कित्येक वर्षापूर्वीचा पुण्यामधला एक उन्हाळा आठवतो... बजाज स्कूटर्स मध्ये ट्रेनिंग साठी तीन महिने होतो... कंपनीत संप झाल्यामुळे ट्रेनिंग खंडित... पुण्यात मी उपरा, नवीन आणि एकटा! एका रविवारी नगरपालिका वाचनालयात म. टा. मध्ये तुमचा 'जनता शिशु वर्गात आम्ही' हा लेख उभ्या उभ्या (मनात हसून हसून लोळत) वाचला, आणि डोक्यात किडा आला...त्या वयात किडे डोक्यातच थांबत नसत...फोन नंबर शोधण अगदीच सोप होत... फिरवण सुद्धा कठीण नव्हत... सुनिता बाईंनी उचलला, “तो घरी नाही, पण दोन दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा, मी सांगते भाईला लेख तुम्हाला खूप आवडला” वगैरे...
दोन दिवसांनी मी पुन्हा खरच फोन केला (संप संपला नव्हता)... या वेळी तुम्ही स्वतःच उचललात, आणि 'हो, आहे ना घरी; आत्ता लगेच येऊ शकाल का, जरूर' एवढ्या भरघोस आमंत्रणावर पुढच्या अर्ध्या तासात मी पोचलो सुद्धा! सुरुवातीला थोडी औपचारिक ओळख वगैरे करून घेतल्यावर पाच मिनिटातच, तुम्ही मी गेली कित्येक वर्ष तुमचा शेजारी असल्यासारख्या सहजपणे गप्पा मारायला सुरुवात केलीत. मी मात्र माझ्या तब्बल वीसेक वर्ष वयाच्या परिपक्वतेचा आब राखून अस्सल टीकाकाराच्या थाटात, तुमची मुलाखत घ्यायला आल्यासारखा प्रश्न विचारत होतो. '"अडला हरी" (माझा अत्यंत आवडता लेख/कथा) शिवाय तुम्ही कथालेखन अस केलच नाही, नाही?' 'नाही, काय आहे, लेखक म्हणून मला तो प्रकार फार appeal झालाच नाही कधी. गंगाधर गाडगीळाना छान जमत ते'... "काय वाट्टेल ते होईल" मधल्या 'बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज - लसणीच तिखट' ची आठवण निघाली... त्यावरून, जौर्जिअन लोकांच्या पाककृती, मेक्सिकन लोकांच तिखट खाण, हालापिन्या (jalapeno) नावाच्या महाजालीम मिरच्या, अमेरिकेतल्या चीनी जेवणाची गम्मत अश्या असंख्य गोष्टी जादूगाराच्या पोतडी मधून बाहेर येताना बघून माझे विस्फारलेले डोळे अजून आठवतात... तरीही माझ्यातला टीकाकार मागे हटत नव्हता... '"सोन्या बागलाणकर" सारख्या लेखनामध्ये वूडहाउसचा एकंदर प्रभाव जाणवतो, नाही? तुम्हाला वूस्टर किंवा एम्सवर्थ सारखे मानसपुत्र नाही करावेसे वाटले?' 'नाही, आपल्याकडे सुद्धा चिं. वि. नी केले, पण त्याला एक नेट लागतो... वूडहाउस प्रचंड ताकदीचा लेखक होता...' मग, वूडहाउस वर एक प्रदीर्घ टिप्पणी, त्याच्या कवितांचा उल्लेख, 'सुनिता, तू ऐकलयस’ (ह्यातला लेकी बोले सुने लागे भाग मला तेव्हाही कळला होता) अस म्हणून त्याची एक छोटी limerick म्हणून दाखवण...
सुनीताबाई फोन सांभाळत थोड्या थोड्या गप्पांमध्ये ही सामील होत होत्या...'कविता आवडतात का नाही?' मी नुकतच बापटांच 'मानसी' वाचल होत, त्यातल्या कवितांचा उल्लेख केल्यावर 'वा, छानच; पण ग्रेस वाचलंय का... "चंद्र माधवीचे प्रदेश"?' वरच्या माझ्या प्रामाणिक आणि बावळट 'प्रयत्न केला, पण ते चंद्राइतक्याच उंचीवरून डोक्यावरून गेले’ ह्या उत्तरावर तुमच हास्य... मग मात्र माझ्यातला अधाशी चाहता त्या स्वैर गप्पांमध्ये वाहून गेला होता, इथून पुढे मी बहुतांश श्रोत्याचच काम केल. काय नव्हत त्या गप्पांमध्ये... इतर अनेक लेखक-कवींचे उल्लेख, 'गुळाचा गणपती', सत्यजित रेंचे सिनेमे, टागोरांच्या कविता, रवींद्र संगीताच्या काही ओळी (त्या काळी मला बंगाली येत नसे, त्यामुळे नुसत्याच भक्तीभावांनी ऐकल्या होत्या)... अलिबाबाची गुहा समोर उघडलेली होती... आणि लुटून न्यायला मी एकटा, फक्त दोन डोळे आणि दोन कान घेऊन...आठवणीच्या पोतडीत भरभरून घेतलं. कसा कुणास ठाऊक पण विषय भारतीय समाजातल्या चाली-रिती, लग्न जुळवण, हुंडा वगैरे वर येउन पोचला… हुंडा मागण्याची आणि घेण्याची किळसवाणी पद्धत, त्याबद्दलचे अनेक विनोदी किस्से... माझी थट्टा 'इथे हो हो म्हणतोय, लग्नात भक्कम हुंडा वसूल करेल बघ!' (त्या विचाराचाही प्रश्नच नव्हता हो) गप्पा रंगतच जात होत्या... घड्याळाकडे माझ लक्ष नसण साहजिकच होत, पण तुम्ही - दोघांनीही - ते लक्षात न घेता केलेल्या आदरातिथ्याची कमाल वाटते... भेटायला आलेल्या एका जोडप्याला 'हा माझा तरुण मित्र मिलिंद' (कान धन्य!) अशी ओळखही करून दिल्याची आठवण हा आयुष्यभराचा ठेवा आहे.
लाज, संकोच वगैरे गोष्टींशी ज्या वयात तोंडओळख ही नसते, त्याच धिटाईनी आणि हावरटपणानी मी दोन-अडीच तास गप्पा मारत बसलो होतो... बाहेर काळोख दिसायला लागल्यावर तृप्ततेनी ओथंबून (खर तर नाही) मी जायला निघालो... वाकून नमस्कार केला... मनापासून... रस्त्यात, परतताना, या सगळ्या अद्भुत भेटीबद्दल स्वतःला चिमटे काढ काढून खात्री करून घेतली की आपण स्वप्नात नाही...तुमचे आभार मानणार पत्र लिहायचं असा निश्चय केला... प्रत्यक्षात आणायला थोडा उशीर झाला...
तुमची पुस्तकं, ध्वनी-फिती, चित्र-फिती असा हिमालयाएवढा सार्वजनिक खजिना तुम्ही मराठी समाजासाठी ठेवून गेलातच, पण माझ्यासाठी खास ह्या भेटीचे हे सुवर्णक्षण हा बापटांच्या भाषेत 'केवळ माझा सह्यकडा'! तुमच्या सार्वजनिक दर्शनानी मी अजूनही चार-चौघात सुद्धा पोट धरधरून हसतो... आणि नंतर कित्येकदा एकटा असताना ह्या अनमोल भेटीतल्या तुमच्या निरपेक्ष प्रेमाच्या आठवणींनी गहिवरतो... आजच्या दिवशी ती आठवण अटळच!
मिलिंद जोशी
0 प्रतिक्रिया:
Post a Comment