Wednesday, March 12, 2025

चांदणे तुझ्या स्मरणाचे - (वरुण पालकर)

८ नोव्हेंबर हा पु.लं. चा म्हणजे भाईंचा वाढदिवस. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप. भाईंना जाऊन आज 19 वर्ष झाली, पण ते गेल्यापासून आजवर कधीही त्यांच्या वाढदिवसाला मी जयंती म्हणालो नाहीये. कारण भाई म्हणजे "महाराष्ट्राच्या अंगणातील कैवल्याचं, आनंदाचं झाड!!", त्यामुळे ते कधी सुकणं, नष्ट होणं शक्य नाही!!या वर्षाच्या सुरुवातीला "भाई-व्यक्ती की वल्ली" हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील काही संवाद आणि काही पात्रांची निवड खटकणारी होती. तसेच Cinematic liberty घेऊन दाखवलेले काही सीन्स अत्यंत आक्षेपार्ह होते. त्यामुळे पूर्वार्ध पाहून "चांदणे तुझ्या स्मरणाचे" या नावाने पहिला भाग 9 जानेवारी रोजी लिहिला. आणि उत्तरार्ध बघून दुसरा भाग टीकात्मक पद्धतीने लिहिणार असं खरंतर ठरवलं होतं, पण काही केल्या लिहिताच आला नाही. भाई आणि सुनीताबाई म्हणजे माझ्या मर्मबंधातली ठेव. या दोघांनी मला आनंदाच्या आणि संस्काराच्या रुपाने एवढं दिलंय की त्याचं ओझं झटकून त्यांच्यावर आधारित चित्रपटावर टीका करायला, त्यातील उणिधुणी काढायला मी धजावलोच नाही. कधी कधी आयुष्यात काही लोकं तुम्हाला असे वश करतात की ते गेल्यानंतरही त्यांची मोहिनी तुमच्यावर कायम असते. भाई आणि माईंच्याबाबतीत माझं नेमकं हेच झालं, असं म्हणता येईल. त्यामुळे आज दहा महिन्यांनी हा दुसरा भाग पूर्ण करुन, या पुण्यवंत उभयतांचे आणि आमचे ऋणानुबंध यांना उजाळा देऊन अंतःकरणापासून आदरांजली वाहण्याचा हा अगदी छोटा प्रयत्न.


आमच्या आजी आजोबांचा आणि पुलं-सुनीताबाईंचा तसा जवळपास 5 दशके जुना परिचय. आणि तो होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या सुनीताबाईंच्या धाकट्या भगिनी कै. शालनताई पाटील!! तेव्हा जोशी हॉस्पिटल शेजारी रुपाली अपार्टमेंटमध्ये भाई आणि माई राहत असत. रोजच्या रोज पत्र, फोन आणि माणसांची वर्दळ!! पण या सर्व वैतागाला लगाम घालायला सुनीताबाईंसारखी खमकी गृहिणी कम सचिव होतीच. मग कधीतरी जरा निवांतपणा मिळावा म्हणून लॉ कॉलेज रोडवरील शालनताईंच्या अबोली अपार्टमेंटमधील घरात दुपारच्या चहापानासाठी अथवा रात्रीच्या भोजनासाठी पुलं-सुनीताबाई येत असत. अशाच एका भोजनप्रसंगी पालकर उभयतांची ओळख झाली मग "ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी" यानुसार या मंडळींमध्ये "जननांतर सौहृद" निर्माण झालं,टिकलं ते अगदी सुनीताबाई जाईपर्यंत. सुनीताबाई पक्क्या नास्तिक,पुलंही अजिबात दैववादी नव्हते. त्यामुळे त्यांनी ना घरात कधीही देव ठेवले की ना कुठली कार्यही केली. पण नातेवाईकांच्या, आप्त-स्नेह्यांच्या मंगलकार्यात त्या नुसत्या उपस्थित राहत नसत, तर संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पडेल ते सर्व करण्याची, प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन(ज्यांचे कार्य आहे त्यांच्याकडील कोणाला कळू न देता) यथाशक्ती मदत करीत असत. आमच्या बंगल्याची वास्तुशांत, आत्या आणि बाबांचं लग्न, प्रणवचं बारसं, माझी मुंज आदी सर्व शुभप्रसंगी पुलं-सुनीताबाई जोडीने अथवा सुनीताबाई तरी आवर्जून उपस्थित होत्या. माझ्या मुंजीत भाईंच्या सर्व पुस्तकांचा संच सुनीताबाईंनी भेट दिला होता, जो आजही मी जीवापाड जपून ठेवला आहे.

सततचे दौरे, अविश्रांतपणे केलेले नाटकाचे, अभिवाचनाचे प्रयोग यामुळे जसा भाईंच्या मेंदूवर ताण आला तसाच ताण सततचे दौरे, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठका, फायली आणि आपल्या आवडत्या व्यक्तींच्या लागोपाठ जाण्याने आमच्या आजोबांच्या मेंदूवर आला. साधारणपणे एका वर्षाच्या अंतराने 1993 साली पुलंना, आणि 1994 च्या शेवटी आजोबांना Parkinson's विकाराने ग्रासले.मग डॉ.चारुदत्त आपटे, डॉ.प्रदीप दिवटेंकडे उपचार सुरू झाले. त्यानिमित्त तरी भेट व्हावी म्हणून दोघेही पुढे मागे येईल अशीच अपॉइंटमेंट घ्यायचे. त्यात आमचे आजोबा मितभाषी, जरुरीपेक्षा जास्त न बोलणारे असे होते. त्यामुळे आपल्याला हा आजार झालाय, आपण परावलंबी होत चाललो आहोत या भावनेने उचल खाऊन आजोबा अंतर्मनात खचू लागले. पण त्या उलट पुलंनी आपल्या आजाराचीही टिंगल करायचे. डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताना जेव्हा आमच्या बापूंच पाऊल पुढे पडायचं नाही त्यावेळेस चेष्टेच्या स्वरात पुलं त्यांना म्हणायचे, "अरे प्रताप, तू माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान आहेस, त्यामुळे पहिला मान माझा. पण इथे आपण उलट करू. तू पहिले आत जा. हं, टाक पाऊल, जमेल तुला. अरे तू एरवी भराभर चालतोस की. माझ्यासारखा स्थूल थोडीच आहेस?" असे एकावर एक विनोद करत पुलं बापूंच्या मनावरचा ताण थोडा हलका करीत. अशीच 2-3 वर्ष गेली. एव्हाना बापूंच्या पूर्ण शरीराचा ताबा Parkinson's ने घेतला होता. दिवसातून दोन वेळा सर्व शरीराला कंप सुटायला लागला, मग साधारणपणे 1998 पासून पूर्ण शरीराला या आजाराने विळखा घातला. यातून तात्पुरती सुटका म्हणून बापू दिवसातून 2 वेळा झोपेच्या गोळ्या घेऊ लागले. यामुळे जास्तीतजास्त काळ बापू झोपूनच राहायचे. इकडे पुलं अमेरिकेला जाऊन मेंदूतल्या पेशींवर शस्त्रक्रिया करून आले,ज्याने त्यांचा त्रास कमी होण्याची अपेक्षा होती, पण त्याचा परिणाम अल्पकाळ टिकला. मग पुलंही wheelchair ला खिळून गेले. बाहेर फिरणे, कार्यक्रमाला जाणे, सगळं सगळं बंद झालं. शेवटचा प्रवास पुलंनी केला तो 1999 साली आनंदवनाचा. तिथे "बाबांच्या सोबत जर मी दोन पाऊलं जास्त चालू शकलो तर माझं आयुष्य वाढेल" या भावनेने जवळपास महिनाभर पुलं तिथे राहिले.

आता आयुष्याचं अंतिम वर्तुळ पूर्ण करण्यासाठी काळाचं चक्र फिरू लागलं. मार्च 2000 च्या शेवटच्या आठवड्यात बापूंना न्यूमोनिया झाला. Parkinson's विकाराचा शेवट न्यूमोनियानेच होते याबद्दल डॉ.आपटेंनी आमच्या बाबांना 1995 लाच कल्पना दिली होती. त्यामुळे हे शेवटचे आजारपण हे बाबा समजून चुकले आणि त्यांनी हळूहळू आजीसह बापूंची बहीण, माझी आत्या सर्वांच्या मनाची तयारी करायला सुरुवात केली. आणि अशातच मे च्या पहिल्या आठवड्यात पुलंना देखील न्यूमोनिया सदृश फुफुसांचा आजार झाल्याचे सुनीताबाईंनी कळवले. तेव्हा मात्र आमच्या घरातल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता भाईदेखील त्याच वाटेचे प्रवासी या विचाराने आजी आणि बाबांना अश्रू अनावर झाले. बाबा आणि आजी भाईंना भेटून आले. भाईंनी स्मित केलं पण आवाज खूप खोल गेला होता. 1 मे रोजी डॉक्टरांच्या साप्ताहिक भेटीत बापूंना dehydration झाल्याचे निदर्शनास आले. शरीरात पाणी राहिना. कातडी ओढली की तशीच वर राहू लागली. शरीरातला जोम दिवसागणिक कमी होत गेला, डोळे खोल गेले. डॉक्टरांनी औषधे बंद करण्यास सांगितली. त्यांचा शेवटचा दिस गोड करा, ते मागतील ते द्या, असा जवळच्या आप्तासारखा सल्ला त्यांनी बाबांना दिला. बापूंची प्रकृती अत्यावस्थ आहे हे समजल्यावर 11 मे रोजी सकाळी सुनीताबाई शहाळी घेऊन आमच्या घरी आल्या. बापू तर ग्लानीतच होते. मग सहज बोलता बोलता आजी म्हणाली की गेले 2 महिने यांच्या आजारपणामुळे यांचं आणि माझं पेन्शनच आणायला जमलेलं नाही. झालं!! आजी बोलायचा अवकाश आणि सुनीताबाई आजीला गाडीत बसवून पेन्शन आणायला घेऊन गेल्या. अर्ध्या तासाने परत आणून सोडलं. मग निघताना मला एक चॉकलेट दिलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला.

दुसरे दिवशी 12 मे रोजी सकाळी बापू गेले. 11 वाजता सुनीताबाई आल्या. मी दारातल्या जिन्याच्या पायरीवर बसून हमसून हमसून रडत होतो. मला जवळ घेत त्यांनी माझे डोळे पुसल्याचं आजही मी विसरु शकत नाही. मग बरोबर महिन्याने 12 जून रोजी पुलं गेले. जणू महाराष्ट्राचा "आनंद-पारिजात"च कोमेजला!! त्याच दिवशी पुलं-सुनीताबाईंच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस असणे हा एक विचित्र योगायोग म्हणायला हवा. मी लहान असल्याने मला हॉस्पिटलमध्ये तर नेलं नव्हतंच, पण घरीही नेलं नव्हतं. मात्र संध्याकाळी मी रडून घर डोक्यावर घेतलं म्हणून आई-बाबा मला पुढ्यात बसवून "मालती-माधव" मध्ये पुलंच्या घरी घेऊन गेले. मी आत गेलो तोच मला सुनीताबाई दिसल्या. मी मूकपणे रडत त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. आणि एका क्षणी मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागलो. माझं रडणं ऐकून आई बाबा तर रडलेच, पण सुनीताबाईंचे डोळेही पाझरले. माझ्या पाठीवरून हात फिरवत, मला धीर देत त्यांनी माझं रडू आवरलं.

पुलं गेले तेव्हा मी फक्त 10 वर्षांचा होतो. मी जे पुलं पाहिले ते wheelchair वर बसलेले, दाढी वाढलेले, मऊ सुती बंडी आणि हाफ चड्डी घालणारे आणि खोल गेलेल्या आवाजामुळे शांत बसलेले असे पुलं पाहिले होते. पण सुनीताबाईंचा सहवास मला अगदी 2008 पर्यंत लाभला. या उभयतांनी महाराष्ट्राला खूप दिलं. पुलंनी लोकांना हसवलं, आणि त्यातून जे कमावलं त्याचा विनियोग सचोटीने करत, अनेक प्रामाणिक कष्टाळू संस्थांना भरघोस मदत करत सुनीताबाईंनी दातृत्वाचा एक अतुलनीय वस्तुपाठ महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यक्षेत्रात घालून दिला. काल सुनीताबाईंची ११ वी पुण्यतिथी झाली. आयुष्यात जास्तीतजास्त आनंद शोधून तो इतरांनाही द्यावा, हे मला भाईंनी शिकवलं, तर कसोटीच्या क्षणी कसं निकराने लढावं, खचून न जाता कणखरपणे कसं उभं राहावं, याचे धडे मी सुनीताबाईंपाशी गिरवले. माझा स्वभाव आवडल्याने ज्यांनी मला आपलंसं केलं, त्या स्वभावाचे कंगोरे घासून लख्ख करण्यात पुलं-सुनीताबाईंचा सिंहाचा वाटा आहे. कुबेराचं कर्ज तिरुपतीचा स्वामी व्यंकटेश्वर अजून फेडतो आहे असं म्हणतात, तद्वत या साहित्यिक कुबेराचे समस्त मराठी जनांवर असलेले ऋण शेवटचा मराठी माणूस या पृथ्वीवर असेपर्यंत फिटणार नाहीत, हे अलबत.

©वरुण पालकर
पुणे

0 प्रतिक्रिया: