माझ्या पिढीच्या अनेक लेखकांप्रमाणे मीही माझं अगदी सुरुवातीचं एक पुस्तक पुलंना अर्पण केलेलं होतं. सन १९८५ ! नाव 'झुळूक' अर्पणपत्रिकेतले शब्द 'अर्थातच पु. लं. ना ज्यांनी आयुष्यातले निरामय आनंदाचे क्षण दिले!' पुस्तकाचे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि मी पुस्तक द्यायला 'रूपाली'च्या फ्लॅटमध्ये गेलो होतो. मला काही सुधरत नव्हतं. पु. लं. ना पुस्तक द्यावं, वाकून नमस्कार करावा आणि उलट पावलो घरी यावं एवढीच कल्पना होती. पु. लं. च्या घरामध्ये पाच-सहा मंडळी बसली होती. हॉल आणि स्वयंपाकघर यांच्या जोडावर सुनीताबाई बसल्या होत्या. त्या एकटक माझ्याकडे बघत होत्या. पु. लं. ना आत्यंतिक भक्तिभावानं नमस्कार करून झाल्यावर मी सुनीताबाईंसमोर नमस्काराला वाकले. त्यांनी पटकन पाय मागं घेतले. म्हणाल्या, "भाईला नमस्कार केलात की तेवढा पुरे. लेखकानं उगाच याच्या त्याच्या समोर वाकू नये." 'उगाच नव्हे, तुमच्या विषयी पण वेगळा आदर वाटतो म्हणून...,' असं काहीतरी मला बोलता आलं असतं; पण धीर झाला नाही. धारदार नजर आणि त्याहून धारदार वाक्यं यांनी माझी बोलती बंद झाली होती.
१९९२ मध्ये 'अमृतसिद्धी पु.ल. समग्रदर्शन' या ग्रंथाच्या कामाला सुरुवात केली. पु. लं. च्या जीवनकार्याचा समग्र आढावा घेण्याचा तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्याचा आराखडा ठरवण्यासाठी प्रा. स. ह. देशपांडे आणि मी पु. लं.कडे गेलो होतो. कसं कधी काम करायचं, कोणाकोणाची मदत घ्यायची अशी बोलणी सुरू असताना पु. लं. ना सारखी सुनीताबाईंची मदत लागत होती. 'आपला कोण ग तो... सुनीता?' 'मला आठवत नाही; पण सुनीता नक्की सांगल,' 'सुनीतानं ते कात्रण नक्की ठेवलं असेल,'
अशा असंख्य वाक्यांमधून पु. लं.चं त्यांच्यावरचं अवलंबित्व जाणवत होतं. कोणतंही काम त्यांच्यावर सोपवून पु. ल. किती सहजपणे अश्वस्त होतात हे वारंवार दिसत होतं. आम्ही निघताना सुनीताबाई सहज बोलून गेल्या, "बाकी सगळं तुम्ही लोक बारकाईनं करालच; पण एक लक्षात ठेवा, विशेषणं जपून वापरा. "
बेहिशेब विशेषणं वापरल्यानं व्यक्तिपर लेखनाचं काय होतं हे आजही कुठेकुठे दिसतं तेव्हा सुनीताबाईंचं ते वाक्य मला आठवतं. सुनीताबाईंची वाङ्मयीन जाणीव आणि साक्षेप किती लखलखीतपणे व्यक्त झाला होता त्यातून! सुनीताबाईंची प्रखर बुद्धिमत्ता, कर्तव्यकठोरता, उत्तम स्मरणशक्ती, सदैव जागा असणारा मूल्यविवेक, जे जे उत्तम उदात्त उन्नत याचं आकर्षण आणि खोटेपणाचा दंभाचा तिटकारा याचं प्रत्यंतर त्या काळात अनेकदा आलं. एवढी वर्ष एवढ्या लोकप्रियतेला तोंड देणं हे सोपं नसणार. सतत लोकांच्या नजरेत राहायचं, तरीही आपल्याला हवं ते कटाक्षानं करून घ्यायचं, कोण काय म्हणतं याच्या आहारी जायचं नाही, जनापवादांचा बाऊ करायचा नाही असं एक प्रकारे अवघड आयुष्य त्या जगल्या. त्यांची तर्ककठोरता अनेकांना तर्ककर्कशता वाटली; पण त्यांनी स्वेच्छेनं पत्करलेल्या रस्त्याला माघार नव्हती.
स्वभावातःच परफेक्शनिस्ट आदर्शवादी असल्यानं सुनीताबाई चटकन दुसऱ्याचं कौतुक करत नसत; तसंच स्वतःचंही कौतुक करत किंवा करवून घेत नसत त्या स्वतःला ललित लेखक मानत नसत. 'तेवढी प्रतिभा माझ्यात कुठली?' असं म्हणून त्यांच्या लेखनाची स्तुती उडवून लावत. घेतलेल्या आक्षेपांवर मात्र जरूर तेवढा विचार करत, चर्चा करत. संदर्भात कुठेही चूक झाली, तर वारंवार दिलगिरी व्यक्त करत. त्यांना आवडणाऱ्या माणसांवर विलक्षण माया करत. कुमार गंधवांचे पुत्र मुकुलजी यांच्या व्यसनाबद्दल काही उलटसुलट बोललं जात असताना त्या एकदम म्हणाल्या होत्या, "कुठेतरी दुखावला असणार हो तो... त्याला मी नुसती हाक मारली, तरी सुतासारखा सरळ होतो तो... लोकांना त्याला नीट वागवता येत नाही म्हणून...'
सुनीताबाईंची ती हाक नक्कीच आर्त असणार. त्यांच्या आवाजाचा पोत, हाका लांबविण्याची- हेल काढण्याची शैली आणि वाक्यं मध्येच सोडून देऊन साधलेला परिणाम माझ्या पूर्णपणे स्मरणात आहे. 'सुंदर मी होणार 'मधली त्यांची दीदीराजेची स्मरणारे जे अगदी थोडे वृद्ध लोक मला भेटले ते एकमुखानं म्हणाले, की सुनीताबाईंना दीदीराजे जशी समजली तशी कोणाला समजली नाही. नाटकात चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी जशी कविता सादर केली तशी कोणालाही करता आली नाही. याविषयी त्या एकदा म्हणाल्या, "दीदीराजे करताना नुसतं शरीर अपंग दिसून चालत नाही. अभिनेत्रीचा चेहरापण अपंग दिसावा लागतो.' सुनीताबाईंना किती आणि काय दिसलं होतं, हे अशा वेळी दिसायचं! सुनीताबाई हे एक अदभूत रसायन होतं. पु.लं. आणि त्या ही एक विलक्षण सांगड होती. सगळी मतमतांतरं गृहीत धरूनही अशी व्यक्ती पुन्हा होणार नाही, असा गहिरा नातेसंबंध वारंवार दिसणार नाही. असंच वाटतं.
'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात पु.लं.नी 'उषा'चं जे वर्णन केलं ते सुनीताबाईना बव्हंशी लागू होतं. हे वर्णन सतीशच्या तोंडी असे होते कधी गौरीसारखी अल्लड.... कधी पार्वतीसारखी निग्रही... कधी उमेसारखी प्रेमळ..... तर कधी साक्षात महिषासुरमर्दिनी... अशी अनेक रूपं धारण करणारी देवता होती; असे सांगताना तो पुढे म्हणतो, पण... जाऊ द्या. जखमेवरच्या खपल्या बेतानं काढाव्यात. . उगाच भळाभळा रक्त वाहायला लागायचं.' सुनीताबाईंना आठवताना मला हीच भीती वाटते. म्हणून इथेच थांबते.
मंगला गोडबोले
दैनिक सकाळ
९/११/२००९
९/११/२००९
0 प्रतिक्रिया:
Post a Comment