Wednesday, June 21, 2017

प्रिय पु.ल.

कागदावर तारीख लिहून मी कितीतरी वेळ त्या कोर्‍या कागदाकडे पहात होतो.....निश:ब्द. काहीतरी हरवलं होतं. जाणवतं होतं , ऐकूही येत होतं , फक्त दिसत नव्हतं. आठवणींचा पूर , विचारांचं उठलेलं काहूर , झालेला एक एक संस्कार , संवाद साधत होता. पण सारं काही मुकं होतं. त्या अभिव्यक्तीने जशा डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या तश्या आजही होऊ लागल्या होत्या. पटकन पाणी गालावर ओघळेल असंही वाटत होतं जे पूर्वी कधीही होत नव्हतं. अशा अनेक मर्यादा त्या अभिव्यक्तीनेच घालून दिल्या होत्या.

विचारांना आणि संवादांना गती आली. ३०-३५ वर्षांचा फेरफटका झाला. खूप ठिकाणी गेलो. अगदी परदेशात सुध्दा जाऊन आलो. खूप जण भेटले. काही शब्द भेटले , काही सूर एैकू आले. सारं काही माणुसकीने ओतप्रोत भरलेलं , देखणं आणि सुसंस्कृत. टाळ मृदुंगाच्या गजरात इंद्रायणीचा काठ कुंभारासकट दर्शन देऊन गेला. विशाल सागर , तिथल्या नारळी पोफळीच्या बागा आणि डिटम्याच्या दिव्याच्या उजेडातील खपाटीला गेलेली पोटं आतमधे काहीतरी कालवून गेली.

परदेशातील घर हरवलेली माणसं भेटली. लग्न कार्यातील निमंत्रण पत्रिका आठवली. मोतीचूराचा लाडू आठवला. टाचा झिजलेल्या चपला आठवल्या. रेल्वेच्या बोगीतील १००% तुकाराम आठवला आणि अचानक उदबत्तीचा वास आला. नव्या कोर्या छत्रीवर पडलेलं पावसाचं पाणी आणि छत्री वर करून केलेल्या छत्रपतींचा जयघोष आठवला. पटकन मुठी आवळल्या. दचकलो , ओळीत चुकून नववा शब्द आला होता , खोडला आणि नविन ओळ सुरू केली. क्षणात कागदावरती लांब केसांचा शेपटा पडला , वाटलं पुढचा पेपर भरूच नये. पण तेवढ्यात कल्हईवाल्या पेंडश्यांच्या बोळातील निळे डोळे मला शांत करून गेले.

जीवन कळलेली माणसं भेटली. सवाई , कुमार इतकंच काय हवाई गंधर्वही भेटले. त्यांच्या सारख्यांच्या गुणांचं आवडीने केलेले गायन एैकू आलं. शांतीनिकेतनातील पारावर बसलेला शांत वृध्द तपस्वी आठवला. बघता बघता चाळीचा जिना चढून गच्चीवर आलो. पाहिलं तर तिथे मोठ्ठे कुलूप म्हणून जिने उतरून खाली येऊ लागलो तर वृध्द चाळीचं मनोगत एैकू येऊ लागलं.

वरातीच्या निमित्ताने गावातील लोकल नाट्य पाहिलं. दिल देके देखोचा रिदम एैकला. दमयंतीमालेचं हंबरणं एैकू आलं. कोर्टाची साक्ष झाली. हशा आणि टाळ्यांचा गजर एैकू आला. बघता बघता गोष्टी इतिहास जमा झाल्या.

या सगळ्या गोष्टी तशा आपल्या आसपास असणार्या , दिसणार्या पण तरीही लक्षात न आलेल्या. माणसं , वस्तु ,वेगवेगळी ठिकाणं , सूर , शब्द आज सगळे अचानक एकदम जाणवायला लागले , दिसायला लागले. शब्दावाचूनचे सूर एैकता एैकता शब्दच सगळं सांगू लागले. आणि एकदा काय झालं ! अहो परवाचीच गोष्ट आहे असं म्हणत म्हणत गोष्टी गोष्ट सांगू लागल्या काय हरवलं आहे त्याची.

विनम्र अभिवादन.

अतुल कुलकर्णी
नारायणगाव
दि १२-०६-२०१७

0 प्रतिक्रिया: