Tuesday, September 28, 2021

'मुली, औक्षवंत हो' ! '

......संगीतातले ढुद्धाचार्य सिनेमा संगीताला नाके मुरडीत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ही मंडळी आपले कान चारी दिशांतून येणाऱ्या सुरांसाठी उघडेच ठेवत नाहीत. वास्तविक सिनेमासंगीत हे आजचे लोकसंगीत आहे. लता मंगेशकर ही आमची खरी 'नॅशनल आर्टिस्ट' आहे -- राष्ट्रगायिका आहे.

नॅशनल प्रोग्रॅममधे गायले म्हणजे नॅशनल आर्टिस्ट होत नसतो. त्याला आकाशवाणीच्या स्टुडिओत घर करून चालत नाही. देशातल्या लोकांच्या अंतःकरणात घर करावे लागते. ते भाग्य लताइतके दुसऱ्या कुठल्याही गायकाला किंवा गायिकेला लाभलेले नाही. आज पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग जर कुणी एकत्र बांधून ठेवला असेल, तर लताच्या सुरांनी. निसर्गदत्त किंवा संकुचित मनाने ज्यांना बहिरेपणा आलेला आहे असे जर काही अभागी वगळले, तर ह्या सुरांनी आकृष्ट न होणारा ह्या देशात कुणी असेल, असे मला तरी वाटत नाही.

सिनेमातले गाणे अल्पजीवी म्हणू हेटाळू नये. ते गाणाऱ्यांची आणि ती गीते लिहिणाऱ्या प्रतिभावान गीतकारांची उपेक्षा होता कामा नये. ते तसे करायचे असेल तर वेलीवर फुलणाऱ्या जाईजुईलाही तुच्छ मानावे लागेल. चित्रपटसंगीतात तबकडीवरची ही तीन-साडेतीन मिनिटे सुरांच्या खजिन्यातून नवीनवी रत्ने काढून साजरी करणे हे सोपे नाही. त्या कालावधीतली प्रत्येक सेकंदाची पोकळी फारफार चतुराईने भरावी लागते. या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. ताजमहालाच्या स्थापत्यात जशी सुधारणा सुचवता येत नाही, किंवा चांदण्याची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला 'तत् तत्वम असि' असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे. सूक्ष्म लयतत्व पाहणारी ही नजर आहे. लताची पंचवीस वर्षांपूर्वीची तबकडी काय आणि आजची काय, त्याच चैतन्याने उजळलेला तो सूर. त्याला कोमेजणे ठाऊक नाही आणि त्याची नक्कलही होऊ शकत नाही.

बहुधा गाणे न कळणारे उच्चभ्रु रसिक "आपण शास्त्रीय संगीताखेरीज दुसरं काही ऐकत नाही," वगैरे सांगत असतात. हे म्हणजे स्वतःला फुलांचा षौकीन म्हणवणाऱ्याने आपण फक्त भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले कमळ तेवढे मानतो, इतर जाईजुई वगैरे हलकी (!) फुले मानीत नाही, म्हणण्यापैकी आहे. ही माणसे चुकून सुरांच्या राज्यात शिरली आहेत.भारतीय चित्रपट संगीतदिग्दर्शकांनी स्वररचनेचे फार कौतुकास्पद चातुर्य दाखवले आहे. आणि सच्चा सच्चा सूर दाखवायला तिथे लताचा आवाज आहे. सुरांचा आणखी सुंदर संस्कार कुठला हवा?

लताच्या सुरांनी जिंकलेले हे केवढे मोठे साम्राज्य आहे! ह्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. सकाळ उजाडते. घरोघरीचे रेडिओ लागतात. एखाद्या रेडिओवरून बातम्या ऐकू येत असतात; युद्धाच्या, जाळपोळीच्या, सत्तेच्या उलथापालथीचा, मन विषण्ण करणाऱ्या, जगणे म्हणजे हेच का शेवटी हा प्रश्न उभा करणाऱ्या -- आणि अंधारातून प्रकाशरेखा जावी, तसा एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले तरी हे सूर ऐकायला तरी जगले पाहिले, असे वाटायला लागते. अतिपरिचयानेदेखील अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणे लताचे सूर ! ते सूर कानी पडले की, मनावर शिल्पासारखा कोरलेला तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो.


"शूरा मी वंदिले" म्हणणारे परकर-पोलक्यातले लताचे चिमुकले ध्यान दिसायला लागते. मनात म्हणतो, ह्या मुलीला कल्पनाही नसेल की, ह्या "शूरा मी वंदिले" ऐकताना कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरातल्या अनेकांनी मनात म्हटले असेल की, ह्या असल्या अलौकिक 'सूरा मी वंदिले'. सुरांची चैतन्यफुले फुलविणाऱ्या लतेला, वयापेक्षा कुठलीही वडिलकी नसणाऱ्या माझ्यासारख्याने अंतःकरणापासून एकच आशीर्वाद द्यायचा की, "मुली, अशी ही दाद तुला अखंड मिळो -- औक्षवंत हो !"

अपूर्ण 
(गुण गाईन आवडी)
पु.ल. देशपांडे

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

भाईंनी काय कौतुक केले आहे लता दीदींचे..... फारच सुंदर....