माझे तारुण्य जन्माला आले ते कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या 'विशाखा' नक्षत्रावर. कवितेने सुरांशी घटस्फोट घेतला नव्हता; त्या जमान्यात माझी कवितेशी मैत्री झाली. गळयात गळा घालणारी दाट मैत्री. त्या काळात रविकिरण मंडळातले गिरीश, यशवंत, विठ्ठलराव घाटे शेकडो श्रोते तन्मयतेने ऐकत असत. श्रोत्यांची संख्या शेकडोंच्या हिशोबात असल्यामुळे कवितेच्या चिकित्सेला जागा नव्हती. यशवंतरावांची 'आई' ऐकून माणसे डोळे टिपीत. गिरीशांनी 'आणि पुशिली लोचने डॉक्टराने' म्हटली की, ऐकणारेही डोळे पुशीत. संजीवनीबाईंचा सूर कानी पडला की,मने तृप्त होत. गोकुळीच्या कान्ह्यानेही वेड लावले होते. ते सारे गोड होते. जरा गोड नव्हे, गोडच गोड आहे की काय अशी शंकाही ओठावर नव्याने फुलणार्या मिशीसारखी उगवायला लागली होती. तेवढ्यात अत्रे यांची 'झेंडूची फुले' आली आणि गोड कुठले आणि गुळचट कुठले ते कळायला लागले. चांदरातीची माया पसरुन काणेकरच त्या चांदरातीच्या वातावरणातून बाहेर पडून 'आकाशातील पोलिस' ला जाब विचारु लागले होते. ना.घ. आणि आ.रा. देशपांड्यांची गाणी तबकड्यांवर आली होती. पण कवी आणि श्रोता यांच्यामध्ये ती गीते गाणारे गायक आणि गायिका येत होते.
कोलाहलातून माझे तारू माझा स्वतःचा सूर शोधीत होते किंवा सुसंवादी सुरांची सोबत शोधीत होते. ही सोबत घेऊन कुसुमाग्रज आले. माझ्या तारुण्यातला कवी मला सापडला. सांगाती भेटला. तिथून पुढील वर्षे, पुढले सारे दिवस हे विशाखाचे दिवस. या काळात प्रेम केले ते विशाखातल्या ओळींनी प्रेमपत्रे सजवीत. मनातल्या त्वेषाला 'कशास आई भिजवीसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' सारख्या ओळींनी वाट फोडली. भोवतालच्या घडामोडींचे संस्कार ज्यांच्या ज्यांच्या मनावर या काळात जाणतेपणाने उमटत होते त्यांचे त्या यौवनकाळातले उद्गाते कुसुमाग्रज होते. कुसुमाग्रज आमचे हीरो नव्हते. ते आमच्यातलेच एक होते. माझ्या अंत:करणातल्या स्वरकोषात जसे बालगंधर्व गातच असतात तसे कुसुमाग्रज कविता म्हणतच नांदत होते. आमच्या जाणिवांना वाचा फुटायची ती त्यांच्या काव्यपंक्तीतूनच.
हा कवी आम्हाला कुठल्याही काव्यगायनाच्या समारंभात व्यासपीठावरुन भेटला नाही. हा कवी कुठल्याही उत्सवात काव्यगायन करीत नव्हता. किंबहुना आजही कुसुमाग्रज आपल्या आयत्या वेळेच्या अनुपस्थितीविषयीच अधिक प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रजांनी जणू काय अदृश्य राहण्याचे निराळेच कोकिळाव्रत घेतले होते.
गडकरी, बालकवी आणि केशवसुत या तिन्ही कविश्रेष्ठांच्या संस्कारांचे सौष्ठव घेतलेली परंतु ३५ ते ४२ या कालखंडातले तरुणांच्या मनावरचे नवे संस्कार शोधून फुललेली ही कविता होती. तिची जवळीक तत्कालीन तरुण मनांना अधिक वाटली. कारण ती वाचताना मला कविप्रतिभा असती तर मी हेच आणि असेच सांगितले असते, असे त्यांना वाटत होते. मग सांगण्याची ती उर्मी पारतंत्र्याविषयक वाटणार्या संतापाविषयी असो की प्रेयसीविषयी वाटणार्या ओढीची असो.
त्या काळात कुसुमाग्रजांची 'स्वप्नाची समाप्ती' ही कविता आली. गोदातीराच्या दिशेने सावरकर, गोविदांनंतर पुन्हा एकदा तेजाची गंगा वाहू लागली.
"प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर"
असे सांगत एक कवी आला. आपल्या प्रेयसीला
‘काढ सखे, गळ्यातील |
तुझे चांदण्यांचे हात |
'क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’म्हणणारा,
रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल पाहणारा,
त्या काळाचा वैतालिक होऊन उभा राहिला.
हा कवी प्रेमासाठी झुरणारा नव्हता. उसासे टाकणारा नव्हता. त्या प्रेमात प्रेयसीच्या मिठीत क्षण क्षण फुलणारी स्वप्ने होती आणि या स्वप्नांची समाप्ती कधी होते, नव्हे ती होणे अटळ कसे आहे याची जाण होती. 'बी' कवींनी एका ठिकाणी नव्या मराठी कवितेच्या नव्या उमेदीच्या नित्य जिव्हाळ्याच्या अनेक खुणा आहेत, असे म्हटले आहे. कुसुमाग्रजांनी आमच्या पिढीचे हे नवे जिव्हाळे आणि नव्या उमेदी ओळ्खल्या. कुठल्याही तबकडीचा किंवा काव्यगायनाचा आधार नसतानाही नव्या रसिक तरुण पिढीत कुसुमाग्रजांची कविता. त्या कवितेला ओज होते, परंतु खरखरीतपणा नव्हता. नव्या युगाच्या नव्या जाणिवांनी सधन झालेली ही कविता पण तिने कुठेही आपले कवितापण सोडले नव्हते.
कुसुमाग्रजांच्या कवितेने स्वप्नांची समाप्ती दाखवली, पण जीवनातल्या स्वप्नांची किंमत उतरवली जात नाही. त्यांनी उत्साहाच्या भरात शृंगाराचीच अवहेलना केली नाही. त्यांनी अवहेलना केली ती दुर्बलांच्या शृंगाराची. कारण तो शृंगारच नसतो. म्हणून ती एक निसर्गाने दिलेल्या अलौकिक वरदानाची दुबळ्या इंद्रियात होणारी शापावस्था असते. तिथे शृंगारदेखील निस्संग होऊन साधलेला नसतो. जीवनात रणभूमीसारखी रतिशय्येवरसुद्धा झपूर्झाची अवस्था ही समर्थ देह आणि समर्थ मनाला साधलेली सिद्धी असते. त्या अवस्थेला कुसुमाग्रज 'वेड' हा साधा शब्द वापरतात.
'होते म्हणू स्वप्न एक, एक रात्री पाहिलेले
होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेले'
असे एका रात्रीचे का होईना, पण वेड लागण्याचे भाग्य त्यांनी मोलाचे मानले. खर्या अर्थाने पृथ्वीमोलाचे मानले. पृथ्वीच्या प्रेमगीतातील पृथ्वी ही त्या युगाची नायिका होती. त्यागाचे अनेक स्थंडिल पेटले होते. त्यात जीवितांची आहुती देण्यासाठी अनेक भास्करांना आपल्या प्रेयसीचे आपल्या गळ्यात पडलेले चांदण्याचे हात दूर करावे लागले होते. अशा भास्करावर प्रेम करणार्या प्रेमिकांनीही त्या पृथ्वीसारखेच प्रेम केले होते. हे अलिंगन आपल्याला भस्मसात करील याची खात्री असूनही केले होते. निरनिराळ्या राजकीय पक्षांत दीपज्योतीवर झेपावणार्या पतंगासारखे आयुष्य झोकून दिलेले तरुण आजूबाजूला दिसत होते. कपाळी मुंडावळ्या बांधलेल्या अवस्थेत ब्रिटिशांच्या फौजदारांनी वरांना चतुर्भुज करुन न्यावे आणि त्यांच्या वधूंनी डोळे कोरडे ठेवून ते पाहावे अशा घटना घडत होत्या. नव्या संसाराची सुरुवात डाळमुरमुर्याच्या भत्त्यावर करणारी आणि देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवताना प्रेमाचे मोल कमी न मानणारी जोडपी होती. अशा एखाद्या प्रेयसीला आपल्या भावी गृहस्थापनेच्या अस्थिरतेविषयी कोणी प्रियकर 'सावधान' असा इशारा देऊ लागला तर तिच्या ओठी 'नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' ह्याशिवाय दुसरी ओळ आली असेल? छ्त्तीस ते बेचाळीस या सहा वर्षांच्या काळातले तरुण आणि तरुणी कुसुमाग्रजांच्या कवितेत बोलू लागले. त्यांना प्रिय आणि आदर्श वाटणार्या अनुभवांची सारी चित्रे त्यांच्यापुढे कुसुमाग्रजांनी रंगविली. त्या चित्रात त्या काळातल्या तरुणांच्या आशाआकांक्षांचे कालसापेक्ष दर्शन होतेच पण त्याबरोबर काळावर मात करुन जाणारी चिरंतन सौंदर्याने नटवलेली अनेक चित्रे होती.
'विशाखे'त अशी असंख्य मोहक चित्रे आहेत तर काही रुधिरात रंगलेली. अमरशेख आपल्या पल्लेदार आवाजात 'सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते' म्हणताना त्या मैदानामागल्या क्षितिजाचा पट होऊन ते दृश्य हजारो डोळ्यांपुढे उभे राहायचे. काही काही ओळींनी तर माझ्या मनःपटलावर त्यावेळी त्याकाळी उभी केलेली चित्रे आज त्याच ताज्या ओलेपणाने टिकून आहेत. प्रवासात कुठल्यातरी डाक बंगल्यात रात्रीचा आसरा घेतलेला असतो. पहाटे जाग येते. अंगणातल्या वृक्षांतून पाखरे भर्रकन चारापाण्याला उडून जातात. आणि एकदम 'सोन्याच्या दर्यात गल्बते जणु गोजिरवाणी | झाला उषःकाल राणी' या ओळी उमटतात.
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेला त्या काळातल्या समीक्षकांनी धगधगत्या यज्ञातून प्रकटणार्या असुरसंहारिणी दुर्गेच्या स्वरुपातच पाहिले. वास्तविक, ती उमेसारखी विविध रूपधारिणी आहे. तिला क्रांतिकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या होमाइतकीच 'माजघरातल्या मंद दिव्याच्या वातीची ओढ' आहे. जीवित हे समुद्रासारखे आहे ते केवळ सुंदर नाही आणि भीषण नाही, ते तिला ठाऊक आहे. जीवनाचा कुंभ हाती देणार्या कुंभाराची चौकशी करण्यात आयुष्य दवडण्यापेक्षा 'आमंत्री बाहू पसरुन इकडे ही यक्षकन्या ही गुणी' म्हणणारे कुसुमाग्रज जीवनाला एकाच सुराने आळवीत बसले नाहीत. इथेच त्यांच्या प्रतिभेला लाभलेले चिरतारुण्य आहे. मराठी कवितेत कितीतरी नवे संप्रदाय आले. खूप भूकंप झाले. स्त्रीचे स्त्रीत्व कशात आहे हा जसा आता नव्या जगात वादाचा मुद्दा झाला आहे तसाच कवितेतले काव्य कशात आहे हाही झाला आहे. हे होणे अपरिहार्य आहे. दुसर्या महायुद्धाने एक-दोन देशांना किंवा खंडांनाच नव्हे तर सार्या मानवी जीवनाला मुळातूनच हादरे दिले आहेत. धर्म, नीती, कुटुंब, शील यात या सार्या मूल्यांची कठोर तपासणी सुरु झाली आहे. अणुबॉम्बपेक्षाही हा धक्का मोठा आहे. साहजिकच हा धक्का सतत नवनिर्मितीच्या चिंतनात असणार्या कवीला आधी आणि अधिक जाणवतो. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात कुसुमाग्रज म्हणत होते 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल.' स्वातंत्र्याबरोबर तो उषःकाल येईल असा हा आशावाद होता. स्वातंत्र्य येऊन पाव शतक लोटल्यावर त्या रात्रीचा असा गर्भपात का झाला? पण कुसुमाग्रजांनी रात्रीच्या गर्भात उद्याचा उषःकाल पाहिला. त्या काळीही एकदा तो उषःकाल झाला की सारे काही छान होईल असला भाबडा आशावाद बाळगून तेही बसले नव्हते. निर्मिती, विध्वंस, त्यातून पुन्हा निर्मिती आणि पुन्हा विध्वंस ह्या निसर्गचक्राची त्यांची जाणीव पक्की होती. कारण त्याच काळात त्यांनी लिहून ठेवले आहे -
'ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती?
वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणार्या मूर्ती'
मूर्ती भंगतात त्या घडवायच्याच नाहीत हा पळपुट्यांचा विचार झाला. मह्त्त्वाचे असते ते नव्या नव्या मूर्ती घडवण्याचे वेड लावून घेणे. अकस्मात घडलेल्या जननानंतर अटळ मरणाकडे जाणारी वाट ही चालताना सुंदर करीत जाणे, त्या वाटेवरचे सौंदर्य पाहून सोबत चालणार्याच्या नजरेला ते आणून देणे, जीवनाचे सारे शहाणपण ज्या वेडापोटी जन्माला येते ती वेडे लावून घेणे. त्यांच्या कवितेत 'वेड' हा शब्द अनेकदा येतो.
१. होते म्हणू वेड एक | एक रात्र राहिलेले
२. उजेडात दिसू वेडे |
आणि ठरु अपराधी
३. हे काय अनामिक आर्त पिसे
४. सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
५. देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार...
६. वेड्याने खोदले प्रचंड मंदिर
७ नंतर सुरु हो वेड्याचे पूजन
८. आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे
९. वेडात मराठे वीर दौडले सात..
नाहीतरी शेक्सपीअरने कवी, वेडे आणि प्रेमिक यांची गाठ मारली आहेच. कसले तरी वेड यौवनाचे लक्षण, ती वेडे आणि त्या वेडातील स्वप्ने ओसरली आणि सबुरीचा आणि औचित्याचा फोल विवेक सुरु झाला की यौवनाच्या चक्राची फेरी संपली हे ओळखावे. विशाखाचे दिवस हे कुसुमाग्रजांच्याही वेडाचेच दिवस होते. एकोणीसशे चौतीस ते एकोणचाळीस सालातल्या ह्या कविता कुसुमाग्रजांच्या ऐन पंचविशीतल्या.
वृद्धत्वातही त्यांच्या प्रतिभेचे ताजेपण ओसरलेले नाही. त्यांच्या भावनांना बुद्धीच्या भट्टीतून भाजून निघण्याची सवय आहे. त्यामुळे आजही त्यावर वार्धक्याचा गंज चढू शकत नाही. त्यांनी पुरोगामित्वाचा कुठलाही एकच एक बावटा नाचवला नाही की खांद्यावर आंधळ्या श्रद्धेची पताका वागवली नाही. आजही सतत नवी निर्मिती करणार्या कुसुमाग्रजांकडे पाहिले, त्यांच्या सहवासात रात्र जागवण्याचा योग आला म्हणजे वाटते की त्यांच्या विशाखाने उजळलेल्या इतरांचे तारुण्य मागे राहिले तरी कुसुमाग्रजांचे विशाखेचेच दिवस चालू आहेत. त्यांचे नव्या मूर्ती घडविणे थांबले नाही. 'वयपरत्वे' हा शब्द त्यांच्या बाबतीत लावता येत नाही. आधुनिक काव्याचे समीक्षक मर्ढेकरांच्यानंतर मराठीत कवितेने घेतलेल्या वळणाच्या अनुषंगाने काव्याची समीक्षा करीत असतात. पण साठीच्या आसपास असणार्या कुसुमाग्रज, बोरकर आणि रेग्यांच्या एकाहत्तर सालात लिहीलेल्या कवितांमधील ताजेपणा त्यांनाही बुचकळ्यात टाकत असावा. तिन्ही तीन तर्हेचे वृक्ष. साठ वर्षांपूर्वी आमच्या भाग्याने मराठीच्या प्रांगणात उगवलेले आणि आजही मातीतला रस शोषून फुलायची ताकद असलेले त्याच जोमाने बहरणारे. असले झाड जुने झाले म्हणून त्याच्यावर फुलणारे फूल जुने नसते. आजही कुसुमाग्रजांची कविता अचानक भेटते आणि आमच्यासारख्यांचा आंतरअग्नी क्षणभर फुलवून जाते. हा नाविक आजही 'निर्मित नव क्षितिजे पुढती' म्हणत चालला आहे. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांना आजही भेटलो तरी वयाचा विसर पडतो. आम्ही विशाखाच्या दिवसात शिरतो.
आज मागे पाहताच कृतार्थ वाटावे अशीच कुसुमाग्रजांची साहित्य-साधना आहे. काव्य, कथा, निबंध, कादंबरी आणि नाटक या क्षेत्रांतही पुढे जाताना त्यांनी मागे सुंदर कुसुमेच ठेवली आहेत. त्यांनी तुडवलेली वाट सुगंधी केली आहे. रंग वैभवाने नटवली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना कुसुमाग्रज आपले वाटत आहेत. माझ्यासारख्यांना ही आपुलकी अधिक, कारण आमच्या जीवनातल्या वसंतकाळातला हा कोकीळ, आमच्या जीवनातल्या छोट्यामोठ्या वेडाचे हे विशाखाचे दिवस. आजही मनाला त्या दिवसांची ओढ लागली की हात पुस्तकांच्या कपाटातून 'विशाखा' काढतात. जुनी ट्रंक उघडल्यावर त्यातल्या वस्त्रांना बिलगलेल्या वाळ्याचा सुगंध यायचा, तसा जीवनाच्या या जीर्ण होत चाललेल्या वस्त्रांच्या कुठल्या तरी आतआतल्या घडीतून विशाखाच्या दिवसांचा सुगंध दरवळायला लागतो.
- पु.ल.देशपांडे
मुळ स्त्रोत -- http://www.maayboli.com/node/33051

2 प्रतिक्रिया:
मनःपूर्वक धन्यवाद...🙏
Title itake sundar aahe Vishakhache diwas,,eka mahakavi la eka mothya sahityika kadun ashi dad mhanje awarniy yog,,
Post a Comment