Tuesday, February 14, 2023

वेध सहजीवनाचा !

'आहे मनोहर तरी' या आत्मलेखनातून सुनीताबाईंनी पुलंसोबतच्या सहजीवनाचा वेध घेतला आहे. त्यांच्या लेखनशैलीचा हा एक संक्षिप्त परिचय...

भाई आणि मी. दोन क्षुल्लक जीव योगायोगाने एकत्र आलो. त्यानंतरचा आजपर्यंतचा आयुष्याचा तुकडा एकत्र चघळताना अनेक लहानमोठी सुखदुःखे भोगली. कधीतरी हे संपून जाईल. राहिलीच तर भाईची पुस्तके तेवढी, त्यांचे त्यांचे आयुष्य सरेपर्यंत त्याच्या मागे राहतील.

आजच्या काळातला एक मराठी लेखक म्हणून भाईचे निश्चितंच एक स्थान आहे, असे मला वाटते. तो अमक्या कवीपेक्षा श्रेष्ठ आहे का किंवा तमक्या कथालेखकापेक्षा अगर कादंबरीकारापेक्षा त्याचे स्थान वरचे आहे का, हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे सगळे स्वतंत्र वाङ्मयप्रकार. त्यांची तुलना करणेच चूक; पण भाईच्या लिखाणाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. ते सदैव ताजे, प्रसन्न, वाचतच राहा - वे, असे वाटण्याच्या जातीचे आहे, असे मला वाटते. स्वच्छंदी फुलपाखरासारखे. मनोहारी, आनंदी, टवटवीत. फुलपाखरांच्या लीलांकडे केव्हाही पाहा, लगेच आपला चेहरा हसराच होतो. ते आनंदाची लागण करत भिरभिरते. शेवटी सुबुद्ध, सुसंस्कृत मनाच्या वाचकांची मोजदाद केली. तर भाईला अशा वाचकांचा फार मोठा वर्ग लाभला आहे, हे कबूल करण्यावाचून गत्यंतर नाही. आता टिकाऊपणाचाच विचार करायचा झाला तर भरधाव वाहत्या काळाच्या संदर्भात एखादाच शेक्सपिअर, सोफोक्लिस किंवा व्यास यांच्यासारख्यांना फारतर टिकाऊ म्हणता येईल. आजच्या साहित्याला असा कस लावायचा झाला, तर त्यासाठी इतका काळ जावा लागेल, की त्या वेळी आपण कुणी तर नसणारच; पण आपल्या पुढल्या अनेक पिढ्याही मागे पडलेल्या असणार. त्यात आपण टिकणार नाही, केव्हाच विसरले जाणार, याची जाणीव भाईला स्वतःलाही पुरेपूर आहे. पण शेवटी तोही माणूसच. - स्वतःच्या हयातीतच विसरले गेलेले काही साहित्यिक किंवा समीक्षक जेव्हा त्याच्या लिखाणाला उथळ म्हणतात, तेव्हा तो नको तितका दुखावतो. 'गेले उडत!' म्हणण्याची ताकद त्याच्यात नाही. ती वृत्तीही नाही. 
जरादेखील असूयेचा स्पर्श न झालेल्या माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या आंतरमनातले सगळे स्वास्थ्य त्याला या दैवी गुणातून लाभले आहे; पण हे सुख तो प्रत्यक्ष भोगत असतानाही, साहित्याच्या अधूनमधून होणाऱ्या मूल्यमापनात त्याची क्वचित उपेक्षा झाली, की लगेच त्याची 'मलये भिल्लपुरंध्री' सारखी अवस्था होते आणि तो मग आपल्यातल्या इतर साहित्यबाह्य गोष्टींतल्या मोठेपणाला घट्ट पकडून ठेवू पाहतो. भूषवलेली पदे, केलेलं दान, मिळालेला मानसन्मान वगैरे. त्याचे चाहते त्याच्या या असल्या पराक्रमांचे पोवाडे गातात ते तो लहान मुलासारखा कान देऊन ऐकतो. ही एक मानवी शोकांतिकाच असावी. अशा वेळी मी फार दुःखी होते. वाटते, त्याला पंखाखाली घ्यावे आणि गोंजारून सांगावे, "नाही रे, या कशाहीपेक्षा तू मोठा आहेस. तुझी बलस्थानं ही नव्हेत. थोडं सहन करायला शिक म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की साहित्यिक म्हणून या आयुष्यात तरी ताठपणे उभं राहण्याचं तुझ्या पायात बळ आहे. या कुबड्यांची तुला गरज नाही." याचा उपयोग होतोही; पण तो तात्कालिक; टिकाऊ नव्हे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. त्याने ढळू नये. आपल्या मातीत पाय रोवून ताठ उभे राहावे वृक्षासारखं. आपल्या वाट्याचं आकाश तर हक्काचं आहे! माझ्यासारख्या वठलेल्या झाडाला हे कळतं, तर सदाबहार असा तू. तुझ्या वाट्याला गाणं घेऊन पक्षीही आले. तुला आणखी काय हवं?... हे असले सगळे मी डोळे मिटून सांगते; पण कान मिटता येत नाहीत. त्यामुळे मग देशपांडे घोरायला लागले की उपदेशपांडेही त्या वेळेपुरते प्रवचन थांबवून झोपायला निघून जातात.

अनेकदा वाटते, या माणसाकडून माझ्यावर थोडाफार अन्यायच झाला. तो त्याने जाणूनबुजून केला असता तर मग त्याची धडगत नव्हती. मी त्याचा बदला घेतलाच असता, मग त्यासाठी कितीही किंमत द्यावी लागो, कारण माझ्यात 'दयामाया' नाही असं नाही; पण त्या प्रांतावर 'न्याया'चं अधिराज्य आहे. त्यामुळे माझ्याकडून त्याला खासा न्यायच मिळाला असता; पण झाले असे, की त्याला प्रेम करताच आले नाही. ती ताकद यायला जी विशिष्ट प्रकारची प्रगल्भता लाभते ती वयाप्रमाणे वाढत जाते.

दुर्दैवाने या बाबतीत त्याचे वय वाढलेच नाही. तो मूलच राहिला आणि लहान वयालाच शोभणारा स्वार्थ म्हणा किंवा आत्मकेंद्रितता म्हणा, त्याच्या वाढत्या वयातही त्याच्यात वसतीला राहिली. इतर सर्व बाबतींतले त्याचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घराबाहेरच्यांना लाभले आणि हे मूलपण माझ्या वाट्याला आले.

लोकसत्ता 
संपादकीय 

0 प्रतिक्रिया: