Monday, July 19, 2021

माशी

साखरेचे खाणार त्याला देव देणार, म्हणतात. माशीतर सदैव साखरेचेच खाणार ! तिच्याइतकी गुळाची चव असलेले प्राणी क्वचित आढळतील. क्वचित ती आपल्या आहारात बदल करते. माणसासारखी माणसे नाही श्वापदांचा आहार करीत ? तिथे माशीनेच काय घोडे मारले आहे ? माणसाला जरी ही निष्कारण दुसऱ्याचे घोडे मारायची सवय असली तरी माशीचे मात्र घोडयावर फार प्रेम असते. बाकी माशीचे हे सगळे घोडयाचे, गोडाधोडाचे आणि क्वचित प्रसंगी उकिरडा फुंकण्याचे किंवा घाणीत तोंड घालण्याचे प्रेम पाहिले, की गतजन्माची राजघराण्यातली मंडळी पुढला जन्म माशीचा घेऊन येतात की काय, असे वाटते.

..माशी शिंकण्यावरून आठवले. मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही. किंबहुना, मी अनेकांना हा प्रश्न विचारला. पण भुताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत. तरीही ती शिंकत असावी. त्याखेरीज लोक उगीच बोलणार नाहीत. नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्तुत दिवंगत माशीलादेखील सर्दी झाली असेल. औषधाच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितलेही असेल की, "स्ट्रेप्टोमायसिनमध्ये एक बुचकळी घे, आणि दोन दिवस मिठाईवर जरा बेतानं बस. एवढी-एवढी साखर खा पलीकडल्या वाण्याकडील. चांगली उघड्यावर असते. शाळेपुढं गुडदाणीवाला बसतो, त्याच्या गुडदाणीवर बसत जा पाच मिण्ट ---फारच भूक लागली तर! एरवी, थोडा खाण्यावर कंट्रोल हवा !”


...पाश्चात्य देशांतले लोक मात्र माशीला उगीचच भितात. घरात एक माशी आली की वाघ शिरल्यासारखा हल्लकल्लोळ होतो. फवारे काय मारतील, माश्या मारायचे जाळीदार थापटणे घेऊन जिथे-जिथे ती बसली असेल ती जागा बदडून काय काढतील. त्या भिण्याला काही सुमार नाही. काळ -वेळ नाही. एका इंग्रज मित्राच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो. पहिले सूप आले.( भारतीय संस्कृतीला आणि पाश्चात्य संस्कृतीतला हा भेद चिंत्य आहे. ते सूप आले की जेवण सुरू करतात, आपण हातात सूप घेऊन गेलो की मांडवातले पाहुणे पांगतात.) माझा इंग्रज मित्र चमचा सुपात बुडवणार, इतक्यात त्याच्या बायकोने काडकन त्याच्या तोंडात वाजवली. ती बराच वेळ आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. पण मी तो पाश्चात्य प्रेमाचा भाग समजत होतो. आपल्याकडे चारचौघांतच नवराबायको तोंडाला तोंड देत नाहीत. त्यांच्याकडे चारचौघात अधिक देतात. त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे तिथे मुळीच लक्ष जात नाही. तोंडात फाडकन बसल्यावर माझा इंग्रज मित्र एकदम कावराबावरा झाला. दुसऱ्या क्षणी "सापडली !" म्हणून मड्डम ओरडली. त्यानेही सूपात नजर टाकून "डार्लिंग" म्हणून तिचे प्रेमभराने चूंबन घेतले. चौकशी अंती उघडकीला आली ती गोष्ट अशी : गेला तासभर साहेबाच्या चेहऱ्यावर माशी बसली होती.उडत नव्हती. ती माझ्याही लक्षात आली होती. किंबहुना, साहेबाच्या गालावरच्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. एक म्हणजे त्याच्या उजव्या गालावर लिपस्टीकचा ठसा उमटला होता. आणि त्या लाल धनुष्यावरच माशी बसली होती.बंदुकीवर माशी असते, पण धनुष्यावर असते, ह्याचे मला नवल वाटले. मी साहेबाला सावध करणार होतो. कारण साहेब झाला, तरी तो एक हाडामासाचा नवरा होता, त्याची दुःख एक समदुःखी नवरा म्हणून मला कळत होती. कचेरीतली सेक्रेटरी मुलगी माझ्याकडे पाहून देखील हळूच गोड हसली होती.तिथे साहेब तर गोरापान ! त्याच्यावर ती निश्चीत खूष असणार. त्यामुळे ते लाल इंद्रधनुष्य पाहून माझे अंतःकरण वर्डस्वर्थसारखे नसले तरी निराळ्या अर्थाने उडाले होते. त्यामुळे त्या मुखभंगाचा मी निराळा अर्थ लावला. पण माझा रहस्यकथांचा व्यासंग मोठा, त्यामुळे कार्यकारणभाव चुकीचे लावण्याकडे ओढा अधिक ! वस्तुस्थिती अशी होती की, सकाळ पासून घरात एक माशी शिरली होती ! "ओ, दॅट हाॅरिबल थिंग !" कोकणात "चुलीवर फुरसं बसलं होतं" हे वाक्य देखील बायका सहज म्हणतात. पण मडमेने "माशी शिरली" ह्या वाक्याला भुवया वर नेल्या, ओठाचा चंबू केला, आपले सोनेरी केस उडवले, आणि दोन्ही हातांनी भरतनाटयममधल्या नर्तकी जसा शहारा आणल्याचा अभिनय करतात तसा केला. दिवसभर ती त्या माशीच्या मागे होती. (तिचा नवरा त्या सेक्रेटरी पोरी मागे असतो तशी !)


(अपूर्ण)
माशी - ह स व णू क
पु.ल. देशपांडे

1 प्रतिक्रिया: