अलीकडेच आलेल्या ‘गुलाबजाम’ या चित्रपटात एक वाक्य होतं ‘‘स्वयंपाक करणं म्हणजे आपल्यातलं काहीतरी काढून त्या पदार्थाला देणं.’’ पदार्थ बनवणाऱयाचं त्या पदार्थाशी असणारं जवळचं नातं अधोरेखित करणारं ते वाक्य होतं. मला लेखनाबद्दल असंच म्हणावंसं वाटतं. चांगलं लेखन हे असंच जमून आलेल्या पाककृतीसारखं असतं. लेखक जेव्हा लिहीत असतो तेव्हा तोदेखील आपल्या संवेदना, आपले अनुभव, आपल्या संचिताचे पापुद्रे सोलूनच त्यांचा साज आपल्या विचारांना चढवत असतो. या सगळ्या घटकांचं मिश्रण जेवढं अचूक, तितकं ते लेखन वाचणाऱयाच्या मनात घर करून राहतं. ही एक ‘सिक्रेट रेसिपी’च असते म्हणा ना! पु.ल. अशा पाककलेतले बल्लवाचार्य होते. या 8 नोव्हेंबरला पुलंच्या जन्माला तब्बल नव्याण्णव वर्ष पूर्ण होतील, पण त्यांच्या लेखनाची चव आजही आपल्या मनात घोळतेय.
पुलंच्या लेखनावरच नाही तर त्यांच्यातल्या प्रत्येक पैलूवर विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आतापर्यंत पुष्कळ लिहिलं आहे. अशा दिग्गजांपासून ते माझ्यासारख्या सामान्य वाचकापर्यंत सर्वांना सारखंच जाणवणारं वैशिष्टय़ म्हणजे पुलंच्या लेखनातील ‘कनेक्ट’. लेखन वाचताना ‘‘अरेच्च्या, हे तर आपणही अनुभवतो’’ असं अगदी मनापासून वाटणं म्हणजेच ‘कनेक्ट’. लेखक आणि नेता या दोघांची भाषा, विचारांची मांडणी जितकी सामान्य लोकांच्या अनुभवविश्वाच्या आणि विचारक्षमतेच्या जवळची असते तितका तो लेखक अथवा नेता लोकांना जास्त आपलासा वाटतो. त्या लेखक अथवा नेत्याचं फक्त एक पावलाच्या अंतरावर असणं सामान्य माणसाला खूप आश्वस्त करत असतं. मराठीत अनेक लेखकांनी अनोखी आणि भारून टाकणारी मांडणी केली, अलंकार ल्यायलेली भाषा वापरली. वाचकांनी ते आवडीनं वाचलं, एवढंच नव्हे ते दिपूनही गेले. परंतु या दिपून जाण्यामुळेच ते लेखक उभं करत असलेलं विश्व अगदी आपलंतुपलंच आहे अशी भावना त्यांच्यात निर्माण नाही होऊ शकली. ‘असं लेखन आपल्याला नाही जमायचं बुवा’, अशी भावना त्यांच्याबद्दल निर्माण झाली. पु.ल. मात्र वाचकांपासून कायमच हाकेच्या अंतरावर राहिले. पुलंचं हे असं सोबत असणंच मला त्यांच्या लोकप्रियतेचं गमक वाटतं.
पुलंची लोकप्रियता आज सोशल मीडियावर वावरतानाही अनेकदा दिसते. एखादा नव्या पिढीचा प्रतिनिधी तिथे कमेंट करताना अगदी सहज ‘काय आज सकाळीच का?’ किंवा ‘या एकदा.. दाखवतो!!’; किंवा ‘पुराव्याने शाबीत करीन’ असं म्हणून जातो तेव्हा पु.ल. याही पिढीच्या सोबत असल्याचा विलक्षण आनंद होतो. लेखकाच्या साहित्याशी ‘कनेक्ट’ असणारे वाचक जेव्हा अशा छोटय़ा छोटय़ा संवादांमधून एकमेकांशी ‘कनेक्ट’ होतात तेव्हा इथली वर्तुळंही हसतहसत विस्तारात जातात. आजही नव्या पिढीला पुलंचा विनोद, दृष्टिकोन समकालीन वाटणं हा पुलंच्या साहित्याच्या अभिजाततेचा सर्वात मोठा पुरावा आहे.
आश्वासक शब्द
मला स्वतःला पुलंचं असं कायम सोबत असणं खूप आश्वस्त करत आलेलं आहे. खरं म्हणजे मी पु.ल. वाचले, ऐकले तोवर त्यांचं लेखन जवळपास थांबलं होतं. त्यांनी उभं केलेलं विश्व – मग ती चाळ असो, सर्व्हिस मोटार असो, नाहीतर रेल्वे स्टेशनवरचा निवांत फलाट असो – मी अपवादानेच अनुभवलं होतं. पण तरीही त्या विश्वातली पात्रं विलक्षण खरी आहेत, त्यांनी उभे केलेले प्रसंग अतिशय जिवंत आणि रसरशीत आहेत, मला आपल्यासोबत खेचून घेऊन जाणारे आहेत अशीच भावना ते वाचताना होत होती. त्यात विलक्षण वैविध्य होतं. आयुष्यातला कुठलाही असा टप्पा नाही, कुठलीही अशी जागा नाही ज्यावर पुलंचं मार्मिक भाष्य नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या छोटय़ामोठय़ा घटनांवर त्यांनी टिप्पणी केलेली आहे आणि तीदेखील कुठलेही पांडित्य सांगत असल्याचा आव न आणता, अगदी सहजपणे लिखाणाच्या ओघात…
पुलंच्या साहित्यातले संदर्भ वेळी-अवेळी आठवून हसू अनावर झाल्याचा अनुभव आपल्यापैकी कित्येकांनी घेतला असेल. मी एकदा एका नातेवाईकांच्या निधनानंतर त्यांच्या दहाव्याच्या दिवशी घाटावर गेलो होतो. वातावरण गंभीर होतं. पिंडदानाची तयारी चालू होती आणि अचानक मला अगदी अटळपणे पुलंच्या ‘पाळीव प्राणी’ मधला बोहारणीशी योग्य सौदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आज्जींच्या पिंडाला कावळा शिवण्याचा प्रसंग आठवून हसूच यायला लागलं. कशीबशी वेळ निभावून नेली मी. आधी माझी मलाच लाज वाटली, पण थोडय़ावेळाने मला जाणवलं की त्यामुळेच माझ्या मनावरचा ताण हलका झाला होता. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ घडणाऱया प्रत्येक प्रसंगावर पुलंचं काही ना काही भाष्य आहेच. त्यांच्या टिप्पण्या, कोपरखळ्यांमधून ते आपल्याला सदोदित सोबत करत असतात असं वाटतं. अनेकदा मन थाऱयावर नसताना, परिस्थितीचा कुठलाही आधार नाही असं वाटत असताना अचानक कुठूनतरी पुलंच्या लेखनाचे कुठले ना कुठले संदर्भ कोंबासारखे तरारून वर येतात आणि मनाला ताजंतवानं, हलकंहलकं करून जातात. पु. ल. देशपांडे नावाचं बीज आपल्यात खूप खोलवर रुजलेलं असल्याची पावती मिळते.
उभारी देणारं टॉनिक
ही मी फक्त माझी गोष्ट सांगत नाही; पुलंची शिदोरी घेऊन फिरणारे आणि छोटय़ा मोठय़ा प्रसंगी तिचा आस्वाद घेणारे अनेक जण मी बघितले आहेत. माझ्या परिचयातला वाचन भरपूर असणारा, परंतु बंडखोर वृत्तीचा मुलगा एकदा घरच्यांशी भांडून तिरीमिरीत बाहेर पडला. वाटेत त्याला कसलातरी मोर्चा दिसला. वास्तविक डोक्यात एवढी राख असताना मोर्चात सामील होऊन मोर्चाला चिथवायला आणि पोलिसांच्या लाठय़ा खायलाही त्याने पुढेमागे पाहिलं नसतं. पण मोर्चातल्या पोरकट घोषणा ऐकल्या, एकूणच गांभीर्याचा अभाव दिसला आणि एकाएकी तो हसतच सुटला. ‘गच्चीसह झालीच पाहिजे’ मधल्या ‘‘बोला राजाराम महाराज की जय, बोला सदाशिवरावभाऊ की जय’’ वगैरे घोषणा त्याला आठवल्या होत्या! कडू तोंड करून घराबाहेर पडलेला मुलगा हसऱया चेहऱयाने घरी परतला. “तो क्षण फार महत्त्वाचा होता. फार योग्य वेळी मला त्यातला फोलपणा कळला. पु.ल. सोबत नसते तर तसाच वाहवत गेलो असतो’’ असं तो अजूनही म्हणतो. सीमेवरच्या खडतर परिस्थितीत आत्महत्येचे विचार मनात येत असलेल्या एका सैनिकाला ‘माझे खाद्यजीवन’ हा पुलंचा लेख वाचायला मिळाल्यावर ‘हे पदार्थ चाखण्यासाठी तरी जगायला हवं’ असं वाटून त्याने आत्महत्येचा विचार कसा बाजूला सारला, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मला खात्री आहे, त्या सैनिकाला पुढे आयुष्यभर पुलंनी सोबत केली असेल.
शब्दांतून कृतीत
खरंतर पुलंनी फक्त लेखनातून लोकांना सोबत केली असती तरी पुरेसं होतं. पण त्याही पुढे जाऊन चांगलं कार्य करणाऱया प्रत्येकाच्या सोबतीला पु.ल आणि सुनीताबाई उभे होते. मग ते कार्य व्यसनमुक्तीचे असो, कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे असो, विज्ञानप्रसाराचे असो किंवा नवख्या परंतु आश्वासक लेखकाकडून होणाऱया साहित्यनिर्मितीचं असो. अनिल अवचट, प्रकाश आमटे, जयंत नारळीकर, आनंद यादव आणि इतर अनेकांनी पुलंच्या मदतीबद्दल, सोबतीबद्दल भरभरून सांगितलं आहे. पुलंची सोबतीची खात्री शब्दांपुरती मर्यादित न राहता कृतीतही आली, म्हणून त्यांचं जनमानसाशी नातं अधिक घट्ट झालं.
लेखकाची काही पुस्तकं जीवनाचा भाग होणं वेगळं आणि संपूर्ण लेखकच जीवनाचा भाग होणं वेगळं. आणखीही काही लेखक वाचकांच्या आयुष्याचा भाग झालेले मी पाहिले आहेत, पण इतक्या प्रचंड वाचकसमुदायाची एवढा दीर्घकाळ आपल्या शब्दांमधून सावलीसारखी सोबत करणारे पु.ल. एकमेव आहेत. माझ्यामते पुलंनी किती पुरस्कार मिळवले, त्यांची किती पुस्तकं खपली, किती लोकांनी त्यांच्या कॅसेट्स ऐकल्या यापेक्षा सुखाच्या आणि दुःखाच्याही प्रसंगी पु.ल. सोबत आहेत असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना असणं यातच पुलंचं खरं यश सामावलेलं आहे.
ऋण पुलंचे
वाराणसीला संध्याकाळी गंगेची आरती होते. त्या आरतीच्या वेळी गंगौघात हजारो दिवे सोडले जातात. सोडणाऱयाला कल्पनाही येणार नाही तिथवर ते दिवे जात राहतात. पुलंचे शब्द, सूर, विचार मला त्या दिव्यांसारखे वाटतात. आजवर कित्येकांचे छोटेछोटे आसमंत त्यांनी उजळवून टाकले आहेत. पु.ल. खरंतर प्रत्येक क्षणीच सोबत असतात, परंतु कालप्रवाहात लखलखते दीप सोडणाऱया आणि पाठीवर थाप देऊन सोबतीबद्दल आश्वस्त करणाऱया त्या हातांबद्दल त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली, इतकंच…
प्रसाद फाटक
सामना व्रुत्तपत्र
४ नोव्हेंबर २०१८
prasadgates@gmail.com

0 प्रतिक्रिया:
Post a Comment