Tuesday, September 28, 2021

'मुली, औक्षवंत हो' ! '

'राज्य सुखी या साधुमुळे
शूरा मी वंदिले'


'राज्य सुखी या साधु'मुळे नंतरच्या शूरामधल्या 'रा' ह्या अक्षरावर सभागृहातून विजेच्या वेगाने आणि विजेच्या लखलखाटाने एखादा तीर सूं-सूं करीत जावा तशी त्या चिमुकल्या गळ्यातून तान गेली आणि सभेचा लक्ष्यवेध झाला. त्या नऊदहा वर्षांच्या चिमण्या जीवाला आपण काय केले ह्याची कल्पना तरी होती की नाही, देव जाणे! सगळ्या पॅलेस थिएटरचे भान त्या सुरांबरोबर हरपले. एक एवढीशी हडकुळी, पण अंतर्बाह्य आत्मविश्वास फुललेली मुलगी रंगभूमीवर येते, आणि फार फार तर 'घेऊन ये पंखा' म्हणायच्या वयात एकदम 'शूरा मी वंदिले' सुरू करते काय!

बाबालाल तबलजी एखाद्या अनुभवी गायकाबरोबर धरावा तसला जबऱ्या दिमाखाचा ठेका काय धरतात आणि पदाची अस्ताई संपवून पहिल्या समेला येताना ही पोरगी पुरे सप्तक भेदून लयीचा तो बिकट बोजा संभाळून समेवर येते काय!

कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरात संगीतातल्या दिग्गजांनी ज्या रंगमंचावरून सुरांच्या बरसातीचे साक्षात्कार घडविले आहेत, त्याच स्थानावरून एका परकऱ्या पोरीने हे नवल वर्तविले होते. आश्चर्य, आनंद आणि त्या पोरीच्या कर्तबगार पित्याची आठवण असल्या नानाविध भावनांनी त्या रंगमंदिरातील श्रोत्यांच्या अंगावर रोमांच फुलले. कडकडून टाळी झाली नुसती पहिल्या समेला. मी मी म्हणणाऱ्यांनी स्वत:ला चिमटा घेऊन पाहिले असेल, की आपण हे ऐकतो आहो ते खरेच आहे की स्वप्न आहे? त्या तानेचा दाणान्‌दाणा स्वच्छ होता, त्या सुरात भिजलेला होता. लयीच्या कणाकणाचा अंदाज बिनचूक होता. समेवरची झडप तर अशी घारीसारखी होती की समोरचे ते एवढेसे परकर-पोलक्यातील दर्शन नसते तर एखाद्याला वाटले असते की कुणी तपातपाची मेहनत झालेली बुजुर्ग बाई केवळ चूष म्हणून बालआ‌वाजीत पलटा घेऊन गेली.

यापूर्वी फक्त कुमार गंधर्वांनी वयाच्या नवव्या वर्षी मुंबईच्या जिना हॉलमध्ये असला धक्का दिला होता. बालगंधर्वांनी आणखी काही वर्षांपूर्वी अशाच बालवयात रंगभूमीवर येऊन असंख्य अंत:करणे आपल्या सुरांनी झेलली होती. आणि आता हा एक नवा चमत्कार घडत होता. बालगंधर्व, कुमारगंधर्व आणि लता मंगेशकर - तिघांनी संगीतातल्या तीन निरनिराळ्या वाटा धरल्या आणि असामान्यत्वाने उजळून ठेवल्या.

संगीताच्या क्षेत्रात परंपरेचे स्थान मोठे मानले जाते. कलावंत मंडळी आपापल्या कुळाचा आणि गोत्राचा फार मोठा अभिमान बाळगीत असतात. कित्येकदा तर काही जण त्या गोत्राच्याच मोठेपणावर नांदू पाहतात. पण सूर आणि लय ह्यांनाच शंकर-पार्वती मानून गाणारे फार थोडे कलावंत मी पाहिले. 'झरा मूळचाचि खरा' म्हणजे काय ते ह्या कलावंताचे गाणे ऐकताना कळते - मग ते 'मम सुखाची ठेव' असो, 'म्हारो जी भूलो ना माने' किंवा 'आयेगा आनेवाला' असो. चिमुकली लता 'शूरा मी वंदिले' म्हणून गेली, त्याला पंचवीस तीस वर्षे झाली.

दीनानाथांचे सूर हवेतून विरले नव्हते. त्यांची धैर्यधराच्या भूमिकेतली ती गाणी, चमत्कृतींनी नटलेल्या गळ्यातून आलेल्या त्या जागा लोकांच्या कानांत होत्या. त्यामुळे 'शूरा मी वंदिले' ऐकल्यावर लोक म्हणाले, 'वा! दीनानाथांची आठवण झाली!'

त्यानंतर मात्र ह्या त्यांच्या लाडक्या कन्येने वडिलांचेच व्रत चालवले. वडिलांची नक्कल करण्याचे नव्हे. ते त्या मानी गायकालाही रुचले नसते. त्याने तर मराठी रंगभूमीवर स्वत:ची गायकी निर्माण केली होती. दीनानाथराव दीनानाथरावांसारखेच गात होते. त्यांच्या मुलीने हेच व्रत पुढे चालवले. त्यानंतर लता ही लतासारखीच गात आली. ह्या काळात अनेक नवीन गायिका चित्रपटांतील गाणी म्हणण्यासाठी आल्या. त्यांची धडपड 'डिट्टो लता' व्हायची होती. त्यांतल्या कुणी 'लताची आठवण करून देतात,' अशीही तारीफ झाली असेल. पण संगीताच्याच काय, कुठल्याही कलेच्या क्षेत्रात अमक्याअमक्याची आठवण करून देणारा कलावंत सदैव दुय्यम दर्जाचा मानकरी होऊन राहतो. लताने गेल्या पंचवीस वर्षांत गझल, दादरे, ठुमऱ्या आणि हजारो विविध चालींवर नटलेली गाणी म्हटली, पण त्यांत तिने आठवण फक्त लताचीच करून दिली. कलावंत 'या सम हा' होतो तो असा!


लयीच्या आणि सुरांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांनी जेव्हा चैतन्य धारण केलेले असते, त्या वेळी त्या गाण्याची कोणी जातवारी पाहत नसतात. उगीचच भयंकर धीमा एकताल लावून दहा मात्रांपर्यंत सुरांच्या माश्या हाकलीत जायचे आणि मग झोपेतून जाग आल्यासारखे शेवटच्या एकदोन मात्रांवरून उडी मारून समेच्या नाक्यावरची जकात चुकवायची आणि ख्यालगायक म्हणून मोठेपणा मिरवायचा, ह्याला काही अर्थ नाही. संगीतात लयीतला प्रत्येक क्षण हा सुरांच्या मजकुराने भरून काढावा लागतो नव्हे, तिथला सुरांचा अभाव असलेला विराम हादेखील बोलका असावा लागतो. चित्रपटासाठी गायिलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्यातदेखिल चांगल्या ख्यालगायिकी इतकीच लयकारीची जाणीव असावी लागते.

लताचा सूर सारेच मानतात, पण निर्मळ मनाने सर्व तऱ्हेच्या संगीताचा आस्वाद घेणाऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी जर कुठली गोष्ट असेल, तर शब्दांची फेक करताना दिसणारी लताची विलक्षण मोठी अशी लयकारीची जाणीव. तिच्या सुरांइतकीच सूक्ष्म. ढोबळ लयकारी नव्हे. एखाद्या फुलपाखरांच्या पावलांनी लयीच्या एका कणावरून दुसऱ्या कणावर अलगद उडणारी. कुमार, बालगंधर्व आणि लता ह्यांना वरदान आहे ते लयकारीच्या ह्या अलौकिक जाणकारीचे! गाण्यात बोलत असते ती लय; आणि म्हणूनच लयीच्या जाणिवेचे दुर्मिळ दान घेऊन आलेल्या ह्या कलावंतांनी गायिलेले गाणे दुसऱ्या कुणीही म्हटले, की काही तरी कमी आहे, असे वाटते. लताची गाणी तर खूप चांगला आवाज असलेल्या किती तरी मुली गातात, आवाजाची टीप गाठतात. पण मूळ चित्र आणि त्याची प्रिंट ह्यात असतो, तसा फरक दिसतो. ह्याचे कारण लयीच्या सूक्ष्मतेच्या जाणिवेचा अभाव. सुरांच्या वर्त‌ुळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाहत्या काळातला निमिषा-निमिषातला लक्षांश पकडणारा असा हा लताचा गळा आहे. आणि म्हणूनच तिच्या गीतातले शब्दच नव्हे, तर व्यंजनमुक्त स्वरही किती आशयगर्भ वाटतात. लता 'धीरेसे आ जा' म्हणून लोरी गाते, पण 'आ जा'नंतरचा तो स्वरांचा हलकासा शिडकावा लयीच्या असा जागेवरून उठतो, की त्याने कसल्या तरी परतत्त्वाचा स्पर्श केल्यासारखा वाटतो. ह्या साऱ्या आठवणी कमालीच्या मुष्किल आहेत. केवळ स्वरांच्या करामतीमुळे नव्हे; उठावासाठी पकडलेल्या, साध्या नजरेला न दिसणाऱ्या स्थानांमुळे. लताच्या गाण्यातले असामान्यत्व मला तरी भासते ते इथे. झोप उडवणाऱ्या त्या अंगाईगीतातल्या स्वरांच्या शिडकाव्यासारखे किती तरी शिडकावे आज तिने गायलेल्या शेकडो तबकड्यांच्या रंध्रारंध्रातून लपलेले आहेत. तबकडीच्या त्या रंध्रात शिरून तिला गाती करणाऱ्या त्या सुईचे अग्र अधिक सूक्ष्म की त्या रंध्रातून उमटणारा लताचा सूर अधिक सूक्ष्म, हे सांगणे कठीण आहे.


होनाजीच्या भूपाळीतल्या 'आनंदकंदा प्रभात झाली'मध्ये वरच्या षड्जावर 'ई'कार लागला आहे तो असाच सुराची सुई घुसल्यासारखा. 'जा जा जा रे जा सजना'मध्ये अशीच एक जागा आहे. 'कैसे दिन बीते कैसी बीती रतियाँ'मध्ये 'हाये'‌वर अशीच एक सुरांची पखरण आहे. अशी किती म्हणून उदाहरणे दाखवायची! माडगूळकरांच्या 'जोगिया' कवितेतल्या नायिकेच्या गळ्यातून सूर उमटल्याचे वर्णन त्यांनी 'स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी' असे केले आहे. लताचे कुठलेही गीत ऐकताना मला ही ओळ आठवते. तिने गायिलेले प्रत्येक गीत हे स्वरलतेवरचे फूलच आहे. अशी शेकडो फुले गेल्या पंचवीस वर्षांत फुलली, आणि किती सहजसहज फुलल्यासारखी फुलली. शब्द, सूर आणि लय ह्यांचे विलक्षण आकार, गंध आणि रंग घेऊन प्रकटलेल्या फुलांचे हे नंदनवन आहे.

मला नेहमी वाटते की, मुंबईसारख्या शहरात एक संगीताचे टोलेजंग म्युझियम असावे. चित्रकलेचे किंवा इतर वस्तूंचे असते तसे. त्यात टेप्सवरून किंवा तबकड्यांवरून देशोदेशींचे आणि सर्व प्रकारचे संगीत ध्वनिमुद्रित करून ज्याला जे ऐकावेसे वाटेल ते ऐकण्यासाठी छोटी छोटी दालने करावीत. हे सारे गायक, गायिका दिसत कसे होते, बोलत कसे होते, राहत कसे होते, हे दाखवणारी चित्रे आणि डॉक्युमेंटरीज कराव्यात. देशोदेशीच्या संगीताच्या इतिहासांच्या, शास्त्रांची, कलावंतांच्या चरित्रांची तिथे मोठी लायब्ररी करावी. पुस्तकांची लायब्ररी, तबकड्यांची लायब्ररी, टेप्सची, डॉक्युमेंटरीजची लायब्ररी. सूर-लयीच्या तृषार्तांनी यावे आणि तृप्त होऊन जावे. त्या लायब्ररीत एक पडवी फक्त लताच्या गीतांची होईल. इतक्या विविध प्रकारची गाणी गायलेली दुसरी गायिका माझ्या तरी माहितीत नाही. आज पंचवीस वर्षे अहोरात्र ह्या अलौकिक सुरांची उधळण चालू आहे. आमची पहाट लताच्या सुरांबरोबर उमलते. मध्यान्ह, सांज, रात्र, मध्यरात्र ह्याच सुरांची साथ घेऊन येतात. वातावरणात कुठे ना कुठे तरी लताचा स्वर मावळत्या किंवा उगवत्या सूर्य-चंद्राच्या साक्षीने विहरत असतो. रेडियोतल्या एका इंजिनीअरने मला सांगितले, की साऱ्या जगात दुसऱ्या कुठल्याही गायक-गायिकेच्या स्वराला वायुमंडलातल्या ध्वनिलहरींवरून इतका अव्याहत संचार करायचे भाग्य लाभलेले नाही. मला त्या विधानात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही. लताच्या सुरांची कधी, कुठे आणि कशी गाठ पडेल, कुणी सांगावे! अनिलांच्या कवितेतील एक ओळ आहे -

'आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, असता मन भलतीचकडे'

किती तरी प्रसंग आठवतात. भारतापासून शेकडो मैल दूर अशा इंडोनेशियातून प्रवास करीत होतो. दंडकारण्यात जनस्थानासारख्या वस्तीत, ज्यांना आमच्या भाषेचा आणि आमच्या संगीताचा कुठलाही संस्कार नाही, असा इंडोनेशियन ग्रामवासीयांचा मेळावा फोनो लावून लताची गाणी ऐकत बसला होता. चिनी आक्रमणाच्या काळात हिमालयाच्या शिखरावर एका छावणीतल्या तंबूतली गोष्ट : लडाखच्या यात्रेत असताना आम्ही तिथे जाऊन पोचलो होतो. आठदहा सैनिकांच्या चिमुकल्या तुकडीला त्या जीवघेण्या थंडीत आणि त्या थंडीहून अधिक गारठून टाकणाऱ्या विजनवासातल्या भयाण एकांतात सोबत होती ट्रँझिस्टरवरच्या लताच्या गीतांची. सैनिकाच्या कुरबानीची याद करा, अशी लताच्या आवाजातील ती आर्त हाक लक्षलक्ष डोळ्यांच्या कडा भिजवून गेली. पण हिमशिखरावर लताचा आवाज ऐकताना तन्मय झालेल्या त्या जवानांच्या तुकडीकडे पाहून वाटले, की जवानांच्या कुरबानीइतकीच ह्या अलौकिक आवाजाची जगावर केवढी मोठी मेहरबानी आहे! इंडोनेशियातले ते ग्रामवासी किंवा हिमालयावरचे आमचे जवान ही तर साधी माणसे; गायनशास्त्रातील कोणी पंडित नव्हेत. पण अल्लादियाखाँसाहेबांचे चिरंजीव भुर्जीखाँ म्हणजे शास्त्रीय संगीतातले केव्हढे विद्वान गृहस्थ! मी त्यांना भेटायला गेलो होतो, त्या वेळी लताच्या गाण्याची तबकडी ऐकण्यात ते रंगले होते. 'आयेगा आनेवाला' ऐकून कुमार गंधर्व म्हणाले, 'तंबोऱ्यातून निघणारा गंधार ऐकायचा असेल तर लताच्या गळ्यातून ऐका.' आडगावच्या गावढ्या मंडळींच्या अड्ड्यापासून ते मलबार हिलच्या बंगल्यात राहणाऱ्यांपर्यंत आणि शाळकरी पोरांपासून ते जख्ख म्हाताऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच आपल्या स्वरांच्या जादूने भारून टाकणारी ही लता - लता कसली, चित्रपटसृष्टीला लाभलेली ही कल्पलताच आहे. सुरांच्या याचकाने जे मागावे ते देणारी. गझल, ठुमरी, दादरा, कवाली, भजन, पाळणे, लोकगीते, भावगीते, बालगीते, खानदानी संगीताच्या वळणाची गाणी... मागणाऱ्याने मागत जावे. असली विविधता आणि तीसुद्धा दर्जाने दिसणारी, भारतीय संगीतात यापूर्वी कोणाच्याही गळ्यातून आलेली नसेल!


हल्ली इलेक्ट्रॉनिक्सच्या साहाय्याने कम्प्युटर म्हणतात त्या यंत्रावर वैज्ञानिकांनी अनेक चमत्कार करून दाखवायला सुरुवात केली आहे. मानवी मेंदूला न साधणारे अनेक बौद्धिक पराक्रम ही यंत्रे करतात. उदाहरणार्थ, जे हिशेब करायला पंचवीस कारकुनांना एक महिना लागेल, ते ही यंत्रे काही सेकंदात करतात. लता हा संगीतातल्या देवाच्या दुनियेतून आलेला कम्प्युटरच आहे. गळ्यातून एक जागा निघावी, म्हणून एकेका गायकगायिकेने जिथे मेहनतीचे पहाड फोडले, त्या बिकट जागा, त्या ताना, त्या मुरक्या, लयकारीचे ते सूक्ष्म भेद हे सारे ती सहज करून जाते. शास्त्रीय संगीतातले जातकुळी असलेले एखादे सिनमातले गाणे असते. लताची त्या गीतातली तान ऐशी गेलेली असते, की मी मी म्हणणाऱ्या उस्तादांनी आणि पंडितांनी, मनाचा तितका प्राजंळपणा असला तर, स्वत:चे कान पकडावे. मला खात्री आहे, की उद्या एखाद्या पाश्चात्य संगीत दिग्दर्शकाने लताला जर इंग्लिश गाणे गायला बोलावले, तर ह्या बाई तिकडल्या तमाम गाणाऱ्या मडमांना संकटात टाकतील. लताच्या सुराला 'अटक गमे जेथ दु:सहा' अशीच जिद्द आहे. देवटाक्याच्या पाण्यासारखा हा गळा. रंग टाकणाऱ्याने आपल्या रंगाच्या निवडीची कमाल करावी. हा गळा त्या रंगांची स्वरपुष्पे क्षणात फुलवून दाखवतो. हा स्वरच मुळी परिसाचा धर्म घेऊन आलेला. त्या स्वरांचा स्पर्श झाला की कशाचेही सोनेच व्हायचे. नुसता स्वरच काय, अभिनयाची जाणकारीही फार मोठी. चित्रपटातील गाणे हे संवादासारखे अभिनीत करायचे असते. मला तर लताला प्लेबॅक आर्टिस्ट का म्हणतात, तेच कळत नाही. तिच्या गाण्यांना त्या नट्यांच्या अभिनयाचा प्लेबॅक असतो. बहुदा तो तिच्या शब्दस्वरांतून उमटलेल्या भावनांच्या उंचीला पोहोचत नाही. 'धूल का फूल' नावाच्या बोलपटातील 'तू मेरे प्यार का फूल है' हे गाणे लताने म्हटले आहे. एका बेवारशी गणल्या जाणाऱ्या अर्भकाची आई हे गीत गात आहे. अभिनय आणि संगीत ह्या दोन्ही दृष्टींनी या गीताचा अभ्यास करावा. लताने त्या गीतातला एकेक शब्द लयीच्या प्रवाहाबरोबर फुलाची एकेक पाकळी सोडावी तसा सोडला आहे. तिने म्हटलेल्या गीतांना, कित्येकदा पडद्यावरच्या नटीच्या ओठांची, स्वत:च्या चेहऱ्याची घडी विस्कटू न देता सुरू झालेली निर्जीव हालचाल पाहिली की वाटते, लताच्या गाण्याच्या वेळी ह्या पडद्यावरच्या नट्यांना पडद्याआडच ठेवावे आणि त्या गीताच्या वेळी कॅमेरा केवळ चंद्र, सूर्य, तारे, पाने, फुले, पाणी, नद्या, डोंगर अशा दृशांच्या दिशेला फिरवावा. आपल्या स्वरांनी आणि स्वरांइतक्याच रेखीव अभिनयाने फुललेल्या गीतांनी लता अशी जादूनगरी उभी करते. तीत कित्येकदा त्या नट्यांच्या ओठांची निष्प्राण हालचाल लताच्या सुरांना दिलेल्या वरवरच्या 'लिप सिम्पथी'सारखी खोटी वाटते. म्हणून मला वाटते, की लता कसली पार्श्वगायिका! तिच्या गीताच्या अभिव्यक्तीतून होणाऱ्या भावनांच्या पातळीला न पोहोचणाऱ्या नट्या या पार्श्वनायिका आहेत.

हिंदी चित्रपट हा काही माझ्या फारशा सलोख्याचा विषय नाही. पण अनेक तारे आणि तारकांनी चमचमणाऱ्या ह्या अंगणातून उद्या लता आणि आशा या भगिनींनी 'आम्हाला वगळा' म्हटले, तर ही तारांगणे एका क्षणात हत:प्रभ होतील! सिलोन रेडिओचा व्यापार विभाग डळमळायला लागेल आणि आमची आकाशवाणी केविलवाणी होऊन जाईल. हिंदी चित्रपटांची दुनिया तर तिथल्या संगीत दिग्दर्शकांनी आणि मुख्यत: लताच्या आवाजाने तगवून धरली आहे. हे म्हणजे मिलिटरीच्या बँडवाल्यांनी एकाद्या राष्ट्राचे संरक्षण केल्यापैकीच आहे. संगीत दिग्दर्शकांच्या भाग्याने लता नावाचा एक चमत्कार हिंदी चित्रपटसृष्टीत आला. या सृष्टीची ती आज गेले पाव शतक अनभिज्ञ सम्राज्ञी आहे. कपिलाषष्ठीच्या योगासारखा तिच्या सार्वजनिक दर्शनाचा योग असतो. कुठले प्रीमियर, कुठली ज्युबिली असल्या प्रसिद्धीच्या नाना आकर्षणापासून ती दूर असते. बाकी राणीला मिरवावे कुठे लागते? मिरवतात दासी. गेल्या पंचवीस वर्षांत तिच्या स्वरांचे हजारो-लाखो अंत:करणांवर अधिराज्य चालू आहे. संगीत दिग्दर्शक नवा असो, जुना असो लता एकदा मायक्रोफोन पुढे आली की सुराना प्राणांचा स्पर्श झाल्याचा साक्षात्कार घडवते आणि त्या बाजारातून नाहीशी होते. पंचवीस वर्षे हा गळा गातो आहे.

तिच्या तीर्थरूपांनी मराठी रंगभूमीवर आपल्या गाण्याने मी मी म्हणवणाऱ्यांना बुचकळ्यात पाडले होते. माझ्या आयुष्याच्या ताळेबंदीत जमेच्या बाजूला जे महान क्षण आहेत, त्यातले किती तरी दीनानाथरावांच्या गाण्यांनी उजळलेले आहेत. सावरकरांसारख्या उत्तुंग प्रतिभावंताने केलेल्या गाण्याची दीनानाथरावांच्या अश्वमेधाच्या घोड्यासारख्या विजिगीषु गळ्यातून निघालेली फेक आजही माझ्या डोळ्यापुढे चमकून जाते. त्यांची ती विजेच्या चपळाईने आणि तितक्याच बेगुमानपणाने जाणारी तान आठवली की आजही जीव अस्वस्थ होतो. जीवाला बैचेन करणारे ते गाणे - अस्वस्थ करणारे. गुंगी आणणारे नव्हे. दीनानाथांच्या कलेचे राज्य त्या काळातल्या आणि व्यवसायाच्या परिस्थितीमुळे मर्यादित राहिले. त्यांच्या या लाडक्या लेकीने त्या राज्याच्या सीमा अमर्याद वाढवल्या. गुणी गायक, वादकांच्या सुरांचे हे ऋण कसे फेडायचे! लताच्या शेकडो स्वरांची ही सुखाची ठेव कुठे ठेवायची? ती स्मृतीवरी लिहावी आणि ते ऋण इथेच ठेवून जायचे! पाव शतकभर साठत आलेले हे ऋण. ऋणकोने धनकोबद्दल एकच भावना ठेवावी; ती म्हणजे धनको सदैव अधिकाधिक धनवान होत जावा हीच.

आमच्या सुरांच्या मागण्याला अंत नाही. आम्ही याबाबतीत सदाचेच भिकारी. सदैव मागतच राहणार. तुकाबाने विठ्ठलाशी मागणे मागताना 'पोटापुरते देई विठ्ठला, मागणे लई नाही, लई नाही' म्हणून सांगितले. पोटापुरते देणाऱ्या विठ्ठलाला देताना कळले असेल की तुकोबाच्या पोटाची भूक कधीच भागणारी नव्हती. लताने कोट्यवधी अंत:करणाच्या सुरांची भूक भागवता भागवता वाढवली आहे. हे स्वरभांडार तिच्या जीवात कोणी मोकळे करून ठेवले काय सांगावे! मी वाडवडिलांचे आशीर्वाद मानणाऱ्यांतला आहे. मला वाटते, दीनानाथांनीच ही मर्मबंधातील ठेव आपल्या मुलामुलींना सांभाळायला दिली. आळंदीच्या विठ्ठलपंताची लेकरे जशी दुधाचे दात पडण्यापूर्वीच विश्वात्मक देवाच्या वाग्यज्ञाची सामग्री गोळा करायला लागली, तशी मंगेशीच्या दीनानाथाची ही मुले हातभर उंचीची असल्यापासून स्वरयज्ञाच्या तयारीला लागली. लताकडे दिदीपण आले. तिने हे वाण आपल्या हाती घेतले आणि अष्टदिशांना सूर पसरला. चित्रपटाच्या मयसृष्टीत कालचे हिरे आज दगडाच्या मोलाने दुर्लक्षिले जातात, तिथे आज लता पंचवीस वर्षे आपले स्थान टिकवून आहे. त्या सृष्टीत राहूनही ती एका विलक्षण अलिप्तपणाने जगत असते. आपल्या स्वराने सर्वांच्यात आहे आणि आपण मात्र कुणाच्यातही नाही. दिवसातून किती तरी वेळा आकाशवाणीवरून तिच्या नावाचा पुकारा होतो. आपल्या साऱ्या जीविताचे स्वरमय अलगुज करणारी ही कलावती. तिच्या गाण्याला कुठलीही फूटपट्टी लावून ती मोजता येत नाही. त्या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. ताजमहालाच्या स्थापत्यात जशी सुधारणा सुचवता येत नाही, किंवा चांदण्यांची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला 'तत्‌ त्वम् असि' असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे. सूक्ष्म लयतत्त्व पाहणारी ही नजर आहे. लताची पंचवीस वर्षांपूर्वीची तबकडी काय आणि आजची काय, त्याच चैतन्याने उजळलेला तो सूर. त्याला कोमेजणे ठाऊक नाही आणि त्याची नक्कलही होऊ शकत नाही.

असली ही गुणी मुलगी आणि तिची गुणी भावंडे. कोल्हापूरच्या पॅलेस थिएटर जवळ चिमुकल्या घरट्यात राहत होती, तेव्हापासून आजतागायत आपल्या गात्या गळ्याने सुरांचे जग जिंकत चाललेली पाहत आलो आहे. ह्या गळ्यांना कधीही थकवा न येवो. आणखी खूप वर्षे हे गळे असेच गात राहोत. ज्ञानदेवांच्या दारी सोन्याचा पिंपळ होता. या भावडांच्या दारी सुरांचा पिंपळ आहे. आज त्या पिंपळाच्या पानापानाइतकी गीते गाऊन ह्या भावडांनी शेकडो अंत:करणे तृप्त केली आहेत.
संगीतातले ढुद्धाचार्य सिनेमा संगीताला नाके मुरडीत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे ही मंडळी आपले कान चारी दिशांतून येणाऱ्या सुरांसाठी उघडेच ठेवत नाहीत. वास्तविक सिनेमासंगीत हे आजचे लोकसंगीत आहे. लता मंगेशकर ही आमची खरी 'नॅशनल आर्टिस्ट' आहे -- राष्ट्रगायिका आहे.

नॅशनल प्रोग्रॅममधे गायले म्हणजे नॅशनल आर्टिस्ट होत नसतो. त्याला आकाशवाणीच्या स्टुडिओत घर करून चालत नाही. देशातल्या लोकांच्या अंतःकरणात घर करावे लागते. ते भाग्य लताइतके दुसऱ्या कुठल्याही गायकाला किंवा गायिकेला लाभलेले नाही. आज पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल, बंग जर कुणी एकत्र बांधून ठेवला असेल, तर लताच्या सुरांनी. निसर्गदत्त किंवा संकुचित मनाने ज्यांना बहिरेपणा आलेला आहे असे जर काही अभागी वगळले, तर ह्या सुरांनी आकृष्ट न होणारा ह्या देशात कुणी असेल, असे मला तरी वाटत नाही.

सिनेमातले गाणे अल्पजीवी म्हणू हेटाळू नये. ते गाणाऱ्यांची आणि ती गीते लिहिणाऱ्या प्रतिभावान गीतकारांची उपेक्षा होता कामा नये. ते तसे करायचे असेल तर वेलीवर फुलणाऱ्या जाईजुईलाही तुच्छ मानावे लागेल. चित्रपटसंगीतात तबकडीवरची ही तीन-साडेतीन मिनिटे सुरांच्या खजिन्यातून नवीनवी रत्ने काढून साजरी करणे हे सोपे नाही. त्या कालावधीतली प्रत्येक सेकंदाची पोकळी फारफार चतुराईने भरावी लागते. या साडेतीन मिनिटांच्या कालावधीत तिच्या गळ्यातून निघालेल्या प्रत्येक सुराला अंतिमत्व आहे. ताजमहालाच्या स्थापत्यात जशी सुधारणा सुचवता येत नाही, किंवा चांदण्याची शोभा वाढवायला त्या चांदण्यात आणखी काही दुरुस्ती घडवावी असे वाटत नाही, तसे त्या स्वराला 'तत् तत्वम असि' असे म्हणावे लागते. सुरांचा मर्मबंध गवसलेला हा गळा आहे. सूक्ष्म लयतत्व पाहणारी ही नजर आहे. लताची पंचवीस वर्षांपूर्वीची तबकडी काय आणि आजची काय, त्याच चैतन्याने उजळलेला तो सूर. त्याला कोमेजणे ठाऊक नाही आणि त्याची नक्कलही होऊ शकत नाही.

बहुधा गाणे न कळणारे उच्चभ्रु रसिक "आपण शास्त्रीय संगीताखेरीज दुसरं काही ऐकत नाही," वगैरे सांगत असतात. हे म्हणजे स्वतःला फुलांचा षौकीन म्हणवणाऱ्याने आपण फक्त भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले कमळ तेवढे मानतो, इतर जाईजुई वगैरे हलकी (!) फुले मानीत नाही, म्हणण्यापैकी आहे. ही माणसे चुकून सुरांच्या राज्यात शिरली आहेत.भारतीय चित्रपट संगीतदिग्दर्शकांनी स्वररचनेचे फार कौतुकास्पद चातुर्य दाखवले आहे. आणि सच्चा सच्चा सूर दाखवायला तिथे लताचा आवाज आहे. सुरांचा आणखी सुंदर संस्कार कुठला हवा?

लताच्या सुरांनी जिंकलेले हे केवढे मोठे साम्राज्य आहे! ह्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही. सकाळ उजाडते. घरोघरीचे रेडिओ लागतात. एखाद्या रेडिओवरून बातम्या ऐकू येत असतात; युद्धाच्या, जाळपोळीच्या, सत्तेच्या उलथापालथीचा, मन विषण्ण करणाऱ्या, जगणे म्हणजे हेच का शेवटी हा प्रश्न उभा करणाऱ्या -- आणि अंधारातून प्रकाशरेखा जावी, तसा एकदम लताचा सूर तीरासारखा घुसतो आणि मनाची काळोखी नष्ट करतो. काही नसले तरी हे सूर ऐकायला तरी जगले पाहिले, असे वाटायला लागते. अतिपरिचयानेदेखील अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणे लताचे सूर ! ते सूर कानी पडले की, मनावर शिल्पासारखा कोरलेला तो प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो.


"शूरा मी वंदिले" म्हणणारे परकर-पोलक्यातले लताचे चिमुकले ध्यान दिसायला लागते. मनात म्हणतो, ह्या मुलीला कल्पनाही नसेल की, ह्या "शूरा मी वंदिले" ऐकताना कोल्हापूरच्या त्या पॅलेस थिएटरातल्या अनेकांनी मनात म्हटले असेल की, ह्या असल्या अलौकिक 'सूरा मी वंदिले'. सुरांची चैतन्यफुले फुलविणाऱ्या लतेला, वयापेक्षा कुठलीही वडिलकी नसणाऱ्या माझ्यासारख्याने अंतःकरणापासून एकच आशीर्वाद द्यायचा की, "मुली, अशी ही दाद तुला अखंड मिळो -- औक्षवंत हो !"

(गुण गाईन आवडी)
पु.ल. देशपांडे
७ फेब्रुवारी २०२२
महाराष्ट्र टाइम्स 

3 प्रतिक्रिया:

Unknown said...

भाईंनी काय कौतुक केले आहे लता दीदींचे..... फारच सुंदर....

pritikhot said...

Apratim lekh... Thanks for sharing!

pritikhot said...

Apratim lekh... Thanks for sharing!