Monday, November 27, 2017

पुलकित यामिनी - शरद सातफळे

काही माणसे आपल्या कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या काही वैशिष्ट्यांमुळे. पंडित भीमसेन जोशी त्यांच्या संगीतामुळे, आचार्य अत्रे त्यांच्या विनोदामुळे, प्रभाकर पणशीकर स्मरणात राहतात ते त्यांच्या अष्टावधानी अभिनयामुळे, बाबा आमटे कायम स्मरणात राहतात ते त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे, कुसुमाग्र्ज त्यांच्या कवितेमुळे तर वि. वा. शिरवाडकर त्यांच्या नाटकां मुळे. या साऱ्यांचा सुरेख संगम एकाच ठिकाणी पाहायला मिळतो तो भार्इंचे ठायी.

भाई म्हणजे महाराष्ट्राचे लाडके दैवत पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! 8 नोव्हेंबरला पुलंचा जन्मदिवस. थोर माणसांच्या जन्मदिनाची नोंद जयंती म्हणून ठेवली जाते. नेत्यांच्या जन्मदिवसाची आठवण शहरभर त्यांची छायाचित्रे लागलीत की होते. मग तो जन्मदिवस पुन्हा एक वर्षासाठी विस्मरणात जातो. मराठीचा एक चोखंदळ वाचकवर्ग आहे. उच्च अभिरूची असलेला मराठी वाचक पु.ल. देशपांड्यांना कधी विसरणार नाही.कारण त्यांचे महाराष्ट्रावर खूप खूप उपकार आहेत. नवीन पिढीतील एका युवा वाचकाने मला विचारले, ‘‘काका तुम्ही पुलंना पाहिलं आहे? तु च्या पिढीने त्यांचे एकपात्री प्रयोग पाहिले आहेत? आम्हाला पु. ल. फक्त वाचून व ऐकूनच माहिती आहेत.’’ त्याला म्हणालो, ‘‘बेटा, आमच्या काळत पु.ल. आमचे साहित्यिक हिरो होते. पु.लं.ची नाटके, एकपात्री
प्रयोग, त्यांचे पेटीवादन आणि त्यांची भाषणे ते जेथे असतील तेथे जाऊन आम्ही पाहिले आहेत, ऐकले आहेत. हे त्या काळात ज्यांनी पाहिलेत त्यांचेही आता अमृतमहोत्सव होत आहेत. पुलंच्या काळात ही सारी नवीन टेक्नॉलॉजी रांगत रांगत येत होती. कॅमेरे, चित्रण बाल्यावस्थेतच होते. त्यामुळे पु.लं.च्या ऐन उमेदीतल्या काळातल्या कार्यक्रमांचं चित्रण किंवा ध्वनिमुद्रण पाहिजे त्या स्वरूपात उपलब्ध नाही. नाही तर तु च्या पिढीला पु.ल. खूप छानसे पाहायला व ऐकायला मिळाले असते.’’

तो युवा वाचक पुढे म्हणाला, ‘‘काका पुलंबद्दल आणखी काही सांगाना.’’

मलाही पुलंबद्दल भरभरून सांगावसं वाटत होतंच. पुलंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पु.ल. स्मरण अगदी योग्य वाटले. पुढे त्याला मी सांगू लागलो. ‘‘बालका, पु.ल. हे महाराष्ट्राला पडलेले एक सुखद स्वप्न होते. पुलंनी व्यवहारात आणि रंगमंचावर अनेक भूमिका केल्यात. पोटापाण्यासाठी मास्तरकी केली. आकाशवाणीवर नोकरी केली. नुकतीच भारतात आलेली दूरचित्रवाणी त्यांनी चित्रित केली आणि शेवटी परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून लेखन, चित्रपट दिग्दर्शन, संगीत इत्यादी ललित कलांमध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित केले. स्वत: त्या चित्रपटां धून भूमिका केल्यात. त्यातली गाणी बसविली. संगीत दिग्दर्शन केले. फार बारीक तारीखवार तपशील देण्यात काही मौज नाही. मौज ही पुलंना ऐकण्यात, त्यांचा अभिनय पाहण्यात, त्यांनी लिहिलेलं वाचण्यात आहे. सुदैवाने पुलंचे सारे साहित्य महाराष्ट्र सारस्वताने जपून ठेवले आहे. ते तु च्या पिढीला वाचायला मिळेलच. पण, पुलंबद्दलचे किस्से कुठलीही मैफील रंगवू शकतात.माणूस गेला की त्याचे किस्से आख्यायिका होतात. पण, तुला सांगतो पुलंची भाषणे, एकपात्री प्रयोग, त्यांची नाटके यावर त्या काळी रसिकांच्या उड्या पडायच्या. पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे आपल्या अवतीभवती वावरत आहेत असा भास होतो. चाळीची संस्कृती आता जवळ जवळ संपुष्टात आली आहे. पण, बटाट्याची चाळ आपल्याला त्या काळात घेऊन जाते. त्या काळातली पात्रे, त्यांचे भ्र ण मंडळ, त्यातली सांगितिक चिंतनिका ऐकली की आपणास काहीतरी हरविल्यासारखे वाटते. पुलंची ‘वाऱ्यावरची वरात’ पाहिली की वधूवरांनासुद्धा तिचा हेवा वाटावा इतकी रंजक. पुलंच्या ‘असामी असा मी’मधला बेंबट्या पुलंनी अजरामर करून टाकला.

पुलंनी लिहिलेली व्यक्तिचित्रे कधी रंगभूमीवर उतरली, त्या कथांचं वाचन हा एक आनंददायी प्रवास
असायचा. ‘हसविण्याचा माझा धंदा’ तर छान बिझिनेस करून गेला. पुलंच्या बरोबर सुनीताबाई देशपांडेही साहित्याची उत्कृष्ट जाण असलेल्या कलाकार होत्या. त्यांनी (सुनीताबार्इंनी) ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये छान ठसकेबाज भूमिका केली होती. ‘तुझे आहे तुजपाशी’ या पुलंच्या नाटकांत आणि ‘राजमाता जिजाबाई’ यातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहे. पुलंची नाटकं त्या काळात खूप गाजली. ‘अंमलदार,’ ‘तुझे आहे तुजपाशी,’ ‘सुंदर मी होणार’ ही त्यातली काही. १९५६ ते १९६६ पर्यंत शाळा-कॉलेजेस स्नेहसंमेंलनां धून व स्पर्धां धून ही नाटके खूप गाजलीत.

पुलंचे चित्रपट त्या काळातले ‘हिट पिक्चर्स’ होते. त्यांचा ‘देवबाप्पा,’ ‘पुढचे पाऊल,’ ‘गुळाचा गणपती’ हे सिनेमे आम्ही शाळकरी पोरे होतो तेव्हा तेव्हा पाहिलेत. ‘गुळाचा गणपती’तला निरागस नाऱ्या म्हणजे स्वत: पु.ल. देशपांडेच होते. पु. ल. देशपांडेंची सारीच पुस्तके खूप छान आहेत. वाचता वाचता हसायला येते. एकटाच कधी वेड्यासारखा हसायला लागतो. पुलंनी गंभीर लिखाणही विनोदी अंगाने केलं आहे. त्यामुळे ते जास्त कुरकुरीत आणि चवदार झालं आहे. बंगाली साहित्यातले सौंदर्य पुलंना शोधायचे होते. बंगाली साहित्याचा पुलंना अभ्यास करावयाचा होता. त्यासाठी पु.ल. स्वत: शांतिनिकेतनमध्ये जाऊन राहिलेत. बंगाली भाषा शिकले आणि त्यांच्या अनुभवातूनच ‘वंगचित्रे’ नावाचे पुस्तक तयार झाले. पुलंची साऱ्या महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात व्याख्याने झालीत त्याचे सुंदर संकलन करून ठेवले आहे आणि ‘श्रोते हो,’ ‘रसिक हो,’ ‘मित्र हो’ अशी छान पुस्तके जन्माला आलीत.पुलंची ‘पुरचुंडी,’ ‘उरलं सुरलं,’ ‘गोळाबेरीज’ आणि ‘खिल्ली’ ही पुस्तके तुम्ही मिळवा आणि वाचा. विनोद कसा असावा हे त्या पुस्तकांवरून कळेल. विनोदाने गुदगुल्या केल्या पाहिजे, हसविलं पाहिजे. ओरबाडून समोरच्याला दुखविणारा हा विनोद कधीच नसतो. हेटाळणी, एखाद्या व्यंगावरून केलेली टीका समोरच्या व्यक्तीचा दुबळेपणा यातून विनोदनिर्मिती होत असेल तर ती आपली भूल आहे. विनोदाविषयी विषाद निर्माण होईल असे विनोद भार्इंकडून कधीही झाले नाहीत. कुणीही कधी दुखावल्या गेले नाही. पुलंनी त्यांच्या विरोधकांनाही हसविलं आहे, जिंकलं आहे.

बाबा आमट्यांच्या आनंदवनात पु.ल. आले आणि बाबांचे काम पाहून खूप प्रभावित झाले. आनंदवनाला त्यांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या. तेथे मुक्तांगण निर्माण झाले. पुलंची उपस्थिती असलेले मित्रमेळावे साऱ्या जगात गाजले. आनंदवनात देशविदेशचे पाहुणे यायला लागलेत. पु.ल. स्वत: कलाकार होते, पण त्यांनी इतर लाकारांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्या कलाकृतीला छान दाद दिली, प्रतिसाद दिला. त्यांचे ‘गणगोत’ खूप मोठे होते. छोट्या रसिक वाचकांच्या पत्रांनाही ते स्वत: लिहून पत्रोत्तर द्यायचे. आनंदवनात एकदा मित्रमेळावा चालू असताना वीज गेली. कंदील-मेणबत्त्या लावून आम्ही सारे पुलंच्या भोवती गोळा झालो. ‘भाई पेटी वाजवा ना,’
किस्से सांगाना,’ म्हणून आग्रह झालेत. पुलंनी छान किस्से सांगायला सुरुवात केली. चित्रपट तयार होत असताना घडलेल्या गमतीजमती, कुठल्या रंगलेल्या मैफलीत झालेला गोंधळ, कुठल्या स्नेहसंमेलनातल्या विनोदी घटना ऐकता ऐकता आणि हसता हसता पुरेवाट झाली. भाई तु च्या युरोप टूरबद्दल सांगाना. त्या वेळी अपूर्वाईचा जन्म झाला होता तरी भार्इंनी सांगितले असे देश मी पाहिले नाही. अरे काय सांगू तुला जिकडे तिकडे क्लिनता (स्वच्छता) आणि माणसं तरी काय सांगू तुला वागण्यात अगदी डिसेंट हो. अशी डिसेंट्री त्रिभुवनात सापडायची नाही. साऱ्यांची सारे किस्से ऐकून हसून हसून मुरकंडी वळली. कुणीतरी भार्इंकडे पुढे पेटी सरकविली. भार्इंचे जादूभरे पेटीवादन सुरू झाले, ‘किती किती सांगू तुला’ वाजवून झाले. टाळ्यांवर टाळ्या. छान छान नाट्यगीते पेटीवरची सुरावट ऐकून कान तृप्त झाले.‘रात्रीचा समय सरूनि होत उष:काल’ हे भार्इंनी वाजवायला घेतलं अन्‌ लाईट आले. अंधारातही दीपवून टाकणारी ही मैफील आम्ही कधीच विसरणार नाही. ही रात्र ‘पुलकित यामिनी’ म्हणून सदैव स्मरणात राहील. भार्इंचा शंभरावा वाढदिवस लवकरच येणार त्याची आपण तयारी करू या आणि पुलंना ‘हॅपी बर्थ डे डीयर भाई’ म्हणून गाऊ या.

शरद सातफळे
तरुण भारत (नागपूर)
०८ नोव्हेंबर २०१७
९४२२१३६०६७


Monday, November 20, 2017

विशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र - सिद्धनाथ गानू

प्रिय पु. ल.,

खरं तर तुम्हाला काका म्हणावं की आजोबा हा प्रश्न आमच्या पिढीला पडायला हवा. आम्ही पहिलं 'ट्यॅह्यॅ' केलं (आमच्या आईशीस नक्की सांगता येईल आम्ही कुठल्या खाटेवर 'ट्यॅह्यॅ' केलं ते) तेव्हा तुम्ही सत्तरी गाठलेली. पण मायन्यांच्या पलीकडे जाऊन तुमचं-आमचं नातं जुळलं ते आयुष्यभरासाठी.

घरातल्या प्रत्येकाला तुमच्या लिखाणात, अभिवाचनात, नाटकात आणि वगैरे वगैरेत स्वतःला लागू पडेल, असं काही ना काही सापडत होतं. 'हॉटेल दिसलं की आमच्या शंकऱ्याला तहान लागते' या तुमच्या वाक्याचा जसा आमच्या पालकांना आधार वाटला, तसा इतर कुणाला वाटला नसेल. अहो कुठल्याश्या बालनाट्याला जाताना मला इतक्या रंगीबेरंगी खाण्याच्या गोष्टी दिसल्या की जिभेचा म्हणजे अगदी नळ झाला होता! पण, कसचं काय? तोंड उघडलं की कोंब राजगिऱ्याचा लाडू या न्यायाने दीड पाकीट संपवलं त्या दिवशी त्यांनी माझ्यावर. तुमच्या 'उपासा'च्या दिवशीही तुम्ही इतके लाडू खाल्ले नसतील जितके मी त्या दिवशी खाल्ले.
            
वाढदिवसाच्या केकचीही तशीच गत! "शाळेत जा आणि लोकांच्या पोरांचे वाढदिवस साजरे करा" असं बर्थडे सेलिब्रेशनचं तुम्हीच गुणवर्णन करून ठेवलंत. त्यामुळे माझ्या पहिल्या वाढदिवसानंतर केकला चाटच मिळाली. वाढदिवसाला आईने केलेला बटाटेवडा, आज्जीने केलेल्या नारळाच्या वड्या आणि आपल्या घरापासून ते कोपऱ्यावरच्या काकूंच्या घरापर्यंत सगळ्या मोठ्यांना नमस्कार करणे हा शिरस्ताच होऊन गेला.

वाढदिवसाचा केक आला तो एकदम कॉलेजला गेल्यानंतर! भरपूर केक खाण्याची अनेक वर्षांची इच्छा अखेर तेव्हा पूर्ण झाली! एक समाधानाची जागा एवढीच की आमच्या लहानश्या शहरात सांद्र स्वर आणि मंद प्रकाशाचं वातावरण असणारी कोणती 'माँजिनीझ' बेकरी नव्हती त्यामुळे आमची तुमच्यासारखी फजिती व्हायची टळली.

जशी शिंगं फुटायला लागली तसं मग शाळा, अभ्यास, त्यात खासकरून गणितादी विषयांचा मनापासून तिटकारा करत आम्ही नाटकं, कविता यासारख्या कल्पनाविश्वात घेऊन जाणाऱ्या गोष्टींमध्येच रमत गेलो. गटण्यासारखी प्राज्ञ परीक्षा मात्र उत्तीर्ण होता आली नाही.

शाळेत असताना गोव्याचं दर्शन झालं ते फक्त बा. भ. बोरकरांच्या 'माझ्या गोव्याच्या भूमीत' या 'पाठ्य' कवितेमुळे. काही भाग्यवंतांना चांगले (म्हणजे कवितेला चाली वगैरे लावून शिकवणारे) मास्तर होते आणि काही जणांना दामले मास्तरांसारखे 'गोव्याच्या म्हणजे गोवा राज्याच्या, भूमीत म्हणजे जमिनीत, गड्या म्हणजे मित्रा...', अशी सालं सोलून कविता शिकवणारे शिक्षक होते.
           
पण बोरकरांच्या या आनंदयात्रेकडे तुम्ही आणि सुनीताबाईंनी ज्या नजरेतून पहायला शिकवलंत, त्याने आमची दृष्टीच बदलली. 'बाकीबाब' आमचे झाले आणि 'लोभस इहलोकातच' राहण्याचा हट्ट करायला भाग पाडणारी ती 'रमलाची रात्र' आयुष्यभरासाठी मनात घर करून बसली.

तुमच्या कथाकथनात तुम्ही चितारलेली मुंबई आम्ही मोठे होईपर्यंत खूप बदलली होती. पण लोकलमध्ये शिरताना किंवा बसमधून उतरताना पेस्तनकाकांनी वर्णन करून सांगितलेला 'घाम ने घान ने घाम' फुटायला लागला आणि या अव्याहत गोंधळातला आपणही एक थेंब होऊन गेलो आहोत याची सचैल जाणीव झाली.

          
अख्खं शालेय जीवन 'क् क् क्' ची बाराखडी असलेले आणि 'काहीतरी नंबर 1' चे सिनेमे पाहत पोसलेल्या या डोळ्यांना मध्येच दूरदर्शनवर किंवा केबलवर एखाद्या रविवारी 'गुळाचा गणपती' पाहायला मिळाल्यानंतर होणारा हर्ष आणि 'एक होता विदूषक' पाहताना मनाची झालेली घालमेल काय वर्णावी!

कॉलेजात जायचं ठरल्यावर शाळेच्या इंग्रजीच्या सरांनी स्पेलिंग घालू नये म्हणून मराठी नाव असलेलंच कॉलेज निवडलं. प्रत्यक्ष कॉलेजात आल्यावरही वर्ग आणि लायब्ररीपेक्षाही नाटकाच्या तालमीचा हॉल आणि अमृततुल्य कुठे आहे हे शोधण्याची घाई जास्त.

रावसाहेब आणि बेळगावच्या नाटक कंपनीच्या गोष्टी ऐकत मनातल्या मनात स्टेज बांधलेल्या आम्हाला, कॉलेजातल्या नाटकाच्या तालमींच्या पहिल्या दिवशीपासूनच तो अवलिया कुठे भेटतो याची आस लागलेली. पण स्पर्धा आणि करंडकांच्या भाषेत बोलणाऱ्यांच्या गर्दीत हे असं 'ब्राँझचं काळीज' असणारा कुणी भेटलाच नाही.

कळत्या वयात आल्यानंतर तुमच्या विनोदामागे दडलेली संवेदनशीलता कळली. तुमच्याकडे केवळ 'एक विनोदी लेखक' म्हणून पाहण्याची चूक करणाऱ्या अनेक लोकांमध्ये आमचाही काही काळ समावेश होता हा सल मनात राहील.
  
साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलवादाचं विश्लेषण करणारा लोकोत्तर अंतू बर्वा, शिवरायांचा इतिहास डोळ्यापुढे उभा करणारे हरीतात्या, ज्याची स्टाईल परिमाण ठरावी असा पॉश नंदा प्रधान आणि प्रत्येक लग्नघरात भेटणारा हरकाम्या नारायण ही सगळी माणसं आमच्या अनेक दशकं आधी जन्माला आली, लोकांच्या गळ्यातला ताईत बनली आणि तरीही ती आम्हाला कालबाह्य किंवा परकी वाटली नाहीत.

बाबांकडून घेतलेल्या, पानं पिवळ्या पडलेल्या बटाट्याच्या चाळीच्या आवृत्तीत आजही मी शाळेत एकपात्रीसाठी पाठ केलेल्या पंतांच्या उपासाची गोष्ट ताजी आहे. सतत ऐकून ऐकून दोन्ही बाजू घासल्या गेलेल्या कॅसेटमधली 'म्हैस' आजही हंबरते तेव्हा हसवून जाते. 'सुंदर मी होणार' मधली दीदी आणि डॉक्टर काकांची घालमेल पाहून काळजात चर्र होतं.

जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि वुडहाऊसच्या मोठेपणाने, त्यांच्या प्रतिभेने आम्ही दडपून गेलो नाही कारण त्याआधीच तुम्ही त्यांची हसत हसवत ओळख करून दिलीत. रेन अँड मार्टिनच्या व्याकरणाच्या पुस्तकातून घडलेल्या आमच्या इंग्रजीला तुमचं अकादमी पुरस्कार घेतानाचं सहज- सोपं आणि लाघवी इंग्रजी आधार देऊन गेलं.
         
साहित्यिकांच्या मांदियाळीत तुमचं स्थान असाधारण आहे. माणसात देव पाहणाऱ्या तुम्हाला काहींनी साक्षात देवस्थानीच नेऊन बसवलं ही गंमतच आहे नाही का? बहुत काय लिहिणे, तुमच्या साहित्याचा आमच्यावर लोभ असावा आणि लोभ असावा नाही, तो वाढावा हीच प्रार्थना.

तुमचाच,
एक लहानसा चाहता

सिद्धनाथ गानू
बीबीसी मराठी प्रतिनिधी


मुळ स्रोत --> https://www.bbc.com/marathi/india-41912810

Friday, November 10, 2017

अजरामर भाई

"अमेरिकेतील माझा विमानवेडा मित्र उत्पल कोप्पीकर तेरा-चौदाव्या वर्षांपूर्वीच आपले छोटे विमान घेऊन आकाशात भराऱ्या मारायचा .मलाही विमान चालवायला शिकवायचा. त्याने चंग बांधला आणि मीही क्षणाचा पायलट आणि अनंतकाळचा पाय लटलट झालो".

या आणि अशा असंख्य शाब्दिक कोट्या ,असंख्य पु.लंचे किस्से मराठी माणूस रोज वाचतो ,रोज तरतरीत होतो.

8 नोव्हेंबर 1919 रोजी गावदेवी पुलाखालच्या हरिश्चंद्र गोरगावकर रस्त्यावरील कृपाल हेमराज चाळीत दुपारी 2.40 वाजता आख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या या विनोदी साहित्य शारदेच्या कंठातील कौस्तुभमणीचा जन्म झाला.

पु.ल.देशपांडे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके भाई. एक बहुरंगी, बहुढंगी, रंगतदार,गमतीदार, व्यक्तिमत्त्व. या जादूगाराने ज्या ज्या कलेला आपला परिसस्पर्श केला त्या त्या कलेला शंभर नंबरी सोनं बनवलं.मग तो चित्रपट असो, एकपात्री प्रयोग असो,प्रवासवर्णन असो,कथा असो अथवा संगीत असो.

अमाप ग्रंथसंपदा
पुलंनी विनोद,व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन, नाटक,असे चौफेर लेखन करून साहित्य वर्तुळात आपले नाव कायमचे कोरून ठेवले आहे.

अपूर्वाई(प्रवासवर्णन),असा मी असा मी(कारकूनाची आत्मकथा),आम्ही लटिके ना बोलू(एकांकिका संग्रह),एका कोळियाने (हेमिंग्वे याच्या old man and the sea याचा अनुवाद),गोळाबेरीज(विनोदी लेखसंग्रह),वयं मोठं खोटम्।(बालनाट्य),व्यक्ती आणि वल्ली(साहित्य अकादमीचा पुरस्कार),वाऱ्यावरची वरात(व्यक्तिचित्रे),..........अशी असंख्य न मोजता येणारी साहित्य संपत्ती पुलंच्या मालकीची आहे.

चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान

पुलं हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते.चित्रपटात कधी भुमिका,कधी पटकथा, कधी संगीत,, कधी संवाद अशा सर्व बाजू ते यथार्थपणे सांभाळत असत.

कुबेर,मोठी माणसे, मानाचं पान, देवबाप्पा, गुळाचा गणपती,एक होता विदूषक, जोहार मायबाप, पुढचं पाऊल, चिमणराव गुंड्याभाऊ,.......अशा एकुण तीसेकच्या वर चित्रपटात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

संगीतकार पु.ल.
'संगीतात रमलेला साहित्यकार'म्हणून पुलंची अनेकदा ओळख करून दिली जाते.त्यांचे गाणे हे त्यांच्या खळखळत्या विनोदी झऱ्यासारखे उत्स्फूर्त आणि आतून येणारे होते.ते श्रेष्ठ दर्जाचे स्वररचनाकार होते.संगीताबद्दलच्या आपल्या आवडीबद्दल ते म्हणतात,

"संगीताबद्दलची माझी उपजत आवड लक्षात आल्यावर माझ्या वडिलांनी मला पेटी आणून दिली.आपण पेटीवादनात गोविंदराव टेंबे व्हावे या जिद्दीने मी पेटी वाजवत सुटलो.पेटी वाजवण्याच्या या नादातून मी जरी गोविंदराव टेंबे झालो नाही तरी उत्तम श्रोता मात्र झालो".

सुनीताबाई आणि पु.ल.-
पुलंचा विवाह 12 जून 1946 रोजी रत्नागिरीत झाला.त्यानी वर्णन केलेला या विवाह सोहळ्याचा किस्साही खुसखुशीत आणि वाचण्याजोगा आहे.सुनीताबाई पुलंना सर्वार्थाने साथ देणाऱ्या होत्या.पुलंच्या मागे त्या प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभ्या होत्या.आपल्या पत्नीविषयी पुलं म्हणतात,

"एका संपन्न् आणि बुद्धिमान घराण्यातील स्त्रीला माझ्याशी संसार करावा असं का बरं वाटलं असावं?पंचावन्न रुपयांमध्ये सहा सात जणांचा गाडा ओढणाऱ्या मला त्यावेळी नाव,यश यातलं काही नव्हते.त्यानंतरचा प्रवास मात्र आमच्या दोघांचा आहे.मला एकट्याला त्यातून निराळा काढताच येणार नाही...,"

अजरामर भाई
भाईंची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि माणसांमधील असलेली कणव यामुळे त्यांच्या साहित्यात सर्वसामान्य जनतेला आपलेच प्रतिबिंब आढळते.साहित्यावर प्रेम करणारी अमाप मराठी मने पुलंच्या साहित्याच्याच अंगाखांद्यावर खेळून प्रतिभावान बनलेली आहेत.समोरच्या माणसाला त्याच्या गुणदोषांसहीत स्वीकारण्याची शक्ती पुलंच्या साहित्यातील पात्रे आजही देतात.आजही पुलंचा विनोद हसता हसता नकळतपणे डोळे ओले करतो. आजही भाई तुमची व्यक्ती आणि वल्ली मधील सर्व पात्रे आम्हाला या माणसांच्या गर्दीत सोबत करतात.
नंदा प्रधान,नारायण,मंजुळा, बापू काणे,
गंपू, चितळे मास्तर ह्या व्यक्ति आमच्या मनात अजरामर झाल्या आहेत.

भाई ,तुम्ही नसल्याची जाणीव आम्हाला कधीच होत नाही. तुम्ही आहात इथेच.तुमचे साहित्य,विनोद ,किस्से,नाटकें, एकपात्री प्रयोग,वक्तृत्व याद्वारे तुम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबर असाल. भाई ,तुम्हाला मृत्यू नाही.तुम्ही अमर आहात.

12 जून 2000 हा दिवस आम्ही आमच्या स्मृतिपटलावरून केव्हाच पुसून टाकला आहे...

~~ गीता जोशी
https://www.facebook.com/GeetaJoshi1978

या महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा !!

आज आपल्या लाडक्या पुलंचा जन्मदिवस.जरी ते आज आपल्यांत नसले तरी त्यांची कमी कधीच जाणवली नाही.कारण त्यांनी आपल्याला इतकं काही देऊन ठेवलंय की ते जन्मभर पुरेल.माझा आयुष्याकड़े पाहण्याच्या दृष्टिकोन फक्त आणि फक्त पुलंमुळेच बदलला.कारण त्यांनी अशी एक अनमोल गोष्ट मला शिकवली ती म्हणजे 'हसणं'. मनुष्याला मिळालेली 'हसू'ही एक दैवी देणगी आहे.माणूस हा एकमेव सजीव आहे की जो हसू शकतो.आणि ही देणगी आपल्याकडे असून सुद्धा आपण तिचा वापर करत नसू तर त्या जगण्याला काय अर्थ नाही.

पुलं एका भाषणात म्हणाले होते की,"महाराष्ट्राने तीन व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं.ही महाराष्ट्राची सांस्कृतिक दैवतं आहेत असं म्हटलं तरी चालेल.एक म्हणजे शिवाजी महाराज,दूसरे लोकमान्य टिळक आणि तीसरे बालगंधर्व.तीन वेगवेगळ्या क्षेत्रातली ही माणसं आहेत.अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळू शकते.परंतु विभूतिमत्व मिळणं फार कठिण आहे.व्यक्तिमत्व मिळू शकतं पण विभूतिमत्व मिळत नाही.आणि ते का मिळतं कुणाला कळत नाही.कारण असे काही चमत्कार असतात की ज्याच्याबद्दल शवविच्छेदन करताच येत नाही.कारण त्या गोष्टीचं शवच होत नाही.त्या जीवंतच असतात." 

मी म्हणेन की,महाराष्ट्राने चार व्यक्तिंवर जीवापाड प्रेम केलं.आणि चौथी व्यक्ती म्हणजे पुलं देशपांडे.
पुलंचं साठ-सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेलं साहित्य आजही तितकच ताजं वाटतं.हीच त्यांच्या लिखाणातली खरी गंमत आहे.हे लिखाण अमर आहे यात काय शंकाच नाही.त्यांनी लिखाणातून उभ्या केलेल्या व्यक्ती या कुठे ना कुठेतरी आपल्याला दिसतच असतात.उदाहरणार्थ रत्नागिरीत गेलो तर अंतुबरवा,झंप्या दामले,उस्मानशेठ,मधु मलुष्टे अशा व्यक्तिंची भेट होतेच.सिंधुदुर्गात गेलो की काशीनाथ नाडकर्णी,गोव्यातला ऑगस्टिन फर्टाडो किंवा मग बेळगांवातले 'रावसाहेब' हे भेटतात.पुण्याला गेलो तर हरितात्या,नारायण,चितळे मास्तर,सखाराम गटणे ही मंडळी भेटतात.मुंबईतले सोकाजीनाना त्रिलोकेकर,बाबुकाका खरे,कायकिणी गोपाळराव,नानू सरंजामे,प्रोफेसर ठीगळे,मुख्याध्यापिका सरोज खरे(आपली),जनोबा रेगे,द्वारकानाथ गुप्ते असे असंख्य नमूने भेटतात.एखादा पारशी दिसला तर पेस्तनकाकांचा भास होतो.
पुलं जरी आज आपल्यांत नसले तरी त्यांनी कल्पनेच्या रुपात घडविलेल्या या व्यक्ती आजही जिवंत आहेत.आणि त्यांचा पावलोपावली आपल्याला प्रत्यय येतो आणि आपसूकच हसू पण येतं.या व्यक्ती जशा अमर आहेत तसेच पुलंचे विचार पण अमर आहेत.पुलंचे शब्द हे जितके खोखो हसवतात तितकेच कधी कधी हसता हसता डोळ्यात पाणी देखील आणतात.ते सत्य अगदी सहजतेने लिहित.त्यावर त्यांना कसलीही बंधनं आली नाहीत.
पुलंच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुलंच्या साहित्यावरुन 'पुलं देशपांडे नावाचे कोणीतरी होते, एवढं पुराव्याने शाबित करण्यापलीकडे या साहित्यात दुसरं काही नाही'.पेस्टनकाकांच्या भाषेत,"तुम्हाला सांगते,ते वैकुण्ठ मध्ये असेल हा,सिटिंग नेक्स्ट टू गॉड.आय टेल यू"

असो, पुलंबद्दल बोलायला सुरुवात झाली की ते संपतचं नाही.पण आज त्यांच्या जन्मदिवसामुळे त्यांच्याबद्दल लिहावसं वाटलं.तर अशा या महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा..


Wednesday, November 8, 2017

माझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण

माझ्या वडिलांनी श्री.वसंतराव देशपांडे यांचा एक वाढदिवस आमच्या गच्चीवर अनेक मित्र मंडळीबरोबर साजरा केला होता.आम्ही त्या निमित्ताने पु. ल. देशपांडे ह्यांना देखील आमच्या घरी येण्याची विनंती केली होती.त्या प्रसंगी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलावून आम्ही त्या दोघांचे काही फोटो काढले होते. त्यातला एक फोटो पु. ल. देशपांडे यांना आवडला होता. त्याची कॉपी सुनीताबाईंनी मागितली होती. माझ्या वडिलांनी मला मुद्दाम आई बरोबर फोटो द्यायला जायला सांगितले.आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात तो सुवर्ण क्षण आला होता.
१८ जुलै १९८४
आज सकाळपासून पाऊस चालू होता. म्हणतात ना ज्या दिवशी पाउस पडतो तो दिवस चांगला जातो. खरेच असणार ते.

आज सकाळी १०.३० वाजता मी माझ्या आईबरोबर पु.ल. देशपांडे यांच्याकडे गेले होते. समजा आपल्याशी पु.ल.बोलले तर? याचाच मी रस्ताभर विचार करत होते. आपण कसे उत्तर द्यायचे? अगदी मोजके बोलायचे? का नीट व्यवस्थित उत्तर द्यायचे? का कोण जाणे पण मनावर दडपण आले होते खरे! आम्ही त्यांना ‘त्यांचा आणि वसंतराव देशपांडे यांचा एकत्रित’ फोटो द्यायला गेलो होतो.

आम्ही घरी गेलो तर ते हॉलमधेच बसले होते. आम्ही येताच म्हणाले, “या या, तुमचीच वाट पहात होतो.” आम्ही सर्वात प्रथम त्यांना तो फोटो दिला. त्यांनी तो शेजारी ठेवून घेतला. आता प्रश्न पडला, पुढे काय बोलायचे. मी तर तिथे गेल्यावर एकदम भारावूनच गेले होते, भांबावून जाउन त्यांचे घर बघत राहिले. घरातले मला सर्वात जास्त काही आवडले असेल तर त्यांची सही असलेला एक आडवा ठोकळा टीव्ही वर ठेवला होता. तो इतका छान दिसत होता की संपूर्ण भेटीत मी सारखी तिकडेच पहात होते. जवळच एक २ वर्षाचा छोटा मुलगा खेळत होता. तो सुनिताबाईंच्या बहिणीचा नातू होता - अश्विन गोखले. 

या अश्या शांततेचा भंग माझ्यावरून होईल असे मला अजिबात वाटले नव्हते. अचानक पु.ल. नी मला विचारले, “काय, कितवीत शिकतेस?” मी एकदम दचकलेच. म्हणले, “मी बारावी सायन्सला आहे” त्यावर ते मला म्हणाले, “अगदी खर सांगू का? टोटलच्या मागे लागू नकोस. या डॉक्टर, इंजिनीरिंगमध्ये काही अर्थ नसतो. हल्ली खूप वेगवेगळे कोर्स निघाले आहेत. पॅथॉलॉजी, बी.फार्मा, मायक्रोबायॉलॉजी....का सगळे मार्कांच्या मागे लागतात कोण जाणे.” यावर मी काय बोलावे मला सूचेना. सुनीताबाई तिथेच कॉफी घेत बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, “अहो, त्या पदव्यांमध्ये काही अर्थ नसतो आणि शिवाय मुलींनी एव्हढे शिकून त्यांना नुसती धावपळच करावी लागते.” आई म्हणाली, “ती सायन्सला गेलीय खरी, पण तिला मराठीची फार आवड आहे.” पु.ल. म्हणाले, “अरे वा! मग छानच आहे की. युगांत वाचलेस का?” मी “हो” म्हणाले. मग सुनिताबाईंनी आमच्या पुढ्यात कॉफी आणि केक आणून ठेवले. अश्विनने एक केक उचलला. पु.ल. म्हणाले, “काय रे, इतर वेळेस तर काही खात नाहीस. बघा ना कसा आहे अंगाने.” नंतर आम्ही त्यांना आमच्या फॅक्टरीत बनवलेली खोडरबरे दिली. सुनीताबाई म्हणाल्या, “मावशीला आणि ताईला ते ‘डीचांग डीचांग उपाशी वर्हाड नाचतंय’ गाणे म्हणून दाखव ना” 

मी केक खात असंताना पु.ल.चे माझ्याकडे बघत आहेत की काय असे वाटत होते. मी मनात म्हटले की आता नेमका माझा केक खाली पडणार. पण झाला बाई एकदाचा केक खाऊन.

सुनीताबाई माझ्याकरता एक गुलाबी गुलाब घेवून आल्या, अश्विनला म्हणाल्या, “ताईला दे गुलाब” तो म्हणला,”थांब, हात पुसून येतो.” पु.ल म्हणाले, “याला स्वच्छतेची इतकी आवड आहे. बघा कसा हात पुसतोय. आणि इतका चावट आहे की मला भाईकाकू म्हणतो. मग मीही त्याला आशुताई म्हणतो.” मी म्हणाले, “याला पाहून दिनेशदादांची आठवण येते.” दोघांना इतका आनंद झाला. सुनीताबाई म्हणाल्या, “तो सध्या हॉलंडला असतो. डॉक्टरकी करतोय. वसंतराव गेल्याचे कळताच त्याला इतक वाईट वाटले पण भावना शेअर करायलाच कोणी नव्हतं.” 

जवळ जवळ एक दीड तास पुष्कळ विषयांवर बोलण झालं. दोघेही जण आनंदात आमच्याशी बोलत होते. माझ्या बाबांबरोबर २-४ दिवस पु.ल. नी राधानगरीला रहायला येण्याचे मान्य केले होते. त्याची आईने आठवण करून देताच हा पावसाळा संपताच जावू या असे ते म्हणाले.
निघताना पाऊस होता म्हणून त्यांनी आशूच्या बाबांना आमच्याकरता रिक्षा आणायला सांगितली. आमची रिक्षा वळून जाईपर्यंत पु.ल.आशूला कडेवर घेवून गॅलरीत उभे होते. आम्हाला हात हलवून अच्छा करत होते.
मला कल्पनेपलीकडचा आनंद झाला होता.
--अश्विनी कंठी
https://www.facebook.com/ashwini.kanthi

बोलावे आणि बोलू द्यावे !


‘बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वात आवडणारी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांशा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव, हे सारं बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या ह्या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवाने तो मुका असला तर खुणांनी बोलतो. रंगरेषांच्या साहाय्याने बोलतो. नादातून बोलतो. हावभावांनी बोलतो. कधी कधी जेंव्हा त्याला कुणालाही काहीही सांगू नये, कुणाशी बोलू नये अस वाटत त्यावेळी सुद्धा ‘हल्ली मला कुणाकुणाशी बोलू नये असं वाटतं’ हे तो दहा जणांना बोलून दाखवतो. जगण्यात अर्थ नाही हे बोलून दाखवतो-जगण्यातच अर्थ आहे हे बोलून दाखवतो. तो स्वतःविषयी बोलतो. दुसऱ्याविषयी बोलतो. खरं बोलतो. खोटं बोलतो. वर्तमान, भूत, भविष्य ह्या तिन्ही काळांविषयी बोलतो. म्हणूनच कुणाला तरी काहीतरी सांगावसं वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मग ते तोंडाने बोलून सांगो, की लेखणीच्या साहाय्याने कागदावर बोलून सांगो. जीवनात कुणापासून दुरावल्याचं दुःख, ‘काय करणार ?तिथे बोलणच संपल’ अशा उद्गारांनीच तो व्यक्त करतो.
                                    
                    मरण म्हणजे तरी काय ?बोलणं संपणं !


मला स्वतःला अबोल माणसांचं भारी भय वाटतं. निर्मळ मनाची माणसं भरपूर बोलतात, कमी बोलणं हे मुत्सद्दीपणाचं लक्षण मानले जाते. ते खरंही असेल. धूर्त माणसं कमी बोलतात आणि मूर्ख माणसं जरा अधिक बोलतात, हेही खोट नाही. काही माणसं दिवसभर नळ गळल्यासारखी बोलतात. काही उगीचच तारसप्तकात बोलतात. अति सर्वत्र वर्जयेत् तेव्हा असल्या अतींचा विचार करायचं कारण नाही. पण गप्पांच्या अड्डयात मोकळेपणाने भाग घेणारा माणूस माझ्या दृष्टीने तरी निरोगी असतो.

अड्डा म्हटला की तिथे थट्टा-मस्करी किंवा गैरहजर माणसाची निंदा चालायचीच. शिवाय निंदेने जसा भुर्रकन वेळ जातो तसा स्तुतीत जात नाही. फक्त त्या निंदेमागे त्या गैरहजर माणसाला माणसातून उठवण्याचा हेतू नसावा. टीकेत तसं काही वाईटचं असतं अस मानण्याचं कारण नाही. तसे आपण सर्वच थोडयाफार प्रमाणात टीकाकार असतोच. आपलं संबंध दिवसाचं बोलणं जर ध्वनिमुद्रित केलं तर त्यात आपण टीकाकाराचीच भूमिका अधिक वेळ बजावित असल्याचं दिसेल. अगदी साध्यासुध्या जेवणाची तारीफ करताना सुद्धा ! स्वतःच्या कुटुंबाने केलेल्या कांदेबटाटयाच्या रश्श्याची तारीफ करताना देखील, ‘नाहीतर त्या दिवशी त्या कुलकर्ण्यांच्या बायकोने केलेला रस्सा. तो काय रस्सा होता? ‘कांदेबटाटयाचा लगदा’ अशी टीकेची पुरवणी जोडल्याखेरीज त्या साध्या पावतीची स्टॅम्प्ड रिसीट होत नाही. बोलण्याच्या पद्धतीचा स्वभावाशी आणि एकूण वागण्याशीही फार जवळचा संबंध असतो.

बेतास बात किंवा टापटिपीने बोलणारी माणसं पोशाखात सुद्धा टापटीप असतात.

अघळपघळ बोलणारी माणसं कडक इस्त्रीबाज नसतात.

रँ रॅं बोलणारी माणस कामातही रँ रँ असतात.

तर तुटक बोलणारी स्वभावानेच तुटक असतात.

काही माणसं ठराविक मंडळीतच खुलतात. जरा कोणी अपरिचित माणूस आला की गप्प, असल्या माणसांच्या जेवणाखाणापासून ते कपडयापर्यंतच्या आवडीनिवडी ठरलेल्या आहेत हे ओळखावं. त्यांना वांग आवडत नसल तर ते उपाशी उठतील.

पण कुठल्याही कंपूत रमणारा माणूस कुठल्याही पद्धतीच्या भोजनाचाही मस्त आस्वाद घेणारा असतो. असल्या माणसांना बोलायला कुणीही चालत. बोलायला चालत म्हणण्यापेक्षा ऐकायला कुणीही असल तरी चालतं.

काही माणस मात्र फक्त आपल्यालाच बोलायचा हक्क आहे, असं समजून बोलत असतात. विशेषतः राजकारणातली आणि साहित्यातली! त्यातून त्यांच्या तोंडापुढे मायक्रोफोन असला तर हा व्यवहार दुतर्फी करायची सोयच नसते. संघटित प्रयत्नांनीच ते बोलणं थांबवता आलं तरच त्यातून सुटका असते. ‘परिसंवाद’ नावाच्या प्रकारात तर असले वक्ते काव आणतात.

अशाच एका परिसंवादात एक साहित्यिक विदुषीबाई बोलायला उभ्या राहिल्या, (त्यांनी पुस्तक वगैरे लिहिलेली नाहीत. पण साहित्यसंमेलनांना नियमितपणाने वर्षानुवर्षे उपस्थित राहिल्यामुळे साहित्यिक) प्रत्येक वक्त्याला फक्त दहा मिनिटांचाच अवधी देण्यात आल्याचा मंत्र अध्यक्षांनी दिला होता. बाईंनी सुरूवात केली आणि त्या आवरेचनात. पंधरा मिनिटानंतर अध्यक्षांनी घंटी वाजवली. बाईंनी ढीम लागू दिली नाही. कारण तोपर्यंत त्या ‘इतक्या थोडया वेळात हा विषय मांडणे शक्य नाही तरी मी आता मुख्य विषयाकडे वळते’ इथपर्यंतच आल्या होत्या. पंचवीस मिनिटानंतर अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवली. बाईंनी अध्यक्षांना, हा उगीचच घंटी वाजवण्याचा कसला भलता नाद लागलाय, अशा चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहून ‘आजच्या समाजात स्त्रियांची कशी मुस्कटदाबी होते आहे’ हा मुद्दा खुलवायला घेतला. काही वेळाने अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवल्यावर बाईंनी त्यांच्यापुढील घंटी स्वतः उचलून हातात घेतली आणि आपलं भाषण चालू ठेवलं.

पुरूषांपेक्षा बायका अधिक बोलतात हा बायकांच्यावर अकारण केलेला आरोप आहे. वास्तविक बायका अधिक बोलत नसून कमी ऐकतात एवढंच. त्यातून असलीच जर एखादी फार बोलणारी बायको तर तिला गप्प करण्याचा एक रामबाण इलाज आमच्या एका अनुभवी मित्राने शोधून काढला आहे. ‘‘शेजारच्या सरलाबाईंनी एक मेलं वाटीभर डाळीचे पीठ द्यायला किती खळखळ केली.’’ अशासारख्या प्रापंचिक विषयावर भाष्य सुरू झाले की आमचा मित्र एकदम आंतरराष्ट्रीय राजकारणात शिरून, ‘‘दक्षिण ऱ्होडेशियातलं कळलं का तुला ?’’ असा प्रश्न टाकून वंशव्देष किंवा इजिप्त-इस्त्राएल संबंध यात शिरतो. त्यामुळे वाटीभर डाळीच्या पिठाचा इश्श्यू क्षुद्र होऊन जातो. गरजूंनी हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण कळायला हवे असे नाही. ब्रह्ममायेसारखे ते एक अगम्य कोडे आहे. म्हणूनच ब्रह्ममायेवर कुठलेही अखंडविखंडानंद जसे मनाला येईल ते बोलतात;तसे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलावे. आंतरराष्ट्रीय राजकारण, ब्रह्मज्ञान आणि भुताटकी या विषयांवर काहीही बोलेले तरी खपते.

ते काही का असेना, पण माणसाने बोलावे. गडकऱ्यांची शिवांगी तिच्या रायाजीला म्हणते, ‘राया, मनात असेल ते बोल, मनात नसेल ते बोल.’ वरपांगी मोठं भाबड पण जरा अधिक न्याहाळून पाहिलं तर तसं फार खोल वाक्य आहे. मनात असेल ते बोलण्याचं धैर्य नसतं. म्हणून तर मनात नसेल ते बोलावं लागतं. व्यवहारात मनात असेल ते न बोलण्याच्या चातुर्यालाच अधिक महत्त्व असते. मुक्काम हलवण्याची चिन्हे न दाखवणाऱ्या पाहुण्याला ‘आता तुम्ही इथून तळ उठवावा’ म्हणायच धैर्य असलेले नरकेसरी ह्या जगात किती सापडतील ? मनात नसेल तेच बोलायची माणसावर ‘संस्कृती’ किंवा सभ्यतेने सक्ती केलेली असते.

आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातली आपण पात्र आहोत. इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककाराने ह्या रंगभूमीवर आपल्याला ढकललेले आहे याचा अजूनही कुणाला थांगपत्ता लागलेला नाही आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. न बोलून सांगता कुणाला अशी अवस्था आहे.

राजेशाहीच्या काळात ‘राजा बोले दळ हाले’ अशी अवस्था होती. लोकशाहीच्या काळात तर लोकांनीच बोलले पाहिजे. आता तलवारीच्या पट्टयाची जागा जिभेच्या पट्टयाने घेतली आहे. इथे न बोलून राहण्यापेक्षा बोलून बाजी मारणारा मोठा, मात्र ह्या असल्या बोलण्याच्या कलेच्या अभ्यासात न बोलण्याची कलासुद्धा आत्मसात करावी लागते. नाहीतर न बोलून मिळालेली सत्ता बोलून घालवली असंही होत. ‘कला’ म्हटल्यावर बोलण्याच्या कलेलाही इतर कलांचे नियम आले.
    ‘‘कला ही प्रत्यक्ष प्रकट करण्याइतकीच दडपण्यातून प्रकट होत असते.’’

कधी कधी भानगडीच्या राजकीय परिस्थितीत नेत्यांच्या वक्तृत्वापेक्षा नेत्यांचं मौन अधिक बोलकं असतं. उत्तम गायकाला गाणं किती गावं याबरोबरच कधी संपवाव हे कळणं आवश्यक असते आणि बोलणाऱ्याप्रमाणे लिहिणाऱ्यालाही लिहिणं संपवावं कधी तेही कळायला हवं. म्हणून हे बोलण्याबद्दलचं लिहिणं विंदा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळीत थोडा फेरफार करून संपवताना मी एवढंच म्हणेन की –

                     बोलणाऱ्याने बोलत जावे

                     ऐकणाऱ्याने ऐकत जावे

                     कधी कधी बोलणाऱ्याने

                    ऐकणाऱ्याचे कान घ्यावे.


कालनिर्णय दिनदर्शिका 
जानेवारी १९७९ 
पु. ल. देशपांडे

मुळ स्रोत -- https://kalnirnay.com/blog

माझा अनमोल खजिना !

पुलंची स्वाक्षरी असलेलं "चित्रमय स्वगत" हे पुस्तक मला २००७ साली कसं गवसलं याची ही गोष्ट खास पुलंप्रेमींसाठी... —

२००७ मधला फेव्रुवारी महिना होता. तेव्हा मी भायखळा येथील मुंबई महानगरपालिकेच्या 'ई' विभाग कार्यालयात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होतो. मदनपुरा नामक अत्यंत गजबजलेल्या विभागातील रस्ते, फूटपाथ, घरगल्ल्या आणि ड्रेनेज व्यवस्था यांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी हे 'स्थापत्य अभियंता' म्हणून माझ्या कामाचं स्वरुप... अत्यंत जीर्ण अवस्थेतील जुन्या काळातील मुंबईच्या वैभवाची आठवण करुन
देणा-या इमारतींची दुरुस्तीची कामं सोबत दाटीवाटीने कायम लोकांचा राबता असलेल्या गल्लीबोळातून करावी लागणारी पायपीट... हे सर्व इतकं सविस्तर सांगण्याचं कारण म्हणजे रोज सकाळी नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी या अत्यंत 'गलिच्छ' भागातून फेरफटका मारावा लागत असल्यामुळे काम करण्याचा उत्साहचं नाहीसा होत असे...

परंतु सकाळी तासभर कामानिमित्त ही 'भटकंती' केल्यानंतर, दुपारपर्यंत निवांत मिळणारे ऐक-दोन तास ही त्यातली अत्यंत जमेची बाजू होती... कारण या वेळेत मी माझा वाचनाचा आनंद उपभोगत असे... "वाचन"—मला आवडणारी अन् गेली कित्येक वर्ष जोपासलेली एक उत्तम गोष्ट... आज मी तुम्हाला या वाचनानेचं मला दिलेल्या स्वर्गीय आनंदाची गोष्ट सांगणार आहे...

भायखळ्याचा मदनपुरा, आग्रीपाडा, नागपाडा, कामाठीपुरा सारखा परिसर आणि तिथे असलेली मुस्लिमबहुल वस्ती बघता , अशा ठिकाणी एखाद्या मराठी सारस्वताच्या साहित्यविषयक कार्यक्रमाची कल्पना करणे म्हणजे जणू दिवास्वप्नचं... परंतु अशाच एका कार्यक्रमाची वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली अन् आश्चर्य वाटले— चक्कं कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम !

मुंबईमध्ये नुकतीच माॅल संस्कृतीची मूळं रुजायला सुरुवात झाली होती. मुंबई सेंट्रल बस डेपोच्यासमोर " सिटी सेंटर " नावाचा एक भव्य माॅल उभा राहिला होता. तिथल्याचं एका पुस्तकाच्या दुकानाच्या उद् घाटन प्रसंगी तिथे चक्क मराठी काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला होता. माॅलमध्ये मराठी पुस्तकाचं दुकान ही कल्पनाचं तेव्हा ग्रेट वाटली म्हणून मग मी एका मित्राबरोबर त्या माॅलमधल्या दुकानात जायचं ठरवलं. निमित्त होतं ' मराठी राजभाषा दिन ' अर्थात २७ फेब्रुवारी - कुसुमाग्रजांचा जन्मदिन !

दुस-या मजल्यावरच्या त्या भव्य दालनासमोर मी जेव्हा उभा राहिलो, तेव्हा याचं ठिकाणी काल कविवर्यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम झाल्याच्या आठवणीने माझा ऊर अभिमानाने भरुन आला. परंतु जेव्हा त्या पुस्तकांच्या वातानुकुलित भव्य दालनात प्रवेश केला तेव्हा तिथं मराठी पुस्तकं कुठंच दिसेनात ? संपूर्ण दालन फिरुन झाले तेव्हा एका कोप-यात काही मराठी पुस्तकं मांडलेली आढळली.
तिथं उभ्या असलेल्या मदतनीस मुलीला जेव्हा मी पुस्तकांविषयी विचारले तेव्हा तिनं सांगितलं की सध्या इतकीचं मराठी पुस्तकं असून अद्याप काही त्या पेटा-यातून काढून मांडायची आहेत.

मग मी अन् माझा मित्र , आम्ही तिथंली पुस्तकं चाळायला लागलो. माझ्या वाचनाच्या आवडीमुळे मी आतापर्यंत पुलं, वपु यांच्याबरोबरचं मराठीतील वाचनीय आणि संग्राह्य पुस्तकं विकत घेतलेली असल्यामुळे त्या भव्य दालनातील तो ' मराठी कोपरा ' पाहून मन खट्टू झाले. तिथं अद्याप न मांडलेली पुस्तकं बघावी म्हणून सहजच मी तो पेटारा उघडला अन् तिथं दिसलेलं पुस्तक बघून माझी उत्सुकता चाळवली गेली. मी ती प्रत उघडून पाहिली आणि मला आश्चर्याचा धक्काचं बसला.

१९९६ साली प्रकाशित झालेलं आणि दस्तुरखुद्द लेखकाची त्यावर स्वाक्षरी असं ते पुस्तक... ती प्रत पाहिल्यावर मला हर्षवायू व्हायचाचं तेवढं बाकी होतं. अचानकपणे एक अशी गोष्ट माझ्या हाती लागली होती ज्याची मी स्वप्नातही कल्पना करु शकत नव्हतो.
ते पुस्तकं होतं , महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंचं स्वाक्षरी केलेलं —
'' चित्रमय स्वगत '' ...
मी अत्यानंदाने माझ्या सोबत्यालाही ती प्रत दाखवली आणि त्यानेही आश्चर्य व्यक्त केलं...

मी एक सामान्य वाचक... पुलंचा चाहता... निस्सिम भक्त... त्यांच्या पुस्तकांनी आजवरच्या आयुष्यात अनेक चढउतारांतुन सावरलेलं... त्यांची सर्व पुस्तकं आपल्या संग्रही असावी, ही माझी मनोकामना अन् म्हणूनचं आतापर्यंत मी त्यांची जवळपास सर्वचं पुस्तकं विकत घेतलेली... परंतु , अद्याप १६०० रुपये किंमत असलेलं त्यांच एकमेव ' चित्रमय स्वगत ' हे पुस्तक मी विकत घेतलेलं नव्हतं...

कारण १९९६ साली ' मौज ' ने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं तेचं मुळी LIMITED EDITION आणि COLLECTORS ISSUE अशा स्वरुपात, शिवाय त्याच बरोबर त्या प्रतींवर दस्तुरखुद्द पुलंनी स्व:ताच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी केलेली होती... हे सर्व माहित असल्यामुळे 'ते' पुलंच्या स्वाक्षरीचं पुस्तक आपल्या संग्रही असणं ही माझ्यासाठी एक न घडणारी गोष्ट होती...

आणि आज अचानकपणे ते पुस्तक माझ्या हातात होतं... पुलं गेल्यानंतर सात वर्षांनी...

खरचं ही पुलंची स्वाक्षरी असलेली प्रत असावी का ? अजूनही विश्वास बसत नव्हता... मग मी 'मौज' ला फोन करुन याबद्दल चौकशी केली. परंतु मौजेकडून काही योग्य उत्तर मिळाले नाही असे वाटल्यामुळे मी पुन्हा 'डिंपल प्रकाशन'चे श्रीयुत अशोक मुळे यांना फोनवर सविस्तर प्रकार सांगितला. थोड्या वेळाने श्री. मुळे यांनी मौजेशी संपर्क करुन कदाचित त्यांनी त्या प्रती तिथं विक्रीसाठी ठेवलेल्या असू शकतात असा निरोप दिला...

माझ्यासाठी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट घडली होती... मी ताबडतोब तिथं उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या पाच प्रती क्रेडिटकार्ड वापरुन विकत घेतल्या आणि माझ्याजवळ असलेल्या पुलंच्या पुस्तक संग्रहात एका अतिशय अनमोल गोष्टीची भर पडली —

चित्रमय स्वगत - पु. ल. देशपांडे !!!



परंतु माझ्यासारख्या पुलंप्रेमींसाठी अनमोल असलेलं हे पुस्तक त्या माॅलमधल्या एका कोप-यात असं विक्रीला ठेवलेलं होतं याचं मला आजही आश्चर्य वाटतं ...

पुलंच्या निधनानंतर त्यांची स्वाक्षरी असलेलं पुस्तक पुलंप्रेमींकडून चढ्या बोलीने विकत घेतलं गेलं असतं... असं असताना "मौजे'ने त्या प्रती सिटी सेंटर माॅल मधल्या त्या वातानुकुलीत दालनाच्या एका कोप-यात का म्हणून विक्रीस ठेवल्या असतील ?

माझ्यासारखा सामान्य पुलंप्रेमी जर यथाशक्ती पाच प्रती विकत घेऊ शकत असेल तर हा प्रकाशकांचा करंटेपणा असावा का की त्यांनी हा 'अनमोल ठेवा' अशा अडगळीच्या ठिकाणी विक्रीस ठेवला असावा ?

मला यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत, परंतु माझ्या हाती एक अनमोल खजिना लागला याचा मात्र मला अत्यंत आनंद आहे...
ते "चित्रमय स्वगत" हे पुस्तक माझ्यासाठी पुलंचा आशिर्वाद आहे !!!

आजच्या "मराठी राजभाषा दिनाच्या" निमित्ताने मी आपल्याशी माझा हा अनुभव शेअर करत आहे...

"वाचाल तर वाचाल !!! " धन्यवाद !!!

— संजय आढाव (२७/०२/२०१५)

Tuesday, November 7, 2017

बरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात


पु.ल. तुम्ही तुमच्या साहित्यात देवांपासुन संतांपर्यंत..नेत्यांपासुन शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांवर #कोपरखळ्या,निखळ विनोद केलेत.

पण तुम्ही आज असे काही विनोद केले असते तर आम्ही ते सहन केले नसते!कारण आता आमच्या चित्तवृत्ती इतक्या अस्थिर,उतावीळ झाल्या आहेत..आम्ही आमच्या आर्दशांबद्दल,जातींबद्दल इतके पजेसिव्ह झालो आहोत की आम्ही तुमच्या नर्म विनोदाला न समजता आमच्या धार्मीक.. जातीय भावना दुखावल्यामुळे आम्ही तुमचे पुतळे जाळले असते.

सोशियल साइट्सवर ''पु.ल.देशपांडे हेटर्स'' पेजेस तयार केले असते. बरं झालं तुम्ही आधीच गेलात..

तुम्हाला आज संगीत नाटकांवर प्रेम करणारे रावसाहेब भेटले नसते की इतिहास जगणारे हरीतात्या, चप्पल झिजेस्तोवर शिक्षण सेवा देणारे चितळे मास्तर भेटले नसतेच.
कारण ती जमात आता कालबाह्य; नव्हे नामशेष झाली आहेत.

आणि समजा आजच्या काळातल्या नारायणावर वा अंतु बर्व्यावर तुम्ही लिहीलं असतं तर तो म्हणला असता ''अरे आमच्यावर विनोद काय करतोस!!पहिले आमची रॉयल्टी दे''!!

त्यामुळे बरंच झालं तुम्ही फार आधीच जन्मलात!आणि मुख्य म्हणजे आज तुमचे विनोद..शब्दातील मर्म..जागा..ग्राफ्स समजणारी पिढी तयार होतेच कुठेय!

आम्हाला काॅमेडी कम चित्रपट प्रमोशन कार्यक्रमांची..लाउड विनोदांची आणि दर तीस सेकंदांनी कानठळ्या बसवणाऱ्या प्री रेकाॅर्डेड लाफ्टर आणि ताळ्या ऐकायचीच इतकी सवय झालीए की तुमच्या वाक्यांतील शब्दांचे अस्तर..खोली..आमच्यापर्यंत पोहचलीच नसती.त्यामुळे हसता हसता डोळ्यांच्या कडा ओलावणारे तुमचे शब्द..वाक्यातील अर्थ..विनोद आम्हाला आज कळणार नव्हताच.

आज तुम्ही असते तर कुठल्या टिव्ही चॅनलवर तुम्हाला; कृत्रीम हिडीस हसणाऱ्या एखाद्या बाईसोबत किंवा खोटं हसणाऱ्या, खुर्चीवरील बुजगावण्या सोबत तुम्हालाही जज बनवुन बसवलं असतं.तेव्हा उथळ कर्कश विनोद पाहुन ऐकुन घुसमट तुम्ही सहन करू शकला नसता..आणि आम्हिही तुम्हाला तसं पाहु शकलो नसतो.म्हणुन बरच झालं तुम्ही गेलात!


आज तुमच्या कथाकथनाला आम्ही आलो असतो तर आम्ही पहिले सोशियल साइट्सवर ''लिसनिंग टू पु.ल.देशपांडे;लाइव्ह.'' अपडेट्स टाकुन;
तुम्ही हरी तात्या,पेस्टन काका सांगत असताना आम्ही सर्व आमच्या माना खाली घालुन दर दोन मिनीटांनी वा आमचे मेसेजेस..पोस्ट्स..चेक राहीलो असतो...
आणि तुमच्यासोबत #सेल्फीज घेऊन सोशिअल मीडियावर टाकून उथळ प्रेम दाखवत राहिलो असतो.

मोबाइल चं कर्णपिशाच्च आमच्या मानगुटीवर बसण्यापुर्वीच..आणि त्या कर्णपिशाच्चाची फेसबुक,वाॅट्स अप आणि इतर पिलावळी जन्मण्यापुर्वीच तुम्ही गेलात तेच बरं झालं.

पण शेवटी एकच म्हणतो देवाने आमचे जीवन समृद्ध करण्याकरिता तुम्ही व तुमचं साहित्य;दिलेल्या या मोलाच्या देणग्या!न मागता त्याने दिल्या पण तो त्या कधीही परत मात्र घेउ शकणार नाही.

- अभिजीत पानसे