Thursday, August 11, 2022

जन गण मन आणि रवींद्रनाथ टागोर - पु.ल. देशपांडे

श्री. रवींद्रनाथांचे 'जनगणमन' हे गीत राजे पंचम जॉर्ज ह्यांच्या स्वागतासाठीच लिहिले होते, अशा अर्थाचे श्री. बाळ जेंरे यांचे पत्र ३ मे'च्या अंकात मी वाचले. आपल्या मताला आधार म्हणून त्यांनी तत्कालीन अँग्लो इंडियन वर्तमानपत्रापैकी 'स्टेटसमन', 'द इंग्लिशमन' ह्यांत आलेल्या मजकुराचे उतारे, दिले आहेत. 'रॉयटर' ह्या इंग्लिश वृत्तसंस्थेनेही तशीच बातमी दिली होती. पण २७ डिसेंबर १९१९ रोजी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे जे वृत्त आहे त्यात श्रो. जेंरे म्हणतात त्याप्रमाणे पंचम जॉर्ज बादशहांच्या स्वागतार्ह रचलेले 'जनगणमन” हे गीत गाण्यात आले, असे. म्हटलेले नाही. ते वृत्त असे आहे : “काँग्रेसच्या २८व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'वंदेमातरम्‌' गाण्यात आले. दुसर्‍या दिवसाचे कामकाज बाबू रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या देशभक्तिपर गीताने (पेट्रीऑटिक साँग) सुरू झाले. (त्यानंतर मित्रांकडून आलेल्या संदेशांचे वाचन आणि राजनिष्ठेचा ठराव स्वीकृत झाल्याचा वृत्तान्त आहे.) त्यानंतर ह्या प्रसंगासाठी रचलेले सम्राट आणि सम्राज्ञीचे स्वागतगीत वृंदगायकांनी गायिले.'' याचा अर्थ रवींद्रनाथांचे जनगणमन हे गीत राष्ट्रभक्तिपर गीत म्हणून गाऊन झाल्यावर संदेशवाचन, ठराव वगैरे झाले आणि त्यानंतर दुसरे एक गीत बादशहाचे स्वागतगीत म्हणून गायले गेले.

आता २८ डिसेंबर १९११ रोजी छापलेला 'अमृतबाजार' पत्रिकेतला वृत्तान्त पहा कामकाजाची सुरुवात बंगाली भाषेतल्या ईशप्रार्थेने झाली. (साँग ऑफ बेनेडिवशन' असे मूळ इंग्रजी शब्द आहेत.) नंतर राजनिष्ठेचा ठराव झाला.
त्यामागून बादशहाच्या सन्मानार्थ दुसरे एक गीत गायिले गेले. (अनदर साँग )

२८ डिंसेंबरच्याच 'दि बेंगॉली' ह्या वृत्तपत्रातील ही बातमी पहा : "कामकाजाची सुरुवात बंगालचे अग्रगण्य कवी बाबू रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या देशभक्तिपर पदाने झाली. त्यानंतर (राजनिष्ठेचा ठराव वगैरे संमत झाल्यावर) बंगाली मुला-मुलींच्या वृंदाने सम्राज्ञीना अंत:करणपूर्वक अभिवादन करणारे (पेईंग ए हार्टफेल्ट होमेज') हिंदी भाषेतले पद म्हटले." काँग्रेसच्या अधिकृत इतिवृत्तात आणि देशी वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीवरून रवींद्रनांथांनी रचलेले गीत हे देशभक्तिपर होते; आणि बादशहांच्या स्वागताचे म्हणून त्यानंतर गायिलेले हिंदी गीत ते 'जनगणमन' नव्हे हे लक्षात येते. 'जनगणमन' हे बंगाली गीत आहे. अँग्लोइंडियन वर्तमानपत्रांच्या वार्ताहरांना पहिल्या आणि दुसर्‍या गाण्यातला फरक न कळल्यामुळे त्यांनी चुकीचे वृत्त दिले.

१९११च्या डिसेंबरात भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानंतर लगेच जानेवारीत म्हणजे महिन्याभरातच 'जनगणमन' हे गील आदिदब्राह्मसमाजाच्या 'तत्त्वबोधिनी पत्रिकेत 'भारतभाग्यविधाता' ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. त्याचे उपशीर्षक 'ब्राह्मसंगीत' असे आहे. 'भारतभाग्यविधाता” ही गीतातली कल्पना दुष्कृत्यांचा विनाश करण्यासाठी प्रत्येक युगात अवतरणाऱ्या भाग्यविधात्यासंबंधीची आहे. ह्या गीताचे तिसरे कडवे वाचले की, ती स्पष्ट होते.

पतन अभ्युटय बंपुरे पंथा, युगयुग धावित धात्री ।
हे चिरसारधि तव रथचक्रे मुखरित पथ टिनरात्रि ।
दारूण विप्लव माझे तव शंखध्वनि बाजे / संकट दु:जाता ।

ह्यातला 'चिरसारथि' हा शब्द गीतेतल्या अवतारी सारथ्याचे स्मरण करून देणाग आहे. दारुण विष्लव माझे म्हणजे. भयंकर अशा संकटामध्ये 'तव शंखध्वनि वाजे' ही शब्दपंक्तीही पाहायला हवी. धर्मकृत्यांच्या आणि धर्मयुद्धाच्या
प्रसंगी सुरूवातीला चैतन्य प्रात करून देणारा शंखध्वनी करणे हीदेखील भारतीय परंपरा आहे. अजूनही बंगालात मंगल समारंभाच्या सुरुवातीला शंख फुंकण्याची पद्धत आहे. 'हे विस्सारथि' ह्या संबोधमातून हा जयजयकार गीताप्रणीत परमेश्वशी अवताराचा आहे हे हिंदुतत्त्वज्ञानाची माहिती असणाऱ्यांच्या ध्यानात आले; पण अँग्लोइंडियन पत्रकारांना ते न समजून सुरुवातीचे गाणे म्हणजे स्वागतपर पद्य अशी त्यांची प्रामाणिक समजूत झाली असेल. त्या काळात काँग्रेसच्या अधिवेशनात राजनिष्ठा व्यवत करणारा ठरव असायचाच. त्यातून त्याच वर्षी सम्राट-सम्राज्ञीचे भारतात आगमन झाले होते. त्यामुळे अँगलोइंडियन पत्रकारांनी त्या गाण्याचा संबंध बादशहाच्या स्वागताशी जोडला. पण रवीन्द्रनाथांची निष्ठा ब्रिटिश साप्राज्यशाहीशी नाही हे तत्कालीन सरकारला ठाऊक होते. कारण “जनगणमन' हे गीत गायल्यानंतर एक महिन्याच्या आत इंग्रजी राजवटीतल्या पूर्व बंगाल आणि आसाम विभागाच्या डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनने गुप्त सक्युलर काढले. कुठून तरी ते 'दि बेंगॉली' ह्या वर्तमानप्रत्रवाल्यांना सापडले. त्यांनी ते २६ जानेवारी १९१९च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यात सरकारी नोकरांनी आपली मुले शांतिनिकेतनात पाठवण्यावर बंदी घालण्यात आली होतो. इतकेच नव्हे तर ''मुले त्या संस्थेत विद्यार्थी म्हणून ठेवली तर त्यांच्या पुढील आयुष्यातील हिताबाबत सरकारी मन कलुषित होईल'' अशा अर्थाची कडक तंबी देण्यात आली होती. सरकारी नोकरीतल्या पालकांनी आपल्या मुलांची नावे शांतिनिकेतनातन काढन घेतली होती संस्थेवर गंडांतर आले होते.

श्री प्रबोधचंद्र सेन यांनी म्हटल्याप्रमाणे 'रवींद्रनाथ जर सम्नाटांचे स्तुतिस्तोत्र गायच्या पातळीवर उतरले असतील तर अशा प्रकारच्या हुकमाची गरज नव्हती. शांतिनिकेतनाकडे सुरुवातीपासून इंग्रजी सरकार संशयाच्याच दृष्टीने पाहत होते हे रवीन्द्रनाथांच्या चरित्राच्या वाचकांना चांगले ठाऊक आहे.

'भारतभाग्यविधाता' ही देवाविषयीची कल्पना प्रस्तुत गीत लिहिण्याच्या एक वर्ष आधी लिहिलेल्या 'गोरा' ह्या रवीन्द्रनाथांच्या कादंबरीतही आढळते. त्यात शेवटी कादंबरीचा नायक गोरा हा परेशबावूंना म्हणतो : ''...आपल्यापाशीच हा मुक्तीचा मंत्र आहे. म्हणूनच तर आपण कुठल्याही समाजात (इथे पंथात ह्या अर्थी) स्थान मिळवू शकला नाही. मला आपले लेकरू माना. मला आज अशा एका देवतेचा मंत्र द्या की, जी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बाह्यो, सर्वांची आहे. जिच्या मंदिराची दारं कुठल्याही जातीला, कुठल्याही व्यक्‍तीला कधीही बंद राहणार नाहीत.'

जी केवळ हिंदुंचीच देवता नव्हे तर भारतवर्षाची देवता !

'जनगणमन'मध्ये जयजयकार आहे तो ह्या भारतवर्षाच्या. भाग्यविधात्या देवतेचा. 'भारतभाग्यविधाता' ह्या कल्पनेचा रवींद्रनाथांनी पुष्कळदा पुनरुच्चार केला आहे.

देश देश नन्दित कारे म्रित तव भेरी
आशिलो जो तो वीखुन्द आसन तव घेरि

अशी एक त्यांची कविता आहे. तीदेखील काँग्रेसच्या अधिवेशनात गायली जात असे. ती भगवंतालाच उद्देशूने आहे. त्यात रवींद्रनाथ म्हणतात :

जनगणपथ तव जयरथ नक्रमुखर आजि
स्पस्दित करि दिग्‌ दिगऱ्त उठिलो शंख आजि

तेव्हा जनगणाच्या मनामध्ये स्वत्व जागवण्यासाठी भारतवर्षाच्या देवाला रवींद्रनाथांनी 'जनगणमनअधिनायक" हे गीत लिहिण्यापूर्वीपासून गद्यातून आणि पद्यातून सतत आवाहन केले आहे. उपनिषदांच्या सतत अध्ययनाने ज्यांच्या
मनाचे पोषण झाले त्या रवीन्द्रनाथांना विश्वात्मक देंव आणि अधर्माचं उच्चाटन करायला परमेश्वरने अवतार घेणे ही कल्पना आकर्षक वाटणे साहजिक आहे.

ज्या 'स्टेटसमन'मधील वृत्ताचा श्री? जेरे हवाला देतात त्याच 'स्टेटस्‌मन'ने १९१९च्या डिसेंबगत 'जमगणमन' हे बादशहाच्या स्वागताचे गाणे असे वर्णन केले आणि त्याच 'जनगणमन' गाण्याचा '१९१७' च्या अधिवेशनात 'जे नॅशनल साँग' (देशभक्तिपर गीत) गायले गेले'' असा उल्लेख केला आहे. आता एकच गाणे एकदा बादशहाच्या स्वागताचे आणि दुसऱ्यांदा राष्ट्रभक्‍तीचे कसे होईल? शिवाय १९१७ साली काँग्रेस ही मवाळांच्या हातून जहालांच्या हाती गेली होती. त्या प्रसंगी केलेल्या भाषणात देशबंधू चित्तरंजन दास यांनी या गीताकडे श्रोत्यांचे लक्ष वेधून त्या गीताचा ''इट इज ए साँग ऑफ ग्लोरी अँड व्हिक्टरी ऑफ इंडिया'' असे म्हटले होते. बादशहाच्या स्तुतीच्या गाण्याला देशबंधू चित्तरंजन दासांसारखा राष्ट्रभक्त हे भारताच्या वैभवाचे आणि विजयाचे गाणे कसे म्हणेल? चित्तरंजन दास हे व्युत्पन्न गृहस्थ होते. कुणी गल्लीबोळातले पुढारी नव्हते. आता खुद्द रवीन्द्रनाथांनीच ह्या गीताच्या जन्मकथेबद्दल काय म्हटले आहे ते पाहा:

बऱ्याच काळानंतर सिमल्यातल्या एका बड्या सरकारी अधिकारी मित्राने विनंती केल्यावरून हे गीत बादशहाच्या स्वागतासाठी लिहिले होते अशी बातमी फैलावण्यावर त्या विनंतीसंबंधी श्री० पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेले
र्वीन्द्रनाथांचे एक पत्रच उपलब्ध झालेले आहे. (९०.९१.३७) प्रभावकुमार मुखर्जींनी लिहिलेल्या रवीन्द्रजीवनीच्या दुसऱ्या खंडात ३३९व्या पानावर बंगालीत हे पत्र आहे. त्याचे मराठो भाषांतर वाचकांसाठी देतो. रवीन्द्रनाथ म्हणतात : ''...सरकारी अधिकाऱ्याची विनंती ऐकून मी विस्मित झालो. ह्या विस्मयाबरेबरच मनात संताप उफाळला. त्याच्या प्रबल प्रतिक्रियेच्या आपरातातून मी 'जनगणमन ह्या गाण्यात त्याच भारतभाग्यविधात्याची जयघोषणा केली आहे की जो पतन-अभ्युदय-बंधुर पंथावर युगानुयुगे धावणाऱ्या यात्रिकांचा चिरसारथी, जो जनगणमनाचा पथपरिचायक, तो
युगयुगान्तरतल्या मानवाचा भाग्यस्थचालक पाचवा किंवा सहावा किंवा इतर कितवाही जॉर्ज असू शकणार नाही, ही गोष्ट त्या राजनिष्ठ मित्राच्याही लक्षात आली. कारण त्याची राजभक्‍ती कितीही प्रबळ असली तरी त्याच्यात अकलेचा अभाव नव्हता, हे गाणे मी काही खास काँग्रेससाठी लिहिले नव्हते.'' ह्याच संबंधात १९.३.३९ला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात

I should only insult myseif if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind. (Purvasa, Phalgun, 1354, p. 738)

तेव्हा ह्या संदर्भात स्वत: रवींद्रनाथांनी कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण केल्याचे कोठेही आढळत माही, हे श्री. बाळ जेरे यांचे म्हणणे बरोबर नाही. स्वत: कवींनी नि:संदिग्ध शब्दात ह्या गीताची भूमिका सांगितली आहे. तीच मला स्वीकारार्ह वाटते. स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्या गीताचा चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या बंगाली मातृभाषा असलेल्या थोर राष्ट्रभक्तांनी 'राष्ट्रभक्तिपर तेजस्वी गीत' म्हणून स्वीकार केला, वंगभंगाच्या चळवळीत बंगालात हजारो कंठातून जे गीत गायले गेले, त्या गीताविरुद्ध रवींद्रनाथांच्या विषयी आदर नसणाऱ्यांनी चुकीचे
लिहिले ते ग्राह्य मानावे असे मला वाटत नाही. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्याविषयी आदर नसलेले इंग्रज इतिहासकार व फारसी अखबारनवीस यांनी लिहिलेला मजकूरच ग्राह्म मानला तर शिवाजी हा लुटारू होता आणि तो जहन्नममध्ये राहण्याच्या लायकीचाच काफिर होता हेच बरोबर आहे, असे धरून चालावे लागेल. रवीन्द्रनाथांना विरोध करणारी अँग्लोइंडियन किंवा 'शनिवारेर चिठि' यांसारखी वर्तमानपत्रेच पुराव्याला घेऊन कसे चालेल?
'इंडियाज नॅशनल अँथेम' ह्या श्री. प्रबोधन सेनसंपादित आणि विश्वभारती-प्रकाशित पुस्तिकेतून श्री. जेंरे यांनी स्टेट्समन आणि 'शनिवारेर चिठि' यांतलेच उतारे घेतले. त्याच पुस्तिकेतले मी उद्‌घृत केलेले उतारे कां घेतले नाहीत? रवींद्रनाथांच्या पत्रातील उतारेही त्या पुस्तिकेत आहेत.

मला जाता जाता अलीकडच्या वाचकांच्या लक्षात हेही आणून द्यावेसे वाटते की, बंकिमचंद्रांचे 'वंदेमातरम्‌' हे रवींद्रनाथांचे आवडते गीत होते. १८९६ साली डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला भरलेल्या काँग्रेस-अधिवेशनात पहिल्या दिवशी ह्या गीताला चाल लावून स्वत: रवींद्रनाथांनी 'उद्बोधन-संगीत' म्हणून प्रथम हे गीत म्हटले आणि नंतर कामकाजाला सुरुवात झाली तेव्हापासून ते गीत गायले जाते आहे. चाल बसवल्यावर तरुण रवींद्रनाथांनी खुद्द बंकिमचंद्रांना प्रथम त्या गीताचे चरण ऐकवले होते, अशी माहितीही 'आनंदबाजार' पत्रिकेत मिळते. (५ अश्विन वंगशक १३४४)

भारतचे राष्ट्रगीत 'वंदेमातरम्‌' असायला हवे होते की 'जमगणमन' हा मुद्दा निराळा आहे. देशप्रेमाची गीते म्हणून मला दोन्ही गीतें अप्रतिम वाटतात. परंतु कवितेतल्या भावार्थाकडे न पाहता 'जनगणमन'ला बादशहाचे स्वागतपर गीत
ठरवणे हे त्या गाण्यातील गीतेतल्या विश्वाचा युगायुगांचा चिरसारथी ह्या उदात्त कल्पनेचा अवमान केल्यासारखे मला वाटते. त्या संपूर्ण गीताचे मनात पूर्वग्रह न ठेवता मनन व्हायला पाहिजे.

श्री जेरे यांचा आणि वाचकांचा गैरसमज दूर व्हावा असे मला मनापासून वाटते म्हणून मी हे काहीसे विस्तृत उत्तर लिहिले आहे.

- पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र टाईम्स 
१६ मे १९८०

मूळ स्रोत - > http://satyashodh.com/janaganaman/index.htm

0 प्रतिक्रिया: