Tuesday, July 27, 2021

पु.ल. भेटतच राहतात.. -- निखिल असवडेकर

ब्लॉगसाठी हा लेख लिहायला सुरवात तर केली पण बटाट्याच्या चाळीतल्या सोकाजीनाना त्रिलोकेकरांप्रमाणे ‘सुरवातीची beginning’ मराठीतून करावी का इंग्रजीतून असा प्रश्न पडला आणि PuLa has always been अशी सुरवात होऊन गाडी शेवटी मराठीकडे वळली.. मराठी साहित्याला ज्या व्यक्तीने अढळ स्थान प्राप्त करून दिलंय त्या व्यक्तीवर मराठीतूनच लिहूया असा विचार केला.

आज पुलंसंबंधी लिहायचं विशेष कारण काय असा प्रश्न साहजिकच मनात येईल पण फक्त जन्मदिन आणि स्मृतीदिवस यापलीकडे हा माणूस आपलं आयुष्य व्यापून राहिलाय याची गेले काही वर्ष सदैव जाणीव होती आणि आणि या जाणिवेतूनच पुढे हा विषय..

मला तर गेल्या २-३ वर्षातून एकही दिवस असा आठवत नाही ज्यादिवशी पुलंची भेट झालेली नाही.. कितीही गडबडीचा किंवा कटकटीचा दिनक्रम असो.. पु.ल. रोज येतातच.. भले अगदी ५-१० मिनिटं का असेना! आपल्या दैनंदिन जीवनात भेटणारी माणसं, आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांचा जरा बारकाईने विचार केला तर “अरे, पुलंनी लिहिलेलं साहित्य आपण प्रत्यक्ष जगतोय कि काय?” असा विचार मनात येतो.

आपण सर्वजण विद्यार्थी’दशे’त नक्कीच कोणातरी ‘सखाराम गटणे’ ला भेटलो असूच.. त्याचप्रमाणे आपणही कोणत्यातरी इयत्तेत ‘दामले’ मास्तरांप्रमाणे अनिष्ट होऊन राशीला बसणाऱ्या ‘गुरूं’चा त्रास सोसला असणारच! गणपतीत आरती करताना ‘भक्तसंकटी नाना….’ म्हणताना आवाज लावणारा कुणी असला कि हरितात्यांची आठवण झालीच म्हणून समजा. मधे एकदा डाॅमिनोज् च्या पिझ्झाबाॅयकडे आधी 20$ ची नोट घेऊन जाणारा, त्याच्याकडे सुटे नाहीत हे कळल्यावर मग आम्हा सर्वांकडून 3$ सुटे जमा करून मग 20$ गेले कुठे शोधणारा एक मित्र जेव्हा पहिला तेव्हा तर खुद्द ‘बाबुकाका खरे’ पहिल्याचा साक्षात्कार झाला. साखरपुडा-लग्न अशा सोशल समारंभांमध्ये पुढे पुढे करणारे ‘नारायण’ही सर्वत्र दिसतात.. पुणेरी स्वाभिमान असो, नागपुरी खाक्या असो किंवा मुंबईची ‘आङ्ग्लोद्भव मराठी’.. “I am going out बरं का रे Macmillan!!” म्हणणाऱ्या देशपांडे श्वानसम्राज्ञीही आता मुंबईच्या ‘टाॅवर संस्कृती’त नवीन नाहीत. एकदा इथे कंपनीत काम करताना मला ऑफिस मधल्या एका मित्राने त्याला नुकतीच सुचलेली इंग्रजी कविता वाचून दाखवली. तेव्हा इथे सातासमुद्रापार ‘हापिसच्या वेळेत आणि हापिसच्या कागदावर’ साहित्य रचणारा नानू सरंजामे (गोऱ्या कातडीचा) आठवला बघा! पुलंच्या नजरेने हेरलेले हे बारकावे केवढे अचूक होते हे जसजशी आपली भटकंती वाढते आणि आजूबाजूचं मित्रमंडळ विस्तारतं तेव्हा समजायला लागतं. ‘म्हैस’ मधील मांडवकर,बगूनाना, झंप्या, बुशकोटवाले डॉक्टर, उस्मानाशेठ, पंचनाम्यासाठी आलेला ऑर्डरली त्याचप्रमाणे ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’ मधील कुलकर्णी, जुने फोटो दाखवून पुलंचा वेळ कुरतडणारे ते दाम्पत्य.. सर्व पात्रे पुलंनी अप्रतिम चितारली आहेत. सतत कोकणच्या प्रगतीचा पाढा वाचणारे काशिनाथ नाडकर्णी असोत अथवा किंवा अतिमवाळ स्वभावाचे कोचरेकर गुरुजी.. या सर्वांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रसंगी अजूनही भेटतच असतो.

पुलंची साहित्यिक पात्रं (शाब्दिक आणि लाक्षणिक दोन्ही अर्थानी) आपल्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून गेलेली आहेत. “काय हो.. हि सगळी मंडळी खरंच जिवंत होऊन तुम्हाला भेटायला आली तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?” असं कुणीतरी पुलंना विचारलं होतं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं – “मी त्यांना कडकडून मिठी मारेन!”. मानवी व्यक्तिरेखा ह्या काल्पनिक असल्या, तरी त्यांचे स्वभाव हे काल्पनिक नसतात.. कदाचित त्यामुळेच ह्या व्यक्तिरेखांचा भास आपल्याला अवतीभवती होत असतो. त्या पात्रांनी कधी आपल्याला हसवलंय, रडवलंय आणि आपल्या प्रतिभेने स्तीमितही केलंय. “अहो आठ आणे खाल्ले कि चौकटीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्त्रीक्ट जेलात घालतात आणि लाख खाल्ले कि गांधीटोपी घालून पाठवतात असेम्बलीत.. लोकनियुक्त प्रतिनिधी!!”, “अर्रे दुष्काळ इथे पडला तर भाषणं कसली देतोस??.. तांदूळ दे! तुम्ही आपले खुळे! आले नेहरू, चालले बघावयास!!” पु.ल. आपल्याच मनातला राग व्यक्त करतायत असं वाटत. “कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसं.. खूप पिकल्याखेरीज गोडवा येत नाही त्यांच्यात” हि आपल्या मनातली सुप्त भावना.. पण पुलंनी शब्दांमध्ये केवढी छान रंगवलीये. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे सामान्य प्रसंग असामान्य पद्धतीने रंगवणं यातंच ते. बाजी मारतात. सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या विनोदाला कधीही तत्कालीन प्रसिद्ध कलाकारांची किंवा पेज-3 पुरस्कृत धुरिणांची गरज भासली नाही आणि त्यांनी अख्ख्या मराठी समाजाला वेड लावलं. पुलंची हि धुंदी कधीही उतरणारी नाही.

पुलंचं आयुष्यात अजूनही असणं हेच आपलं जीवन सुखकर बनवतं. म्हणजे आपण आनंदी असलो कि पु.ल. हसवतात पण जेव्हा कधी दु:खी, निराश असू तेव्हा आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगून जातात.. “ज्या दिवशी जन्माला येणं जस्टीफाएबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.” पुलंनी त्यांचे मित्र चंदू ठाकूर यांना लिहिलेल्या सांत्वनपर आणि प्रेरणादायक पत्रातील हे काही शब्द.. आपली विचार करण्याची किंवा आपल्या कल्पनेची, सामर्थ्याची रेघा किती सीमित आहेत याची जाणीव करून देतात. ‘हसविण्याचा माझा धंदा’ याप्रमाणेच या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक म्हणूनही आपली मोठी जबाबदारी आहे याची पुलंना नितांत जाणीव होती हे यावरून लक्षात येईल. चित्रपट-मालिका- नाटकांमधून राजे महाराजे, स्वातंत्र्यसेनानी साकारत सिंहगर्जना करणारे आपल्या पिढीतले कलाकार जेव्हा राजकीय सभा-समारंभांमध्ये कोणा स्वयंघोषित पक्षप्रमुखांच्या उगाच पुढे-मागे करत त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आपण पाहतो तेव्हा नक्कीच त्या प्रकारची कीव येते अन मन विषण्ण होतं. आपल्या प्रतिभेला समाजमान्यता हवी यासाठी खरंच अशा थोतांडाची गरज आहे का असा विचार साहजिकच मनात येतो. मात्र कोणत्याही संकुचित राजकीय वा जातीय-सामाजिक चक्रव्यूहात पुलंची प्रतिभा फसली नाही की लोकप्रियतेच्या लाटेत वहावत जाऊन त्यांची साहित्यसंपदा कधी भरकटली नाही . तो त्यांचा पिंडच नव्हता. अलौकिक प्रतिभामंथनातून जोपासले गेलेले विचार आणि भावना त्यांनी वेगवेगळया वेळी, वेगवेगळया प्रासंगिक निमित्तांनी आपल्या लेखांत-भाषणांत-नाटकांत सुयोग्य चेहऱ्यांचा त्यावर मुखवटा लावून, आपल्या स्वाभाविक, सहज व अतिशय बोलक्या भाषेत कथन केल्या. पुलंचा एक ‘डाय हार्ड’ फॅन आणि त्यातही एक पार्लेकर असूनही त्यांना प्रत्यक्षात कधी न भेटता आल्याची खंत कायमच सतावत राहील पण ह्या निरनिराळ्या अवतारांनी ते मला अजूनही भेटतच राहतात.. रोजंच!!

– निखिल असवडेकर

(वरील लेखात अधे-मधे आलेले इंग्रजी शब्द ‘अव्हाॅईड’ करण्याचा प्रयत्न चुकूनही केला नाही.. शेवटी मी पडलो पक्का ‘मुंबईकर’!! )

मूळ स्रोत -- > https://nikhilasawadekar.wordpress.com

3 प्रतिक्रिया:

Sandeep Dudam संदीप दुडम said...

सुंदर शब्दांकन निखिलजी!
*बुस्कुटवाले डॉक्टर* ऐवजी *बुशकोटवाले डॉक्टर* असे हवे.
आणि हो माझीही खंत तुमच्यासारखीच, पुलंना प्रत्यक्षात भेटता नाही आलं याची.
धन्यवाद!

Nikhil Asawadekar said...

Just realized my post is here on this website. What a pleasure! मनापासून धन्यवाद!!

Nikhil Asawadekar said...

Just realized that my blog-post is here on my favorite PuLa website.
माझं पोस्ट आणि ब्लॉग ची लिंक शेअर केल्याबद्दल मनापासून आभार!