पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Friday, November 14, 2014
चिरंजीव
काही माणसं "गेली" असं म्हणवत नाही. मुळात ती गेली आहेत ह्यावरच विश्वास बसत नाही. कारण ती रोज आपल्या बरोबर असतात. ती कुठल्या क्षणी कुठल्या कारणासाठी आपल्या आसपास प्रकट होतील सांगता येत नाही. भाई, तुम्ही "जाऊन" १४ वर्ष झाली असं म्हणायला अजूनही जीभ रेटत नाही ... यापुढेही रेटणार नाही. जोवर तुमच्या चाहत्यांच्या संग्रहात - व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, गणगोत, पूर्वरंग, अपूर्वाई आणि अशी अजून ढीगभर पुस्तकं किंवा निदान यातलं एक पुस्तक जरी असेल तोवर तुमचं चिरंजीवीत्व अबाधित आहे.
खरं सांगायचं तर दु:ख एकाच गोष्टिचं आहे, समोरा समोर तुम्हांला कधी ऐकायला, बघायला, भेटायला नाही मिळालं. २००० साली तुम्ही "गेलात" असं लोकं जे म्हणतात .... तर ... त्यावेळी नुकतेच पुलं वाचायला लागलो होतो. म्याट्रिक मध्ये आम्हांला तुमचा "अंतु बर्वा" होता, अर्थात शालेय पुस्तकातील जागा, त्या वयातली मुलांची विनोद समजण्याची कुवत हे सगळं बघुन परीक्षेच्या हिशोबाने ५-७ मार्कांपुरता ठेवुन बरीच काटछाट करुन तो आम्हांला दिला होता. तिथुन पुलं वाचायला सुरुवात झाली होती. मी आजही तुम्ही लिहिलेलं एक आणि एक अक्षर वाचलंय, साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात वगैरे गटणे स्टाइलने काही बोलणार नाहीये, कारण ते तसंच आहे. मी अजून पोरवय, वंगचित्रे, जावे त्यांच्या देशा, गांधीजी वगैरे पुस्तकं अजिबात वाचली नाहीयेत. मला तुम्ही अनुवादित केलेलं "एका कोळियाने" आवडलं नव्हतं( .... किंवा मी ते वाचलं तेव्हा समजुन घेण्याचं माझं वय नव्हतं अस देखिल म्हणता येईल.). आणि हे तुम्हांला मी हक्काने सांगु शकतो.
लोकं तुम्हांना "विनोदी" लेखक म्हणून ओळखतात हा तुमच्यावर लादलेला आरोप आहे. तुम्ही लिहिलेली रवींद्रनाथ : तीन व्याख्याने, किंवा रेडिओवरती तुम्ही केलेली भाषणे जी पुढे पुस्तकांच्या रुपाने २ भागात प्रसिद्ध झाली ती वाचून केवळ विनोदि लेखक म्हणणे हा सरळ सरळ आरोप होईल. "हसवणूक"च्या मुखपृष्ठावरचा त्या लालचुटूक नाकाच्या विदूषकाचा तुम्ही धरलेला मुखवटा लोकांनी तुमच्या चेहर्यावर फिक्स करुन टाकला. पण विनोद हे तुमचे केवळ माध्यम होते. खर्या अथवा काल्पनिक व्यक्तीचित्रांतील विनोदामागची विसंगतीने भरलेली ठसठसती जखम फार नाजूकपणे उघडी केलीत. कधी कधी तर व्यक्तिचित्रणातले चटका लावून जाणारे शेवटचे वाक्य लिहिण्याकरता आधीचं अख्खं व्यक्तीचित्रण लिहीलत असं वाटून जातं. तशीच वेगवेगळ्या प्रसंगात अनेक व्यासपिठांवरुन तुम्ही केलेली भाषणे ऐकून तुम्हांला किती लहान लहान बाबतीत समाजाचं सजग भान आहे हे समजतं. तुमच्या विनोदाने कधी कोणाच्या मनावरती ओरखाडा काढला नाही. मात्र आणिबाणीच्या काळात त्याच विनोदाला धारदारपणा आणायला तुम्ही बिचकला नाहीत. माझ्या सारख्या लाखो टवाळांना खर्या अर्थाने विनोद आवडायला लावलेत. त्यांनाही "कोट्याधिश" बनवलंत.
हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्यासाठीच की माझ्यात जे काही थोडंफार शहाणपण, सामाजिक भान आहे, "माणूस" म्हणून समोरच्याला समजुन घ्यायची इच्छा आहे त्यात माझ्या आजी-आजोबा, आई-वडील, अत्यंत जवळचे नातेवाईक यांच्या शिवाय तुमचाही वाटा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचतय यावरही माझा विश्वास आहे. कारण तुम्ही कुठल्याही क्षणी आसपास प्रकट होऊ शकता हे मला माहीत आहे, अगदी कधीही .... आत्ता यशोधनला पुण्यात फोन लावला तर "हॅलो" ऐवजी दुपारची झोपमोड झाल्याने आवाजाला जो नैसर्गिक तुसडेपणा येतो त्याच तुसड्या आवाजात "काय आहे???" विचारेल तेव्हा ..... किंवा यमी पेक्षा सहापट गोरा असलेला माझा मित्र भेटल्यावर ...... ट्रेकला गेल्यावर चिखल - मातीत उठबस करुन आमची चड्डी शंकर्याच्या चड्डीहुनही अधिक मळखाऊ होईल तेव्हा ..... कुणी नव्याने बांधायला घेतलेले घर दाखवायला नेईल तेव्हा ....... किंवा अगदी पानवाल्याच्या गादिसमोर उभे असू तेव्हा देखिल तुम्ही आसपासच असाल. कारण आधीच म्हणालो तसे तुम्ही "चिरंजीव" आहात.
- सौरभ वैशंपायन
Labels:
PL Deshpande,
Pula,
pulaprem,
आठवणीतले पु.ल.,
चाहत्यांचे पु.ल.,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 प्रतिक्रिया:
Well said.... Aapan kharach khup bhagyawan aahot ki aaplyala Pu La'ncha prem prapt zaalay !!! Dhanya zaalo ki mi boloto marathi !!!
Post a Comment