जीवनात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला आपली वाट गवसते किंवा चुकते. मला माझी वाट २००० साली गवसली. महाराष्ट्र त्यावेळी एका मोठय़ा धक्क्य़ातून सावरत होता. पु. ल. देशपांडे निवर्तले होते. दुसऱ्या दिवशी सगळ्या मराठी वर्तमानपत्रांतून पुलं गेल्याची बातमी छापून आली होती. जवळजवळ अख्खा पेपर ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ या नावाशी संबंधित लेखांनी भरलेला पाहिला. तत्पूर्वी पु. ल. देशपांडे नावाचे एक थोर साहित्यिक आपल्या महाराष्ट्रात आहेत, एवढंच जुजबी ज्ञान माझ्या बालमेंदूत शिक्षण खात्यानं घुसवलेलं. त्यामुळे प्रत्यक्षात पु. ल. देशपांडे ही काय चीज आहे मला माहीत नव्हतं. मग मी ‘पुलं कोण होते’ याचा शोध घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. कॅसेट हाऊसमधून पुलंच्या ‘रावसाहेब’, ‘नारायण’ व ‘सखाराम गटणे’ या कथाकथनाची कॅसेट आणली आणि प्लेयरवर लावली.
‘एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही..’ हे पुलंचं पहिलं वाक्य कानावर पडलं आणि माझी त्यांच्याशी त्याच दिवशी वेव्हलेंग्थ जुळली. त्यानंतर पुलंच्या विचाराशिवाय एकही दिवस गेला नाही. पुलंच्या ऑडियो क्लिप्स ऐकून आणि त्यांची पुस्तकं वाचून झालेलं तृप्तीचं समाधान अतुलनीय आहे. एखादा विचार व्यक्त करत असताना योग्य शब्द निवडण्याचं कसब पुलंना सहजी अवगत होतं. शाळकरी मुलापासून ते नव्वदीत पोचलेल्या वृद्धांपर्यंत वाचकांची मोठी रेंज लाभणं- यातून पुलंच्या साहित्याचा समाजावरील गहिरा प्रभाव दिसून येतो. पुलंच्या समकालीन किंवा सद्य:कालीन अन्य कुणा लेखकाला हे भाग्य लाभलेलं दिसत नाही. पुलंनी दैनंदिन जीवनातील घडामोडींचं सूक्ष्म निरीक्षण करून त्याला अनुपमेय शब्दरूप दिलं आणि समाजाला जीवनाकडे सौंदर्यदृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली. ती देताना त्यांची भाषा कुठेही प्रचारकी नव्हती. आजची पिढी पुलंची वाक्यं एखाद्या संदर्भात वापरते त्यावरून खात्रीनं वाटतं, की पुलं हेच मराठी साहित्यातील सर्वात जास्त लोकप्रिय लेखक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं तर पुलंची जन्मशताब्दी साजरी झाली त्यानिमित्ताने ‘मालती-माधव’मधल्या पुलंच्या घरी त्यांचा सहवास लाभलेले कित्येक स्नेहीसोबती जमले होते. या कार्यक्रमाला पुलंवरच्या प्रेमापोटी आम्ही तरुणांनी बनवलेल्या ‘आम्ही असू ‘पुलं’कित’ या ग्रुपच्या सदस्यांना ठाकूर दाम्पत्याने मोठय़ा आपुलकीनं बोलावलं होतं. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर ते पार बेळगावहून मंडळी जमली होती ती केवळ पुलंवरील प्रेमामुळेच. वाटावं- हे एकच कुटुंब आहे! डॉ. जब्बार पटेल, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, श्रीकांत मोघे, अरुणा ढेरे, माधव वझे, सुधीर गाडगीळ यांसारखी कलाक्षेत्रातील मंडळी त्या दिवशी जमली होती. त्यांच्यासमवेत वयाचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा कसलाही भेद न बाळगता आम्हा मुलांना ‘मालती-माधव‘मध्ये काही तास घालवता आले ही कदाचित आमची पूर्वजन्मीची पुण्याईच! दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात एकमेकांशी बोलताना आम्हा मुलांच्या तोंडी फक्त पुलंचीच वाक्यं होती. जसं की आमच्यातला मृणाल ‘सर, हे पेढे!’ म्हणत गटण्याच्या भूमिकेत शिरून सर्वाना पेढे वाटत होता. मी बाबासाहेब पुरंदरे, जब्बार पटेल, माधव वझे यांच्याशी बोलताना एकच वाक्य म्हणायचो- ‘आपल्याशी एकदा (पुलं) या विषयावर बोलायचंय!’ डोंबिवलीहून आलेल्या आनंद मोरेंची ओळख करून दिली तर ते एकदम ‘म्हैस’मधल्या बाबासाहेब मोरे या पुढाऱ्याच्या भूमिकेत शिरून म्हणाले, ‘(मंत्रालयात) मालती-माधवमध्ये मीटिंग आहे..’ दुपारी जेवताना आम्ही एकमेकांना ‘अरे, घ्या.. घ्या, लाजताय काय च्यायला स्वत:च्या घरी असल्यासारखे!’ अशी टपली मारत होतो. पुलंच्या लोकप्रियतेचा मला आलेला एक अनुभव सांगतो. २०१५ साली मी मित्रांसमवेत तोरणा किल्ल्यावर अभ्यासासाठी गेलो होतो. चालून थकल्यामुळे दुपारच्या वेळी गडावर सावलीत निवांत झोपलो होतो. अचानक दुरून बारीक आवाजात ‘गोदाक्का, तुझा पदर कुठल्या दिशेला उडतोय बघ बघू?’ हे चितळे मास्तरांचं वाक्य कानावर पडलं. कुठल्याशा कॉलेजात शिकणारी मुलं सुट्टीत गडावर फिरायला आली होती. त्यातल्याच एकाच्या खिशातून ‘चितळे मास्तर’ ऐकू येत होते. गड चढताना कष्ट जाणवू नयेत म्हणून त्याने मोबाइलवर चितळे मास्तरांची क्लिप लावलेली आणि बाकीचे मन लावून ते ऐकत ऐकत गड चढत होते. वयोगट साधारणत: २०-२१ वर्षे. असं काही अनुभवलं की वाटतं, जगात आपल्यासारखे ‘पुलंयेडे’ बरेच आहेत.
मला वाटतं, पुलंना केवळ ‘विनोदी लेखक’ म्हणून जी ओळख मिळाली ती जरा अन्यायकारकच आहे. खरे पुलं त्यांच्या भाषणांतून आणि वैचारिक लेखांतून समजतात. पुलंच्या एकूण साहित्यसंपदेपैकी विनोदी साहित्याचं प्रमाण हे वैचारिक साहित्यापेक्षा कमीच असावं. पुलंची गोळी कडू नसे. त्यामुळं ती घेणाऱ्याचं तोंड कधीही कडवट झालं नाही. परिणाम मात्र योग्य तो व्हायचाच. पुलं वाचताना आपण उगाच काहीतरी गहन वाचतोय असं निदान मला तरी कधी वाटलं नाही. हो, अंतर्मुख जरूर झालो. अगदी पुलंचं विनोदी साहित्यही वाचूनही. पुलं वाचताना नेहमी मला संवादाचा भास होतो. माझं आपलं असं कुणीतरी माझ्याशी गप्पा मारतंय असं वाटत राहतं. ‘हा माणूस आपला आहे’ असं वाटणं ही भावना वाचकाचं लेखकाशी अदृश्य नातं जोडते. यामुळंच पुलं प्रत्येक पिढीशी आपलं नातं जोडून आहेत.
पुलं एक कमाल आस्वादक होते. जीवनाचा आनंद त्यांनी स्वत: तर घेतलाच आणि तो इतरांनाही वाटला. समाजातलं उत्तम ते- ते पाहावं, आस्वादावं आणि आयुष्य आनंदानं जगावं ही मूलभूत शिकवण पुलंनी आपल्याला दिली. पुलंमुळे मी पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे यांचं गाणं ऐकणं शिकलो. चार्ली चॅप्लिन समजला. व्यक्त होणं शिकलो. उत्तम मैत्र जोडणं शिकलो. कला, साहित्य, संगीत, नाटक यांत मनापासून काम करणाऱ्या मंडळींशी गट्टी जमवून आपली सांस्कृतिक भूक भागवणं शिकलो. रवींद्रनाथ टागोर समजावेत म्हणून वयाच्या पन्नाशीत पुलं शांतिनिकेतनमध्ये बंगाली भाषा शिकायला गेले होते, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. त्यांनी रवींद्रनाथांचं भाषांतरित साहित्य वाचलं असतं तरी चाललं असतं, पण पुलंनी ते टाळलं. जीवनाचा सर्वार्थाने आनंद घेणं ते हेच.
मी मुद्दाम कुणाला ‘पुलं’ ऐकवण्यापेक्षा माझ्यासाठी त्यांची ऑडियो क्लीप लावतो. तो आवाज ज्या- ज्या माणसांच्या कानांवर पडेल, त्यांतून ज्याला जे भावेल तो पुलंचा झाला असं साधं-सरळ समीकरण आहे. समाधानाची बाब ही, की पुलंच्या लिखाणाला काळाचं बंधन नसल्यामुळे ज्याला मराठी भाषेचा सेन्स आहे अशा प्रत्येकाला पुलं भावतात. त्यामुळं ‘आजच्या पिढीला पुलं समजायला हवेत’, ‘इतरभाषिकांना पुलं समजायला हवेत’ वगैरे कल्पना वांझोटय़ा आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. अभिजात गोष्टी शाश्वतच असतात. कदाचित दृश्य किंवा वस्तूरूपात त्यांचं अस्तित्व नष्ट होईलही; परंतु परिणामस्वरूपात त्या काळावर मात करतात. पुलंचं कलेतलं योगदान शाश्वत आहे. ते बरोब्बर जिथं पोचायचं तिथं पोचणारं आणि चिरंतन टिकणारं आहे. त्यासाठी आपण वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.
अमोल लोखंडे
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०
amolslokhande1984@gmail.com
लोकसत्ता
१२ जून २०२०
0 प्रतिक्रिया:
Post a Comment