Monday, September 19, 2016

पु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान - डॉ. शरद सालफळे

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ पुल देशपांडे हे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र सारस्वताला परमेश्‍वराने दिलेले वरदान आहे. पुल देशपांडे हे साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत वावरलेत. विपुल लेखन केले. नाटके लिहिलीत. एकपात्री प्रयोग केलेत. चित्रपटांची निर्मिती केली. भावगीतांना व गाण्यांना सुंदर चाली लावल्यात. पुल सुंदर अभिनय करीत, सुरेल पेटी वाजवीत. या सार्‍या गुणांवरही ताण म्हणजे पुल एक उत्तम रसिक होते. चांगल्या गाण्याला, चांगल्या संगीताला, चांगल्या लिहिण्याला आणि चांगल्या बोलण्याला पुल मनमोकळी दाद देत. असल्या बहुशृत कलाकारास महाराष्ट्र कधी विसरूच शकणार नाही. सार्‍या महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्राला पुल कायमचे स्मरणात रहातील, ते त्यांच्या विनोदबुद्धीमुळे. पुलंना विनोदाची निसर्गदत्त देणगी होती. पुल शाब्दिक कोट्या करीत, त्यावर सारा रसिकवर्ग खळाळून हसायचा.

पुलंचे समाजमनाचे व समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे कमालीचे सूक्ष्मतम निरीक्षण असायचे. त्यांना भेटलेल्या व्यक्तींचे, त्यांच्या स्वभावाचे, गुणदोषांचे निरीक्षण करायचे. त्याला विनोदाची मखर देऊन त्या व्यक्तीविषयीचे अभ्यासपूर्ण लेखन करायचे. त्यातूनच त्यांचे विनोदी लेखन झाले. पुलंचे लिखाण केवळ विनोदासाठी विनोद असे नसून, ते आपल्या लेखनातून समाजातील दोषांना उघडे करून दाखवीत. व्यक्तींचे स्वभाव त्यांच्या गुणदोषांसह वाचकांसमोर येत. त्यांच्या स्वभावाला पुल विनोदाचे पांघरूण घालीत, पण दोष मात्र उघडे पाडीत.

पुलंच्या लिखाणातून जीवनाचे सुंदर दर्शन होते. वाचताना आपल्या लक्षात येते की, या गोष्टी, या घटना प्रत्यही आपल्या सभोवती घडत असतात. आपल्या लक्षात कशा येत नाहीत? साधी ‘म्हैस’ घ्या. बसने झालेल्या अपघातात म्हैस जखमी होते. इतरांना वैताग येतो, पण पुलंना त्यात ‘सुबक ठेंगणी’ दिसते. इंप्रेशन मारणार्‍या हिरोची पुढे पुढे करण्याची वृत्ती दिसते. पंचनामा करणारा शिपाई दिसतो.

पुल आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण रसिकतेने जगले. छोट्या छोट्या व्यक्तींमध्ये त्यांना लिहिण्यासारखं सापडायचं. लेट झालेल्या गाडीने आपण वैतागतो. पुल तोच वेळ प्लॅटफॉर्मवरील विविध व्यक्ती, त्यांचे खाणेपिणे, इतरांवर खेकसून बोलणे इत्यादींचा अभ्यास करून त्याची नोंद करतात.

पानवाल्याच्या पानाबरोबरच पुलंना त्याच्या लादीचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक आहे. रावसाहेबांची शिवराळ भाषा व त्यामागची कळकळ केवळ पुलंनाच कळली. नामू परिटाचा शर्ट हा आपलाच आहे, हे कळल्यावर संतापून न जाता नामूही त्यात जास्त खुलून दिसतो, असे सांगून पुल आपली खेळकर वृत्ती दाखवितात. पाळीव प्राण्यांपैकी एकालाही न दुखविता त्या प्राण्यांच्या मालकाची अशी खिल्ली उडविली आहे की, ते प्राणीही खुष व्हावेत.

आवाजाच्या दुनियेचा पुलंनी घेतलेला कानोसा मजेदारच आहे. दररोज दारावर वस्तीतून हिंडणारे विक्रेते यांचा पुलंचा अभ्यास कमालीचा आहे. शेंगावाला, भाजीवाला, कुल्फीवाला, कल्हईवाला या सर्वांच्या आवाजाचे पृथ:करण करून त्यांच्या पोटापाण्याला तेच आवाज कसे पोषक असतात, ते पुलंनी सप्रमाण दाखविले आहे.

प्राण्यांच्या ध्वनिविश्‍वातली व्यंजनं शोधण्याचे महाकठीण काम पुलंनी केलं आहे. पुलंना बहुधा तमाम प्राणिमात्रांची भाषा समजत असावी. कुत्र्यांच्या सभेतलं भाषण माणसांना समजावं, असं त्यांनी भाषांतरित केलेलं आहे.

स्वत:ला लेखक-कवी म्हणविणार्‍या तथाकथित साहित्यिकांची पुलंनी मस्त खिल्ली उडविली आहे. या सार्‍यांचीच नोंद मराठी वाङ्‌मयाच्या गाळीव इतिहासात आली आहे. चोरलेल्या कवितांचे व लेखांचे साहित्यिकाच्या परिचयासह या इतिहासात उल्लेख आहेत.

पुलंच्या विनोदास कधी चावटपणा चाटून जातो, तर कधी ते वाचकांना वात्रट वाटतात. प्रसंगी त्या विनोदास कारुण्याची किनार असते. समाजातील विषमता, विसंगती त्यांच्या लेखनातून डोकावते. उपरोधाने लिहिलेले मान्यवरांवरील लेख त्यांना त्यांना कळले तर पुल त्यांना मानधन द्यायला तयार असायचे. गरिबीची आणि गरिबाची पुलंनी कधी खिल्ली उडविली नाही, पण अंधश्रद्धा आणि ढोंगीपणावर त्यांनी विनोदाचे आसूड उगारले. उगाच मोठेपणा मिरविणार्‍या उच्चभ्रू समाजातल्या बायांना आणि श्रीमंतीची ऐट दाखविणार्‍या स्त्रियांना त्यांनी त्यांच्या विनोदी शैलीने बोचकारले आहे. ज्ञानेश्‍वरीचा उपयोग ती डोक्यावर घेऊन सरळ चालण्याच्या व्यायामप्रकारात मोडतो म्हणणार्‍या बाया किंवा अध्यात्मावरील भाषणे हे फॅशन शोचे एक माध्यम मानणार्‍या बाया पुलंना भेटल्या. ‘तुझे आहे तुजपाशी’ मधल्या अतिविशाल महिलांचं मंडळ आचार्यांना असल्याच संदर्भात भेटायला येतं. आचार्यांचा क्रोध आणि विशाल महिलांचे निर्विकार पण व्यवहारी बोलणे यांचा संवाद रंजक वाटतो.

पुलंचे विडंबनकाव्य अत्र्यांच्या ‘झेंडूची फुले’ वर मात करते. मनाच्या श्‍लोकांची पुलंनी केलेली मनमानी मौजेची आहे. मुंबईकर जेव्हा ट्राम व बसने जायचे त्यावेळी बटाट्याच्या चाळीतले द्वारकानाथ गुप्ते म्हणतात, ‘मना सज्जना ट्राम पंथेची जावे

| तरी वाचतो एक आणा स्वभावे॥ बशीला कशाला उगा दोन आणे| उशिरा सदाचे हफीसांत जाणे॥ पुलंच्या कविताही मिस्कील. त्यात अगम्य दुर्बोध असे काहीच नसे. वाचताना खुदकन हसू यावे अशा वात्रटिका त्यांनी लिहिल्यात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ मध्ये ते लिहितात-‘गाळणे घेऊन गाळतो घाम चाळणे घेऊन चालतो दाम. चालीबाहेर दुकान माझे | विकतो तेथे हसणे ताजे| खुदकन् हसूचे पैसे आठ | खो खो खो चे पैसे साठ| हसविण्याचा करतो धंदा| कुणी निंदा कुणी वंदा॥

पुलंच्या विनोदावर खळाळून हसणारा मराठी वाचक श्रोता किंवा प्रेक्षक हा बहुशृत असला की, त्याला त्यांच्या विनोदाचे मर्म कळायचे. संदर्भ माहीत असलेत की विनोदाची खुमारी वाढते. दुसर्‍या बाजीरावाबद्दल गाळीव इतिहासात पुल लिहितात, दुसरे बाजीराव हे दानशूर होते. कुठल्याही कलावंतास ते १०० रुपये देत त्यावरून त्यांना दोन शून्य बाजीराव म्हणत. एक शून्य बाजीराव हे त्या काळात गाजलेले नाटक. त्याचा संदर्भ घेऊन ही शाब्दिक कोटी पुलंनी केली.

पुल हे दानशूर लक्षाधीश होते, पण शाब्दिक कोट्यधीश होते. त्यांच्या कोट्या पराकोटीच्या असत. मर्ढेकरांचं काव्यवाचन करायला सुनीताबाई व पुल सातार्‍याला गेलेत. यजमानांनी खूप खाण्याचा आग्रह केला तेव्हा पुल म्हणाले, ‘अहो श्रोत्यांना मर्ढेकर ऐकवायचे आहेत ढेकर नव्हेत.’ जुन्या काळातल्या अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांचा संमेलनात परिचय करून देताना पुल म्हणाले, ‘याचे एक आडनाव सोडले तर बाकीचे यांचे सारे खरेच आहे.’ सौ. सुनीताबाई पुलंना सारखा औषधाचा व खाण्यापिण्याचा सल्ला देत तेव्हा पुल त्यांना जाहीरपणे ‘उपदेश पांडे’ म्हणायचे.

पुल देशपांडे यांच्या विनोदी लेखनाने मराठी साहित्यात विनोदाचा व हास्याचा प्रचंड धबधबा आणि दबदबाही निर्माण केला आहे. त्यातले केवळ तुषारही आपल्या अंगावर उडालेत तरी आनंद होतो. जे त्या धबधब्याखाली ओलचिंब होतात किंवा झाले ते धन्य होत.

सर्व प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे माणसाला हसता येते. पुलंनी याबद्दल ब्रह्मदेवाचे आभार मानले आहेत. पुलंनी माणसाला हसायला शिकविले यासाठीच पुलंनी एवढ्या लेखन प्रपंचाचा अट्टहास केला. आपल्या अवतीभवती एवढे सौंदर्य असते, आनंद देणारी निसर्गाची किमयागारे असतात, पण आपण इतके करंटे की आपणास त्यांची ओळख नसते. पुलंनी अवतीभवतीचा सारा आनंद माणसास दाखवून ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ हे खरे करून दाखविले. पुलंची विनोदबुद्धी शाब्दिक कोट्या करविते. प्रसंगोपात घडलेल्या विनोदाचं दर्शन घडविते. व्यक्तीमधल्या स्वभावविशेषाने घडणारे विनोदाचे साक्षात्कार दाखविते. अवतीभवतीच्या सार्‍या घटनांचे आपणही साक्षीदार असतो, पण त्यातल्या विसंगती नजरेला आणून देतात ते पुल. त्यातून आनंद घ्यायला शिकवितात ते पुल. ते म्हणतात, दुसर्‍याला हसू नका दुसर्‍याला सोबत घेऊन हसा. सर्वांनी एकत्रपणे हसण्यासाठीच विनोदाची निर्मिती असते.

पुलंचे विनोद निर्मळ असत. त्यात अश्‍लीलता नसायची. कधी त्याला सेन्सॉरची कात्री लावावी लागत नसे. शाळकरी मुलांनाही समजेल असे पुलंचे साधे लेखन असायचे. अशा मराठी जगतास सार्‍या चिंतांसह, सार्‍या अडचणींसह हसायला शिकविणारा हा पुरुषोत्तम मराठी सारस्वताचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलवतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

-- डॉ. शरद सालफळे
६/१२/२०१२
तरुण भारत

Friday, September 16, 2016

माझी आवडती व्यक्तिरेखा - ल़खू रिसबूड

पुलंचे लेखन वाचण्याच्या, आवडण्याच्या आणि उमजण्याच्या बर्‍याच पायर्‍या असतात असं मला कायम वाटतं. अगदी सुरुवातीला शालेय वयात पुलं म्हणजे नुसती धमाल, जागच्याजागी उड्या मारायला लावेल असा विनोद आणि शुद्ध, निखळ मनोरंजन यापेक्षा जास्त काही जाणवलं नव्हतं. पण हे जे काही होतं तेच इतकं भरुन आणि भारुन टाकणारं होतं की त्याची झिंग अजूनही थोडी आहेच. मित्रांशी वाद रंगलेला असतो आणि मधेच एकदम कोणीतरी म्हणतो; 'बाबारे तुझं जग निराळं आणि माझं निराळं', आणि कसलाही संदर्भ देण्याची गरज न लागता ठसका लागेपर्यंत हसू मात्र येते, हे पुलंचा हँगओव्हर न उतरल्याचेच लक्षण! मुळात असा संदर्भ झटक्यात समजणारा तो मित्र अशीही व्याख्या करायला हरकत नाही.

विनोदाच्या या धुंदीत शाळकरी वयात तरी व्यक्ती आणि वल्लीमधल्या काही व्यक्तिरेखा समजल्याच नव्हत्या. आपल्या आजूबाजूला वावरणारे 'दोन उस्ताद' दिसले नव्हते की जनार्दन नारो शिंगणापूरकरचे दु:खही टोचले नव्हते. आज हे लेखन किंवा अगदी नारायण, हरितात्यासारखे 'व्यवच्छेदक' पुलं पुन्हा वाचताना आधी न कळलेला एखादा नवाच पैलू दिसतो. पण त्या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा मात्र मी तेंव्हा 'यात काय मजा नाही' म्हणून एका पानातच सोडली ती म्हणजे 'लखू रिसबूड'. आज मात्र पुलंनी रंगवलेल्या सगळ्या गोतावळ्यातील सर्वात अस्सल माणूस हाच आहे याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. अगदी नंदा प्रधानपेक्षाही हा माणूस जास्त खरा आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त करुणही.

लखू ही एक सार्वकालिक व्यक्ति आहे. तो आदिम, पुरातन आहे. लखू खरेतर एक व्यक्ती नाहीच ती एक प्रवृत्ती आहे, एक अ‍ॅटीट्यूड, एक सिस्टीम. जगातील सर्व शारिर सुखांची हाव असलेला माणूस. कशालाच सर्व शक्तीनिशी भिडायला घाबरणारा. सतत न्यूनगंडाने पछाडलेला आणि त्यावर मात करण्यासाठी भाडोत्री विचारांची फौज गोळा करणारा. त्याला काहीच पूर्ण कळतं नाही, आवडत नाही, पचत नाही. कुठल्याच विचारसरणीचा त्याच्यावर प्रभाव नाही. त्याला कसलाही सखोल अभ्यास नको आहे. स्वतंत्र, मूलभूत आणि निखळ विचार त्याला जमू शकतो पण त्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे कष्ट त्याला नको आहेत. प्रत्येक ग्रेटनेसवर थुंकण्याची त्याला आवड आहे. त्याचे भोगही लाचार, त्याचे वैराग्यही ढोंगी.

पुलंनी ही व्यक्तिरेखा कधी आणि कोणाच्या संदर्भाने लिहिली ते माहिती नाही पण 'मिडीऑकर' या शब्दालाच जिवंत रुप देणारा हा माणूस त्यांच्या इतर अनेक लेखनातूनही डोकावतो. ज्याला टागोर 'पटत नाही' असा सुरेश बोचके, 'गोदूची वाट' साऱखे प्रयोग, अगदी धोंडो भिकाजी जोशीही याचेच एक स्वरुप आहे. असा'मी' मधला मी म्हणजे पुलं स्वतःच अशी समजूत करुन घेतलेल्या त्यांच्या अनेक चाहत्यांनी खर्‍या पुलंच्या मनातली अशा प्रवृत्तींविषयीची आत्यंतिक चीड सोयिस्करपणे दुर्लक्षली, त्यात मी ही एक होतो.

याच भ्रमात आयुष्य गेलेही असते, काय सांगावे सुखाचेही झाले असते, पण सुदैवाने तसे झाले नाही. पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असेन, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे मतं उगवण्याचा काळ होता. एका वेगळ्याच नशेत, जगात घडणार्‍या प्रत्येक घटनेवर, सिनेमा, साहित्य, संगीत, खेळ कशावरही बेफाम टिप्पणी करीत चाललो होतो. आधी बर्‍यापैकी असलेले वाचनही बंद पडत चाललेले किंवा उगाच चर्चेत नावं भिरकावण्यापुरते. अशावेळी पहिल्यांदा, ते एक राहिलेय जरा वाचायचे अशा तोर्‍यात 'लखू रिसबूड' वाचला आणि कोणीतरी सणसणीत थोबाडीत मारल्यासारखे झाले. पार हेलपाटूनच गेलो. माझे सगळे आयुष्यच त्या झटक्याने बदलले. मी कोणत्या दिशेने चाललो आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे स्पष्ट, स्वच्छ, लख्ख कळून आले. या रिअ‍ॅलिटी चेकसाठी मी पुलंचा कायम ऋणी असेन.पाच पैशाचेही काम न करता आलेला फुकटचा सिनिक आव गळून पडला. आपल्याला खरचं काय कळतं? काय समजतं? काय आवडतं? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कठोर आत्मपरिक्षणाला सुरुवात झाली जे अजूनही चालू आहे. ही दिशाहीनतेची जाणिव झाली नसती तर आपली वाट शोधण्याचा प्रयत्नही झाला नसता.

आज आयुष्यात फार काही भरीव केले आहे किंवा फार काही ज्ञान झाले आहे असे म्हणण्याचा फालतूपणा करणार नाही पण निदान उथळपणाला बांध बसला हे खरेच. समोरच्यामधला भंपकपणा पटकन जाणवायला लागला पण एका पातळीपर्यंत तो सहन करण्याची वृत्तीही आली. सर्वात महत्त्वाचे त्त्वा, आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही हे मान्य करण्याचा प्रांजळपणा आणि असे केवळ मान्य करण्याने फार काही ग्रेट साध्य झालेले नसते ही अक्कल नक्कीच आली आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट, शाम मनोहरांच्या 'कळ' मधला 'अंधारात बसलेला मठ्ठ काळा बैल' वाचत होतो. प्रचंड आवडले ते. आसपासची अशी अनेक माणसे आठवली. आपणही असेच पोकळ झालो असतो, पण पुलंनी वाचवलं हे मनात आलं आणि त्यांच्या लखू रिसबूडला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिले.

- आगाऊ
मुळ स्रोत --> http://www.maayboli.com/node/41308

Thursday, September 15, 2016

प्रिय पु.ल.

प्रिय पु.ल,

बरेच दिवसापासून तुम्हाला एक आदरतिथ्य पत्र लिहावं म्हणत होतो. पण काय करणार ? आत्तापर्यंत जेवढी पत्र मी माझ्या प्रेयसी ला लिहिली नसतील तेवढी तुम्हाला लिहिली आहेत. भाई हे तुम्ही सुद्धा मान्य कराल.

तसं पाहता बरेच दिवस झाले आपला स्नेह आहे. दिवस काय वर्ष म्हणा हवं तर, आणि दिवसेंदिवस तो वाढतच चाललाय. पण भाई.. काहीही म्हणा, आपल्या नात्यामध्ये पण निराळीच मजा आहे.आपलं नातं हे स्वीकृत असल्यामुळे कदाचित ते आत्तापर्यंत टिकत आलंय.पण भाई रक्ताच्या नात्यापेक्षा स्वीकृत नातं केंव्हाही चांगलंच बरं का, असं एकदा तुम्हीच म्हणाला होता.

वास्तविक भाई, एक गोष्ट मला सतत खुणावत असते… ती म्हणजे दुर्दैवाने आपली भेट होऊ शकली नाही. पण कधी नं कधी ती कुठे तरी होईलच अशी आशा वाटते. असो, पण काहीही म्हणा, तुमच्याशी बोलताना निराळीच उर्जा मनामध्ये सामावलेली असते. त्या उर्जेच्या आधारावरच मी आत्तापर्यंतची सगळी पत्रं लिहिली आहेत.

अगदी प्रांजळपणे कबुल करतो, मी खरोखरच ऋणी आहे त्या क्षणाचा त्यामुळेच कदाचित आपली ‘नाती-गोती’ इतरांपेक्षा जरा वेगळी आहेत.
भाई पण एक मात्र नक्की… ! तुम्ही म्हणजे खरोखरच एक प्रकारचा खजिना आहात बघा. असा खजिना, जो कितीही लुटला तरी संपायला तयार होत नाही, जो इतरांना सतत काही नं काही पुरवण्यात व्यग्र असतो असा खजिना. माझं भाग्यच, मला तुमच्या सारख्या हिऱ्याची साथ लाभली.

भाई, तुम्हाला वाटत असेल कि आजकाल हा ‘गटण्या’ सारखाच लिहायला लागलाय.

पण मी हे मान्य करायला कदापि तयार नाहीये, कारण ‘गटण्या’ सारखं माझ अफाट वाचन नाहीये. जेवढं काही आहे… तेवढ केवळ तुमच्यामुळेच आहे. हां… पण साहित्याची रुची मला लावली ती तुम्हीच. तुमच्या मुळेच मला सारख्या दिग्गजांचा सहवास लाभला. या बद्दल तर मी तुमचा ऋणी आहेच.

आजकाल लोक आयुष्य खूप गांभीर्याने घेतात, पण जेंव्हा पासून माझी हरितात्या, रावसाहेब, बबडू यांच्या सारख्या मस्त मौलांची ओळख तुम्ही करून दिलीत… तेंव्हापासून आयुष्य सुद्धा एकदम मस्तमौला झालंय. त्याबद्दल आभार तर आहेतच पण त्यांची साथ आहे हे फार बरं आहे बघा…. !
त्यात एक खुपणारी गोष्ट म्हणजे, आजकाल लोकांना चांगल्या दर्जाचा विनोद सुद्धा कळत नाही. विनोदाची व्याख्याच मुळात बदलत चाललीये.
असो, पण कुठेतरी कसा का असेना विनोद टिकून आहे याचा आनंद देखील वाटतो.

तसं पाहता, हे आभार पत्र मी ८ नोव्हेंबर… म्हणजे आपल्या जन्मदिवसादिवशीच लिहिणार होतो. पण तितकीशी वाट बघायला मन तयार होईना. शेवटी काही झालं तरी भावना महत्वाच्या.

‘तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहू द्या’ तेवढाच आधार वाटतो हो भाई…!

तुमचाच लाडका,
अक्षय. .!

--अक्षय चिक्षे

Tuesday, September 13, 2016

मला भेटलेले पु.ल. - कौशल इनामदार

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे यांची नुकतीच (१२ जून रोजी) पुण्यतिथी झाली. २००० साली पुलंचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. त्याच्या काही काळ आधीच आजच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांची पुलंशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी शेअर केली आहे...
मी २७ वर्षांचा होतो. ताजा फडफडीत संगीतकार! ईन मीन तीन कॅसेटी बाजारात आल्या होत्या. आणि एकाचं ध्वनिमुद्रण झालं होतं. लग्न एका महिन्यावर आलं होतं. 
एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला. समोरचा माणूस म्हणाला- "मी पु.ल.देशपांडेंचा असिस्टंट बोलतोय. भाई आत्ता जांभूळपाड्याला आहेत आणि गेले दोन दिवस फक्त तुमचीच गाणी ऐकताएत. त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तुम्ही उद्या जांभूळपाड्याला याल का?"

मी काही या असल्या फोनला भुलणारा नव्हतो. आम्ही कॉलेजमधे असे अनेक फोन केले होते! माझी खात्री होती की आमचाच कोणी मित्र आवाज बदलून फोन करतोय. एक - पुलं आपली गाणी कुठून ऐकणार? आणि 'फक्त' आपली?? बरं बोलवलंय कुठे? तर जांभूळपाडा?!!!
मी म्हटलं आपणही खेळू हा खेळ!

"मला ऐकून आनंद झाला. पण माझं १५ दिवसात लग्न आहे तर तुम्ही पुलंना सांगाल का की मला वेळ नाही?"
माझं बोलणं ऐकून तो इसम म्हणाला - "अरेरे, नाही का वेळ? भाईंची खूप इच्छा होती हो तुम्हाला भेटायची!"
या वाक्याने तर माझी खात्रीच पटली की हे सगळं सोंग आहे!
दिवसभरात मी हा फोन विसरलो आणि माझ्या कामात गुंतलो.
दुपारी ४ वा. पुन्हा फोन वाजला. मी फोन उचलला तर पुन्हा तोच आवाज.
"एक मिनीट हं. भाई बोलताएत तुमच्याशी!"
समोरून "हॅलो" ऐकू आलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण पु.लं. देशपांडेंचा आवाज तर मी ओळखत होतो.

"मी तुमची गाणी ऐकली आणि आवडली ती मला. तुम्ही आला असता जांभूळपाड्याला तर आनंद झाला असता मला. तुमचं लग्नगाठ आहे आत्ता असंही कळलं! दोघे आलात तर आशीर्वादही देईन!"
इतकं ओशाळल्यासारखं मला आयुष्यात झालं नव्हतं!

दुसऱ्या दिवशी मी, सुचित्रा आणि आमचा मित्र परीक्षित असे तिघे जांभुळपाड्याच्या वृद्धाश्रमात पोहोचलो. पुलंची तब्येत बरी नव्हती आणि ते विश्रांतीसाठी तिथे आले होते. त्यांनीच दिलेल्या देणगीतून हा वृद्धाश्रम उभा राहिल्याचं मला माहित होतं.

त्यांच्या असिस्टंटने आम्हाला त्यांच्या खोलीत नेलं. खरोखर त्यांच्या उशाला माझ्याच कॅसेट्स होत्या. मला किती भरून आलं असेल याची कल्पना आली का तुम्हाला?

त्यानंतर तासभर पुलंनी माझं एक-एक गाणं माझ्यासोबत ऐकून त्या त्या गाण्यात त्यांना काय काय आवडलं ते तपशीलवार सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय मार्मिक होत्या.
झाल्यावर त्यांनी खूप चौकशी केली. किती कार्यक्रम झाले? लोक येतात का? पैसे देतात का? कवितांना चाली द्याव्याशा का वाटलं? त्यांच्या प्रश्नांमध्ये आत्मीयता होती. त्यांच्या एका प्रश्नाला मी उत्साहाच्या भरात म्हटलं -
"मला काहीतरी वेगळं करायचं होतं"

त्यावर त्यांनी अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले-
"तुम्ही चांगलं करा. वेगळं आपोआप होईल."
**
मला एका क्षणात अख्ख्या आयुष्याकडे बघायची एक नवी दृष्टी मिळाली आणि ती पुलंनी दिली यात शंका नाही.
**
त्यांचं लिखाण चिरंतन असेल किंवा नसेल. पण एखादा नवा गीतकार होऊ पाहणारा मुलगा भेटायला येतो आणि त्याच्या दातांत मला छापखान्यातले खिळे दिसू लागतात. माझ्या कुठल्याही कार्यक्रमाच्या वेळी अखंड काम करणाऱ्या मंदार गोगटेकडे पाहून 'नारायण' आठवतो. पार्ल्यात गेलं आणि श्रद्धानंद रोडची पाटी पाहिली की रस्त्यात महाराष्ट्राच्या भूगोलात शिरलेला तो 'थेरडा' आठवतो. वरच्या फ्लॅटमधून ठोकण्याचे आवाज आले की 'कुटील शेजारी' आठवतात. पुण्यातल्या दुकानात शिरलं की 'सर्वात दुर्लक्ष करण्यासारख्या' गोष्टीसारखं वाटू लागतं. असं बरंच. अचानक पाणी गेलं की आपल्या कुंडलीत जलःश्रृंखला योग आहे का अशी शंका येते.
'पुलं' माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांचं एक तरी वाक्य आठवतं आणि प्रसंगी तारूनही नेतं. हे भावनिक नाही, अनुभवातून आहे.
शेवटी एकच. माणसाचं काम चिरंतन आहे की नाही हे काळ ठरवतो. माणूस नाही.⁠⁠⁠⁠

कौशल इनामदार
लोकमत
१४ जून २०१६