Saturday, October 1, 2022

चैतन्यानं भरलेलं गाणं

स्वरसम्राट कुमार गंधर्व आज हयात असते तर (८ एप्रिल १९९९ रोजी) ७५ वर्षांचे झाले असते. हे औचित्य साधून पु. ल. देशपांडे यांनी कुमार गंधर्व यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त देवास येथे झालेल्या तीन दिवसीय संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण प्रसिद्ध करीत आहोत. या कार्यक्रमाचा समारोपही पुलंच्याच भाषणाने झाला होता. अप्रकाशित राहिलेली ही भाषणे राम कोल्हटकर यांच्या सौजन्याने उपलब्ध झाली.

मित्रहो,
माझ्या आधी राहुल (बारपुते) आणि राम (पुजारी) हे इतकं छान आणि इतकं चांगलं बोललेले आहेत, की त्यांच्यानंतर खरं म्हणाल तर- या दोघांसारखंच मलाही वाटतं, असं म्हणून मी माझं भाषण संपवलं पाहिजे असं माझं मत आहे. पण असं करून चालत नाही. मलासुद्धा आज बोलायचं आहे. कारण आयुष्यामध्ये मी असंख्य जाहीर भाषणं केली. काय करता, या प्रश्नाला उत्तर ‘भाषण’ असंच द्यावं, इतकी भाषणं अलीकडील काळात मी केली. परंतु इतक्या सुंदर भाग्यवंतांच्या मेळाव्यापुढं भाषण करायचा योग मला आलेला नव्हता. हा मेळावा नुसतं गाणं ऐकणाऱ्यांचा मेळावा नाही. नुसता सुरांवर प्रेम करणाऱ्यांचा मेळावा नाही. सुरांवर प्रेम करता करता, गाणं ऐकता ऐकता ज्यांची भाग्यं अंतर्बाह्य़ उजळली अशा भाग्यवंतांचा हा मेळावा आहे. ती उजळायला कुमार गंधर्व कारणीभूत झाला. या भाग्यवंतांना त्यांच्या भाग्याची शब्दामध्ये मी काय कल्पना देणार?
‘कुमार गंधर्वाचं गाणं’ असा शब्दप्रयोग ज्यावेळी वापरला जातो, त्यावेळी मला आरती प्रभूंची एक ओळ आठवते. त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे की, ‘तो न गातो, ऐकतो तो सूर अपुला आतला..’ कुमार गंधर्व गायला लागला की असं वाटतं, की हा गातो ते गाणं आत चाललेलं गाणं आहे. ते स्वत:च ऐकता ऐकता जे काही सूर बाहेर पडतात त्यांचं गाणं तयार होतंय. ही वीणा कुमार जन्माला आला त्यावेळी सुरू झालेली आहे. ही अक्षय अशा प्रकारची आजतागायत चाललेली वीणा आहे. ही मैफल आज चालूच आहे. जसा आपण एखादा पिंजरा उघडावा आणि आतील पक्षी बाहेर पडावा, तसे कुमार ‘आ’ करतात आणि त्यातून गाणं बाहेर पडतं. ही गाण्यातील नैसर्गिकता आहे. हा सहजोद्भव गंगोत्रीसारखा आलेला आहे. एखाद्या झऱ्यासारखं आलेलं असं हे गाणं अत्यंत दुर्मीळ, दुष्प्राप्य अशा प्रकारचं आहे.

तानसेन कसे गात होते हे मला माहीत नाही. परंतु त्यांच्याबद्दल जे काही म्हणतात, ते आधुनिक काळात ज्यांच्याबद्दल म्हणावं, अशा गवयांतील कुमार गंधर्व सर्वश्रेष्ठ गवई आहेत असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती केली असं कोणी म्हणू नये. आणि मी अतिशयोक्ती केली असं ज्याला वाटेल, त्याला अतिशयोक्ती म्हणजे काय हे कळत नाही, हे मला ठाम माहीत आहे. मी जवळजवळ तीस वर्षांपूर्वी कुमारांचं गाणं मुंबईत ऐकलं त्यावेळी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगतो. तुकारामांनी म्हटलंय, ‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी, साचभावे वर्ताया.’ त्या देहूच्या वाण्यानं ते असं मिजाशीत सांगितलेलं होतं. कुमारांसारख्याचं गाणं ऐकताना ते आतून ऐकल्यासारखं आम्हाला वाटतं. भारतीय संगीताची ज्यांनी स्थापना केली, भारतीय संगीत नावाची कल्पना ज्यांनी काढली, त्यांना जे काही म्हणायचं होतं, ते साचभावे सांगण्यासाठी कुमार गंधर्व आलेला आहे, असंच काही असावं असं मला वाटतं. मी ते भाषण केल्यानंतर त्यावेळी अनेकांना ते आवडलेलं नव्हतं. मनुष्यस्वभावामध्ये दुसऱ्याला चांगलं म्हणणं हासुद्धा एक भाग आहे. तसं दुसऱ्याला चांगलं म्हटलेलं नावडणं हासुद्धा मनुष्यस्वभावाचाच एक भाग आहे. त्यामुळे कोणाला दोष देण्याचे कारण नाही. पण मी हे उगाच म्हटलेलं नव्हतं. कुमार गंधर्वामध्ये जशी ५० वर्षे गायल्याची पुण्याई आहे, तशी माझ्यामध्येसुद्धा वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपासून गाणं ऐकल्याची पुण्याई आहे. ती काही फुकटची पुण्याई नाही. गवयांनासुद्धा स्थान मिळतं, प्राप्त होतं, ते ऐकणारा कोणीतरी असतो म्हणूनच.
या जगामध्ये भक्त नसते तर भगवंताला कुत्र्यानंसुद्धा विचारलं नसतं. भक्त आहे म्हणून भगवंताची किंमत आहे. हा देवाणघेवाणीचा प्रकार आहे. मला आनंद एवढाच आहे की, कोठेतरी आमचा धागा असा जमला आहे की, तो जे काय सांगतो ते माझ्या मनामध्ये आपोआप साठून जातं. रक्तामध्ये काही रक्त असं असतं की, दुसऱ्याचं रक्त दिलं तरी ते टाकून देतं असं म्हणतात. तसंच गाण्याचं आहे. काही गाणी आपलं शरीर फेकूनच देत असतं. स्वीकारायला तयार नसतं. त्याच्या उलट काही गाणी अशी असतात, की ती आपल्या शरीरात कधी मिसळतात त्याचा पत्ताच लागत नाही. कुमार गंधर्वाचं गाणं माझ्या सबंध व्यक्तिमत्त्वामध्ये कधी मिसळलं याचा पत्ताच लागला नाही.
कुमारला जसा तो किती उत्तम गातो याचा पत्ता नाही, तसं आम्ही ऐकताना किती उत्तम ऐकतो याचा आमचा आम्हालाच पत्ता नाही. असा अनुभव कुमारांच्या गाण्यामध्ये मला मिळाला. तो मला गाण्यातूनच जेव्हा काही सांगतो, तेव्हा मी कोणीतरी मोठा झालो, मी कोणीतरी निर्मळ झालो असं मला वाटतं. हे सांगताना मला गाण्यातील फार कळलं असं म्हणायचं कारणच नाही. कारण मला ते सर्टिफिकेट दाखवून कोणत्याही गाण्याच्या कॉलेजचा प्रिन्सिपॉल व्हायचं नाही, किंवा मी फार मोठा मनुष्य आहे, हे मला कोणाला मुद्दाम सांगायला जायची गरज नाही. मला जो आनंद मिळालेला आहे, जी श्रीमंती मिळालेली आहे, ती मला मिळालीच नाही, म्हणून फाटके कपडे घालून हिंडावं, अशा प्रकारचं ढोंग करायची मला गरज नाही. मी एक कमालीचा श्रीमंत मनुष्य आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे.
कुमारांचं दहाव्या वर्षी जे गाणं झालं ते ऐकलेला मी मनुष्य आहे. आज हर्षे मास्तर सोडले तर ते गाणं ऐकलेला दुसरा कोणी या मेळाव्यात असेल असं मला वाटत नाही. आमचे दुसरे एक अतिशय ‘तरुण’ श्रोते आहेत- दत्तोपंत देशपांडे. ७५ वर्षांचे. त्यांनी ते गाणं ऐकलेलं आहे. तेही देशपांडेच आहेत. माझ्यासारखे. त्या दिवशी काहीतरी असं झालं की, आपण काहीतरी अद्भुत ऐकलं असं श्रोत्यांना वाटलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे, तेव्हा तेव्हा घरी आल्यानंतर ‘अस्वस्थता’ याखेरीज आणखी काही मी अनुभवलेलं नाही. मला आठवतंय, ५३ सालची गोष्ट आहे. आमचे गणूकाका कात्रे होते. कुमार गंधर्व त्यावेळी आजारातून बरे होऊन पुण्याला आले. फडतऱ्यांच्या वाडय़ामध्ये. त्यांच्या माडीवर. त्या वास्तूला विचारलं की, तुझ्याकडं कोणाकोणाचं गाणं झालं? आणि तो वाडा जर बोलायला लागला, तर भारतीय संगीताचा गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास आपल्याला ऐकायला मिळेल. दिसायला अतिशय साधी अशी ती वास्तू आहे. आणि काय सांगायचं! तिथं कुमार आले आणि त्यांनी गायला सुरुवात केली. त्यावेळी वसंतराव देशपांडे माझ्या शेजारी बसलेले होते. मंगरुळकरही होते. असे आम्ही सगळेजण बसलो होतो. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी कुमारनं गायला सुरुवात केली. त्याला फार गायला परवानगी नव्हती. तास- दीड तासच गायचं होतं. परंतु त्या तास- दीड तासात जवळजवळ दोनशे तासांचं संगीताचं भांडवल आमच्या शरीरामध्ये गेलेलं होतं. ते झाल्यानंतर रात्री दहा-अकराच्या सुमारास आम्ही घरी आलो. आणि मला ते अजून आठवतंय, की मी आणि वसंत देशपांडे दोघेजण दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत एकमेकांशी काहीही न बोलता खोलीमध्ये बसलो होतो.

कुमारांसारखा गवई गातो, त्यावेळी आपली भूमिका अशी पाहिजे की तो जो भूप गातो, त्याला भूप म्हणायचं. कुमार जे गातो, त्याला ख्याल म्हणायचं. ख्यालाची व्याख्या उलट करीत बसायचं नाही.

ख्याल म्हणजे काय, याचा परीक्षेसाठी अभ्यास केला तर प्रमाणपत्र मिळेल; पण गाणं नाही मिळणार. ‘बालगंधर्वाचा अभिनय म्हणजे काय?’ असं मला कोणीतरी विचारलं तेव्हा मी म्हटलं, ‘बालगंधर्वाचा अभिनय नव्हता. बालगंधर्व जे करतात त्याला अभिनय म्हणतात.’ त्याप्रमाणं कुमार जे गायचा त्याला आम्ही गाणं म्हणायचो. तेथे आम्हाला राग दिसायला लागला. त्याचा साक्षात्कार झाला. कोणीतरी आता म्हणालं की, गौडमल्हार मला तसा वाटलाच नाही. तर त्यानं गायलेला गौडमल्हार काय होता, हे परमेश्वरालाच ठाऊक. एक प्रसिद्ध गोष्ट आहे. द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा याला पिठाचं दूध त्याची आई देत असे. एकदा ते दुयरेधनाच्या घरी गेलेले असताना त्यांनी त्याला खरं दूध दिलं. परंतु ते त्यानं थू थू करून थुंकून टाकलं. त्याला या दुधाची चव माहीत नव्हती. तो पिठाचं दूधच प्यायला होता. तसं पिठाच्या पाण्याचा गौडमल्हार ज्यानं ऐकला असेल त्याला कुमारांचा गौडमल्हार हा गौडमल्हार न वाटणं यात त्याची काही चूक नाही. पण हे सगळं जे आलं ते काही आपोआप आलं असं नाही. कुमार गंधर्व किती लहानपणी गायला लागले, त्याला जे गाणं स्फुरलं, ते किती मोठं होतं, हे सांगायची गरज नाही. वयाच्या दहाव्या वर्षीची त्याची ‘रामकली’सारखी रेकॉर्ड ऐकली तर त्यावेळी आणि आता ऐकताना तेच चैतन्य गातंय असं तुम्हाला वाटेल. परवासुद्धा त्याच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त निरनिराळ्या लोकांनी लेख लिहिले. आत्मीयतेने लिहिले. कुमार काही कोणी राजकीय मंत्री किंवा पुढारी नाही, की त्याच्याबद्दल चांगलं लिहिल्यानं आपल्याला मुंबईत एखादा फ्लॅट वगैरे मिळेल. तर प्रेमानं सगळ्यांनी लिहिलं. सगळ्यांचे लेख मी वाचले. अतिशय तन्मयतेने वाचले. आणि माझ्या लक्षात आलं की, एवढं सगळं झालं तरीसुद्धा या लेखकांना वाटत असेल की, अजूनसुद्धा काहीतरी राहिलंय. परमेश्वराबद्दल जे म्हणतात, स्थिरचर व्यापून अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला, तसं कुमार गंधर्वाच्याबद्दल सगळं लिहूनसुद्धा पुन्हा दशांगुळे राहतातच. त्यामुळे हे गाणं आम्ही सांगूच शकत नाही. आमचा अहंकार जर कुठं जिरत असेल, तर कुमार गंधर्वाचं गाणं कसं आहे हे सांगा, असं म्हटलं की तेथेच जिरतो. ही अनुभवाची गोष्ट आहे. ही प्रचीतीची गोष्ट आहे. आणि प्रचीतीच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला काय सांगणार? मला राहुल म्हणाला, आज तुला कुमारबद्दल बोलायचं आहे. मी मनात म्हटलं की, आज तुला चांदण्याबद्दल बोलायचं आहे. ज्यानं चांदण्याचा आनंद घेतलाय, त्यानं बोलायची गरज नाही. ज्यानं हा आनंद घेतला नाही, त्याला बोलून कळणार नाही. तसं कुमारचं गाणं आहे. ज्याच्या अंतरंगामध्ये ते शिरलं, त्याला कळणार. याचं कारण आहे- कुमारसारखे जे गवई गातात ते काहीतरी दुसरं सिद्ध करण्यासाठी गात नाहीत. ते गातात त्यावेळी त्यांचं सगळं व्यक्तिमत्त्व, त्यांचं रंध्र न् रंध्र गात असतं. स्टेथस्कोपसारखं एखादं यंत्र निर्माण झालं आणि कुमार समजा भूप गातोय आणि त्यावेळी ते यंत्र त्याच्या गुडघ्याला लावलं तर त्या गुडघ्यातून, त्या नळीमधूनसुद्धा भूपच ऐकू येईल. सबंध शरीरात, सबंध रक्तात, आपल्या सबंध चिंतनात जेव्हा तो राग मिसळतो, त्यावेळीच तो राग जिवंत होऊन आलेला असतो. काही लोकांचं पाठांतर इतकं चोख असतं, की उत्तम कारागीरसुद्धा उत्तम कलावंत होऊ शकतो. उत्तम कारागिराला मी नावं ठेवीत नाही. त्यालासुद्धा तपश्चर्या लागते. कुमारसारखा गवई ज्यावेळी गायला लागतो, त्यावेळी ते चैतन्य आतून काहीतरी प्रॉम्प्टिंग करतं आणि बाहेर हे गाणं येतं. याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. कुमार माझ्या घरी भूप गात होते. ‘ध्यान अब दीज्यो गुनिजन..’ आणि तितक्यात गोविंदराव टेंबे आले. गोविंदराव टेंब्यांचं मैफलीत येणं म्हणजे काळोख्या रात्री एकाएकी चांदणं पसरल्यासारखंच होतं.

काळोखी रात्र असताना ‘फुल मून’ दिसला म्हणजे कसं वाटेल, तसं गोविंदराव नुसते मैफलीत आले की वाटायचं. मी खरोखर सांगतो की मैफलीची रोशन, मैफलीची शोभा काय असते, तर ती म्हणजे गोविंदराव होते. गाणाऱ्या माणसाला आपलं जीवन धन्य झालं असं वाटावं अशा रीतीनं ते गाणं ऐकत असत. चांगलं असेल तर. नाहीतर मग त्यांचा चेहरा बघवत नसे. कुमारचं गाणं झालं. तो भूप संपला. त्याबरोबर गोविंदरावांनी उद्गार काढले, ‘तुला काय दाद द्यायची? गेल्या तीन जन्मांतील गाणं या जन्मात आठवावं अशी जर विधात्यानं तुझ्याकडं सोय करून ठेवलेली असेल, तर दाद कसली द्यायला पाहिजे!’

एखाद्याला लहानपणी एकदम अशा प्रकारची कीर्ती मिळाली की फार धोकाही असतो. मला नेहमी असं वाटतं, की ज्याला प्रॉडिजी म्हणतात, अशा प्रकारचा जन्म देणं हा एक प्रकारचा त्याच्यावरचा अन्यायच असतो. परंतु कुमार हा एक असा निघाला, की लहानपणी तो बालकलावंत असूनसुद्धा आजन्म कलावंतच राहिला. बाल्यामध्ये ‘हा फार चांगलं गात असतो’ या तारीफेवर पुढे ५० वर्षे गात राहणं, असा प्रकार झाला नाही. त्याचं नाव ज्या कोणी कुमार गंधर्व ठेवलं असेल, त्याच्या कानामध्ये त्या क्षणी जगातील सर्व शुभदेवता आल्या असतील आणि त्या कुजबुजल्या असतील की, हा कुमार- ‘गंधर्व’ आहे.

‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ असं म्हटलंय. वार्धक्यामध्येसुद्धा शैशव जपणे हे फार कठीण असते. कुमारच्या गाण्यातील ताजेपण हे एखाद्या शैशवासारखे आहे. कुमार गंधर्व पान लावायला लागले तरी ते मैफिलीत बसल्यासारखे किंवा ख्याल गायला बसल्यासारखे वाटतात. असं म्हटलेलं आहे की ‘मधुराधिपतेरखिलम् मधुरम्’! जो मधुर असतो त्याचं चालणं, बोलणं, गाणंसुद्धा मधुरच असतं. असं सगळं मधुर बरोबर घेऊन तो आला, हे खरंच आहे. ते घेऊन आला, परंतु मिजाशीत राहिला नाही. ते वाढवीत गेला. त्याला अखंड चिंतन कारणीभूत आहे. कुमार गंधर्वाचं गाणं म्हणजे चिंतनाच्या तपश्चर्येतून निघालेली एक किमया आहे. त्याला कोणीतरी विचारलं की, तुमची साधना केव्हा चालू असते? कुमारनं त्याच्याकडे असं पाहिलं, की ‘केव्हा नसते?’ साधना याचा अर्थ रोज सकाळी उठून ‘पलटे घोकत बसणे’ असा नव्हे. साधना म्हणजे तो राग दिसला पाहिजे, स्वर दिसला पाहिजे. शंकराचार्याबद्दल असं म्हणतात की, त्यांनी परकायाप्रवेश केला. कुमार गंधर्व गायला लागले की ते स्वरकायाप्रवेश करतात असं वाटतं. गंधार म्हणजे कुमारच, मध्यम म्हणजे कुमारच आणि पंचम म्हणजे कुमारच असं वाटतं. भाविक लोक असं म्हणतात की, ‘पूर्वसुकृताचि जोडी म्हणुनि विठ्ठली आवडी..’ मला पूर्वसुकृताचं माहीत नाही, परंतु मी असं म्हणेन की, ‘पूर्वसुकृताचि जोडी म्हणुनि आज संगीत आवडी’ असं वाटायला लावणं, हे कुमारचं गाणं आहे. आज आपल्याला केवढं श्रीमंत केलंय या माणसानं! गेल्या चाळीस वर्षांच्या याच्या सहवासातून मला फक्त ऐश्वर्यच मिळालं आहे. बाकी काही नाही. फक्त ऐश्वर्य, ऐश्वर्य आण ऐश्वर्यच. प्रत्येक बैठक मला प्रचंड श्रीमंत करून गेली. त्यानं आम्हाला किती बदललं, हे त्याचं त्यालाच माहीत नसेल. हे बदलताना कमालीच्या सहजभावनेनं त्यानं बदललं. चारचौघांमध्ये चारचौघांसारखं. हा कोणीतरी मोठा आहे, हे सामान्यांना मुद्दाम सांगावं लागलं नाही. आज एखादा वादकही पुढे-मागे दोन-चार शिष्य घेऊन येतो. अशा वरातीतून आल्यावर त्याला मोठं वाटतं. परंतु साध्या रीतीने स्वत:च्या गाण्याच्या मैफलीला स्वत:च स्वत:ची बैठक घालणारा हा गायक आहे. 
कुमारचं दुसरं वैशिष्टय़ असं की, भारतीय संगीतकलेला ज्यांनी अतोनात मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्यांच्यात मला कुमार गंधर्वाचं स्थान फार मोठं वाटतं. हे करण्यासाठी त्यानं खोटे प्रयत्न केले नाहीत. पण बैठक हे एका यज्ञकर्मासारखं अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं कर्म आहे, अशा भावनेनं त्याकडे बघितलं. कसंतरी चालेल, काहीतरी चालेल, असं केलं नाही. दोन वर्षांपूर्वी आलेलो असताना तुम्हाला काय दिलं, दोन वर्षांनंतर काय द्यायचं, याचा विचार करून त्याचा मेनू तयार करणं आणि तो देणं, हे कोणता गवई करतो? तुम्ही मला सांगा. आम्हा कलावंतांमध्ये नेहमीची पद्धत असते, की ज्या गोष्टीसाठी आम्हाला टाळ्या आणि वाहवा मिळालेली असते ती ट्राय करायची. त्यावेळी तो शुअर शॉट असतो. काही घाबरायचं कारण नसतं. कुमार गंधर्वाचं मोठेपण याच्यात आहे, की त्यांना पेटंट लागतच नाही. ते जो राग गातील तोच या जगातील सर्वश्रेष्ठ असा राग वाटत असतो. त्यांना न आवडणाऱ्या रागाबद्दलसुद्धा त्यांनी त्या दिवशी गंमत केली. त्यानं मी थंडच झालो. त्यांच्याकडे कोणीतरी परीक्षेला बसणारा शिष्य आला होता. तो म्हणाला की, मला हिंडोलमधील चीज पाहिजे. कुमार म्हणाले, अरे, हिंडोल हा मला न आवडणारा राग आहे. कुमारलासुद्धा न आवडणारा राग असतो, याच्यावर माझा विश्वास नव्हता. पण त्या दिवशी त्यानं ठरवलं होतं, की हिंडोलशी जमलेलं नाही. तो आवडत नाही म्हटल्यानंतर मला हिंडोल का आवडत नाही, यावरचीच चीज त्यांनी म्हटली. तो मला आवडत नाही, बिलकूल आवडत नाही म्हणून त्यांनी त्या रागाला वेगळीच पीठिका दिली. ते इतकं सुंदर आहे, की भारतीय संगीताच्या इतिहासात ते कोणाला साधलेलं असेल असं मला वाटत नाही. त्याला अतोनात सुंदर अशा वात्सल्याची पीठिका आहे. त्यांचा नातू फार दंगा करतो. आणि ते त्याला सांगतात की, ए बदमाशा, तू मला आवडत नाहीस. म्हणजे न आवडणाऱ्या हिंडोलला त्यांनी लहान मुलाच्या खटय़ाळपणाची पीठिका दिली. हे साध्यासुध्या बुद्धिमत्तेचं काम नाही. मला नेहमी वाटतं की, कुमार गंधर्व कधी नाटककार झाले नाहीत, नाहीतर आमचं कोणी नाटककार म्हणून नावही घेतलं नसतं. त्यांच्या नाटकात आम्ही पडदे ओढायला जाऊन उभे राहिलो असतो. ते गवई झाले ते बरं झालं. आणि आम्ही गवई झालो नाही, हे भारतीय संगीताच्या दृष्टीनं फार बरं झालं. आपण गवई झालो नसतो तर बरं झालं असतं, असं जर काही गवयांना वाटलं असतं तर भारतीय संगीतावर उपकारच झाले असते. ते कळत नाही, हीच फार मोठी ट्रॅजेडी आहे. परंतु कुमारनं हा सगळा आनंद दिला. प्रत्येक क्षेत्रात आनंद दिला. त्याचं नुसतं येणं हेच आनंददायी असतं. कुमार गंधर्व पुण्यात आला- ही बातमी कळल्यानंतर आमच्यासारखे लोक जागच्या जागीच आनंदी व्हायचे. त्याच्या गाण्याला जायचं लांबच राहिलं. हे भाग्य कुणाला लाभलं? ते चिंतनानं लाभलं, तपस्येनं लाभलं. प्रतिभेच्या जोडीला उत्तम प्रज्ञा असल्यामुळेच त्याचे प्रयोग महत्त्वाचे ठरले.

खरं सांगायचं तर कुमार गंधर्वाचं गाणं वयाच्या दहाव्या वर्षांइतकंच साठाव्या वर्षीही तरुण आहे. साठावं वर्ष कुमार गंधर्व नावाच्या माणसाला लागलेलं वर्ष आहे. त्याचं गाणं त्याच्यासारखंच चिरतरुण आहे. काही गोष्टी म्हाताऱ्या होऊ शकत नाहीत. जसं चांदणं किंवा गंगेचं पाणी. त्याचं गाणं चैतन्यानं भरलेलं गाणं आहे.

(लोकरंग – ४ एप्रिल १९९९ )

मूळ स्रोत -->https://www.loksatta.com/lokrang/lekha/pu-la-deshpande-speech-delivered-on-occasion-of-music-festival-inauguration-1291518/

0 प्रतिक्रिया: