Tuesday, May 17, 2022

पुलं म्हणजे माणुसकीने लगडलेला सहज-साधा मोठेपणा -- भीमराव पांचाळे

अनाकलनीय ,अविश्वसनीय गोष्टी आयुष्यात घडू शकतात याची मिसाल म्हणजे भाईंचा लाभलेला स्नेह .अकोल्यात किशोरदादांमुळे अल्पशी भेट घडली. मुंबईला आल्यावर त्या भेटीचे स्नेहात रूपांतर कधी झाले ते कळलेच नाही.."गज़ल" हाच एकमेव दुवा. माझी पेशकश त्यांना आवडायची. मी त्यांच्या भेटीला माझ्या ऑफिस पासून जवळच असलेल्या एनसीपीए मध्ये जायला लागलो.कधी गीता पण सोबत यायची. गीता सारस्वत आहे आणि गोवन पद्धतीने मासे छान बनवते याचे त्यांना केवढे कौतुक..तिच्या हातचे तिसऱ्यांचे हुमण आवडीने खायचे. मी मासे खात नाही म्हणून त्यांची बोलणी खायचो.

खूप गप्पा मारायचो त्यांच्याशी आणि नंतर चकित व्हायचो की , असे कसे हे लोभस मोठेपण जे माझ्यासारख्या लहानशा कलावंताला इंप्रेस करून बुजवत नाही, संकोचही वाटू देत नाही. किती सहजपणे बोलू शकतो मी या एवढ्या मोठ्या माणसाशी..! माणुसकीने लगडलेला असा सहज साधा मोठेपणा मला कधी येईल ? आपल्या अंगी त्याचा अंश जरी आला तरी जिंदगी निहाल होऊन जाईल .
           
भाईंचा कृपालोभ आणि परिसस्पर्श लाभला हे मला स्वप्नवतच वाटते... एनसीपीए मध्ये माझी विशेष मैफिल घडवून आणणे..., 'एक जखम सुगंधी' या माझ्या पहिल्या गज़ल कॅसेटचे विमोचन.., चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात (भाई उदघाटक होते) , आग्रहाने मैफिलीचे आयोजन आणि विशेष म्हणजे मैफिलीचे प्रास्ताविक निवेदन स्वतः करून नंतर ऑडियन्स मध्ये बसून भरभरून दाद.., आमच्या संसाराला त्यांचे प्रेमळ आशीर्वाद... आणि असे खूप काही काळजाच्या अगदी जवळचे...! आता हसू येतं आणि माझ्याच हिमतीची मला दाद द्यावीशी वाटते ...

श्रीलाल शुक्ल यांची 'राग दरबारी' ही कादंबरी तुम्ही वाचली का भाई ? असा आगाऊ प्रश्न केल्यावर त्यांनी काय करावं ?, कानांच्या पाळ्याना हात लावत त्या अफलातुन कलाकृतीची तारीफ केली आणि एखाद्या कादंबरीचा नायक एक गाव असू शकतं यावर खूप बोलले.असाच आगाऊपणा अजून एकदा केला होता..तेव्हां तर मजाच आली.. गुईयानी गुरेश्चि हा एक अजब व्यंगकार व कार्टुनिस्ट , त्याबद्दल विचारल्यावर ते उडालेच. 'अरे ,तुला कसा काय हा लेखक माहीत , तू कसा आणि कधी वाचतोस हे ? ' ..मग मी त्यांना किशोर दादांनी मला वाचनाची लावलेली आवड , मराठी ,हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा पाडलेला फडशा ,गुईयानीचं अपघातानेच हाती लागलेलं "The House that Nino Built" हे मस्तं पुस्तक , मग मुंबईला आल्यावर फूटपाथवरील पुस्तक विक्रेत्यांकडून जिद्दीने मिळवलेली सगळी पुस्तकं वगैरे सर्व सांगितले. भाईंनी यावर काय म्हणावे ?..ते एखाद्या लहान मुलासारखं म्हणाले - , मी फक्त एकच वाचले रे , मला देशील का सगळी वाचायला ?..मी १५ दिवसांत तुला परत करीन.
                      
खूप आठवणी मनात रुंजी घालत आहेत . ही अजून एक...

युरोपात मैफिलींचा दौरा होता..नेदरलँड्स , जर्मनी , फ्रान्स..इ... अठरा दिवसांचा मुक्काम (गीता आणि भाग्यश्री सह) आमर्सफोर्ट येथे.. मित्र आणि चाहते गिरीश ठाकूर व सौ.वृंदा वहिनी यांचे घरी. पु लं चे हे सख्खे भाचे. गप्पांमध्ये 'भाई ' म्हणजे आपुलकीचा विषय. एक किस्सा त्यांनी सांगितला . भाई त्यांना एकदा म्हणाले की, " तुमची मुलं इथे डच भाषेत शिकली , वाढली तरी घरात मराठी बोलतात याचा आनंद आहेच. पण ती भांडतातही मराठीत याचा मला अभिमान वाटतो.."

दुःखाला हसरं करणारे- असे हे पु लं... जणू माणसा-माणसातील संवादाचा पूल !

भाईंना जाऊन खूप वर्षे झालीत पण त्यांची याद कधीच गेली नाही... जाणारही नाही... कारण- अनगिनत आठवणींमध्ये ते महफूज आहेत.. असेही नाही की, कधी लिहावेसे वाटले नाही... पण आपले हे असाहित्यिक मनोगत कुणाला आवडेल का ?... असे वाटून नाही कधी लिहिले... आज लिहावेसे वाटले... कोरोना काळातील आष्टगावच्या या प्रदीर्घ आणि निवांत मुक्कामात ति. भाईंच्या स्मृती तीव्रतेने जागल्या आणि-

मन भरून आले...

यादोंका एक हुजूम मेरे साथ-साथ है
तुझसे बिछडके मै कभी तनहा नही रहा..भीमराव पांचाळे
१२ जून २०२०
महाराष्ट्र टाईम्स

0 प्रतिक्रिया: