Wednesday, October 31, 2018

पु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार - अनिल गोविलकर


फार वर्षांपूर्वी प्रख्यात संगीतकार श्रीनिवास खळ्यांचे "गोरी गोरी पान, फुलासारखी छान" हे बालगीत अतिशय लोकप्रिय झाले होते, इतके की कवी ग.दि.माडगूळकरांनी कौतुकाने "अहो खळे, या गाण्याने मी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलो". वास्तविक माडगूळकर, त्याआधीच घरगुती झाले होते पण यानिमित्ताने त्यांनी श्रीनिवास खळेकाकांचे कौतुक करून घेतले. अशाच वेळी कुणीतरी या गाण्याचे कौतुक करीत असताना, खळ्यांनी मात्र आपली आवड म्हणून "नाच रे मोरा आंब्याच्या वनात" या बालगीताचे नाव घेतले. वास्तविक प्रस्तुत बालगीत प्रसिद्ध नक्कीच होते परंतु कालौघात काहीसे मागे पडले होते. अर्थात त्यानिमित्ताने काही लोकांना या गाण्याचे संगीतकार पु.ल.देशपांडे आहेत, ही माहिती "नव्याने" समजली. पु.ल. आपल्या असंख्य व्यापात वावरत असताना, त्यांनी आपल्यातील संगीतकार या भूमिकेबाबत नेहमीच अनुत्साही राहिले आणि खुद्द संगीतकारच जिथे मागे रहात आहे तिथे मग इतरेजन कशाला फारसे लक्षात ठेवतील? परंतु संगीतकार म्हणून पु.लं. नी ललित संगीतात काही, ज्याला असामान्य म्हणाव्यात अशा संगीतरचना केल्या आहेत. बऱ्याचशा रचना कालानुरूप अशा केल्या आहेत आणि त्यात फारशी प्रयोगशीलता आढळत नाही परंतु चालीतील गोडवा, शब्दांचे राखलेले औचित्य आणि काहीवेळा स्वररचनेवर राहिलेला नाट्यगीतांचा प्रभाव आणि त्यातूनच निर्माण झालेले "गायकी" अंग, यांमुळे गाणी श्रवणीय झाली आहेत.

पु.लं. नी आपल्या सुरवातीच्या काळात भावगीत गायनाचे कार्यक्रम केले होते. त्या दृष्टीने विवरण करायचे झाल्यास, त्यांनी गायलेली गाणी फारशी ऐकायला मिळत नाहीत. "पाखरा जा" सारखे अपवादात्मक गाणे ऐकायला मिळते. त्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास, आवाज "कमावलेला" नाही, पण रुंद, मोकळा आणि स्वच्छ आहे. त्याला "गाज" फार नाही पण गोड, सुरेल आहे. त्यात किंचित सुखावणारी अनुनासिकता आहे पण लवचिकपणा फार नसल्याने फिरत ऐकायला मिळत नाही. एकूणच बहुतेक भर हा उस्फूर्तता असावी, असे वाटते. अर्थात अचूक शब्दोच्चार हा महत्वाचा मुद्दा विशेषत्वाने मांडायला लागेल. असेच एक लक्षात राहण्यासारखी रचना म्हणजे "उघड दार". या गायनात आवाजाची फेक वेधक आहे. "दार" मधील "दा" अक्षरावरील तयार षडजामधला आ-कार सुरेख लागलेला आहे. वरती उल्लेख केलेल्या "पाखरा जा" मधील "पहा" या शब्दावर छोटी चक्री तान आहे. परंतु मघाशी म्हटल्याप्रमाणे आवाजावर शास्त्रीय संगीताचे संस्कार नसल्याने, घेतलेल्या ताना या, दोन, तीन स्वरांपुरत्या असल्याने एकूणच स्वररचनेला विलॊभनीयता आणणाऱ्या आहेत. त्यामुळे एक विधान ठामपणे करता येते, ललित गायकाला प्रत्येक प्रकारची गाणी गाता येणे गरजेचे असते आणि तिथे मात्र पु.लं. च्या गायनात काहीसे थिटेपण जाणवते. पुढे "बटाट्याची चाळ" या संगीतिकेतील गायन ऐकायला मिळते पण ते गायन हे बव्हंशी कविता वाचन स्वरूपाचे झाले आहे. मुळात त्या रचनेत संगीताचे स्थान तसे गौण असल्याने, असे झाले असावे. असे असले तरी एकूणच पु.लं.चा आपल्या गायनावर फार विश्वास नसावा, असेच वाटते. 
पु.लं.चा खरा सांगीतिक आविष्कार ऐकायला मिळतो तो त्यांच्या हार्मोनियम वादनातून. मला देखील काही प्रख्यात गायकांना साथ करताना ऐकण्याची संधी मिळाली होती. अर्थात यात त्यांचे जाहीर वादनाचे कार्यक्रम देखील समाविष्ट आहेत. वाद्य वाजणारे कलाकार बहुदा त्या वाद्याच्या प्रेमात पडतात. समजा ते वाद्य हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन झाले तर तर त्या वाद्याचा अतोनात गौरव करण्याकडे प्रवृत्ती वळते. या दृष्टीने बघता पु.लं.चे तसे झाले नाही. त्यांनी आपले पेटीवादन कधीही व्यावसायिक तत्वावर केले नाही, किंबहुना आनंदनिधानाचे स्थान, इतपतच त्यांच्या आयुष्यात या वाद्याचे स्थान राहिले, असे म्हणता येईल. त्यांनी या वाद्याच्या कमतरते विषयी बऱ्याचवेळा जाहीर मतप्रदर्शन केले होते आणि ते वाजवी असेच होते. अर्थात इतर कुठल्याही वाद्याकडे पु.ल. वळले नसल्याने, या वाद्याच्या अनुरोधानेच त्यांच्या संगीत प्रभुत्वाबद्दल काही विधाने करता येतील.

आता जर का पेटी या वाद्याचीच घडण लक्षात घेतली तर आपल्याला काही ठाम विधाने करता येतील. हातानेच भाता चालवायचा असल्याने "दमसास"ची अडचण उद्भवत नाही. दीर्घ स्वरावली आणि ताना घेता येतात तसेच सर्व सप्तकात फिरता येते. गळ्यापेक्षा बोटांचे चापल्य अधिक त्यामुळे जलद ताना सुलभतेने घेता येतात. परंतु या वाद्यात दोन अडचणी प्रामुख्याने येतात. १) तिच्यातील स्वरस्थाने आणि भारतीय संगीतातील स्वरस्थाने यात फरक पडतो. २) सर्वात मोठा फरक म्हणजे पेटीच्या स्वरांत तुटकपणा फार जाणवतो. एक स्वर झाल्यावर दुसरा स्वर परंतु इतर तंतुवाद्यांत असा प्रवास करताना स्वरांतील सातत्य राखणे जमू शकते आणि तिथे पेटी कमी पडते. पुढचा मुद्दा असा, भारतीय संगीतात "मींड" या अलंकाराला अतोनात महत्व असते आणि तिचे अस्तित्व पेटीतून दाखवणे जवळपास अशक्य होते आणि याचे मुख्य कारण स्वरांतील तुटकपणा ठळकपणे ऐकायला मिळतो. आणि हा दृष्टिकोन ध्यानात ठेऊनच आपल्याला पु.ल. एक वादक याचा धांडोळा घ्यायचा आहे. बोटांचे छापल्या तर महत्वाचे खरेच पण भाता सक्षमपणे हलवणे तसेच स्वरांचा नाद अवश्य तिथे लहान-मोठा करणे, एकाच स्वर दीर्घकाळ त्याच "व्हॉल्युम" मध्ये ठेवणे इत्यादी बाबींतून मैफिलीत रंग भरणे, यात पु.ल. निश्चित वाकबगार होते. मुळात पेटी हे संथ, मुक्त आलापीचे वाद्यच नव्हे - जसे सतारीत अनुभवता येते. विलंबित स्वराला जे सातत्य, दीर्घता हवी असते ती पेटिट सुट्या-सुट्या स्वरांतून मिळत नाही.

मी स्वतः: वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि मल्लिकार्जुन मन्सूर यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर केली साथ ऐकली आहे. आदर्श साथ जी गायकाच्या बरोबर जाते पण भारतीय संगीतात ठरीव संहिता अशी कधीच नसते म्हणजेच गायक जे त्या क्षणी सुचेल त्या स्वरावली घेत असल्यामुळे पुढच्या क्षणी येणारी स्वरावली ही नेहमीच अनपेक्षित असते, त्यामुळे साथ देणारा "बरोबर" जाऊ शकत नाही - तो मागोवा घेत असतो. यात गायकाच्या पेशकारीच्या शक्य तितक्या जवळपास वावराने, इतकेच पेटी वादकांच्या हातात असते. पु.लं.च्या बाबतीत हे कौशल्य ठळकपणे ऐकायला मिळते. बरेचवेळा गायकाने जी स्वरावली घेतली आहे, त्याचे प्रत्यंतर आपल्या वादनातून देणे अंडी इथे पु.ल. नेमके वादन करताना आढळतात. तसेच कधीकधी "मोकळ्या" जागेतील "भरणा" अतिशय कुशलतेने करताना आढळतात. अर्थात प्रत्येकवेळी असे करता येईल असे शक्य नसते परंतु वसंतराव देशपांड्यांच्या बाबतीत पु.लं.नी हे स्वातंत्र्य घेतल्याचे मी अनुभवले आहे. एकतर वसंतरावांचा गळा कोणत्यावेळी कुठे आणि कशी झेप घेईल याची अटकळ बांधणे महामुश्किल असताना, त्यांना साथ करताना ही व्यवधाने अचूकपणे सांभाळल्याचे समजून घेता येते.

आता पुढील भाग म्हणजे पु.लं.ची ललित संगीतातील कामगिरी. इथे त्यांनी दोन स्तरांवर संगीत दिग्दर्शन केले आहे. १) भावगीत, २) चित्रपट गीत. तसे पाहता, आविष्काराच्या दृष्टीने दोन्ही आविष्कार एकाच पातळीवर वावरतात पण चित्रपट गीत बांधताना, प्रसंगाची पार्श्वभूमी, आजूबाजूचे "सेटिंग" वेळेची मर्यादा इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. पु.लं.ची बरीचशी चित्रपट गीते ही त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील आहेत. अर्थात बरेचवेळा आर्थिक चणचण हा मुद्दा असल्याने वाद्यमेळाच्या विविधतेवर मर्यादा आल्या. अर्थात अशी मर्यादा असून देखील त्यांनी काही अत्यंत संस्मरणीय रचना दिल्या, हे मान्यच करायला हवे. मी सुरवातीला एक मुद्दा मांडला होता, पु.लं.च्या स्वररचनेवर त्यावेळच्या नाट्यगीतांचा प्रभाव जाणवत आहे. विशेषतः: मास्तर कृष्णराव यांचा जाणवण्याइतका प्रभाव दिसतो. मास्तरांच्या रचनेतील प्रासादिकता, कल्पक छोट्या अशा ताना, आवाजाला तरलपणे फिरवण्याची हातोटी, एकाच अक्षराच्या पुनरावृत्तीत दोन वेगळ्या सुरांचा वापर करून चमत्कृती घडवायची आणि रचनेत रमणीयता आणायची इत्यादी खुब्यांचा आढळ पु.लं.च्या बहुतेक रचनांमधून ऐकायला मिळतो. "माझिया माहेरा जा" सारख्या गीतांतून मास्तर कृष्णरावांच्या प्रभावाचा अनुभव घेता येतो. तसेच "हसले मनीं चांदणे" सारख्या (राग चंद्रकौंस) गाण्यातून बालगंधर्वी शैलीचा प्रभाव जाणवतो. सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे शब्दांचे औचित्य सांभाळणे - "माझिया माहेरा" या गाण्यातील "हळूच उतरा खाली" इथे स्वर पायरीपायरीने उतरवून, शब्दांबाबतली औचित्याची भावना सुरेख मांडली आहे. तसेच "तुझ्या मनात कुणीतरी हसलं ग" (राग पहाडी) सारख्या रचनेत प्रसन्नतेचा भावस्थितीनुसार लय काहीशी द्रुत ठेवणे हे संगीतकार म्हणून नेमके जमले आहे.
                                     
त्यांची खास गाजलेली दोन भावगीते - "शब्दावाचून कळले सारे" आणि "माझे जीवन गाणे". मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेल्या प्रसन्न कवितेला पु.लं. नी खरोखरच चिरस्मरणीय अशा चाली दिल्या आहेत. "दूर कुठे राऊळात दरवळतो पुरिया" सारख्या चित्रपटगीतांत "पुरिया" रागाचा समर्पक उपयोग केला आहे. तसे बघितले चाल साधी आणि सरळ आहे पण तेच या चाळीचे खरे वैशिष्ट्य म्हणायला हवे. दुसरे गाजलेले चित्रपट गीत म्हणजे "इंद्रायणी काठी" हे भजन. या रचनेवर देखील मास्तर कृष्णरावांचा प्रभाव आढळतो. असे असले तरी गायनावर बालगंधर्व शैली पुसली जात नाही - विशेषतः: "विठ्ठला मायबापा" हा पुकार तर खास बालगंधर्व शैलीतला. भीमपलास रोगावरील धून असली तरी रागाचे अस्तित्व वेगळे ठेवले आहे. "ही कुणी छेडिली तयार" हे केदार रागावर आधारित गाणे असेच विलोभनीय झाले आहे. यात गिटार वाद्याचा उपयोग लक्षणीय आहे जरी वसंर्तवाचा ढाला आवाज काहीसा विक्षेप आणत असला तरी. वर उल्लेखलेल्या "नाच रे मोरा" ही रचना तर बालगीत म्हणून चिरंजीव झालेली आहे. गाताना काहीसा बोबडा उच्चार, हलकेच निमुळता होत जाणारा स्वर तसेच सुरवातीच्या "नाच" मधील "ना" आणि शेवटी येणाऱ्या "नाच" मधील हलका "ना" यांचा गमतीदार विरोध इत्यादी अनेक गुणविशेषांनी हे गाणे नटले आहे. असेच अप्रतिम गाणे "करू देत शृंगार" सारखी विरहिणी अजरामर झाली आहे. कवितेतील आशय अतिशय नेमक्याप्रकारे जाणून घेऊन, तितकीच तरल स्वररचना सादर केली आहे. अर्थात आणखी एक उणीव असे म्हणता येणार नाही कारण त्यात आर्थिक कारणे दडलेली आहेत पण सगळ्याचा स्वररचनांमध्ये वाद्यमेळाचे प्रयोग फारसे बघायला मिळत नाहीत.
                                 
एकूणच खोलात विचार करता, पु.लं.च्या संगीताचा साक्षेपाने विचार केल्यास, सारांशाने असे म्हणता येईल, की त्यांचा व्यासंग हा "साधना" या सदरात मोडणे अवघड आहे. त्यांच्या आस्वाद यात्रेतील एक वाटचाल असे म्हणता येईल. असे असले तरी, महाराष्ट्राने त्यांच्या विविध पैलूंवर अतोनात प्रेम केले पण यात या माणसाच्या सांगीतिक कर्तबगारीची विशेष जण ठेवली नाही आणि कदाचित पु.लं.नी देखील फार गांभीर्याने याकडे पाहिले नाही.


अनिल गोविलकर
मुळ स्रोत- http://govilkaranil.blogspot.com/2018/10/blog-post.html

पु.ल. एक आनंदयात्री

दिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का? विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास सुरुवात केलीच. त्यांच्या पुस्तकातून पुलंची ओळख होत गेली ती अशी, पु.ल. म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व, पु.लं. म्हणजे बुद्धीविभव, सर्जनशील वक्ता, पु.लं. म्हणजे संगीताभिनयाचा जाणकार, पु.लं. म्हणजे गरुडाची निरीक्षणशक्ती असणारा डोळस लेखक, पु.लं. म्हणजे निखळ, निरागस, निर्हेतुक आनंदोत्सव घडविणारा कवी, जिंदादिल आस्वादक, रसिक जीवनयात्री, पु.लं. म्हणजे मराठी मनाचा आरसा प्रामाणिक, सचेतन, सहृदय. हे सारं लिहिलं खरं पण कानात रावसाहेब खेकसले, ‘हे कसलं हो असलं मिळमिळीत?’ मग हा रूळ ताबडतोब बदलून टाकला. म्हटलं, पु.लं. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा, पु.लं. म्हणजे मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेते, पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांचे मानकरी,साहित्य समेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष;तेवढ्यात शंकऱ्या किणकिणला, ‘आमचे बाबा कीनई नारूच्या बाबांपेक्षा चिक्कार शक्तीवान आहेत, पोट पुढे असलं म्हणून काय झालं?’ लेखाला सुरुवात केली खरी न् पण असामी ची ओळख काय म्हणून झाली नक्की, हा प्रश्न काही सुटेना. मग मात्र ठरवून टाकलं की, या विदुषकाचा मुखवटा धारण केलेल्या विनोदकार, नाटककार, कवी, गायक, वादक, वक्ता आणि बैठ्या मैफिलींच्या अनभिषिक्त सम्राट असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा द्यायचा हे आपल्या लेखाचं निमित्त.

पुलंनी त्यांच्या लेखनातून आनंद दिला आणि आपण रसिकांनी तो पुरेपूर लुटला. ‘विनोद’ हा पुलंच्या लेखनाचा मूलाधार होता पण त्यांना हशा मिळविण्यासाठी कधी विनोद करावा लागला नाही. खरं तर सुमार आणि सपक विनोद हे विनोदाचे शत्रू पुलंच्या विनोदात कधी दिसलेच नाहीत. असामी असामी मधला बेमट्या उर्फ धोंडो भिकाजी जोशी चे डी बी अंकल हा प्रवास अनुभवताना आपण त्यांच्याबरोबर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास अनुभवला. सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा, आवडी असणारा तो, त्याच्या त्या केविलवाण्या आयुष्याला हसत असताना आपण त्याचे कधी होऊन गेलो ते कळलंच नाही; ते वाचताना वा ऐकताना आपण स्वत:लाच हसत होतो याचंही भान आपल्याला उरलं नाही. उलट चार्ली चाप्लीनला पुलं ‘तू माझा सांगाती’ असं का बरं म्हणत असतील हे आपल्याला मनोमन पटलं.

पुलंनी जसा हा माणूस उभा केला तशीच बटाट्याच्या चाळीचीही निर्मिती केली. तिच्यातून नुसती चाळच नाही तर मुंबईसुद्धा भेटली. अगदी तिचा कधीही अनुभव न घेतलेल्यालाही ती जवळची वाटली. त्यांनी या चाळीला एक स्वतंत्र, संवेदनक्षम आणि बोलकं व्यक्तिमत्त्व दिलं. त्या चाळीबरोबरच सुतकी आवाजात ‘पंत, तुम्ही उपास सुरु केलाय?’ असं म्हणणारे कुशाभाऊ, ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे?’ हे विचारणारा फर्ताडो, पट्टीच्या न सापडणाऱ्या सुरात गाणाऱ्या वरदाबाई, ‘कुठल्याशा किल्ल्याला चिखल किती लागला ते पन्हाळगडच्या पावनखिंडीची लांबी रुंदी काय होती’ असली कागदोपत्री प्रवासाची इत्थंभूत माहिती असणारे बाबुकाका खरे ही सगळी मंडळीही आपल्याला तिथेच भेटली किंबहुना ती रूपं बदलून आजन्म भेटत राहतील. पुलंचं लेखन नुसतंच व्यंग किंवा विसंगती दाखवणारं नव्हतं तर त्यावर ते एक मार्मिक भाष्य करीत, कधी त्यात खोचक चिमटेही घेत असत पण त्या विनोदाचा दर्जा कायमच निखळ अन् निकोप असे.

पुलंचं लेखन खरंतर आपण वाचत नाहीच ते ऐकत असतो. बहुतेक त्यांना लिहिण्यापेक्षा बोलायला अधिक आवडत असणार म्हणून असेल. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गोळाबेरीज’ आणि ‘मैत्र’ यासारख्या पुस्तकातून त्यांने लिहिलेल्या व्यक्ती आपल्याला खरोखर भेटतात. ‘सर, हे पेढे.’ म्हणत सुरातील अजिजी दाखवणारा सखाराम गटणे, ‘इथे सगळेच पंचेवाले, अन त्याच्यापेक्षा उघडे.’ असं बिनधास्तपणे सांगणारा अंतू बर्वा, ‘आम्ही पाहतोय, महाराज पाहताहेत..’ म्हणत शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करणारे हरितात्या, सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी, ‘हं, ‘नाना फडणवीस’ अशी सही केली’ म्हणणारे बघुनाना, ते ‘आयुष्यात व्रत एकच केलं, पोरगं सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून लख्खं करून जगात पाठवून देणे!’ असं म्हणणारे चितळे मास्तर अशी जर या वल्लींची यादी करावयास सुरुवात केली तर ती संपणारच नाही. पुलंच्या समृद्ध भाषेमुळे, संवेदनशीलतेमुळे, लोकसंग्रहामुळे, आणि अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे विनोद केवळ हासण्यापुरते मर्यादित न राहता त्या मागची कारुण्याची लकेरही आपल्या नजरेस येते.

बरं, पुलंच्या लेखनाच्या वैविध्याबरोबर विषयांचंही वैविध्य होतं; त्यांना कुठल्याही विषयाचंही वावडं नव्हतं. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व, त्याचा अभ्यास त्यांनी वापरलेल्या परिभाषेतून दिसून येई. त्यांची प्रवासवर्णनंही अशीच वैशिष्ट्यपूर्ण मग ते ‘जावे त्याचा देशा’ असो किंवा ‘अपूर्वाई’. त्यांची आठवणी लिहिण्याची हातोटी विलक्षण होती. अपूर्वाई तील एक आठवण, प्रवासात हॉटेलमधल्या फ्रेंच वेटरशी संवाद करण्याचा प्रसंग गुदरला, तेव्हा पु.लं म्हणतात, ’दूध हवं, हे सांगण्यासाठी कागदावर एक गाय काढली - काढली कसली, गोहत्याच ती!’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या विनोदबुद्धीवर काय बोलावं? आपल्याला मराठी कळतं त्यामुळे आपण हे वाचून आनंद घेऊ शकतो, अनुवाद वगैरे ऐकण्या-वाचण्याची वेळ आपल्यावर येत नाही याबद्दल कृतज्ञ राहावं इतकंच.
असं असलं तरीही, पुलं विरोधी गटही काही कमी नाही, नुसतेच विनोदी, उथळ, वरवरचे, फक्त जे लोकांना ऐकायला आणि वाचायलाच आवडेल असे लिहिले असे आरोपही होत या लेखनावर आले. पण त्यांनी त्यांच्या लेखनातून विषमता, अन्याय, दंभ, मत्सर ही समाजाची कुरूपता मुद्दाम कधी दाखवली नाहीत. स्वत:च्या दु:खाचे मनोरे रचून आपल्याला रडवले नाही; उलट रडू येईपर्यंत हसवले. आणि विरोधकांना त्यांच्या विरुद्ध मतासह आपले मानले. आताचा काळ तर असा आहे की, पुलंचे कित्येक विनोद, किस्से, कोट्या या स्वत:च्या नावाने दडपून लोक ते व्हॉटस् अॅपताना, फेसबुकताना किंवा त्याची पुणेरी पाटी बनतानाही दिसून येते. कदाचित हेच त्या लेखकाचं यश असेल, की त्याचा विनोद हा सर्व सामान्य माणसाला इतका जवळचा वाटतो. पुलंचं लेखन आपण जितके वेळा वाचतो तितके वेळा ते आनंदच देतं, त्याचं कंटाळा येत नाही. आता उदाहरणच द्यायचं तर, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती, ‘संगीत संशयकल्लोळ’ मधील संगीत नसते, तर बरे झाले असते, असे म्हणण्याइतके मधुर आहे, किंवा एकदा मर्ढेकरांच्या कविता सादर करायला जाण्यापूर्वी भरपेट जेवण झाल्यावर ‘इतके जेवण झाल्यावर मर्ढेकर कुठला? नुसता ढेकर.’ हे आणि असं खुमासदार लेखन न आवडेल तरच आश्चर्य. त्यातून पुलंनी त्यांच्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत ते ऐकवलं तर आणखी लज्जतदार. अक्षरांशी थोडाफार संबंध आलेला असा एकही माणूस नसेल ज्याने पुलंचं नाव ऐकताच त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला हात घातला जाणार नाही वा उत्साहाची लहर उठणार नाही.
त्यांच्यातला लेखक एक उत्तम अभिनेता म्हणून भेटतो तो ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात आणि तितकाच परिणामकारक दिग्दर्शक भेटतो ‘वाऱ्यावरची वरात’ किंवा ‘वटवट’ सारख्या सामुहिक नाट्यप्रयोगांचे मोट वळताना. त्यांना एक कसबी लेखक, गायक, वादक, अभिनेता म्हणून ओळखू लागतो तोवर ‘शिकवीन चांगलाच धडा’ म्हणत ‘ती फुलराणी’ समोर उभी राहते,त्यांच्या भाषा आणि बोलींच्या अभ्यासाची आपल्यावर मोहिनी घातली जाते,आणि त्यांच्यातला नाटककार खुणावून जातो. ‘सुंदर मी होणार’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ सारखी नाटकं, रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण नाटकं म्हणून आजही आठवली जातात.

पुलंच्या लेखनातून जसे ते अगदी मनापासून भिडतात तसेच ते त्यांच्या अभिनयातून आणि अभिवाचनातून आपल्याला मनोमन भावतात. गुळाचा गणपती, किंवा बटाट्याची चाळ मधील त्यांच्या लयबद्ध हालचाली असोत किंवा म्हैस मधील कित्येक आवाजांचे प्रकार असोत, हा सगळा खटाटोप ते लीलया साधून जातात. म्हणूनच की काय, आपण त्यांनी संगीत दिलेली ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम’, ‘माझे जीवनगाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’, किंवा ‘हसले मनी चांदणे’ यासारखी गोड गाणी कधी विसरूच शकणार नाही. एरवी मिश्कील असणारे पु.लं इतर कवींच्या कविता मात्र अतिशय गांभीर्याने ऐकवत असत. ‘आनंदयात्रा कवितेची’ हा बा. भ. बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करताना उत्तम आस्वादक असलेल्या पुलंकडून त्याचं कवितांवर असलेलं प्रेम वाक्यावाक्यातून जाणवत राहतं. सरीवर सरी आल्या गं, किंवा समुद्रबिलोरी ऐना यासारख्या कविता म्हणतानाचा त्यांचा सुरेल आवाज ऐकत रहावासा वाटतो. या बहुरूपी अवलियाचं रुपडं आपण जितकं म्हणून शोधू, पाहू तितकं रंगीबेरंगी दिसू लागतं.

या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती असावेत, एकाविषयी आश्चर्य, कौतुक वाटावं तोवर दुसरा समोर यावा. त्यांची अशीच एक विलक्षण गोष्ट वाटली ती म्हणजे ते वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मुद्दाम शांतीनिकेतन मध्ये जाऊन बंगाली भाषा शिकले, त्या भाषेचा, परिसराचा अभ्यासही केला. जर कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिथे जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची ही त्यांची धारणा. हे त्याचे केवळ तत्व म्हणून मानले नाही तर त्यांनी तसे अनुभव घेऊन ते ‘वंगचित्रे’ मधून त्यांच्या शब्दातही मांडलेदेखील.

पुलंच्या ठायी हे सारे गुण तर होतेच होते पण त्याहीपेक्षा अफाट माया आणि प्रेम होते ते ‘माणूस’ या गोष्टीविषयी. त्यामुळे त्यांनी असंख्य माणसांना आपलेसे करून घेतले आणि सत्पात्री दानही केले. या त्यांच्या सव्यापसव्याचे शिस्तबद्ध दिग्दर्शन केले ते त्यांच्या पत्नीने ‘सुनीताबाई’ यांनी. रसिकांनी जसे त्यांच्यावर प्रेम केले तितकेच प्रेम पुलंनी समाजावर, मुक्तहस्ताने आणि आजन्म केले. त्यांच्यासाठी बोरकरांनी लिहिलेल्या या कवितेच्या ओळी खरंच किती समर्पक आहेत बघा,..

जराशप्त या येथल्या जीवनाला | कलायौवने तूच उ:शापिले |
व्यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू | निराशेत आशेस शृंगारिले |
मिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी | तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली |


तुझ्यासारखा तूच आनंदयात्री | तुवां फेडिली गाठ प्राणातली |

युवोन्मेष दिवाळी अंक २०१८
नंदिता गाडगीळ