Tuesday, June 19, 2018

परीसस्पर्श - सतीश पाकणीकर

माझ्या "पुलकित" मित्रमैत्रिणिंनो, आज मेजवानी आहे आठवणींची, पुण्यातील प्रसिध्द प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी लिहिलेली पुलंची एक आठवण आणि छायाचित्र पाहुन अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले माझ्या, तुमच्यासाठी शेअर करण्याची परवानगी सतीशजींनी आनंदाने दिली त्यासाठी आपण त्यांचे कृतज्ञ राहू. 

*कट वन* - १९८६ च्या जून महिन्यातली बारा तारीख. स्थळ ‘बालगंधर्व रंगमंदिराचे कलादालन’. उद्यापासून म्हणजेच १३ जून १९८६ पासून ते १६ जून १९८६ पर्यंतच्या काळात माझे पहिलेच स्वतंत्र प्रकाशचित्र प्रदर्शन. प्रदर्शनाचे नाव ‘ स्वरचित्रांच्या काठावरती ...’ अर्थातच भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या मी टिपलेल्या भावमुद्रांचे सादरीकरण. चित्रकार संजय पवार, भाऊ नार्वेकर, प्रमोद देशपांडे, संदीप होले, जयंत पाठक हे जिवलग मित्र व माझे दोन्ही भाऊ हेमंत व हरिष सर्वांनी मिळून रात्रभर जागून प्रदर्शनाचा ‘डिस्प्ले’ केलेला.
उद्घाटनाचा कार्यक्रमही प्रदर्शनाच्या विषयाला साजेसा. माझा मित्र विजय कोपरकर याचं गाणं, साथीला दुसरा मित्र रामदास पळसुले आणि नुकतेच पुण्याला परिचित झालेले सतारवादक शाहीद परवेझ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन. गद्य भाषणाला पूर्णपणे चाट. अशा प्रकारे प्रदर्शनाचे उद्घाटन होण्याची ‘बालगंधर्व’ मधील ही पहिलीच वेळ. संजय पवारने केलेले निमंत्रण तर सर्वांना अतोनात आवडलेले. संगीत क्षेत्रातील सर्व नामवंतांना मी स्वतः जाऊन निमंत्रण दिलेले. तरीही माझ्या मनात धाकधुक.

पण दिलेल्या वेळेला कलादालन रसिकांच्या उपस्थितीने पूर्ण भरून गेले. उस्ताद सईदउद्दीन डागर, गुरू रोहिणीताई भाटे, आशाताई गाडगीळ, मधुकर पारुंडेकर, दत्तोपंत देशपांडे असे श्रोते भारतीय बैठकीवर बसलेले. बाजूच्या चार भिंतींवर अभिजात संगीतातील मोगुबाई कुर्डीकर, भीमसेनजी, कुमारजी, अभिषेकीबुआ, किशोरीताई, रविशंकर, विलायात खान, अमजदअली खान, झाकीर हुसैन अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भावमुद्रा अन विजयच्या सुरेल स्वरांचा दरवळ. मैफल एकदम जमून गेली.

सर्व प्रमुख वृत्तपत्रांनी केलेल्या कौतुकामुळे पुढच्या तीन दिवसात जवळ जवळ तीन हजार रसिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. चित्रकार जि. भी. दीक्षित, पंडित जितेंद्र अभिषेकी, वामनराव देशपांडे, वसंत बापट, राम माटे, जयराम व कीर्ती शिलेदार, चंद्रकांत कामत, अरविंद थत्ते, शरद तळवलकर अशा कलावंतांची उपस्थिती माझी उमेद वाढवणारी होती.

प्रदर्शनाचा शेवटचा दिवस. १६ जून. माझी नजर सतत कलादालनाच्या दाराकडे जात होती. मी एका व्यक्तीची आतुरतेनी वाट पाहत होतो. मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन निमंत्रण केलेले. त्यावर त्यांनी येण्याचे आश्वासनही दिलेले. ते येतील? मनात द्वंद्व चाललेलं. एक मन सांगत होतं की ते किती मोठे आहेत, कितीतरी आमंत्रणे त्यांना रोजच येत असणार, अशा किती ठिकाणी ते उपस्थित राहणार? लगेच दुसरं मन म्हणे त्यांनी कबूल केलयं म्हणजे ते नक्की येतील.

वेळ तर निघून चाललेली. साडे चार वाजले. मी चहा पिण्यासाठी खालच्या कँटिनमध्ये गेलो. पुढ्यात चहा आला. एक–दोन घोट घेतोय तोवर माझा मित्र प्रमोद पळत पळत आला व म्हणाला- “ लवकर चल. वर कलादालनात पु. ल. देशपांडे व त्यांचे एक मित्र आलेत. ते तुझी चौकशी करताहेत.”

दुसऱ्या मनाचा कल बरोबर ठरल्याच्या आनंदात मी हातातला कप तसाच ठेवला. धावलो. प्रदर्शनातील मधल्या पॅनेलपाशी दोघेही तन्मय होऊन फोटो पाहत होते. मी हळूच जाऊन शेजारी उभा राहिलो. ते आल्याने स्वाभाविकच त्यांच्या आजूबाजूला गर्दी झाली होती. थोड्या वेळाने पु.लं चे माझ्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले – “अरे तुलाच शोधतोय, कुठे होतास? हे माझे मित्र नंदा नारळकर.” मी दोघांनाही नमस्कार केला. माझा विश्वास बसत नव्हता. पण समोर साक्षात अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व त्यांच्या एका जीवलग मित्रासोबत. आणि ते दोघेही माझ्या कामाचं ते तोंड भरून कौतुक करीत होते. मग पुढील जवळजवळ एक तास सर्व प्रकाशचित्रे बारकाईने पाहताना.... त्यांची उपस्थिती असलेल्या मैफिलींबद्दलच्या आठवणी जागवण्यात गेला. प्रदर्शन पाहून झाल्यावर पु लं नी अभिप्राय लिहिला – “ या अप्रतिम छायाचित्रातून स्वर ऐकू येतात.” करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेला हा अभिप्राय माझ्यासाठी जगातील सर्वात मोठे ‘अॅवॉर्ड’ होते.

मग पु लं नी चौकशी केली की इतके सगळे प्रिंट्स करण्यासाठी व प्रदर्शनासाठी खर्च किती आला व तो कोणी केला? हा सर्व खर्च मी केला आहे हे कळल्यावर ते म्हणाले – “ एक काम कर. आम्ही एन. सी. पी. ए. मध्ये या सर्व कलाकारांचे ध्वनीमुद्रण जतन करतोय. त्या संग्रहासाठी अल्बमचे कव्हर म्हणून या प्रत्येक कलाकाराच्या फोटोची एक एक प्रत आम्हाला दे. त्यासाठी किती खर्च येईल त्याचे एक पत्र मला दे. मी पुढच्या आठवड्यात चार-पाच दिवस तेथे आहे. नंतर प्रिंट्स दे.” किती सहज बोलून गेले ते. पण माझ्या सारख्याला ती एक फार मोठी संधी होती. एका मोठ्या अभिप्रायाच्या बरोबरीने मिळालेली आश्वासक संधी. प्रदर्शनासाठी घेतलेल्या कष्टांचे सार्थकच जणू!

*कट टू* – पुढच्याच आठवड्यात शनिवारी मी व मित्र प्रमोद देशपांडे पहाटेच्या सिंहगड एक्स्प्रेसने निघून मुंबईच्या व्ही टी ला पोहोचलेलो. पहाटे उठल्याने व प्रवासात झोपल्याने आमचे पुरेसे अवतार झालेले. खांद्याला शबनम त्यात (प्रिंट्सच्या खर्चाचे पत्र) व पायात स्लीपर्स असा वेश. व्ही टी वरून बसने थेट एन. सी. पी. ए.! त्यावेळी एन. सी. पी. ए.च्या समोर आज उभी असलेली गगनचुंबी इमारत नव्हती. एन. सी. पी. ए.च्या समोर थेट समुद्राचा अप्रतिम नजारा. समुद्राच्या बाजूकडून चालत चालत आम्ही टाटा थिएटरच्या बाजूने एका गेटमधून आत शिरलो.. आमचा एकूण अवतार बघून लगेचच तेथील गुरख्याने आम्हाला हटकले. “ ऐ किधर जाते हो ? क्या काम है ?” या त्याच्या प्रश्नावर मी उत्तर दिले की “ हमें पु ल देशपांडे साहब ने बुलाया है ।” माझ्या या उत्तरावर गुरख्याने आम्हाला एक कडक सॅल्युट ठोकला. त्याने आम्हाला त्याच्या मागे येण्याची खूण केली. नुसत्या पु लं च्या नावाचा हा परिणाम! आम्हाला घेऊन तो गेस्ट हाउसच्या दिशेनी निघाला. दारावरची बेल त्यानेच वाजवली. कोणी नोकराने दरवाजा उघडला. मग “पुण्याहून कोणीतरी आलयं” चा निरोप आत गेला.

आम्ही तसेच उभे. पाच मिनिटातच पिस्ता कलरचा झब्बा व पायजमा परिधान केलेले पु. ल. आतून बाहेर आले. आम्हाला पाहताच त्यांनी बसण्याची खूण केली. त्या नोकराला पाणी व चहा आणण्यास सांगितले. त्याचे नाव बहुदा लक्ष्मण. कसे आलात वैगेरे चौकशी केल्यावर पु लं नी मला विचारले “ या आधी एन. सी. पी. ए. मध्ये आला आहेस का ?” मी मानेनेच नाही सांगितले.

त्यांच्या मनांत काही विचार आले असावेत. येणारा तासभराचा वेळ आमच्या दोघांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा असणार आहे याची आम्हाला कणभरानेही कल्पना आली नाही. इतक्यात चहा आला. तिघांनेही चहा घेतला. मी आणलेले पत्र पु लं च्या हातात दिले. त्यांनी त्याच्यावरून एक नजर टाकली व ठीक आहे असे म्हणाले. मान वळवत त्यांनी परत हाक मारली – “ लक्ष्मण, लायब्ररी व आर्ट गॅलरीच्या किल्ल्या घेऊन जा. व दोन्ही उघडून ठेव.”

प्रिंट्स किती दिवसात तयार होऊ शकतात वैगेरे चौकशी करून दहा मिनिटांनी पु ल आम्हाला म्हणाले – “चला”. आम्ही उठलो. त्यांच्या मागे मागे जात आम्ही पोहोचलो होतो एन. सी. पी. ए.च्या सुसज्ज अशा लायब्ररीत. वर्ग व विषय निहाय ठेवलेली पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्रे सर्व काही, सांस्कृतिक तपशिलांचा खजिनाच. त्यादिवशी सुट्टी असल्याने तेथे कोणीच नव्हते. पु लं नी आम्हाला तो म्युझिक सेक्शन दाखवला ज्यासाठी त्यांनी मला प्रिंट्स देण्यास सांगितले होते. लायब्ररी मधून निघून आम्ही पिरामल आर्ट गॅलरीत पोहोचलो. पूर्ण वातानुकुलीत अशी गॅलरी. तेथे आधीच्या प्रदर्शनाचे काही प्रिंट्स ठेवलेले होते. अप्रतिम डिस्प्ले बोर्ड्स, डिस्प्ले केलेल्या प्रिंट्ससाठी असलेली समर्पक प्रकाशयोजना पाहून मी थक्क झालो होतो.

“ येथे सर्व प्रदर्शने निमंत्रणावरून होतात.” पु ल म्हणाले. आमचे प्रश्नार्थक चेहरे पाहून त्यांनी खुलासा केला की –“ फोटोग्राफर्स कोणत्याही थीमवर काम करून त्याचा पोर्टफोलिओ येथे पाठवतात. येथील तज्ञ ते पोर्टफोलिओ पाहून कोणाच्या कामाला गॅलरी उपलब्ध करून द्यायची ते निवडतात. फोटोग्राफरने फक्त प्रिंट्स द्यायच्या. बाकी सर्व सोपस्कार येथील स्टाफ करतो. सर्व खर्च एन. सी. पी. ए. मार्फत केला जातो. थीमवर अवलंबून किती दिवस गॅलरी द्यायची हेही पाहिले जाते.” आमच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. (माझ्या प्रदर्शनात खर्च कोणी केलायं असे पु लं नी का विचारले याचा मला उलगडा झाला)

तेथून आम्ही मधल्याच एका बऱ्यापैकी मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो. एका बाजूस छतापासून जमिनीपर्यंत मखमली पडदा होता. त्याच्या पुढ्यात एक भला मोठा ऑर्गन ठेवलेला होता. पु लं नी सांगितले “ ही नुकतीच झालेली अॅडिशन आहे. ” कोण्या एका पारशी गृहस्थाने तो ऑर्गन भेट म्हणून दिला होता. जिन्याने उतरून आम्ही ‘रंगोली’ नावाच्या रेस्तराँपाशी पोहोचलो. समोर चौरसाकार उतरत जाणाऱ्या पायऱ्या व हिरवळ. रेस्तराँच्या आतून व बाहेरून दिसणारे दृश्य एकदम मनमोहक. डाव्या बाजूला एक्स्प्रिमेंटल थिएटर.

बोलत बोलत आम्ही टाटा थिएटरच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो. पूर्वेकडे चढत जाणाऱ्या पायऱ्या चढून थिएटरच्या आत गेलो. अर्धगोलाकृती स्टेज, तशीच अर्धगोलाकृती, १०१० प्रेक्षक आरामदायकरित्या बसण्याची व्यवस्था, प्रत्येक आसनावर उत्तम ऐकू येईल अशी ध्वनीयंत्रणा, अद्ययावत प्रकाशयोजना हे सर्व पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बाहेरच्या लॉबीत आलो. समोर परत एकदा समुद्राचा नजारा. पु लं नी सांगितले की “ फिलीप जॉन्सन नावाच्या आर्किटेक्टने हे सर्व डिझाईन केले आहे.”

जे आर डी टाटा व डॉ. जमशेद भाभा यांनी पाहिलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आणायला असाच वास्तू-विशारद हवा.

या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी कष्ट घेतलेली व तेव्हा ऑनररी डायरेक्टर असलेली, मराठी सारस्वतांचा कप्तान असलेली, लेखन, नाट्य, सिनेमा, संगीत, अभिनय या प्रत्येक कलेत आपला अमिट ठसा उमटवलेली व अवघ्या महाराष्ट्राची लाडकी असलेली पु ल देशपांडे ही असामी आपला बहुमोल वेळ खर्च करून आम्हाला तो ३२००० स्क्वेअर मीटर पसरलेला आसमंत दाखवत होती. आमच्या आयुष्यात यापेक्षा अजून भाग्याची घटना काय असू शकेल?

पु लं च्या दातृत्वाने समृद्ध झालेल्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत. त्यांच्या परीसस्पर्शाने सोनं झालेली अनेक आयुष्य आजही आहेत. व्यवसायाखेरीज मी निवडलेल्या माझ्या भारतीय अभिजात संगीतातील कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्याच्या छंदाला सुरुवातीच्या काळातच त्यांचा परीसस्पर्श व्हावा हे माझे अहोभाग्य!

*आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.*

आदरणीय भाई,
तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला हा संदेश फक्त जीवनाकडे बघण्याची दृष्टीच देतो असं नाही तर तो माझ्यासारख्या अनेकांचा प्रेरणास्त्रोतच आहे. माझ्या गळ्यात जोपर्यंत कॅमेरा आहे तो पर्यंत माझा हा छंद मी जाणीवपूर्वक जोपासेन, वाढवेन. माझी अशी प्रामाणिक धारणा आहे की तीच तुम्हाला तुमच्या या जन्मशताब्दी वर्षात खरी आदरांजली ठरेल!

सतीश पाकणीकर
९८२३०३०३२०
१२ जून २०१८

0 प्रतिक्रिया: