Monday, April 11, 2022

अग्रलेखक गोविंदराव तळवलकर

‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंदराव तळवलकर यांना यंदाचे ‘दुर्गारतन’ पारितोषिक मिळाले. ही बातमी त्यांनी आपल्या पेपरात ठळक मथळा न घालता किंवा इतर मानकऱ्यांच्यावर आपले नाव जाड टायपात न टाकता छापली. स्वत:चा फोटोही छापला नाही. कुणीही काढला तरी चांगला फोटो यावा असा त्यांचा चेहरा आहे. त्यानंतर एक आला. पण तो ग्रुप फोटो. तिथेही ‘फुली मारलेले ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंदराव तळवलकर यांच्या डाव्या बाजूला राष्ट्रपती उभे आहेत,’ अशासारखा खुलासा न छापता. वास्तविक ‘दुर्गारतन’ पारितोषिकाला अल्पावधीतच पत्रकारांच्या सृष्टीत फार मोठी प्रतिष्ठा मिळालेली आहे. दुर्गादास ह्या श्रेष्ठ दर्जाच्या पत्रकाराने आपल्या कमाईतून, पत्रसृष्टीत विशेष मोलाची कामगिरी करणाऱ्या पाच भारतीय पत्रकारांना दर वर्षी पारितोषिके देण्याचा हा उपक्रम सुरू केला. दुर्गादास हे आयुष्याच्या अखेरीला ‘हिंदुस्थान टाइम्स’चे संपादक होते. गेल्याच वर्षी मे महिन्यात त्यांचे निधन झाले. आपल्या हयातीतच त्यांनी आपल्या आणि आपली पत्नी रतन ह्यांच्या नावाने ही पारितोषिके द्यायला सुरुवात केली. सुवर्णपदक, एक हजार रुपये आणि पत्रकाराच्या विशेष कर्तृत्वाचे मोजक्या शब्दांत गुणवर्णन करणारा ताम्रपट असे ह्या पारितोषिकाचे स्वरूप आहे. मोठ्या कसोशीने ह्या पारितोषिकाच्या मानकऱ्यांची निवड केली जाते. आता हा एवढा मोठा मान गोविंदरावांना मिळाला; पण त्यांनी स्वत:च्या वर्तमानपत्रात मात्र मुद्दाम वाचल्याशिवाय लक्षात येऊ नये अशा रीतीने ही बातमी छापली. हे हल्ली दुर्मिळ होत चाललेल्या विनयाचे आणि सभ्यतेचे लक्षण आहे.

गोविंदराव तळवलकर आमचे मित्र आहेत. हे वाक्य त्यांच्या अग्रलेखापासून आमचा बचाव व्हावा ह्या धोरणाने लिहिलेले नाही. उद्या एखाद्या सत्कारात आम्ही गाफीलपणाने आमचा गळा हारात गुंतवून गेलो तर ते ‘सत्कार कसले घेता?’ ह्या मथळ्याखाली आम्हांला धारेवर धरणार नाहीतच असे आम्ही ठामपणाने सांगू शकत नाही. जयप्रकाशांच्या सात्त्विक संतापाला पाठिंबा देणारे गोविंदराव त्यांच्या (म्हणजे जयप्रकाशांच्या) भाषणातून चार शब्द अधिक गेल्याबरोबर जिथे त्यांना लायनीवर आणायला कचरात नाहीत, तिथे आम्ही आम्हांला एखाद्या संपादकाच्या थाटात ‘आम्ही म्हणत’ असलो तरी किस पेड की पत्ती.

आमची मैत्री ग्रंथप्रेमातून जुळली. अर्थात त्यांचे ग्रंथप्रेम हे आमच्या ग्रंथप्रेमापेक्षा सहस्रपट आहे. विशेष म्हणजे त्यांना पुस्तके विकत घेऊन वाचण्याची खोड आहे. ती आम्हांला फार उपयोगी पडते. संपादक म्हणवून घेणाऱ्याचे वाचन शक्य तितके अद्ययावत असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. “याची काही गरज नाही” असे नुकतेच एका मराठी संपादकाने त्यांना सांगितले म्हणतात. काही वर्षांपूर्वी मी रेडियोवर नोकरीला असताना एका गृहस्थाच्या भाषणाचे रेकॉर्डिंग करत होतो. बोलताना त्यांच्या काही चुका झाल्या. मी म्हणालो, ‘‘पुन्हा रेकॉर्डिंग करू या.” तशी ते म्हणाले, “जाऊ द्या हो-कोण ऐकतो ही भाषणं?” स्वत:च्या अकर्तृत्वावर एवढी श्रद्धा असलेली माणसे विरळा. गोविंदरावांच्या घरी आलेले संपादक हे त्यांतलेच असावेत. गोविंदराव नव्हे तर त्यांच्या भिंतीला चिकटलेली, असंख्य ग्रंथांनी भरलेली कपाटेही त्या संपादकाकडे ‘आ’ वासून पाहू लागली असणार!

गोविंदराव पुस्तके वाचतात हे मी स्वानुभवाने सांगतो. कारण त्यांच्याकडून मागून आणलेल्या पुस्तकांत त्यांनी पेन्सिलीने खुणा केलेल्या मला आढळतात आणि तो भाग खरोखरीच अधिक मननीय असतो; मात्र ‘वाचन’ हा त्यांच्या आनंदाचा विषय आहे. ग्रंथाचा अभ्यास हा षौक आहे. त्यांच्या संग्रहात केवळ राजकारण, अर्थकारण ह्या विषयांवरचीच पुस्तके नाहीत. ते त्यांचे अत्यंत आवडते विषय हे खरेच; पण त्यांच्याकडून मला जशी सध्याच्या चीनसंबंधीची पुस्तके वाचायला मिळाली, तसेच नोएल कॉवर्डसारख्या करमणूक हा हेतू ठेवून लिहिणाऱ्या नाटककाराचे चरित्रही त्यांनीच मला वाचायला दिले. (त्यातही पेन्सिलीच्या खुणा होत्याच.) म्हणूनच ते व्यासंगी असूनही केवळ ‘आदरास पात्र’ ह्या सदरात न राहता मैफिलीत रंग भरणारे राहिले.

तसा त्यांचा माझा ते ‘लोकसत्ते’त ह. रा. महाजनी संपादक असताना उपसंपादक होते तेव्हापासूनचा परिचय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ‘लोकसत्ते’त असूनही नाटक ह्या विषयावर बोलत नसत. तरीही ग्रंथसंग्रहात उत्तमोत्तम इंग्रजी नाटकांची पुस्तके, नट-नाटककारांची चरित्रे आहेतच. गाण्याच्या मैफिलीत आढळायचे; पण संगीतावर एक ओळ न लिहिता, निमूटपणाने गाणे ऐकून जायचे.

नाटक, संगीत ह्या विषयांवर काहीही न बोलणाऱ्या आणि न लिहिणाऱ्या ह्या माणसाची ह. रा. महाजनींनी ‘लोकसत्ते’त नोकरी टिकू कशी दिली हे मला न सुटलेले कोडे आहे; पण बऱ्याच बाबतींत त्यांनी स्वत:ला फसू दिलेले नाही. वास्तविक गोपीनाथ तळवलकर आणि नटवर्य शरद तळवलकर हे त्यांचे काका. असे असूनही गोविंदराव बालवाङ्मय आणि नाटक ह्यांपासून शिताफीने दूर राहिले. याचे कारण ते लहानपणीच डोंबिवलीला राहायला गेले. त्यांच्या लहानपणी डोंबिवली फक्त गोरक्षण संस्थेविषयी प्रसिद्ध होती. त्यानंतर कित्येक वर्षांनी तिथे महाराष्ट्रातले डझनभर साहित्यिक राहायला गेले आणि गाई मागे पडल्या. तरीदेखील गोविंदराव ललित साहित्याकडे वळले नाहीत. यावरून आमचा कयास असा आहे, की आपण पत्रकारच व्हायचे असे त्यांनी बालवयातच ठरवलेले दिसते. मुंबईत शेट्टी-लोक हे जसे हॉटेलबद्दल प्रसिद्ध तसे तळवलकर-लोक हॉस्पिटलबद्दल. (खरे तर मुंबईच्या ‘जसलोक’सारखे सर्व तळवलकर डॉक्टरांना मिळून एक ‘तळवलकर लोक’ हॉस्पिटल चालवायला काही हरकत नाही.) पण एवढे आयते तळवलकर असून, गोविंदराव डॉक्टरही झाले नाहीत. (मात्र ही चूक त्यांनी आपल्या कन्येला डॉक्टर करून भरून काढली आहे.) ते प्राध्यापक झाले नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे रोज नवीन ग्रंथ वाचायची खोड. राजकारण ह्या विषयाची त्यांना अतोनात आवड. त्या क्षेत्रातल्या लोकांची वजनेमापे घेण्याची हौसही मोठी; पण त्यांच्या तरुणपणी जी गांधीवादी चळवळ होती त्यातल्या लोकांना गीतेचे काही अध्याय, ‘आश्रमभजनावली’, कुराणातल्या काही आयत वगैरे प्रार्थनीय ग्रंथांचीच ओढ अधिक. त्यांत गोविंदरावांचे कसे जमणार? आता ग्रंथप्रेम आणि राजकारण यांची गाठ मारलेला एकच राजकीय पक्ष त्यांच्या तरुणपणी होता. तो म्हणजे रॉयिस्टांचा. हे लोक मात्र गांधींनी चालवलेल्या सामुदायिक चळवळीच्या काळात एका निराळेपणाने उठून दिसणारे किंवा खरे म्हणजे एखाद्या रॉयवाद्याच्याच घरात बसून दिसणारे लोक होते. गांधींच्या जनता-चळवळीतली ती गर्दी, तो एकूणच सगळा गदारोळ आणि रॉयवादी गटाचा तो क्रांतिकारक नेमस्तपणा यांची तुलना करायची झाली, तर पंढरीच्या वारीतला तो ‘तुटो हें मस्तक फुटो हें शरीर’ थाटाचा दंगा आणि थिऑसॉफिस्टांचे ते पांढरेधोप परीटघडीचे अध्यात्म यांच्याशीच होईल. गोविंदरावांच्या स्वभावाला हिंसा किंवा अहिंसा यांपैकी कशासाठीही रस्ते किंवा मैदाने गाजवण्याच्या राजकीय चळवळी मानवणाऱ्या नव्हत्या. सभांचे फड जिंकण्यातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाल्यावर डोंबिवलीतून ते मुंबईला राहायला गेले. त्या वेळी डोंबिवलीच्या नागरिकांनी फार मोठा सत्कार-कम-निरोप समारंभ केला होता. (गोविंदरावांच्या सामानाचा ट्रक अडवल्यामुळे त्यांना समारंभाला हजर राहावे लागले असे मी नंतर ऐकले.) ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे आणि मी असे प्रमुख वक्ते. सत्कारसमितीने माइकवाल्याला दिलेले भाडे आम्ही पुरेपूर वसूल करून दाखवले; पण गोविंदरावांनी आपले उत्तरादाखल भाषण पाच-सात ओळींत उरकले. तेव्हाच आम्ही ओळखले, की गोविंदराव ‘सरकार’ ह्या गोष्टीला वैतागत नाहीत इतके ‘सत्कार’ ह्या प्रकाराला वैतागतात. (विचारा : अॅ. रामराव आदिक, मा. रत्नाप्पा कुंभार आणि न जाणो, लवकरच माननीय मुख्यमंत्री-चुकलो-जनाबेअली वझीरे अव्वल शंकररावजी चव्हाण...)

तात्पर्य, वाणीपेक्षा लेखणीवर त्यांचा विश्वास अधिक. आंधळेपणाने एकाच पंथामागून जाण्यापेक्षा दहा प्रकारच्या ग्रंथांतून सत्य शोधण्याकडे प्रवृत्ती. हे गुण पक्षीय धोरणात बसते तेवढेच सत्य मानणाऱ्यांच्यात अवगुण ठरतात. तेव्हा एखाद्या सामाजिक किंवा राजकीय घटनेचे जिथे व्यासंगी मंडळीकडून विवरण चालते अशा रॉयिस्टांच्या मेळाव्याकडे ते तरुणवयात आकर्षित झाले. शिवाय तिथली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धनदास पारीख, वसंतराव कर्णिक ह्यांच्यासारखी ग्रंथप्रेमी माणसे अभ्यासजड नव्हती. त्यांचा सहवास आणि स्नेह त्यांना अधिक मानवला. निरनिराळ्या विषयांवरच्या वैचारिक वाङ्मयाच्या वाचनात ते रमू लागले. ह. रा. महाजनींचा इथेच परिचय झाला. त्यांच्याबरोबर ते ‘लोकसत्ते’त आले. त्यापूर्वी काही महिने ते शंकरराव देवांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘नवभारत’ मासिकात होते. त्यात येणाऱ्या बऱ्याचशा लेखांची प्रुफे तपासताना जडजंबाल मराठी भाषेच्या स्वरूपाचे त्यांना सर्वांगांनी दर्शन घडून, आपण लिहिलेले लोकांनी वाचावे अशी इच्छा असल्यास सोपे लिहिले पाहिजे हा धडा त्यांनी घेतला असावा. ‘लोकसत्ते’तून ते नव्यानेच निघत असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उपसंपादक म्हणून आले. द्वा. भ. कर्णिक हे त्या वेळी संपादक होते. तेही रॉयवादी; पण गोविंदराव मात्र रॉयवादात गुंतून राहिले नाहीत. एकाच माणसाला जगातले सगळे काही कळते असे मानणे चूक आहे हे त्यांना रॉयवादी वाङ्मयाच्या अभ्यासातून मिळालेल्या वैचारिक शिस्तीमुळेच कळले आणि म्हणूनच ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाल्यावर त्यांनी त्या पत्राच्या धोरणात कुठल्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा उदोउदो होऊ दिला नाही; पण पत्रकार म्हणून लो. टिळक हा त्यांचा आदर्श आहे. अग्रलेख ही विद्वत्तेचे प्रदर्शन करण्याची जागा नाही, तर भोवताली घडणाऱ्या सामाजिक, राजकीय इत्यादी उलथापालथींचा सामान्य वाचकाला अन्वयार्थ करून दाखवणारे ते विवेचन असले पाहिजे, हे तत्त्व महापंडित असलेल्या लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखांतून सिद्ध केले आहे. लोकमान्यांच्या साध्या, सरळ शैलीविषयी लिहिताना प्रा. श्री. म. माट्यांनी म्हटले आहे, “एकशे दहा कोटी रुपया कसा उडतो,’ हें हेडिंग घालणाऱ्या माणसाचें तोंड हलक्या आवाजात बजेटाची गंभीर चर्चा करणाऱ्या नामदाराकडे वळलेले नाही, तर ज्यास आपल्याला शिक्षण द्यावयाचें आहे, त्या लोकसमूहाकडे वळलेलें आहें हें सहज दिसतें.’’ गोविंदरावांच्या अग्रलेखांची ‘स्पष्ट बोला-तर मग ऐकाच’ किंवा ‘सचिवालयातील मेहूण’, ‘नाथांचे भारूड’ यांसारखी हेडिंगे आणि खालचा मजकूर वाचताना शैलीच्या बाबतीतले त्यांचे गुरुघराणे कोणते हे चटकन लक्षात येते.

सगळ्या लाकडाच्या वखारी जशा जंगी किंवा हल्ली कुठल्याही मराठी नाटकातले नट जसे ‘नेहमीचे यशस्वी’, तसे सगळे पत्रकार हे झुंजार; पण ह्या झुंजारपणाशी भडकपणाचे नाते जुळवलेलेच अधिक आढळते. खऱ्या झुंजारपणाच्या बाबतीत लो. टिळकांविषयी शंका घेणारा कुणी असेल असे मला वाटत नाही; पण संताप हा साध्या वाक्यातूनही तीव्रपणाने दाखवता येतो. ‘राज्य चालवणें म्हणजे रयतेचा सूड घेणें नव्हें’ यासारख्या साध्या वाटणाऱ्या वाक्यामागे टिळक संतापाचा अदृश्य जाळ पेटलेला दाखवून देत असत. पत्रकाराने लोकांना सावध करावे. सत्तेवरच्या लोकांना हातातल्या सत्तेमुळे मर्यादातिक्रम कुठे होतो ते दाखवून द्यावे. अधिकाऱ्यांना शहाणे करावे. नुसती शब्दांची शिवराळ आतषबाजी करून भडकवलेले लोक त्या राळेसारखेच भपकन पेटतात आणि विझून जातात. सामाजिक चळवळी म्हणजे गुंडांच्या मारामाऱ्या नव्हेत. टिळक आणि तळवलकर यांची तुलना करण्याचा आचरटपणा मी करणार नाही. असल्या वावग्या स्तुतीचा शब्द माझ्या हातून गेला तर पुढल्याच ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘काहीतरी काय लिहिता!’ असल्या साध्या मथळ्याचा, पण शब्दांच्या अग्राअग्रातून माझ्या लेखाची चाळण करणारा अग्रलेख लिहून गोविंदराव आमचा ‘पुण्यश्लोक’ करून टाकतील. (ह्या शब्दाला त्यांनी भलताच अर्थ मिळवून दिला आहे.) पण संपादकीय खुर्चीवर बसताना त्यांनी ‘तव स्मरण संतत स्फुरणदायि आम्हां घडो’ म्हणून लोकमान्य टिळकांना पहिले वंदन केले असावे हे मात्र त्यांच्या वाचकांना सतत जाणवत आलेले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या राष्ट्रप्रेमी संपादकापुढे ब्रिटिश राजवटीचा अंत घडवणे हेच प्रमुख लक्ष्य होते. स्वातंत्र्यानंतर मात्र चांगल्या संपादकाला सार्वजनिक जीवनातल्या अनेक आघाड्यांकडे वाचकाचे लक्ष वेधावे लागते. ते वेधताना त्याला नीट कळेल अशा भाषेत लिहावे लागते; पण भाषेचे हे साधेपण जर उत्तम व्यासंगातून उमटलेले नसेल तर मात्र फार नकली होते. लहान मुलांना गोष्ट सांगताना काही माणसे उगीचच एक अदृश्य झबले चढवून बोलतात. अभ्यासहीन साधेपणाचे तसे काहीसे असते. गोविंदराव तसले साधे लिहित नाहीत आणि निर्भीडपणाने लिहिताना त्या लेखनाला भडकपणाचा स्पर्श होऊ देत नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणखी एक गोष्ट होती : वर्तमानपत्राला ते चालवणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय जीवनातल्या मोठेपणाचा प्रकाश मिळायचा. त्यामुळे टिळकांसारख्यांचे अग्रलेख सामान्य जनतेत त्यांच्याविषयी असणाऱ्या आदराची पुण्याई घेऊन उभे राहत. अग्रलेख बरा की वाईट हा प्रश्नच नव्हता. तो शब्द टिळकांचा आहे, गांधींचा आहे ही त्या शब्दामागे पुण्याई असे. स्वातंत्र्यानंतर हे व्यक्तिमहात्म्य संपुष्टात आले. आता संपादकाला असले श्रेष्ठत्व अग्रलेखाच्या गुणवत्तेतून सिद्ध करावे लागते आणि हे काम स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय जीवनाचा मोहराच बदलल्यामुळे अधिक खडतर झाले आहे.

आज राजकीयच नव्हे, तर जीवनातल्या सगळ्याच सार्वजनिक क्षेत्रांत, निवडणूक जिंकून सत्तेची जागा पटकावून बसणे ही एकच ईर्षा दिसते. त्या ईर्षेच्या आड कोणी आले तर त्याला साम, दाम, दंड, भेद ह्यांपैकी जो उपाय योग्य वाटेल त्या उपायाने उखडून काढणे हा एकमेव सिद्धांत स्वीकारला गेला आहे. “हे असेच चालायचे” असे सर्वच जण म्हणत असताना “हे असे चालू देता कामा नये” म्हणायला फार ताकद लागते. व्यक्तिमहात्म्य आणि सार्वजनिक हित ह्यांत सार्वजनिक हिताला मोठे मानून वृत्तपत्रीय लेखन करायचे दिवसेंदिवस बिकट होत चाललेले आहे. कुठला नेता ऐन वेळी कुठली ढाल पुढे करून त्यामागे दडेल हे सांगणे अशक्य. सत्तास्थाने मिळवलेल्या लोकांभवती पेटव म्हटले की पेटवणारी भुतावळ हजर असते. मग कधी जातीच्या अपमानाचा छू मंतर, कधी भाषिक अहंकार, कधी जिल्ह्याचा मान-कधी काही, कधी काही.

अलीकडेच पुण्यात झालेल्या प्राध्यापकांच्या संपात एका प्राध्यापकाने “पुण्याच्या प्राध्यापकांचे पुण्याबाहेरच्या प्राध्यापकांनी येऊन नेतृत्व करण्याचे कारण नाही” असे खडसावून वगैरे बजावल्याची बातमी मी वाचली. यापुढली पायरी म्हणजे पुणे विद्यापीठात शेक्सपियर, कालिदास वगैरे पुण्याबाहेरच्या ग्रंथकारांचे ग्रंथ आम्ही शिकवणार नाही म्हणून एक संप! असल्या ह्या स्फोटक वातावरणात आपल्या अग्रलेखांनी वाचकांपुढे सत्य परिस्थिती मांडणाऱ्या गोविंदरावांचा पराक्रम मोठा आहे.

मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूच्या अश्लाघ्य वर्तनावर त्यांनी स्पष्टपणाने लेखन करून सरकारला योग्य ती उपाययोजना करायला भाग पाडले. त्यांच्यावर जातीय अहंकारापासून सर्व आरोप झाले. विद्यार्थ्यांचे गट हाताशी धरून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. सरकारी दडपण आले नसेलच असे नाही. तरीही त्यांनी आपल्या लेखनात कसलीही असभ्यता येऊ न देता विद्यापीठातल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न तडीला लावला. त्याबद्दलच हे ‘दुर्गारतन’ पारितोषिक त्यांना मिळाले. न जाणो, प्रतिपक्षाच्या कारवायांना यश आले असते तर नोकरीतून नारळही मिळाला असता. कारण गोविंदराव काही वृत्तपत्राचे मालक नाहीत.

आपल्या अग्रलेखांनी असा कुठेतरी अन्यायाला योग्य शब्दांत, कसल्याही शिवराळ पद्धतीने नव्हे, पण स्पष्टपणाने वाचा फोडणारा संपादक हा सरळ मार्गाने जगू इच्छिणाऱ्या लोकांना आपला आधार आहे असे वाटते. गोविंदरावांनी लिहिलेले अग्रलेख वाचण्याविषयी उत्सुकता हे ह्याच भावनेचे द्योतक आहे.

मी मी म्हणवणाऱ्या उद्धटांना त्यांनी लटपटायला लावले आहे हे खरे; पण त्याविषयीचा अहंकार त्यांच्या लेखनातून दिसत नाही. सहज बोलल्यासारखे ते लिहितात. अनायासे साधलेल्या विनोदामुळे, माफक वक्रोक्तीमुळे त्यांचा अग्रलेख अतिशय वाचनीय होतो. वर्तमानपत्र हे घाईत वाचले जाते हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यामुळे चिरंतन साहित्यात त्या अग्रलेखांना स्थान मिळवण्यासाठी कुठे आटापिटा ते करत नाहीत. त्याबरोबरच ते आकर्षक करण्यासाठी व्यक्तिगत भांडणे चव्हाठ्यावर आणण्याची असभ्यताही त्यांनी केली नाही. व्यक्तीच्या आचरणाचा जिथे सार्वजनिक जीवनाशी संबंध येतो त्या संदर्भातच त्यांनी त्या व्यक्तींना धारेवर धरले आहे. केवळ अग्रलेखच नव्हे तर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये येणाऱ्या इतर लेखनामुळेही सुसंस्कृत आणि सुबुद्धपणाने चालवलेले वर्तमानपत्र असा लौकिक प्राप्त झाला आहे. त्यांचा गौरव हा पर्यायाने त्या दैनिकाचा गौरव आहे. दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना लाभलेला स्नेह आणि आदर काय आहे हे पाहण्याची मला संधी लाभली आहे. असे असूनही खाजगी संभाषणातून त्यांनी कधी बड्या मंडळींशी असलेल्या परिचयाची हळूच ती ‘नावे टाकून’ शेखी मिरवली नाही. हे एक फार चांगल्या संस्कारांचे लक्षण आहे.

हे सारे त्यांनी उत्तम व्यासंगातून, सामाजिक घडामोडींच्या निरीक्षणातून, अभ्यासू विद्वानांच्या सहवासातून मिळवलेले आहे. ही कमाई सामान्यांपर्यंत सुंदर, पण सोप्या मराठीतून पोहोचवण्याच्या तळमळीतून आणि संपूर्ण वेळ ‘पत्रकार’ ह्या जबाबदार भूमिकेतच राहण्याच्या निष्ठेतून त्यांना हे यश लाभले आहे आणि विशेष म्हणजे ह्या यशापासून हळूच नामानिराळे राहण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे यशाच्या याहूनही वरच्या पायऱ्या गाठण्याचे योग त्यांच्या भावी आयुष्यात आल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे. सत्कार-समारंभांचे हार गळ्यात पडले, तरी न कळत पायांत येऊन गुरफटतात आणि वाटचाल थांबवतात. हे त्यांनी पाहिलेले असल्यामुळेच सत्तेवरच्या उन्मत्तांना न भिणारे गोविंदराव त्या तसल्या हारांना भीत असावेत!
.......
(पूर्वप्रसिद्धी : पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख मे, १९७५मध्ये ‘ललित’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर मौज प्रकाशन गृहाने प्रसिद्ध केलेल्या ‘आपुलकी’ या संकलित लेखांच्या पुस्तकात तो पुनःप्रकाशित करण्यात आला होता. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे कॉपीराइट्स पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेकडे आहेत. या संस्थेची परवानगी घेऊन हा लेख ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने २२ मार्च २०१७ रोजी तळवलकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध केला. )


0 प्रतिक्रिया: