाने दो, जाने दो यार. साला गवर्मींटका मामला ऐसाही हो ग्या-", वगैरे पाणी ओतले आणि ती पंधरा पैशांची तिकिटे विजयचिन्हांसारखी मिरवीत मी बाहेर पडलो आणि समोरच्या पेटीत पत्र टाकले. निम्मी वाट चालून गेल्यावर ती पंधरा पैशांची विजयचिन्हे त्या पत्राला चिकटवायची विजयोन्मादाच्या भरात विसरल्याचे लक्षात आले.

- माझे पौष्टिक जीवन (हसवणूक)

0 प्रतिक्रिया: