Wednesday, June 24, 2026

सुनीताबाईंचा 'डोडी'

फोटोत सुनीता बाई आपल्या आवडत्या डोडी बरोबर आहेत. त्यांच्या नावाने त्यांनी प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी पण दिली होती. 


"मण्यांची माळ" या पुस्तकात सुनीता बाई नी डोडी च खूप छान वर्णन केलं आहे.

त्यातलाच काही अंश "डोडी खरोखरंच देखणा कुत्रा आहे. काही कुत्री केसाळ असतात. त्यांच्यासारखे डोडीचे केस खूप लांब नाहीत. बेताचेच लांब आहेत. सोनेरी रुपेरी काळसर असं काहीसं रंगाचं सुंदर मिश्रण असलेले केस, चकलीसारखी, सदैव गोल गोल गुंडाळलेली शेपटी, आपल्यातलं कुणी आल की पंख्यासारखी ती चकली हलवत ठेवत आनंद व्यक्त करण्याची व्यक्त करण्याची तह, त्याचं रुसण, सर्व काही मला मोहून टाकतं. रांगत्या मुलाची लाळ गळत असते, तरी आपल्याला ती मुलं अस्वच्छ वाटतं नाहीत, त्यांना उचलून घ्यावं, त्यांचे पापे घ्यावे, असाच काही तरी निरागस भाव त्यांच्या त्या उघड्या तोंडावर असतो. डोडीच्या बाबतीत माझी तशीच गत होते."

-मधुरा कुलकर्णी


‘पुल’कित स्पर्श (संदीप गजानन श्रोत्री)

आम्ही २१ सप्टेंबर १९८४ या दिवशी थंडीत कुडकुडत पण छातीत धडधडत सकाळी सात वाजता पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील ‘रुपाली’ अपार्टमेंट मधील एक नंबरच्या फ्लॅट समोर उभे होतो. बेल वाजवली. दरवाजा उघडला तो डॉ. जब्बार पटेल यांनी. तीन खोल्यांचा तो फ्लॅट, आत हॉलमध्ये एका सोफ्यावर जाड काड्यांचा चष्मा आणि शेवाळी-हिरव्या रंगाचा स्वेटर घालून ‘पुल’ अर्थात ‘भाई’ बसले होते, समोर बालभारती संस्थेचे काही अधिकारी बसले होते. थेट मिरजहून सह्याद्री एक्स्प्रेसने आलो, असे समजून सुनिताबाईनी आम्हाला स्वैपाकघरात बोलावले. चहा-पाणी, नाष्टा आमचे तिथेच झाले.

त्या दिवशी लोकसभेसाठी मतदान होते. त्यामुळे पुलंना मतदानासाठी नेण्याची राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ चालू होती. पुलंची ती बैठक तब्बल चार तास चालली होती. त्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर बसलो. ‘पुलं’पेक्षा सुनीताबाई आमच्याशी कार्यक्रमाच्या तपशिलाविषयी सांगत होत्या. कार्यक्रम होता, ‘एक आनंदयात्रा कवितेची’. आम्ही दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचा प्लॅन घेऊन गेलो होतो. त्यांनी सगळी माहिती आमच्याकडून घेतली. कार्यक्रमाचे बारकावे, येणाऱ्या प्रेक्षकांच्या अपेक्षा विचारल्या. आम्हाला काही सूचना केल्या. कार्यक्रम कवितेचा असल्यामुळे ‘लहान मुलांना प्रवेश नाही, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु झाल्यावर कोणाला आत किंवा बाहेर ये-जा करता येणार नाही, मुख्य म्हणजे कार्यक्रमाचे तिकीट दहा रुपयांपेक्षा जास्त लावायचे नाही, विलीन्ग्डन कॉलेजच्या मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे’, या त्यापैकी काही प्लॅनवरील अगोदरच केलेल्या लाल फुल्या बघून त्यांनी चौकशी केली. त्या खुर्च्या नगरपालिका, पोलीस आणि कलेक्टर यांच्यासाठी राखीव आहेत असे सांगितल्यानंतर पुलंनी कपाळावर हात मारून घेतला होता आणि म्हणाले, “एखादी सुंदर स्त्री आपल्याकडे पाहताना मध्येच हसली आणि तिचे पुढचे चार दात पडलेले दिसावेत, तसे पडदा उघडला आणि भरगच्च सभागृहात पुढच्या चार-पाच रांगेतील या ‘सरकारी’ रिकाम्या खुर्च्या पहिल्या कि व्यासपीठावरून आम्हाला वाटते”, अशी एक परफेक्ट कॉमेंट केली होती. तब्बल सात तास आम्ही त्यांच्या घरी होतो. शेवटपर्यंत त्यांनी मानधनाचा विषय काढला नाही. शेवटी मीच भीतभीत त्यांना विचारले. त्यावर सुनिताबाईनी ‘तुमचा सगळा खर्च वजा जाता उरलेली रक्कम द्या’, असा धक्कादायक आणि तितकाच आनंददायक बॉम्ब टाकला. आम्हाला त्यांचे मानधन लाखाच्या घरात (१९८४ साली) असते एवढेच माहित होते. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो, पण झाले उलटेच. मोठ्या आनंदांत आम्ही मिरजला आलो. तारीख ठरली होतीच. कार्यक्रमाचा आणि संपूर्ण दिवसाचाच अक्षरशः ‘मिनिट टू मिनिट’ तपशील काढला. पुल-सुनिताबाईना आणण्यासाठी कोल्हापूरला आदल्या दिवशी आम्ही जाणार होतो. त्याच दिवशी त्यांचा तेथील हाच प्रयोग बघणार होतो. आम्ही त्यांच्यासाठी आमच्या कॉलेजपलीकडील ‘गेस्ट हाउस’ मधील एक ‘सूट’ आरक्षित केला होता. तिथेच सर्वाना रात्रीचे जेवण होते.
 
प्रत्यक्ष कार्यक्रमाची तारीख होती ३१ जानेवारी १९८५, परंतु त्यादिवसाच्या कितीतरी अगोदर आम्ही तयारीला लागलो होतो. सर्वात कटकटीचा आणि डोकेदुखीचा मुद्दा होता तो तिकीट वाटपाचा. तिकिटे विकली जाणे हा मुद्दाच नव्हता. ती कोणाला किती द्यायची हाच खरा प्रश्न होता. प्रत्येक डॉक्टरला जादा पासेस हवे होते. आम्ही प्रत्येकाला जास्तीतजास्त फक्त दोन तिकिटेच द्यायची असा निर्णय घेतला. भाईंच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही खरेच विलिंग्डन कॉलेजमध्ये गेलो, तिथे प्राचार्यांना भेटून एम.ए.मराठी च्या विद्यार्थ्यांना तिकिटे घ्यायला लावली. शांताबाई किर्लोस्कर, प्रा.दिलीप परदेशी, अंधकवी राम गोसावी, औदुम्बरचे कवी सुधांशू, आदी कितीतरी मान्यवर या कार्यक्रमाला येणार होते. त्यावेळच्या जिल्हाधिकारी सौ.लीना मेहेंदळे, पोलीस अधीक्षक श्री पुरुषोत्तम जाधव हे साहित्यरसिक होतेच. परंतु त्यांनासुद्धा आम्ही जादा तिकिटे देऊ शकलो नाही. माझ्या खोलीवरच सगळी तिकिटे विकली गेली होती. दीनानाथ नाट्यगृहासमोर तीन दिवस अगोदर तिकिटासाठी रांग लागलेली आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिकिटे न मिळाल्यामुळे अनेक रसिकांचे शिव्याशाप आम्ही त्या काळी घेतले होते. अनेक ‘व्हीआयपी’चा दबाव आम्ही झुगारून लावला होता. कॉलेजच्या प्राध्यापकांनी सुद्धा आम्हाला आग्रह किंवा आमच्यात ढवळाढवळ केली नाही. डॉ. दयानंद नाईक माझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीर उभे होते. डॉ.दत्ता कुंभार यांच्याकडे छायाचित्रे काढण्याची जबाबदारी होती.
 

कार्यक्रम सुरु होण्याच्या अगोदर एक तास भाई आणि सुनीताबाई दीनानाथ नाट्यगृहात आले. व्यासपीठावर भाई बसले आणि सुनीताबाई त्या नाट्यगृहाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जावून आवाज व्यवस्थित येतो का त्याची खात्री करत होत्या. भाईनी त्यावेळी ‘चपल तुझे चरण जरा’ हि कविता गायली होती. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर फोटो काढायला परवानगी नव्हती. कार्यक्रमाचे रेकोर्डिंग करण्यासाठी कोल्हापूरहून इच्छुक लोक आले होते परंतु भाईनी त्यांना विनम्र नकार दिला होता. प्रचंड गर्दी बाहेरच्या आवारात झाली होती. पोलीस व्यवस्था चोख होती. बाहेर जादा माईकची सोय केली होती. आमच्या कार्यकारिणीतील वर्गमैत्रिणी वर्षा शिराळकर (काणे), किमया शहा, विनिता बहेकर (कुलकर्णी) यांनी फार मोठी जबाबदारी मोठ्या हौसेने पार पाडली होती. नाट्यगृहात उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्रीवर्गाला गजरे देवून आणि अत्तरदाणी-गुलाबदाणीच्या पाण्याचा शिडकावा करून वातावरण सुगंधी केले होते. कार्यक्रम सुरु झाला त्यावेळी मधु गानू हे भाईंचे मित्र आणि सहाय्यक, मी आणि धनंजय खानोलकर विंगेतच होतो. ध्वनिव्यवस्था श्री आठवले यांच्याकडे होती. कार्यक्रम बरोबर दिड तास चालला. आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो.

कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर जमलेल्या लोकांना त्यांच्या विनंतीवरून मागील दरवाज्याने पुलंचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आत सोडले होते आणि पुढील दरवाज्याने आतील लोकांना बाहेर सोडले होते. त्या गर्दीतून भाई माझ्या खांद्यावर हात ठेवून बाहेर गाडीत आले होते. रात्रीचे भोजन म्हणजे तर एक वेगळा समारंभच होता. भाईंच्या आवडीचे मासे गोव्यावरून मागवले होते आणि हेल्थ रेझोर्टचे श्री सामंत या ‘सारस्वतां’कडून बनवून घेतले होते. त्याला भाईनी सुद्धा दाद दिली होती. त्यानंतर ‘फोटोसेशन’ झाला. मानधनाचे पाकीट त्यांच्या हाती देताना त्यांनी ‘किती रुपये आहेत?’, ते न विचारता पुन्हा पुन्हा ‘सर्व खर्च वजा केला का?’ ते विचारले. रात्री अकरा वाजता रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्स्प्रेसच्या पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये त्या दोघांना बसविले. पाया पडून त्यांचा आशीर्वाद आणि निरोप घेतला. आणि मिशनच्या चौकात सायकली पळवत आलो ते थेट कुमारच्या टपरीवर शांतपणे चहा प्यायला. एक स्वप्न पूर्ण झाले होते. खरे म्हणजे आजही त्या स्वप्नातून बाहेर यावेसे वाटत नाही.

पुढे भविष्यात ‘पुलं’ची सुद्धा दोन वेळा गाठ पडली, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज भेटले. परंतु मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्या दीड वर्षातील त्या आठवणी आजही तशाच लख्ख ताज्या आहेत. अत्तराच्या कुपिमध्ये त्या हृदयात बंद आहेत, केंव्हातरी वाऱ्याची झुळूक येते, ती कुपी थोडीशी उघडली जाते. आतील पुलकित आठवणीरुपी अत्तराच्या सुगंधी वासाने तन आणि मन धुंद होते. ओठावर ‘गदिमां’ची मला अत्यंत आवडती ओळ येते,


“लुटुनी नेसी काय काळा, सौख्य माझे मागले, भोगले ते भोगले”.
 
- डॉ. संदीप गजानन श्रोत्री, एम.एस.

Monday, April 20, 2026

मोठ्यांच्या गोष्टी - (दिलीप प्रभावळकर)

..पुलंच्या वेळी असंच झालं. माझ्या मनात, डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा होती एका परफॉर्मरची. त्यांचं एवढं साहित्य (पुनःपुन्हा) वाचूनही त्यांच्या 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात' या कार्यक्रमांचा विलक्षण प्रभाव पडल्यामुळे आकाराला आलेली प्रतिमा... त्यांच्या विविध क्षेत्रांतल्या असामान्य कामगिरीमुळे आणखी पक्की झालेली.

त्यांच्या 'बटाट्याची चाळ' या बहुरूपी कार्यक्रमाचा प्रभाव तर इतका होता की मला तो एक 'चमत्कार' वाटला. एक कलाकार तीन तास प्रेक्षकांना खिळवून कसा काय ठेवू शकतो याचं मला मोठं नवल वाटलं होतं. आपणही असं काही करायला हवं वाटण्याऐवजी, हेच करायला हवं असं वाटलं. आणि मी पुलंचा प्रयोग पुन्हा पुन्हा पाहून आणि 'बटाट्याची चाळ' मधले लेख वाचून त्यातला 'भ्रमण मंडळ' हा भाग चोख पाठांतर करून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात सादर केला. त्याचं कौतुक झालं. माझ्या अंगात उत्साह संचारला! मला वाटलं, आता कोणी सांगितलं, बोलावलं की करून दाखवायला हरकत नाही. 'दाभोळकर ऑप्टिशियन' आमच्या कॉलनीत राहायचे. त्यांच्या दुकानात जाऊन मी पुलंसारखा चष्माही करून घेतला. कॉलनीतल्याच एकदोघांनी मला त्यांच्या ऑफिसच्या वार्षिक समारंभाला हे सादर करायला बोलावलं. मग एकदा आमच्यासमोर राहणाऱ्या एका वकिलांनी मला विचारलं, 'काय रे तू पुलंना भेटलायस का?' 'नाही हो. फार इच्छा आहे. पण कसं जाणार?' 'मग हे त्यांचं भ्रमण मंडळ कसं करतोयस? परवानगी घेतली आहेस?' मला यासाठी परवानगी घ्यायची असते याची कल्पना नव्हती. 'सुनीताबाई केस करतील,' त्यांनी इशारा दिला. माझ्या उत्साहाला तात्काळ ब्रेक लागला. (मी चष्माही परत केला.) पण मग पुलंची भेट झाली, (त्या वयात) स्वप्नवत वाटणारं 'दर्शन' घडलं ते पक्कं आठवतं.

पार्त्याच्या एका सभागृहात श्री. ना. पेंडसे लिखित 'राजेमास्तर' या नाटकाचा पुलंच्या हस्ते मुहूर्त होता. तिथे मला माझ्या बाबांचे मित्र घेऊन गेले. त्यांनी माझ्या संग्रहातली पुलंची पुस्तकं - तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळीच्या सगळी पाहिली होतीच,

शिवाय पुलंविषयी वर्तमानपत्रात आलेला मजकूर, त्यांची भाषणं या सगळ्याची मी व्यवस्थित कापून वह्यांमध्ये चिकटवलेली कात्रणंही पाहिली होती! (त्यांना ते 'वेड' बघून हसूच फुटलं होतं!) 'पुलंना भेटायचंय तुला? माझे मित्र आहेत ते.' असं त्यांनी म्हटल्यावर मला जवळजवळ हर्षवायूच झाला होता. 'राजेमास्तर'च्या मुहूर्ताच्या वेळी 'दर्शन' झालं! पुलंना पाहिल्याबरोबर वाटलं, आपल्यासमोर जी प्रतिमा होती, तसेच तर हे एरवीही दिसतात की! आनंदी, मिश्किल परफॉर्मर ! त्यांच्या अभिनयाच्या आणि संगीताच्या कर्तृत्वापेक्षा, वक्तृत्वापेक्षा त्यांचं साहित्यच आठवत राहिलं. परिच्छेदच्या परिच्छेद, वाक्यंच्या वाक्यं... विनोद एकापाठोपाठ एक ! कुडाळकरकाकांनी ओळख करून दिली. आता मला तो प्रसंग आठवला की वाटतं, त्यावेळच्या माझ्यात पुलंच्याच 'सखाराम गटणे' या पात्राची लक्षणं दिसत होती की काय? अर्थात मी 'कृत्रिम' किंवा 'छापील' बोलत नव्हतो. काही बोलतच नव्हतो. कुडाळकरकाकाच पुलंना म्हणाले, 'बरं भाई, येतो आम्ही.' पुलंनीच माझा हात हातात घेऊन 'बरं भेटू या हं' म्हटलं.

त्यानंतर काही काळानं आम्ही बऱ्याचदा भेटलो. तालमीत प्रयोगांआधी नाटकांच्या नंतर - त्यांच्या घरी नाट्यगृहांमध्ये. त्या आठवणी आहेतच. पण पहिल्या 'दर्शना'ची आठवण खास आहे.

या मनातल्या प्रतिमेशी बरोबर जुळणाऱ्या व्यक्ती. पण असेही भेटले, जे कल्पनेतल्या रूपाला छेद देणारे होते. प्रत्यक्षातले अगदीच वेगळे. आश्चर्यच वाटावं, चकित व्हावं, अविश्वास वाटावा असे. त्याबद्दल पुढच्या वेळी.

- दिलीप प्रभावळकर
मूळ स्रोत - मुंबई टाइम्स 


Thursday, March 26, 2026

चांदण्यांची झाडं - (ना. धों. महानोर)

माघी पौर्णिमेची रात्र. अतिशय सुंदर, स्वच्छ चांदण्यांचं आकाश. निरभ्र आकाश. भक्कम असा चांदण्यांचा प्रकाश. हलका थंड गारवा. हवेत व मोसंबीच्या बागेतही. एक हजार झाडं-फळांनी लदबदलेली. सोळा सोळा फूट अंतरावर दहा वर्षांची, एका रांगेत उभी असलेली, छान उठून दिसणारी मोसंबीची बाग. गारवा झिनमिन अंगभर चिपकणारा. मोसंबीच्या फुलांचा घनदाट दरवळ. सगळा आसमंत सुगंधित करणारा. दहा, अकरा, बारा वाजता वाढत जाणारी रात्र. लहानशा गवताच्या झोपडीजवळ मोसंबीच्या बागेत उतरलेलं माघी पौर्णिमेचं स्वच्छ निरभ्र चांदणं. शांत एकान्त. मध्येच वाऱ्यावर वाहत येणाऱ्या बांधावरल्या मोहाच्या शुभ्र फुलांचा मादक सुवास. मोहाच्या फुलांच्या नुसत्या सुवासाने सगळे तरतरीत झालेले.

पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कविवर्य बा. भ. बोरकर, वा. ल., आणखी शेतावरले पाच-सहा गडी. पाच-सहा साहित्यिक मित्र. माघी पौर्णिमेच्या रात्री मोसंबीच्या बागेत सबंध मराठी कविता, गाणी गप्पा, मस्करी, हास्यविनोद अशी चढाओढ चाललेली. रात्रीचे दोन कधी वाजले हे कळलंसुद्धा नाही. मी भाईंना (पु.ल.) म्हणालो, "थोडे डोळे बारीक करून एकटक बागेकडे पहा." मोसंबीच्या झाडांच्या काळपट सावल्या मोसंबीच्या झाडांखाली घर करून स्वस्थ बसलेल्या होत्या. एक हजार झाडं. झाडांमधलं जे अंतर होतं त्यात चांदण्यांचं आभाळ उतरलेलं. त्याचं त्या त्या आकाराचं चांदण्याचं झाड झालेलं. असं प्रत्येक चार-चार झाडांमध्ये एक-एक चांदण्यांचं झाड संबंध बगीच्यामध्ये दिसू लागलं. वारा आला म्हणजे त्या झुळुकीने जे झाड, नव्हे ते चांदण्यांचं झाड (मोठ्ठा झाडाचा पांढराशुभ्र झाडासारखा त्याचा ठिपका म्हणजेच झाड) हलायचं. दूर दूर अशा चांदण्यांच्या झाडांचं वाऱ्याच्या झुळकीसरशी लयबद्ध हलणं, मंद नाचणं.

आम्ही सांगितल्यावर मग बोरकर, सुनीताबाई, सगळ्यांनीच ती अस्तित्वात नसलेली परंतु प्रत्यक्षात असलेली चांदण्यांची झाडं मंद वाऱ्यावर, आमच्या कवितांवर, गाण्याच्या तालावर नाचताना पाहिली. आणि कसला आनंद ! हे वेगळं जग पाहिल्यावर, निसर्गाचं विलोभनीय सुंदर देखणं रूप पाहिल्यावर सगळेच वेडे झाले. बागेत पुन्हा पुन्हा डोळे टाकून पाहू लागले. निसर्गाच्या सचेतन मानवी जगण्याचा अपरंपार आनंद. सगळ्यांनी मिळून समूहाने कवितेचं आनंदगान गाताना, कविता म्हणताना बोरकरांनी अंगावरली शाल फेकून दिली आणि उभं राहून त्या चांदण्यांच्या झाडांमध्ये एकरूप होऊन ते मनसोक्त नाचू लागले. खूप नाचले. झाडांसोबतच्या डोळ्यांवर. अशा खूप रात्री. ऋतुवंत निसर्गाचं रूप. कवितेत कधीच न लिहिता आलेली, चित्रं उभी न करता आलेली त्यांची रूपं आजही मला पछाडून टाकताहेत, आनंद देताहेत. ते नीट लिहिता येत नाही... शब्दांपलीकडलं खरं म्हणायचं तर हेच. निसर्गाचं विविध रूपांनी नटलेलं, खुणावणारं आकाश, डोळे खुडून नेणारं आकाश.

- ना. धों. महानोर

Tuesday, March 10, 2026

पुलंनी आपल्या मेव्हण्याना लिहिलेलं हे पत्र..

(डॉ. श्रद्धानंद ठाकूर या आपल्या मेव्हण्याना पुलंनी लिहिलेलं हे पत्र गंमत म्हणजे डॉ. ठाकूरांनाही भाई हे टोपण नाव होतं.)

प्रिय भाई,

तुझे अमेरिकेहून पाठवलेले पत्र माझ्या वाढदिवसाच्या तारखेलाच लिहिलेले असल्यामुळे त्या दिवशी भरतभूमीत पोहोचणे शक्य नव्हते, पण आश्चर्य म्हणजे त्याच तारखेला खुद्द पुण्यातून पाठवलेल्या पत्राआधी मिळाले. यंदा माझ्या वाढदिवसाचा सप्ताह साजरा होत असल्यासारखी पत्रे येत आहेत. जन्तेला मी सत्तरीत शिरल्याचा भलताच आनंद झालेला दिसतो. वास्तविक ह्या वयातल्या वाढदिवसात वार्ध्यक्यसुलभ व्याधीखेरीज आणखी इतर कसलीही वाढ होत नसते. हे काही चतुर मंडळींनी जाणून मला एक आयुर्वेदिक उपचार पद्धती एक होमेपदी आणि एक ऍलोपथी अशी तीन घराण्यांची तीन पुस्तके वाढदिवसाची भेट म्हणून आली आहेत. एवढ्याने झाले नाही म्हणून एक अॅक्युपंक्चर तज्ज्ञ मला टोचून जाण्याचा मनसुबा व्यक्त करून गेले ते निराळे!

आज १८ तारीख. पण आजच्या डाकेलाही शुभेच्छापत्रे आली आहेत. एकदम हा इतका वर्षाव होण्याचे कारण मुंबई दूरदर्शनने एका कार्यक्रमात माझ्या गुळाच्या गणपतीतला इंद्रायणी काठी प्रसंग दाखवला आणि सुधीर गाडगीळने आज पु.लं.चा वाढदिवस आहे म्हणून उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरात मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मध्यरात्री फोन येणे वगैरे चालू होते. सालाबादप्रमाणे अनेक परिचित अपरिचित मंडळी घरी येऊन शुभेच्छा देऊन गेली. त्यातच दिवाळी! (शिवाय जेमिनी सर्कस ह्या चालीवर) शुभा नितिन वगैरे आले होते. मोहन, अंजली, महेश सुमित्राही येऊन गेले. एका चाहत्याचा (?) फोन रात्री १२ ।। ला १० तारखेला आला. त्याला ८ ता.ला वाढदिवस झाल्याचे सांगितल्यावर, 'मला वाटलं अजून चालूच आहे. हैं हैं हैं! असे कोडगे उत्तर मिळाले. माझा वाढदिवस मी नवरात्रासारखा साजरा करतो अशी त्याची कल्पना असावी. एका उत्साही पत्रकाराने मला असेच ७ ता.ला मध्यरात्री जागवून ७० व्या वर्षाचे नवे संकल्प काय असे विचारले. 'इथून पुढे रात्री निवांत झोप घ्यावी, असे म्हणतो.' हे सांगून मी त्याला फुटवला! असा तर असो हा वाढदिवस.

तुझे ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे वाचून खूप समाधान वाटले. वाटू द्यायची नाही म्हटले तरी काळजी वाटत होतीच. काळजी वाटण्यापेक्षा काळजी घेणे अधिक चांगले हे तत्त्वज्ञान कळते! मात्र तू त्या देशात जाऊन ऑपरेशन करून घेतलेस ते चांगले केलेस. तिथे ऑपरेशननंतरची देखभाल विशेष चांगली होते. मात्र विश्रांती ईज म्हणजे मस्टच घ्यायला हवी. (साला भर्डाचा स्टूडंट हाय!)

मात्र हे पत्र तुला मिळेल त्यावेळी तू व निर्मल डॉ. हबीकडून दिनेशकडे आलेली असणार. २२ नोव्हेंबरला रमाकांत अमेरिकेला जायला निघत आहे. विभाकडून तो दिनेशला फोन करीलच. त्याच्याबरोबर सुनीताने तुमच्यासाठी महाराष्ट्र टाईम्स, मौज, हंसचे दिवाळी अंक पाठवले आहेत. म.टा. व मौज मधे सुनीताचे लेख आले आहेत. जाणकार वाचकांची ह्या चिंतनपर लेखाला उत्तम दाद मिळाली आहे. सुधीर सवूर, गीता ह्यांना आमचे आशीर्वाद सांगणे. अमेरिकेला हेमंत संपून आता शिशिरागम झाला असणार. पुण्यातही आता थोडीफार थंडी पडायला लागली आहे. रात्रीच्या वेळी उष्ण तापमान १०-११० सेल्सीयस पर्यंत जाते. दिनेशला ज्योती गरम कपडे चढवते ना?

-भाई
(जीवनज्योत दिवाळी अंक २००९)

Saturday, February 14, 2026

बोटीवरील एक जोडपे - पूर्वरंग

बोटीवरच्या एका जोडप्याने मला फार कौतुक वाटले. हे जोडपे मधुचंद्रासाठी निघालेले असावे. पारव्यासारखे हे जोडपे सदैव आपल्याआपल्यात असे. भोवतालच्या बोटीची त्यांनी अजिबात दखल घेतली नाही. बोटीवरच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला नाही. शिष्टाचार म्हणूनदेखील त्यांनी कुणाला 'हॅलो' केले नाही.

त्यांच्या साऱ्या प्रणयलीला अत्यंत सौम्य होत्या. गोरीपान, उंच, पेशावरकडली असावीत. त्यांच्या हालचालीत एक मजेदार नवखेपणा होता. एकमेकांना प्रसन्न करण्याची तत्परता होती. पहिल्याच दिवशी नास्त्याच्या वेळी मी त्यांना पाहिले चहादाणीतून याने चहा ओतला की ती दूध ओतायची, ह्याने साखर घातली की ती ढवळायची. तेव्हाच लक्षात आले की हळद अजून ओली आहे.
(चित्र - ए आय मार्फत बनविले आहे)
त्याचे लक्ष नसले तर ती त्याच्याकडे टक लावून पाहायची आणि दूर समुद्रात काहीतरी दाखवून तिचे लक्ष त्या दृश्याकडे वेधले की तो तिच्याकडे पाहत असे. मधुचंद्राचे हे तरंगते चालतेबोलते काव्य पाहणे हा एक विरंगुळा होता. त्यांच्या त्या अलिप्तपणात एक विलक्षण मोहकता होती. त्यांची ओळख करून घ्यावी असे वाटले; पण विचार आला की, स्वर्गात आहेत बिचारे, का त्यांना जमिनीवर ओढा ? त्यांचा प्रेमविवाह नसावा. कारण त्यांच्या जोडहालचालीत पूर्वपरिचयाचा सराईतपणा नव्हता. एखाद्या रमणीय, पण अगदी नवख्या प्रदेशात शिरणाऱ्या प्रवाशासारखी ती एकमेकांच्या मनात शिरत होती.

- पूर्वरंग 
पु . ल . देशपांडे 

Tuesday, January 13, 2026

कुमार गंधर्व एक असामान्य कलावंत

..चव्वेचाळीस - पंचेचाळीस सालची गोष्ट असेल. पुण्यातल्या भावे स्कूलच्या हॉलमध्ये कुमारचे गाणे झाले होते. त्या दिवशीची ' सुघर बर पायो ' अप्रतिम जमली होती. त्याच मैफिलीत कुमारने " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" हे राजा बढ्यांचे भावगीत म्हंटले होते. मैफिलीला भानुमती श्रोत्यांत होती. " प्रेम केले काय हा झाला गुन्हा" ही ओळ म्हटल्यावर श्रोत्यांत एक " आम्ही वळखलं गss" च्या चालीची खसखसही पिकली होती. त्या विलक्षण जमलेल्या मैफिलीचे सूर कानात घेऊन परतणाऱ्या लोकांच्या स्वप्नातही नव्हते की, पुढली पाचसहा वर्षे हे गाणे मूक होणार आहे! पुण्याची ती कुमारच्या आजारापूर्वीची शेवटची बैठक. अनपेक्षितरीतीने बातमी आली की, कलकत्त्याच्या कॉन्फरंसमधून गाऊन येताना सर्दी - खोकला झाल्याचे निमित्त झाले, आणि तपासणीत ती व्याधी फार मोठी ठरली. त्यानंतरची पाचएक वर्ष कुमारने इंदूर देवासच्या भागात रुग्णशय्येवर काढली. सत्तेचाळीस ते बावन्न, पाच वर्षे कुमारचा सूर आमच्या कानी पडला नव्हता.

त्रेपन्न साल उजाडले. पुण्याला ' गुळाचा गणपती ' नावाच्या माझ्या चित्रपटाचे शूटिंग चालले होते. आऊटडोअर लोकेशन पाहायला मी देहू - आळंदीच्या दिशेला गेलो होतो. संध्याकाळी पाच - साडेपाचाच्या सुमाराला बादशाहीच्या बोळातल्या माझ्या बिऱ्हाडी परतताना नाक्यावर वामनराव देशपांडे मला भेटले.

" चला - असाल तसे चला"

मी माझ्या आळंदीच्या अबीर बुक्क्यात होतो. मी म्हटले, " कुठे चला?"

" अहो कुमार आलाय!"

" काय म्हणता काय? कुमार हिंडाफिरायला लागला?"

"अर्धा तास गायची परवानगी मिळालीय त्याला डॉक्टरची - गणूकाका कात्र्यांच्या क्लासात चला, फडक्यांच्या वाड्यात."

तसाच त्या दिशेने सुटलो. तीसचाळीस मंडळी होती. वसंत देशपांडे होता, अरविंद मंगरुळकर, वृद्ध मेहबुबखाँसाहेब होते, मारुलकरबुवा, मूछकाका पटवर्धन, भास्करबुवा जोशी. सुरुवातीला गणूकाकांनी कुमारला पुष्पहार वगैरे दिला. मग थोडावेळ वझेबुवांचे शिष्य भास्करबुवा जोशी गायले. मग वसंत देशपांडे गायला. मग हळूच कुणीतरी कुमारला सुचवले, " म्हणणार का काही?" त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य उमटले. स्वारी दोन तंबोऱ्यात बसली. बसण्यातला तोच डौल. तंबोऱ्याचे गुंजन सुरू झाले. समोर उतू जाणारा आनंद चेहऱ्यावर दाटलेली स्नेहीमंडळी आणि गेली पाचसहा वर्षे आम्ही ज्या षडजासाठी आसुसलो होतो तो षडज लागला त्याच ताकदीचा. म्हातारे मेहबूबखाँ आजूबाजूचा शिष्ट समाज काय म्हणेल याची फिकीर न करता आपल्या खास मुशेलमानी मऱ्हाटीत उद्गारले,

" व्वा! अवो, चड्डीत मुतायच्या उमरीचं होतं, तेव्हापासून पयल्या 'सा ' ची हीच ताकद की वोss! जियो - आमचं उमर ऊन जाईS!"

कुमारच्या चेहऱ्यावर आजाराचे कुठलेच लक्षण नव्हते. पाच वर्षांपूर्वीचाच, कानांना ' आता अवधारिजो जी ' असे जरासे बजावून सांगणारा तोच, तसाच षड्रज लागला आणि त्यापूर्वी कुणीही न ऐकलेल्या एका रागातल्या चिजेचा अद्भुत मुखडा कानी पडला, " मारुजी भूलो ना म्हाने. " अस्ताई म्हटल्यावर पुन्हा चिजेच्या तोंडाकडे येताना मारूजी मधल्या ' जी ' वर कुमार कोमल रिषभावर दोनच सेकंद असेल पण अश्या ताकदीने ठेहरला की त्या कोमल रिषभाचा तीर मैफिलीला आरपार भेदून गेला. त्या रिषभाची जखम आजही माझ्या मनात ओलीच आहे. कुमारने मग त्या रागाचे नाव सांगितले, ' सोहनीभटीयार ' आणि म्हणाला, " गेल्या काही वर्षांत असे काही नवीन राग आणि चिजा झाल्या आहेत. "

शेवटी कुणाच्या तरी हाताला यशाची गुरूकिल्ली लागली आणि कुमार त्या आजारातून उठला. रामूभय्यांनी तर साऱ्या इंदूरला गावजेवण घालायचे बाकी ठेवले होते. गणूकाकांच्या क्लासात त्या संध्याकाळी कुमारचे गाणे ऐकून मी आणि वसंत देशपांडे माझ्या घरी परतल्यावर मध्यरात्र उलटेपर्यंत त्या अनुभवाचा आनंद आठवीत बसलो होतो. त्या दिवशी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीवरचा हार कुणीतरी मला प्रसाद म्हणून दिला होता. त्या हाराशी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन आणि कुमारची ही मैफिल निगडित झाली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून तो हार कित्येक दिवस जपून ठेवला होता.

कुमारच्या स्वरांचे मयूरपंख फुलले की एक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. या भाग्याचा धनी मी का झालो? हे धन मला देऊन गेलेल्या किती म्हणून कलावंतांचे स्मरण करावे! झोळी खूप भरलेली आहे.पण कुमारने भरभरून दिलेल्या सुवर्णक्षणांच्या मुठी मोजदादीपलीकडल्या आहेत.

- पु. ल. देशपांडे
गुण गाईन आवडी