Leave a message

Friday, April 19, 2024

अशी ही बनवाबनवी आणि पु. ल.

मराठी सिनेसृष्टीची अजरामर कलाकृती म्हणून अशी ही बनवाबनवी चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे लोटली, तरीही अद्याप प्रेक्षकांवरील चित्रपटाची जादू तीळमात्रही कमी झालेली नाही. या चित्रपटाची गाणी आजही तितक्याच उत्साहात लावली जातात. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळेच की काय कधीही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षकांना तो पाहावासा वाटतो.

चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्षे झाली तरी या चित्रपटाचे किस्से अजूनही गाजतात. चित्रपटातील कलाकार कोणत्याही कार्यक्रमांना चित्रपटासंबंधी आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असाच एक किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला होता. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तयार करत असताना त्यातील एक सीन हा पुलंच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवर आधारित आहे. याबाबत सचिन यांनी सांगितले की, मी अनेकदा पुलंना भेटायला जायचो. त्यांच्याकडे गेलो की ते माझ्यासमोर त्यांच्या किस्स्यांचा पेटारा उघडायचे. असेच एकदा त्यांनी बालगंधर्व मंदिराचा किस्सा सांगितला. जो चित्रपटात जसाच्या तसा वापरला आहे.

सचिन पिळगांवकर यांनी सांगितले की, पुलंनी त्यांना एक किस्सा सांगितला होता. – त्यावेळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचं नव्यानेच बांधकाम झालेलं होतं. बालगंधर्व रंगमंदिर स्थापन करण्यात पुलंचा वाटा मोठा होता. त्यावेळी तिथल्या काही प्रमुख लोकांनी पुलं देशपांडेंना ते नवीन बालगंधर्व रंगमंदिर बघण्यासाठी बोलावलं होतं. पु. ल. देशपांडे बालगंधर्व रंगमंदिर बघायला गेले. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुलं देशपांडे कोण आहेत हे माहिती नव्हतं. पुलं देशपांडे माहिती नाही इथपर्यंत ठीक होतं मात्र बालगंधर्व कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं.

पुलं आणि बालगंधर्व अशा दोन्ही नावांबद्दल त्यांना माहिती नव्हतं आणि ओळखीचा तर प्रश्नच नव्हता. मग त्या कर्मचाऱ्याने पुलं देशपांडेंना आणि काही पाहुण्यांना सोबत घेऊन बालगंधर्व रंगमंदिर आतून दाखवण्यास सुरवात केली. आतून बांधलेलं भव्य बालगंधर्व रंगमंदिर बघून सगळे खुश झाले. उत्साहाने सगळे नाट्यगृह बघून आले आणि बालगंधर्वांच्या चित्राजवळ येऊन थांबले. त्या कर्मचाऱ्यांना बालगंधर्व माहित नव्हते. पुलंना ओरिजिनल पुरुषी पोषाखातला फोटो दाखवून तो म्हणाला ” हे बालगंधर्व.” आणि मग शेजारच्या बाईच्या वेषातल्या बालगंधर्वांकडे बघून तो म्हणाला, ” आणि या मिसेस बालगंधर्व.”
सचिन यांनी हा किस्सा ऐकला तेव्हा त्यांच्या अशी ही बनवाबनवीची घोषणा झाली होती. आणि या किस्स्यांमधून त्यांना त्यांच्या चित्रपटातील एक सीन मिळाला होता. चित्रपटातील एका सीनमध्ये सुशांत रे म्हणजे शंतनू म्हणतो कि दादा या मिसेस बालगंधर्व का ? तेव्हा अशोक सराफ म्हणजे धनंजय माने म्हणतो कि हळू बोल कुणी ऐकलं तर मारतील. मग पुढे सांगतात कि स्त्री भूमिका करणारा असा नट दुसरा झाला नाही.

0 प्रतिक्रिया:

a