Monday, January 10, 2022

राघुनानांची कन्येस पत्रे यातील शेवटचे तीन उतारे

उपसंहार :

एवंगुणविशिष्ट, श्री. राघूनाना सोमण यांच्या कन्येस पाच पत्रेरूपी मधू वाचकरूपी वाङ्मयमधुकारांपुढे लेखरूपी द्रोणातून सादर करीत आहो. यापुढे नानांनी बरेच दिवस पत्रे लिहिली नाहीत. याचे कारण पुसता, त्यांनी 'गोदीचे नानांस उत्तर' काढून आमच्या हाती दिले. आजवर 'कन्येस पत्र' सर्वांनी प्रसिद्ध केली आहेत. परंतु कन्येचे पित्यास पत्र आम्ही प्रथम प्रकाशित करत आहो. राघूनानांची ही कन्या महाराष्ट्रातली आद्य पत्रलेखिका ठरावी.

चि. गोदीचे ती. नानांस उत्तर१२ :

ती. नाना यांस त्रीकालचरणी मस्तक ठेऊन बालके गोदावरीचा शीर सास्टांग नमस्कार विनंती विशेष. तुमची मोठ्ठीमोठ्ठी पत्रे पोचली. एवढी मोठी पत्रे का पाठवतां असें आईने विचारले आहे. पोस्टाची तिकिटे आपल्याला काही फुकट मिळत नाहीत म्हणावे. आणि खुशाली कळवण्यास काय होते. तुमचे लक्षण लहानपणापासून आसेच, आसे आजी म्हणाली व एकदा हातींपायी धड सुकरूप येवूं दे म्हणाली. गंधाची बाटली व आईने बुंदी पाडायचा लहानसा बेताचाच आणा म्हणावं झारा आणावयास सांगितले आहे.

तुमची पत्रे वाचावयास वेळ लागतो. तुम्ही आल्यावर वाचून दाखवा. आम्ही सर्व खुशाल आहो. दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशी जिन्यावरून पडल्या व त्यामुळे कठडा मोडला आहे. म्हणून दुसऱ्या मजल्यावरच्या भीमामावशींच्या एजमानांचे व चाळीच्या भय्याचे भांडण झाले. आई सौ. लिही मागे व आजी गं. भा. लिहायचं खुशाल आहेत. हे पत्र मी लीहलं आणि मधूनमधून आई सांगत होती. तरी गंधाची बाटली व रिबिनी वीसरू नये.

तुमची अध्याकारक
गोदी कु.

हे पत्र श्री. सोमणांनी हताशपणे आमच्यापुढे फेकले. ह्या हताशपणाचे कारण आम्हांला कळले नाही. त्यांचा हा अकारण आलेला हताशपणा, हे औदासिन्य जावे आणि दुरिताचे तिमिर जाऊन पत्ररूपी सूर्याने प्रकाशावे अशी इच्छा व्यक्त करून हे संपवतो.

रसिकांचा पादरविन्द
म. म. अणणुराव शेषराव मोगलगिद्दीकर
पत्रेतिहासमंडळ, हलकर्णी (मु. व पो.)


पुस्तक - बटाट्याची चाळ 
लेखक - पु.ल. देशपांडे