Tuesday, March 13, 2012

आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा!

दिवंगत लेखक पु. ल. देशपांडे यांचं 'गाठोडं' हे पुस्तक नुकतच 'परचुरे प्रकाशन मंदिर'तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकातील 'मार्मिक'च्या चौथ्या वाढदिवसाला उपस्थित न राहता आल्याबद्दल पुलंनी बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या बंधुंना पाठवलेलं हे 'मार्मिक' पत्र...

१४ ऑगस्ट १९६४
वरळी, मुंबई १८

प्रिय बाळ आणि श्रीकान्त,

तुम्हां दोघांपैकी कुणाच्याही हातात सापडलो असतो, तर आजच्या 'मार्मिक'च्या वाढदिवसाला मोठ्या आनंदाने अध्यक्षीय पगडी घालून बसलो असतो. तो योग हुकल्याचे मला खरोखरीच दु:ख होत आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमाची सुपारी आधीच घेतल्यामुळे येता येत नाही. म्हणून ह्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी तुम्हांला, 'मार्मिक'ला, श्री. द. पां. खांबेटे आदी करोन तुमच्या समस्त सहकारी मंडळींना 'आयुष्यमान व्हा - यशस्वी व्हा' असा आशीर्वाद देतो.

अध्यक्ष म्हणून जे चार शब्द सांगितले असते, ते पत्रातूनच सांगतो. ह्या शब्दांना थोडा वडिलकीचा सूर लागला असला, तर रागावू नका. तो सूर थोडासा अपरिहार्य आहे. कारण आजही तुम्ही दोघे जण माझ्या डोळ्यांपुढे येता ते आपापली दप्तरे आणि अर्ध्या चड्ड्या सावरीत शाळेत येणारे दोन चुणचुणीत आणि काहीसे खट्याळ विद्यार्थी म्हणूनच. बाळने शाळेची हस्तलिखित मासिके सजवायची आणि श्रीकान्तने व्हायोलिन वाजवून गॅदरिंगमध्ये टाळ्या मिळवायच्या, हे तुमचे पराक्रम तुमच्या चिमुकल्या वयात मी पाहिले आहेत.

कुठल्याही कलेतला का असेना 'झरा मूळचाचि खरा' असावा लागतो, तरच तो टिकतो. उदाहरणच द्यायचे तर मार्मिकमधून येणारे तीर्थस्वरूप दादांचे आत्मचरित्रच पाहा. त्यांनी ऐन जवानीची वेस ओलांडल्याला कित्येक वर्षे लोटली, पण जन्माला येतानाच नसानसांतून वाहणारा त्वेष आजही टिकून राहिला आहे. अन्याय दिसला की तारुण्यातला हा तानाजी वार्धक्यात शेलारमामासारखा उठतो आणि स्वत:ला उदय भानू म्हणवणारे ते चिमटीत चिरडण्याच्या लायकीचे काजवे आहेत हे दाखवून जातो; आणि म्हणूनच वृत्तपत्रव्यवसायातच काय पण सर्वत्रच प्रलोभनकारांचा सुळसुळाट झालेल्या ह्या अव-काळात हा प्रबोधनकार आजही निराळा उठून दिसतो.

हे व्रत खडतर आहे. आपल्या हातून या व्रताचे पालन किती काटेकोरपणाने होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याचा आजचा हा दिवस आहे. सुदैवाने असले निर्दय आत्मपरीक्षण करायला लागणारी विनोदबुद्धी तुम्हांला उपजत मिळाली आहे. निर्मळ विनोदबुद्धी हे देवाच्या देण्यातले एक ठेवणीचे देणे आहे. मत्सर, पूर्वग्रह, क्षुद्रता, वैयक्तिक हेवेदावे असल्या संकुचित आणि स्वत:लाच दु:खी करणाऱ्या भावनांपासून ह्या देण्यामुळे माणूस दूर राहतो; आणि म्हणूनच निर्मळ विनोदाचा उपयोग जेव्हा शस्त्र म्हणून करायचा, तेव्हा व्यक्तीचा द्वेष न राहता, वृत्तीतला दोष दाखवणे हे मुख्य कर्तव्य राहते. आणि जेव्हा व्यक्तिद्वेष नसतो, तेव्हाच निर्भयता येते. तोंड चुकवून पळावे लागत नाही किंवा स्वत:च्या क्षुद लिखाणाचे त्याहूनही दुबळे असे समर्थन करीत बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागत नाही. सभ्यतेचा धर्म सोडून वर्म हुडकीत बसणे, हे अत्यंत क्षुद मनाचे लक्षण आहे. इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोषदिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाराला इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सभ्य सीमारेषा कुठली, त्याचे तारतम्य हवे. घाव असा हवा की, मरणाऱ्याने मरतामरता मारणाऱ्याचा हात अभिनंदनासाठी धरावा. शेतातले काटे काढताना, धान्याची धाटे मोडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे स्वरूप नीट पारखता आले पाहिजे. व्यंगचित्राने प्रथम हसवले पाहिजे. थट्टेमागे आकस आला, विनोदात कुचाळी आली की ते व्यंगचित्र निर्मळ पाण्यात रंग न कालवता गटारगंगेच्या पाण्याने काढल्याची घाण येते. उत्साहाच्या आणि गंमत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडण्याच्या भरात आपणा सर्वांच्या हातून मर्यादांचे उल्लंघन होते. सुदैवाने तुमच्यावर डोळा ठेवायला दादा आहेत. त्यांच्या स्वत:च्या हातून लेखनात मर्यादांचे जे उल्लंघन झाले असेल, ते तुम्हांला खिलाडूपणाने सांगण्याचे धैर्य त्यांना आहे. तुमचे भाग्य म्हणून तुम्हांला साक्षात जन्मदाताच गुरू म्हणून लाभला; पण गुरू जितका समर्थ, तितकी शिष्याची जबाबदारी अधिक.
                                
' मार्मिक'च्या छोट्याशा कारकिदीर्तल्या कार्याचा आढावा घेण्याचा माझा हेतू नाही, परंतु गेल्या वर्षातल्या तुमच्या ठळक कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. दोन-तीन बाबतींत मला तुमचे अभिनंदन करावेसे वाटते. शब्दस्पर्धा क्षेत्रांतली लबाडी तुम्ही उघडकीला आणलीत, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. जुगाराला माझा विरोध नाही, पण तो खेळणाराने आणि खेळवणाराने हा जुगार आहे म्हणून खेळावे व खेळवावे. धर्मराजसुद्धा द्यूत हे द्यूत म्हणूनच खेळले. धर्मयुद्धासारखे ते धर्मद्यूत होते. पण ह्या शब्दकोड्यांच्या जुगारातून साहित्याची गोडी लागते, हे वाचून मात्र मी थंड पडत होतो. असल्या जुगाराला साहित्य प्रचाराचे साधन म्हणून परवानगी देणाऱ्या आपल्या राज्यर्कत्यांच्या निष्पाप मनाचे कौतुक करायला हाती मीठमोहऱ्याच हव्यात.

' मार्मिक'मधले माझे दुसरे आवडते सदर म्हणजे, सिने-प्रिक्षान. वास्तविक सिनेमा हे तर नियतकालिकांचे 'डोंगरे बालामृत' आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या जाहिरातींवर नियतकालिके बाळसे धरतात. त्या भूगंधर्वनगरीतल्या यक्षयक्षिणींना आणि त्यांच्या कुबेरांना प्रसन्न ठेवण्याची अहमहमिका लागलेली दिसते. मराठी भाषेत तर आता नवी विशेषणे निर्माण करण्याची वेळ आली आहे. महान शब्द केव्हाच लहान झाला. कलामहर्षी तर बाबूलनाथाच्या पायरीवरच्या बैराग्यांइतके वाढले आहेत. अभिनयाचे सम्राट आणि सम्राज्ञी वृत्तपत्रीय स्तंभास्तंभांना टेकून उभ्या आहेत. अशा वेळी बोलपटांतले कचकडे उघडे करून दाखवणे हे किती अव्यवहार्य धोरण; पण तुम्ही ते पाळले आहे, याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.

जगातल्या कुठल्याही चांगल्या व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींशी तुलना केल्यावर उणेपण वाटू नये, असे गुण तुमच्या व्यंगचित्रांमध्ये आहेत. आवश्यक निर्भयता आहे. रेखाटणांत विलक्षण सहजता आहे. आमच्या बोरूच्या बहादुरीपेक्षा तुमच्या कुंचल्याची शक्ती दांडगी. दोन रेषांत तुम्ही मी-मी म्हणवणाऱ्याला लोळवू शकता. कुठल्याही स्तंभलेखकापेक्षा तुमचे सार्मथ्य मोठे; पण सार्मथ्य जितके मोठे, तितके ते किती बेताने वापरावे, याची जबाबदारीही मोठी.

अत्यंत जिव्हाळ्याने तुम्हांला मी हे पत्र लिहीत आहे. त्यामुळे काही धोक्याच्या सूचना दिल्या, तर रागावू नका. हे पत्र आहे, मानपत्र नव्हे. शिवाय तुमच्या बाबतीत मास्तरकीची माझी जुनी छडी थोडा वेळ पुन्हा हाती धरतो. स्तुतीचा 'वा'देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा. भलत्या ठिकाणी 'वा' दिल्यावर 'नर'देखील 'वानर' होण्याची भीती असते. सिनेप्रिक्षान, ती. स्व. दादांची आत्मकथा किंवा खांबेट्यांचा गुरू-बाजीची करुण कहाणी सांगणारा लेख, असले अपवाद वजा केले, तर लेखी मजकूर तुमच्या व्यंगचित्रांच्या तोडीचा होत नाही. चित्रे इतकी चांगली आणि लेखी मजकूर मात्र सामान्य. विनोदी लेख तर कित्येकदा केविलवाणे असतात. चांगले आणि हुकमी विनोदी लेखन ही दुमिर्ळ गोष्ट आहे. अशा वेळी कै. दत्तू बांदेकरांची आठवण होते. माझ्या मते कै. दत्तू बांदेकर हे मराठी पत्रसृष्टीतील एकमेवाद्वितीय असे विनोदी स्तंभलेखक. विनोदी लिखाणाच्या दृष्टीने अधिक जोरदार खटपट हवी.

दंभस्फोटाच्या वेळी तुमच्या संपादकीय विभागातल्या लेखण्यांना धार चढते; परंतु काही वेळा जिथे चापटीने भागेल, तिथे तुम्ही एकदम दात पाडायला निघू नये. अलीकडेच कॉलेजातल्या टेक्स्ट बुकातील धड्यांसंबंधीचा लेख मला असाच भडकून लिहिल्यासारखा वाटला. तुमचा हेतू प्रामाणिक होता. यौवनाच्या उंबरठ्यावरच्या पोरांना अगदी सिनेमातले हिरो अगर हिरोइन बनवणारे शिक्षण देऊ नये हे खरेच. तसे ते कॉलेजातून दिलेही जात नाही. खरे म्हणजे विद्यार्थ्यांनी काय व्हावे, काय होऊ नये याची चिंता करण्यात आपली प्राध्यापक मंडळी वेळ फुकट घालवीत नाहीत; गाइडे लिहिण्यात त्यांचा किती वेळ जातो, याची तुम्हांला कल्पना नाही. इंटरला शेक्सपिअरचे रोमिओ-ज्युलिएटही असते, संस्कृत नाटकांत शृंगार असतो. 'कातरवेळ' ही मराठीतली एक अतिशय सुंदर कथा आहे. षोडश वर्षे प्राप्त झाल्यावर पुत्रांशी मित्रांसारखे वागा, असे शास्त्रवचन सांगते. पोरांचे 'हिरो' होऊ नयेत, पण त्यांचे 'मोरू'तरी का करावेत? तात्पर्य, तुमच्या व्यंगचित्रांच्या सोयीसाठी नाक ओढताना उगीचच गळा आवळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. उत्साहाच्या भरात तारतम्य सुटू नये. विनोदी लेखक-चित्रकारांचे तर अजिबात सुटू नये. लोक तारतम्य सोडतात, तिथे विनोदी लेखकाचे काम सुरू होते. थोडक्यात म्हणजे गुळगुळीत करावी, पण रक्त न काढता! ज्याची झाली, त्यालादेखील आपण 'स्वच्छ' झालो; असे वाटले पाहिजे.

तुम्हांला उत्तरोत्तर यश मिळो आणि त्या वाढत्या यशाबरोबर 'अहंकाराचा वारा न लागो, पाडसा माझ्या विष्णुदासा, नामदेवा'!

ह्या प्रसंगी श्री. द. पां. खांबेटे यांचे व तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या यशात तुमच्या मातापित्यांच्या आशीर्वादाइतकाच त्यांच्या सहकार्याचाही वाटा आहे. वडिलांच्या तेजस्वी लेखनाची परंपरा चालू ठेवा आणि व्यंगचित्र साप्ताहिकाचे रामलक्ष्मण होऊन दुष्टांचे निर्दाळण करून सुष्टांच्या सदिच्छांचे मानकरी व्हा, असा आशीर्वाद केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन देतो.

प्रत्यक्ष हजर राहता न आल्याबद्दल राग मानू नका, असे पुन्हा एकदा सांगून आणि मार्मिकच्या पंचविसाव्या वाढदिवसाला तुम्हां दोघांच्या हाती लागून, नव्हे हातांचा आधार घेऊन व्यासपीठावर प्रत्यक्ष येऊन भाषण करीन, असे आश्वासन देऊन हे लांबलेले पत्र संपवतो.

तुमचा,
पु. ल. देशपांडे

महाराष्ट्र टाईम्स
११ मार्च २०१२
(हा लेख पु.ल.प्रेम ब्लॉगसाठी सुचवल्याबद्दल श्री धीरज पाटील आणि श्री चंद्रशेखर मोघे ह्या पु.ल.प्रेमींचे मन:पूर्वक आभार)