‘दगडू मारुती पवार’ ह्याच्या वाट्याला आलेले हे दु:खाचे बलुते भारतीय समाजव्यवस्थेने त्याच्या जन्मकाळीच त्याच्या पदरात बांधले. दया पवार नावाच्या-आज लोकांपुढे कवी, साहित्यिक, विचारवंत म्हणून प्रसिद्धीस आलेल्या माणसातच हा दगडू मारुती पवार वसलेला आहे. एकाच देहात नांदणारी ही जुळी व्यक्तिमत्त्वे आहेत. सुखाच्या क्षणीही दयाला सुखासीन होऊ न देता, सतत टोकरीत राहणारा हा दगडू. तो ह्या आत्मकथेचा लिहविता धनी. दयाला अस्वस्थ करणारा आतला नुसता आवाज नव्हे तर आतला आक्रोश. सत्य सांगून भार हलका करू इच्छिणारा. (तो भार हलका होत नाही ही आणखी एक शोकांतिका.) दया पवार त्या दगडूची लेखणी झाला. आणि अतिशयोक्ती न करता बोलायचे म्हणजे त्यातून एका असामान्य आत्मकथेचा जन्म झाला.
ह्या पुस्तकाला अनेक ठिकाणी फाटलेल्या आणि ठिगळा- ठिगळांनी जोडलेल्या गोधडीचे वेष्टनचित्र आहे. अन्न, वस्त्र, निवारा या बाबतीतच नव्हे तर क्षणोक्षणी भावनांच्यासुद्धा चिंध्याचिंध्या होत जाणारे आयुष्यच जिथे ठिगळाठिगळांनी जोडत जावे लागते अशा जीवनाची ही सत्यकथा आहे. असली ही जीवनपोथी उत्तम भोजनोत्तर किंवा उत्तम भोजनाची खात्री असल्यामुळे श्रवणसौख्यात भर घालणाऱ्या देव-देवतांच्या लीलामृतांच्या धार्मिक पोथ्यांना असतात तसल्या रेशमी सोवळ्यात कशी बांधली जाणार? तिला गोधडी-बांधणीतच गुंडाळणे शक्य आहे. वेष्टनावरची ती गोधडीच पहिला धक्का देऊन जाते. स्वत:ला स्पृश्य किंवा सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या मानवी जीवनाच्या किती प्रकारांनी चिंध्या करत असतो याचे ह्या वेष्टनापासूनच सूचक दर्शन घडायला लागते, पण हे दर्शन घडवणारा दगडू कुठेही स्वत:बद्दल अनुकंपा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत नाही, हे ह्या कहाणीचे सर्वांत मोठे यश आहे, हे सुरुवातीलाच नमूद करून ठेवायला हवे. दगडू पवार शिष्ट समाजाच्या करुणेची भीक मागायला उभा राहिलेला नाही. उलट, ही कथा वाचून संपल्यावर आपण देश, धर्म, संस्कृती, समाज, सुधारणा, प्रबोधन वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचाच पुन्हा एकदा अधिक तीव्रतेने प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही आणि आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते.
दगडू कधी खेड्यात तर कधी मुंबईत असा लहानाचा मोठा होत गेला. खेड्यातला तो महारवाडा आणि मुंबईतला दगडू जगत होता तो विभाग स्वत:ला सुसंस्कृत, सुशिक्षित, सुप्रतिष्ठित, सभ्य वगैरे समजणाऱ्यांना त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याच्याही लायकीचा वाटत नाही. पूर्वी दादर टी.टी. ते काळा घोडा असा सहा नंबरच्या ट्रामचा रस्ता होता. एकदा त्या ट्रामने गिरणगाव ओलांडले की, चर्नी रोड नाका येईपर्यंत वाटेत लागणारे फोरास रोड, नागपाडा वगैरे भाग, देवळाच्या दारातल्या महारोग्यांची पंगत ज्या कातडे ओढलेल्या डोळ्यांनी ओलांडायची असते, अशा रीतीने ट्राममधल्या सभ्य पाशिंजरांनी त्या बाजूला न पाहता आणि त्या दैन्य-दारिद्रयाचा मनावर संस्कार करून न घेता ओलांडायची असे. तिथली माणसे ही माणसेच नव्हेत असे मानणे म्हणजे सुसंस्कृतपणा ही शिकवण असे. एकदा चर्नी रोडची पारशी अग्यारी लागली की मग भारतीय संस्कृती सुरू. हा मधला पट्टा जिवंत माणसांचा उकिरडा असल्यासारखा आपले सारे अभागीपण दाखवत असायचा. त्या वस्तीतल्या ‘कावाखान्या’पाशी दगडू वाढला. आजूबाजूचा चोरबाजार, कामाठीपुरा, गोलपिठा ह्या विभागांतच ‘छोटी छोटी बेटं’ करून महार मंडळी राहत. (त्यांतच देशस्थ महारांचे निराळे, कोकणस्थ महारांचे निराळे.) दगडूच्या ‘आयुष्याची कितीतरी उमेदीची वर्षे ह्या खचरात गेली.’ पण त्या खाचरातही दगडूचे वडील राजाच्या ऐटीने राहायचे. दगडूच्या स्वाभिमानी आजीने आपल्या दोन लेकरासंकट गावातल्या हलकट संभावितांच्या जाचापासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘ममई’ गाठली होती. मुले वाढवून मोठी करून उद्योगाला लावली होती. दगडूचे वडील मुंबईच्या गोदीत चाकरी करत होते. ‘पांढरंशुभ्र मसराईचं उंची धोतर, वुलन कोट, गंधर्व छाप काळी टोपी, दातावर सोन्याची मेख’ असा त्यांचा थाट होता. त्यांना गाण्याचे अंग होते. कुटुंबात वाद्ये वाजवणारे काका, मामा होते. (त्यांत वाजंत्र्यांच्या ताफ्यात तरबेजपणानं कांडे वाजवणारा सखामामा होता. सवर्णांच्या लग्नात त्यांना उष्ट्या पत्रावळीवर जेवायला लावणाऱ्या उद्दाम तालेवारांना त्या कांड्यातून तो शिव्याही वाजवत होता. वरपांगी ‘धिक्कट धिम् तिक्कड तिम्’ ऐकू आले तरी सखामामा आणि त्याचा हा असल्या अपमानास्पद वागणुकीने डिवचला गेलेला भाचा त्यांना त्या धिक्कड् दिममध्ये दडलेल्या शिव्या ऐकू येत होत्या.) पुढे दगडूचे रसिक वडील दारूच्या नादाला लागले. बाटलीबरोबर बाई आली. गोदीतून तांबे-पितळ चोरून आणू लागले. दगडूला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळू लागले. त्याच काळात दगडू शाळेत ‘बरे सत्य बोला’ शिकत होता. ‘वास्तवाच्या जगापेक्षा शाळेचे जग खूपच नकली वाटायचे. जसे तसबिरीत नयनमनोहर चित्र टांगावं तसं.’
हे आत्मकथन वाचताना घडणाऱ्या त्या वास्तवाच्या दर्शनाने दगडूसारख्यांना आपण ‘तसबिरी’तली माणसे का वाटत असतो याची जाणीव पांढरपेशांना झाल्याशिवाय राहणार नाही. हा केवळ आर्थिक दारिद्रयाचा प्रश्न नाही. नुसत्या दारिद्रयामुळे सोसाव्या लागणाऱ्या ओढाताणीचा अनुभव मध्यमवर्गीयांनाही असतो. पण भयानक दारिद्रयाच्या जोडीला हिंदू समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जन्मकाळापासून ते प्रेतदहन किंवा दफनापर्यंत जनावरांपेक्षाही भयंकर असे हे हीनत्व लादलेले आहे आणि त्यामुळे क्षणोक्षणी ज्या भयाखाली त्यांना थरथरत्या अवस्थेत जगावे लागते त्याचा हा आत्मकथेतून येणारा प्रत्यय वाचकाला हादरून टाकणारा आहे. आणि ह्या कथेचे मोठेपण असे की, वाचकाने असे हादरावे म्हणून जाणूनबुजून कसलाही प्रयत्न इथे केलेला नाही. चमकदार भाषाशैली वापरून परिणाम साधायचा इथे यत्किंचितही अट्टाहास नाही. मराठी भाषेचे एक अत्यंत सुबोध, सरळ रूप पाहण्यासाठीसुद्धा ‘बलुतं’ वाचावे. वास्तवाच्या दर्शनाला अलंकाराची गरज नसते. घाव बसल्यावर रक्त भळभळ वाहत जावे तशी ह्या पुस्तकातली वाक्ये वाहत चाललेली आहेत. मनावर झालेले वयाच्या वेगवेगळ्या काळातले घाव परिणामकारक करायला दगडूला कुठल्याही कृत्रिम नाटकीपणाचा आश्रय घ्यावा लागलेला नाही.
पांढरपेशांच्या जगाने झिडकारलेली, नाकारलेली कितीतरी माणसे इथे भेटतात. देवाधर्माच्या नावाखाली यल्लामा देवाला दरिद्री आईबाप पोटची पोरे वाहतात. मुलींची पुढे वेश्यांच्या बाजारात विक्री होते. आजही यल्लामाच्या जत्रेत हजारो मुलींची त्या देवीच्या साक्षीने विक्री होते. दगडूच्या जमनामावशीच्या नशिबी हा भोग आलेला होता. फोरास रोडवर पिंजऱ्यात वेश्या करून डांबलेली जमनामावशी ह्या भाच्यासाठी खाऊ आणून वाट पाहत असते. घोडागाडीतून फिरवते. त्याला छान कपडे घेऊन देते. या भाच्यावर मारा करून आपली अतृप्त वात्सल्याची भूक ती भागवत असते. वेश्यावस्तीच्या त्या नरकवासातल्या कोठडीच्या भिंतीवर यल्लामाचा देव्हारा असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांची तसबीर. हे सारे काल्पनिक वाटावे इतके आम्हाला दूरचे आहे. त्या जमनामावशीची गोष्ट इथेच संपत नाही. काही वर्षे लोटतात. आता मोठा झालेला दगडू सांगतो- “अगदी अलिकडची गोष्ट. मी दादरच्या पुलाखालून चाललो होतो. माझ्या सोबत काही बडी लेखक मंडळी. तिथे भिकाऱ्यांच्या घोळक्यात दीनवाणी मुद्रेची, लक्तर फाटलेली, झिंज्या सोडलेल्या अशा अवस्थेत मी जमनाला ओळखतो. जमनाच ती. तिनेही एवढ्या वर्षानंतर मला ओळखलेले असते. ती एकटक माझ्याकडे बघत असते. तिच्याशी सांधा संवादही मी करू शकलो नव्हतो. वाटलं, टेरिलिनच्या कपड्यांत आपण किती पांढरपेशे झालोय.” दगडूचे जीवन आता वरपांगी यशस्वीही म्हणण्यासारखे. पण त्या यशाच्या वस्त्रांना आतून काट्यांचे अस्तर जोडल्यासारखे सतत टोचण्या देणारे.
शिक्षणाशिवाय दलित समाजाला मुक्ती नाही हे ओळखून बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याशिवाय ह्या गुलामगिरीतून सुटका नाही याची जाणीव झालेला शिक्षित दलित समाज नव्या निर्धाराने त्या दिशेने झुंजही घेऊ लागला. पण त्यातच एक नवा पांढरपेशा दलित तयार झाला. त्याचे खेड्यातल्या अशिक्षित आणि सर्वार्थाने दलितावस्थेत राहणाऱ्या आपल्याच बांधवाशी नाते तुटत गेले. ह्या नव्या वास्तवाचे चित्रणही ‘बलुत्या’त पाहायला मिळते. ही एक निराळीच, ना अरत्र ना परत्र अशी अवस्था. “आपल्याला जीवनात काय हवे? आपले काय बरं हरवलंय? ही नुसती धावपळ काय आहे?” अशांसारख्या मूलभूत प्रश्नांचे मोहोळ आता उठते. दगडूला त्या प्रश्नांच्या गांधीलमाशा डंख मारू लागतात. जीवन निराळ्याच दृष्टीने असह्य करतात. रोज नव्या भ्रमनिरासांचा अनुभव येतो. स्वत:ला डावे म्हणवणाऱ्यांतला उजवेपणा आणि ज्यांना प्रतिगामी उजवे मानले त्यांच्यातला डावेपणा अनुभवाला येतो आणि गोंधळ वाढतच जातो. कुठल्याही एका तत्त्वज्ञानाची रेडीमेड झापडे न बांधता जगू पाहणाऱ्यांची ही नेहमीचीच कुचंबणा आहे. असंतुष्ट सॉक्रेटिसाचेच जिणे त्यांच्या वाट्याला येते. ‘देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही मनी ओळखावे’ ही प्रचीती तुकोबांनाही आली होती. दीनांचा वाली म्हणून ज्या देवाचे गोडवे आपण गातो, तो तसा वालीबिली नसल्याचे पदोपदी अनुभवाला येऊ लागल्याने तुकारामबुवांनाही पायाखालची वाळू सरकल्यासारखे वाटणे स्वाभाविक होते. ‘राजकारणाच्या लढाईत बाजारबुणगीही चालतात’ असे म्हणून बाजारबुणग्यांना जवळ करून प्रामाणिक लढवय्यांशी जिवघेणा खेळ खेळणारे मान्यवर पुढारी दगडूला भेटतात आणि गोंधळ वाढत जातो. ‘तळाच्या माणसाशी आपण एकनिष्ठ राहावं’ असे दगडूला प्रामाणिकपणाने वाटत असते, पण असा नुसता डांगोरा पिटून त्या तळातल्या माणसांना ‘भांडवला’सारखे वापरून स्वत:ची पोळी पिकवणारे नेतेही त्याला दिसत असतात. मासिक हजार-बाराशे रुपयाची प्राध्यापकी आणि उच्चवर्णीयांच्या वस्तीतला आपला फ्लॅट सजवून परिसंवाद ‘संपन्न’ करणारे पांढरपेशे पुरोगामी, क्रांतिकारक इत्यादी विद्वान आणि विदुषी इतरांना ‘प्रस्थापित’ म्हणून हिणवण्यात धन्यता मानताना आढळतातच की! तेच ढोंग दलित नेते म्हणवणाऱ्यांत झिरपलेले दिसते.
ह्याच काळात दगडू रुपारेल कॉलेजात शिकायला जात होता. तिथे कालिदासाचे मेघदूत शिकावे लागे. मेघदूतातल्या शृंगारिक ओळींनी महिरून जाणाऱ्या पांढरपेशा घरातल्या यक्षिणीही वर्गात असत आणि त्या काळी दगडूचे लग्न होऊनही बायकोशी एकान्त करायला अशक्य असा पत्र्याचा आडोसा. तसल्या त्या आडोशात माणसांची गर्दी. काकूच्या पलंगाखालच्या अडगळीत दगडूची शृंगारशय्या. कल्पनेत कालिदासाचे मेघदूत आणि वास्तवात शेणाचा नरक. त्यातही पुन्हा सासू-सुनेच्या भांडणाचे घरात “विषारी चुबू काटे पसरलेले. सकाळी झाडावं तर संध्याकाळी पुन्हा उगवणारे.”
अशा दोन्ही बाजूंनी फाटलेल्या अवस्थेत जगणारा दगडू वैयक्तिक दु:खे जोजवीत न बसता दलितांच्या चळवळीत पडतो. तिथेही जन्माला आल्याबरोबर पार्टीचे कार्ड चिकटलेले. “सोशल फोर्सच एवढा होता की, तुम्हाला वेगळी पार्टी इच्छा असूनही निवडता येत नव्हती. ज्यांनी निवडली ते बहिष्कृत झाले. त्यांच्या प्रेतयात्रेला जात हजर राहिली नाही. (इथेही पुन्हा जात आहेच!) विंचूरचे रणखांबे, बाबासाहेबांचे चरित्र लिहिणारे खैरमोडे, कॉ. मोरे ही ठळक उदाहरणे.” दलित पुढारी म्हणवणाऱ्यांनादेखील आपल्या फाटक्यातुटक्या कपड्यांतल्या अनुयायांनी मोर्चा मिरवणुकीत आपल्या बरोबरीने चालावे हे मान्य नसायचे राहून आणखी भयंकर भ्रमनिरास दुसरा कुठला व्हायला हवा?
जन्मापासून छळणारा अस्पृश्यतेचा शिक्का तो आपल्या सामाजिक जीवनातून नष्ट व्हावा म्हणून चालवलेल्या चळवळीत आपमतलबी नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या प्रसंगामुळे वाढत जाणारी निराशा, निर्मितिशील, पण अशा परिस्थितीत शापासारखे ठरणारे मन, ज्या आईने आपल्यासाठी एवढे डोंगराएवढे कष्ट उपसले तिला “उभ्या हयातीत मी काय सुख दिलं?” ही टोचणी. बायकोने एकाएकी घर सोडून एका म्हाताऱ्याशी लग्न करून संसाराचा पट उधळलेला. संगमनेरच्या बाजारात अंगावर विटके लुगडे, डोक्यावर गवताचा भारा आणि पाठीला धोतरात बांधलेले तान्हे लेकरू हे तिचे अनपेक्षितपणे घडलेले दर्शन. स्वत:च्या एकलकोंड्या प्रवासात तीव्र आठवण व्हावी असा एकच, पण दगडूपासून तोडून नेलेला दुवा म्हणजे लाडकी लेक बकुळा. तिलाही तिच्या आईने ‘खाचरा’त ठेवलेले. फाटत फाटत जाणाऱ्या जीवनाला कुठे कुठे आणि किती ठिगळे जोडायची?
‘मडकं असतं तर बोलताना तोंड फुटलं असतं’ अशा तीव्र आवेगाने ही कथा सांगून संपवताना दगडू म्हणतो- “मी आयुष्यभर घाबरतच आलोय. त्याला कारणं जशी वैयक्तिक आहेत तशी ज्या अभावग्रस्त समाजात मी जन्माला आलोय त्यातही सापडतील.”
शेवटी दयाने असा हा आपल्यातला दगडू पाहिला म्हणजे काय पाहिले हे त्याच्या कवितेतूनच सांगितले आहे :
दु:खानं गदगदताना
हे झाड मी पाहिलेलं...
...धमनी-धमनीत फुटू पाहणाऱ्या
यातना
महारोग्यांच्या बोटांसारखी
झडलेली पानं
हे खोड कसलं?
फांदी-फांदीला जखडलेली
कुबडी.
मरण येत नाही
म्हणून मरणकळा सोसणारं...
दु:खाने गदगदलेले झाड आता ‘बलुतं’ नावाचे पुस्तक होऊन आले आहे. पूर्वी धार्मिक ग्रंथाच्या वाचनाने ‘निपुत्रिकाला पुत्र होतील, निर्धनाला धन लाभेल...’ असे शेवटी फलित असायचे. तसे ह्या ग्रंथाचे फलित सांगायचे तर असेच म्हणावे लागेल : “ह्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रूढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणाऱ्या अश्रूंत नवी किरणे उतरल्याचा साक्षात्कार होईल. माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. साऱ्या चांगल्या साहित्याचा हेतू नाहीतरी दुसरा काय असतो? माणसामाणसांत नवे जिव्हाळे जोडून समाजाला कृत्रिम आणि जाचक बंधनातून मुक्त करण्याचाच ना?”
(पु.ल. देशपांडे यांच्या ‘दाद’ या मौज प्रकाशन गृहानं प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

मुळ स्रोत-- https://www.aksharnama.com/client/article_detail/2532
अक्षरनामा
0 प्रतिक्रिया:
Post a Comment