Friday, August 31, 2012

पु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही - रवी आमले

पुलं इतिहासजमा झाले आहेत काय, हा प्रश्न तसा संतापजनक आहे. पुलं म्हणजे मराठी संस्कृतीची समृद्ध साठवण आहे. आजच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचे 'आयकॉन' आहेत. मराठी रसिकतेचे मानिबदू आहेत. 1942 पासून आजतागायत मराठी वाचकांच्या काही पिढ्यांना त्यांच्या विनोदाने शहाणीव दिलेली आहे. अशा परिस्थितीत ते, म्हणजे त्यांचे लेखन इतिहासजमा झाले आहे काय, असे विचारणे कुणासही वाह्यातपणा वाटू शकतो. पण आज अनेक ठिकाणांहून, खासगी वाड्मयीन चर्चातून हा प्रश्न समोर येताना दिसतो. त्या प्रश्नाचा सोपा अर्थ एवढाच असतो, की पुलंचे साहित्य आजच्या, समाजातील मध्यमवर्ग नामशेष होऊ घातलेल्या काळात शिळे झाले आहे काय?

आता येथे सर्व प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जेव्हा आपण पुलंचे साहित्य म्हणतो तेव्हा आपल्या नजरेसमोर केवळ त्यांचे विनोदी लेखन तेवढेच असते. त्यात आपण राजा ओयदिपौसची रंगावृत्ती धरत नाही की काय वाट्टेल ते होईल वा एका कोळीयाने या कादंब-या पकडत नाही. पुलंनी निखळ विनोदाच्या पलीकडे जाऊन खूप लिहिलेले आहे. त्यांनी त्यांच्या मिश्किल खुमासदार शैलीत आपल्या गणगोतांची व्यक्तिचित्रे लिहिलेली आहेत. नाटके लिहिली आहेत. त्यांच्या भाषणांचे संग्रहही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक प्रस्तावना गाजलेल्या आहेत. तर याबद्दल कुणाचे काही म्हणणे दिसत नाही. हे लेखन कालबाह्य झाले आहे असे काही कुणी म्हणत नाही. कालबाह्यतेचा आक्षेप येत आहे तो त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असा मी असामी, मराठी वाड्मयचा गाळीव इतिहास, खोगीरभरती आदी पुस्तकांतील विनोदाबद्दल. आक्षेप घेणारांचे म्हणणे असे असते, की पुलंचे विनोद ज्या कालपटलाच्या व संस्कृतीच्या पाश्र्वभूमीवर घडत आहेत ती आज स्वाभाविकच उरलेली नाही. नव्या पिढीला तर तिच्या स्मृतीही नाहीत. 'त्यांनी तुम बीन मोरीत तोंड घातले' यातील विनोद समजायचा, तर या पिढीला घरातलीही मोरी माहिती नाही आणि गाण्यातलीही. तेव्हा त्या काळी ज्या विनोदाने लोकांना खळखळून हसविले, तो विनोद आज वायाच गेला.

पुलं लिहित होते, तो काळ येथे लक्षात घेतला पाहिजे. त्यांची गाजलेली बटाट्याची चाळ 1958 मधली आहे आणि व्यक्ती आणि वल्ली 1966 मधील. हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीनेही संक्रमणाचा काळ होता. जुनी संस्कृती, जुन्या जाणीवा निखळून पडत तेथे नवीन काही आकाराला येत होते. धोंडो भिकाजी जोशी हा पुलंच्या असा मी असामीचा नायक. तो या काळातल्या मध्यमवर्गीयांचा प्रतिनिधी होता. पुलं लिहित होते, ते या मध्यमवर्गीयांसाठीच. मराठी वाचक हा निर्वविादपणे मध्यमवर्गीय असल्याचे विद्याधर पुंडलिक यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत पुलंनीच म्हणून ठेवलेले आहे. पुलं हे त्यांच्याच गोष्टी त्यांनाच सांगत होते. त्यात नव्या जगण्यातले भेलकांडलेपण होते, खुपसे स्मरणरंजन होते आणि लोक ते ऐकून खळखळून हसत होते. एकूण लोकशाहीच्या व्याख्येप्रमाणे मध्यमवर्गीयांचे मध्यमवर्गीयांसाठी मध्यमवर्गीयाकडून असेच पुलंच्या विनोदाचे स्वरूप होते. आणि ते छान निर्मल होते. हे येथे आवर्जून सांगायचे कारण म्हणजे, मध्यमवर्गीय या शब्दाकडे आपल्याकडे उगाचच साम्यवादी चष्म्यातून पाहण्याची रुढी पडलेली आहे. या मध्यमवर्गाची खास अशी पांढरपेशी संस्कृती होती. पुलंचे विनोद त्या संस्कृतीतले आहेत.

नव्वदच्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाच्या वा-याने या संस्कृतीला जोरदार हादरा दिला. खुल्या अर्थव्यवस्थेने आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तंत्रक्रांतीने समाजातील मध्यमवर्गावरच घाला घातला. आज समाजात तसा वर्गच राहिलेला नाही. त्या वर्गातल्या अनेकांच्या हाती भगवी रेशनकार्डे आली. बाकीच्यांना नवश्रीमंत हा वेगळाच दर्जा मिळाला. स्वाभाविकच त्यांच्या जगण्याच्या पद्धती आणि सांस्कृतिक प्राधान्यक्रम बदलले. मराठी माणसे मराठी (ललित) पुस्तके वाचत नाहीत, ही ओरड होण्याचे कारणही हेच आहे. या काळाच्या अपत्यांना पुलंचे मध्यमवर्गीय संस्कृतीतून, त्यांच्या जगण्याच्या त-हांमधून आलेले विनोद न समजणे स्वाभाविकच होते. त्या दृष्टीने, पुलंचे विनोद कालबाह्य झालेले आहेत, या आक्षेपात तथ्य आहे.
पण येथे मौज अशी आहे, की पुलंचे विनोद नव्या पिढीच्या डोक्यावरून जात आहेत, असे म्हणताना दुसरीकडे आजही पुस्तकांच्या दुकानांतून, ग्रंथप्रदर्शनांतून, ग्रंथालयांतून त्यांना मागणी असल्याचे चित्र आहे. त्याहून कडी म्हणजे आज पुलंचे नाव गुगल केल्यास एका निमिषात तेथे सव्वा लाख शोधनिकाल येतात. तेच नाव देवनागरीतून गुगल केल्यास साडेअठरा हजार संकेतस्थळे समोर येतात. इंटरनेटवर आज त्यांच्या नावाचे गुगल ग्रुप आहेत, फेसबुक ग्रुप आहेत, ब्लॉग्ज आहेत आणि संकेतस्थळेही आहेत. पिकासावेबवर त्यांच्या कोणा चाहत्याने त्यांची अनेक छायाचित्रे उपलब्ध करून दिलेली आहेत. यूट्यूबवर त्यांच्या अनेक ध्वनीचित्रफिती आहेत. या सगळ्याला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. फेसबुकवरील पुलंच्या नावाचे एक पान तब्बल एक लाख 40 हजार 234 जणांनी 'लाईक' केले आहे. पुलं या ग्रुपचे 309 सदस्य आहेत, तर पुलं आनंदाच्या दाही दिशा नावाच्या एका ग्रुपमध्ये 268 जण आहेत. लक्षात घ्या, ही सगळी तरूण मंडळी आहे. त्यातल्या अनेकांची प्रोफाईल्स तपासून पाहिली, तर हेही लक्षात येईल, की पुलंचे लिखाण ऐन भरात असल्याच्या काळात त्यांचा जन्मही झाला नव्हता. पुलंच्या नजरेसमोर जो मध्यमवर्ग होता, त्याच्याशी या मुलांचे सांस्कृतिकदृष्ट्या कोणतेही नाते नाही. ती संस्कृती, ते संस्कार, त्या जाणीवा, ते विचार यांपासून ते खूप दूर आहेत. त्यातील काही जण तर मायभूमीपासूनही खूप अंतरावर आहेत आणि तरीही त्यांना पुलंचे साहित्य साद घालीत आहे. हे पाहिल्यावर आता येथे वेगळाच प्रश्न निर्माण झाला. या मोबाईल पिढीला पुलंचे साहित्य आवडते, त्यांचे किस्से, कोट्या, आख्यायिका हे सगळं हे तरूण 'एंजॉय' करतात आणि मराठीत हा एवढा मोठा साहित्यिक झाला याचा अभिमान बाळगतात याची कारणे काय असावीत?

याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पुलंचे विनोद हे काही संता-बंताचे वा कॉमेडीच्या सर्कशीतील विनोद नाहीत. त्यांच्या विनोदीच नव्हे, तर सर्वच साहित्यात जगण्यावरील नितळ प्रेम, सत्य आणि शिवाची असोशी, असुंदराने संतापणारी सात्विकता यांचे नितांत छान रसायन आहे. त्यात कुठेही असभ्यपणा नाही, विध्वंसकता नाही. छान गाणे असावे तसा त्यांचा विनोद आहे. आणि त्याच्या तळाशी कुठल्याही संस्कृतीत, कोणत्याही काळात कालबाह्य न ठरणारी माणूसपण, सौंदर्य ही मूल्ये आहेत. त्यामुळे तो सहजच तत्कालिकतेच्या पलिकडे जातो. त्यातील संदर्भ कदाचित आजच्या पिढीला माहित नसतील, संकल्पना, वस्तू, माणसे अपरिचित असतील, पण त्याने त्यांचे काही बिघडताना दिसत नाही. विनोदाने आपणांस सेन्स ऑफ प्रपोर्शनची जाणीव दिली असे पुलंनी म्हटले आहे. आजच्या अस्थिर, प्रदुषित पर्यावरणात वावरणा-या तरुण पिढीला हीच जाणीव पुलंचा - जीवन पुरेपूर कळलेल्या माणासाचा - अभिजात विनोद देत असावा. असा विनोदकार इतिहासजमा होत नसतो.
- रवी आमले
रविवार, ६ नोव्हेंबर २०११
लोकसत्ता

6 प्रतिक्रिया:

मी मराठी .... said...

पु. ल. यांचं कौतुक करण्या इतकी मी मोठी नक्कीच नाही , त्यामुळे ते इतिहास जमा झालेत ... असा विचार करणाऱ्यांची कीव मात्र येते.

Ketan said...

पुल यांचा साहित्य आज अनेक वर्ष झाली तरी तसेच ताजे आणि टवटवीत आहे .त्यांच्या लेखनाचा आवाका खूप मोठा आहे आणि निश्चितच सर्वाना झेपणारा नाही .. त्यांच्या सारखी व्यक्ती आणि वल्ली हि इतिहासात अजरामर होते आणि म्हणूनच इतिहासजमा होण्याचा काही संबंधाच नाही

Kamari Durgalaxmi said...

काही लोक पुल सारख्या मोठ्या लेखकांवरही टीका करतात. अशा प्रवृत्तींना काय म्हणायला पाहिजे. हे मला अजिबातच कळत नाही. http://anita-patil.blogspot.in/ या ब्लॉगवर पुल विरोधात खूप लेख वाचयला मिळाले. त्याचा निषेध व्हायला हवा.

Unknown said...

कोणी टीका करुन पुलं थोडीच छोटे होणार आहेत. ते तर आपल्या मनात सदैव राह्तील.

डॉ. राजेंद्र मलोसे said...

पुल इज पुल

विनीत said...

त्यांचे विनोद थोड्याप्रमाणात कालबाह्य असतील. उदा बटाट्याची चाळ मधील विनोद. आज जे तिशीत आहेत त्यांना हे विनोद कळणे अवघड आहे, कारण त्यांनी चाळ अनुभवलेलीच नाही. किंवा "रडायला काय झाले, बाप मेला का तुझा?" यातील विनोद कळणे अशक्य आहे. कारण मुलांना ओरडणारे आईबाप आणि शिक्षक आज उरलेच नाहीत. पण मला असे जाणवते स्वरूप बदलले असेल पण त्या सर्व लिखाणामागील कारणे आजही तीच आहेत.

असामी असामी मधील "कडमडेकर जोशी "ब्याकवर्ड" होतात हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे. आणि घेतला का थोड्या प्रमाणात दिलाही आहे. माझया तरुणपणी काही प्रमाणात माझया आईबाबांची चेष्टादेखील केली आहे. किंवा "वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन भूतकाळातच अधिक रमते" हे मी स्वानुभवाने सांगतो. शिक्षक आजारी पाडावेत ही इच्छा आम्हीही बाळगली होती फक्त पुलंनी ते प्रकट केले

त्यामुळे स्वरूप बदलले असेल पण मूळ गाभा न बदलणारा आहे. त्यांचे लिखाण हे निव्वळ लिखाण नव्हते तर इंग्रजीत ज्याला "principles" म्हणतात तसे होते. "Principles" कधीच बदलत नाहीत. त्यांचे लिखाण अजरामर आहे. माझी लेक (आता १८ वर्षे) अगदी लहानपणापासून पुलांचे वाचन आनंदाने ऐकत आली आहे आणि आजही ऐकते.