पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं.

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.
त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.
" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.
***
बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे.
त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.
नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात.
हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.

मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं.
उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात,
" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला.
पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."
हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.
अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा.
एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद.
"रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."
आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.

***
सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना.
त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या.
पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत.
आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.
पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."
हे करणा-याही सुनीताबाईच असतात !
गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.
सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं.
डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं.
पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे!
पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही.
हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती.
आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता.
कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली.
एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.
आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात...
कधी सुखावतात... कधी अस्वस्थ करतात.
- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿
( टीप :-
१) मंगला गोडबोले यांच्या पुस्तकाअखेरीस असलेला अरुणा ढेरे यांचा दीर्घ लेख खास जपावा असाच. पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचा.
२) घरात बसून राहिल्यामुळेच हे असं लेखन शक्य होत आहे. त्यामुळे कोरोना संकटाचा मी तरी ऋणी आहे. )
1 प्रतिक्रिया:
वाह !! भाई आणि सुनीताबाई , हेवा वाटावा असं नातं
Post a Comment