Thursday, December 2, 2021

‘पुल’कित संध्याकाळ - योगेश कोर्डे

पुलंच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात आणि परदेशातल्या महाराष्ट्र मंडळात विविध कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. पुण्यात लहानपणी ते जिथे राहायचे त्या जुन्या वाड्यात एका छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्याचे ठरले.पु.लं चा हा सत्कार समारंभ ‘व्यक्ती आणि वल्ली प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित केला गेला होता. यातले सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून पु.लं च्याच ‘व्यक्ती आणि वल्ली’.

 या वाड्यात हा समारंभ आयोजित करण्याचे दुसरे कारण म्हणजे हरितात्यांना ते सोयीस्कर होणार होते. जुन्या आठवणी पुराव्यानी शाबीत करायला ते उत्सुक होतेच. या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना सेक्रेटरी म्हणून बापू काणेची निवड बिनविरोध करण्यात आली कारण तो सेक्रेटरी म्हणूनच जन्माला आला होता. मदतीला होता तो नारायण. पु. लं चा सत्कार म्हणजे घरचं कार्यं आणि स्वयंसेवकगिरी तर त्याच्या रक्तात भिनलेली. समारंभासाठी काय काय लागणार हे नारायणास ठाऊक असल्याने बापू त्यास पुण्यातल्या गल्ली बोळांत पिटाळणार होता. चितळे मास्तर आणि अण्णा वडगावकर यांना खास निमंत्रण होते. सखाराम गटणे मध्ये पुरेसा आत्मविश्वास कोंबून त्याला भाषणाला उभे करायचे ठरले. तांदळातून खडे निवडावे तसे त्याने थोर साहित्यिकांच्या पुस्तकांतली वाक्ये टिपून घेण्यास सुरुवात केली. बुद्धीजीवी लखू रिसबूड ला बापू नी पेपरात कार्यक्रमाची जाहिरात छापण्यास सांगितले. ती कुठल्या मथळ्याखाली आणि कशी छापायची या विचारात लखू गर्क झाला. या वेळी मात्र त्याने कुरबुर केली नाही. पु.लं च्या सत्काराची जाहिरात छापायची म्हटल्यावर लखूला प्रथमच MA झाल्याचं सार्थक वाटलं. कार्यक्रमानंतरचं परीक्षण तोच लिहिणार होता आणि तेही कुठल्याही पगाराची अपेक्षा न ठेवता. ‘तो’ ला कार्यक्रमाची माहिती कळविण्याची गरज भासली नाही कारण ‘तो’ हा सर्वत्र असतोच. ‘तो’ जसा कुठेही उगवतो तसा इथेही उगवलाच. खरं सांगायचे झाल्यास ‘तो’ काहीच काम करणार नव्ह्ता फक्त चारचौघात बडबड करणार होता.

भय्या नागपूरकर मात्र कार्यक्रमाला कुठली शेरवानी घालायची आणि कुठले सुरवार नी चढाव वगैरे चढवायचे या विचारात गुंग झाला. पु.लं समोर फिल्मी गीत गावे की गझल हे त्याचे अजून निश्चित नव्हते. निमंत्रण पत्रिकांवर डिझाईन कोणते असावे हे ठरवण्याची जबाबदारी चौकोनी कुटुंबाची. पत्रिका सुबक, सुरेख, आकर्षक, सुव्यवस्थित आणि गुळगुळीत कशा करता येतील यावर माधवराव आणि मालतीबाई यांच्यात न भांडता विचारविनिमय झाला. बटाट्याच्या चाळीतल्या मंडळीना निमंत्रण द्यायला परोपकारी गंपू ला पाठविण्यात आले. सगळ्यांची विचारपूस करण्याची त्याला भारी हौस असल्याकारणाने गंपू ला तिकडे धाडण्यात आले होते. शेवटी एकदाचा कार्यक्रमाचा दिवस उजाडला…

पहाटेच्या यष्टीने अंतू बर्वा पुण्यात अवतरला. येताना ‘म्हस’ आडवी आल्याने त्याला यायला थोडा उशीर झाला होता.वाड्यात येताच अंतू ने बापूस हटकले... ”काणेंचा बापू ना तू?” “हो” ”झटक्यात ओळखले मी ! अरे तुझ्याशिवाय कां कुणी सेक्रेटरी होणारेय” बोलण्यात शक्य तितके अनुस्वार जाणून बुजून न वापरता अंतू बर्वा म्हणाला, “कशी काय कामं?”

“होत आहेत”, हातातला कार्यक्रमाच्या बजेटचा कागद डोळ्याखालून नाचवत बापू उत्तरला. इतक्यात लखू ला उद्देशून अंतूशेट ओरडले “पेपरातून जाहिरातीच्या अक्षता वाटल्याचे समजले हो SSSS ,पगार वाढवून क्षुद्र शब्दकोडी रचण्यापेक्षा हे उत्तम.”

”अंतूशेट, सखोल व्यासंग आणि परिश्रमाला अर्थ नसल्याने शब्दकोड्या सारख्या शुल्लक प्रकारांना साहित्यिक दर्जा देण्याचे काम करावे लागते.” नेहमीप्रमाणे लखू म्हणाला. एवढ्यात तिसर्याला बघून अंतू आत कुठेतरी अंतर्धान पावला. कार्यक्रमाची वेळ होत आली होती. नारायणावर चौफेर हल्ले होत होते. ज्याप्रमाणे त्याच्या अंगात आतापर्यंत लग्न चढायचे तसे आता सत्कार समारंभ चढला होता. खुर्च्या व्यवस्थित मांडल्या आहेत का; गालिचे नीट अंथरले आहेत का; हार फुले मागवली ती आली आहेत का; ही सगळी कामं तो निस्वार्थ पणे करीत होता.

हरितात्या कोपर्यात कुठेतरी गजा खोत आणि चार दोन मंडळींना घेऊन इतिहास जमा आले होते. ”अरे पुराव्यानी शाबीत करीन… असे महाराज सिंहासनावर बसलेले… गागाभट म्हणतायेत मंत्र...आणि हा असा राज्याभिषेक होतोय…मंगल वाद्ये वाजविली जातायेत..तोफांच्या आवाजांनी सह्याद्रीचे कडे निनादून सोडले जातायेत..आणि तुला सांगतो गजा, जिजाऊ माउलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते… अरे पुरावा आहे.” काही वेळात आपल्या भल्या मोठ्या प्याकार्ड गाडीतून बबडू आला.एकंदरीत कार्यक्रमाची लगबग बघून म्हणाला – ”ह्या स्साला…कारेक्रमाचा मस्त जामानिमा केलाय हां…अरे आमच्या स्कालर चा वाढदिवस आज…आख्खा पुण्यात रोषणाई झाली पाहिजे..बेसनलाडू चा बेत आहे कां ? …साला घोसाळकर मास्तर जगला असता तर जख्खड म्हातारा झाला असता आज …डाइड झाला साला…” उगाच घोसाळकर मास्तर आठवून बबडू इकडे तिकडे वाड्यात फिरू लागला .

सखाराम गटणे ने भाषण मुखोद्गत केले होते. Drawing आणि ड्रील सोडून चितळे मास्तरांना सगळे विषय येत असल्यामुळे त्यांनी सखाराम ची उजळणी घेतली. अण्णा वडगावकर यांनी सुद्धा ‘माय गुड फेलो’ असे म्हणून गटण्याचे कौतुक केले. अपेक्षेला छेद न देता स्वच्छ धोतर नेसलेले माधवराव आणि नऊवारीतल्या मालतीबाई मुलांसमवेत आल्या. लोकांची गर्दी व्हायला सुरुवात होत होती. संध्याकाळ होत आली होती. तेवढ्यात पावणे सहा फुट उंच,निळ्या डोळ्यांचा,कुरळ्या केसांचा रुबाबदार नंदा प्रधान आला.तो येताच उपस्थित असलेल्या समस्त तरुणींच्या नजरा त्यावर खिळल्या. नाथा कामात त्या अगोदरच आला होता आणि एकशे ऐंशी कोनात मान फिरवून त्या तरुणींवर याने आपल्या नजरा स्थिर केल्या. एकीला बघून ‘सुषमा नेने’ असे काहीसे तो पुटपुटल्याचा नंदा प्रधानला भास झाला. पेस्तन काका खास taxi करून मुंबईहून पुण्याला आले होते आणि सगळ्या व्यक्ती वल्लींना भेटून ते म्हणाले,”भावसाहेब, कार्यक्रम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार हाय.”

दोन वस्तादांपैकी तबलजी टिल्या वस्तादशी भय्या नागपूरकराने गट्टी जमवली व शेवटी गझल गायचे असे ठरवून आतल्या एका खोलीत रियाझ सुरु केला. गजा खोतानी त्याला स्वतःची कधीही न वाजवलेली नवी पेटी दिली. गज्याच्या आयुष्यात खूप दिवसांनी मजेचा दिवस येणार होता. ‘तो’ कसा आहे हे सर्व व्यक्ती वल्ल्लींना माहित होते त्यामुळे ‘तो’ ने त्यांना टाळून मुंबईहून आलेल्या बटाट्याच्या चाळीतल्या मंडळींशी हितगुज करायला प्रारंभ केला. एच्च. मंगेशराव यांना गाठून त्याने ‘हंसध्वनी’ या रागाबद्दल चर्चा सुरु केली. थोड्या अवधीतच ‘तो’ ने आपण एक नंबरचे बोगस माणूस आहोत हे पटवून देण्यात यश मिळवले. पु.लं न घ्यायला बबडू आपल्या लांबलचक मोटारीतून गेला.

पु.ल आणि सुनीताबाई आले. त्यांच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.वाडा पुरता सजला होता. कार्यक्रमाची एवढी सुंदर तयारी बघून दोघेही भारावून गेले. औपचारीकता कधीच नाहीशी झाली होती. सगळ्या मंडळींची पु.ल व सुनिताबाईंनी आस्थेने चौकशी केली. पहिल्यांदा गटणे ने इतक्या लोकांसमोर दणदणीत भाषण ठोकले. त्याने सुरुवातच मुळी जोरदार केली ”मराठी सारस्वतात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सोनेरी झळाळी प्राप्त करून देणारे, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहे …..” त्याच्या जीवनातला साहित्याचा बोळा केव्हाच दूर झाला होता पण त्याचे भाषण मात्र साहित्याप्रचुर आणि व्यासंगपूर्ण झाले. भय्या नागपूरकरने बेगम अख्तर यांची ”ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया…जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया...” ही गझल गायली. पुलं ना ती गझल फार आवडली.

सत्काराला उत्तर देताना पु.ल एवढेच म्हणले — ”अरे तुमच्या सारखी मंडळी माझ्या आयुष्यात आली आणि हे आयुष्य सर्वार्थाने मखमली झालं. जगात जिवंत माणसांपलीकडे बघण्यासारखं काही नाही.तुम्ही मला दिलेली ही प्रेमाची खुर्ची तुम्हीच घट्ट धरून ठेवलीये. ह्या प्रेमाच्या ऋणातून मला मुक्तता नकोय…अजिबात नकोय”. अंतू बर्वा आपले ओले मिचमिचे डोळे सद्र्याने पुसत होता. त्याचे ते खपाटीला गेलेले पोट पु.लं च्या नजरेतून पुन्हा एकदा सुटले नाही.

नंदा प्रधान म्हणाला –” भाई, तुम्ही आमच्या साठी एक कधीही न संपणारा अमृतकुंभ आहात. अहो तुम्ही नसता तर आम्हाला कुणी विचारले तरी असते का? चांगल्या वाईट गुणांचं संचित घेऊन, कपाळावर आठ्या मिरवत उद्याची चिंता वहात सदैव रस्त्याने खाली मान घालून चालणारी सामान्य माणसं आम्ही !! तुम्ही ती घराघरात पोहचवली…अजरामर केली. लोकं आमच्यामध्ये स्वतःचा शोध घेऊ लागली..’वैभव...वैभव’ म्हणतात ते याहून का वेगळं असतं !!” बोलट असो वा नामू परीट...सगळ्यांचे डोळे पाणावले होते. आपुलकीची व अव्याहत प्रेमाची ही शिदोरी घेऊन पु.ल आणि सुनिताबाई निघाले. काही वेळातच सगळी मंडळी एकमेकांचा निरोप घेऊन पांगू लागली ती पुन्हा भेटू या शपथेवरच !! संध्याकाळ ओसरून रात्र झाली होती. वाड्यात एका कोचावर नारायण निपचित पडला होता आणि एका खोलीत बापू काणे खर्चाचा हिशोब तपासात होता. बाकी सर्वत्र सामसूम होती.

योगेश कोर्डे
मूळ स्त्रोत --> http://yogesh-korde.blogspot.in/2013/02/blog-post_9527.html


2 प्रतिक्रिया:

Unknown said...

फारच छान!

_Scholar_ said...

खूप छान लिहिलंय. उत्तम , अप्रतिम .👍