Tuesday, November 22, 2022

पंचनामा

सगळ्या पोलिसी व्यवहारात 'पंचनामा' हा तर एक अजब प्रकार आहे. नमुनेदार पंचनाम्यांचा संग्रह जर कुणी छापला, तर तो एक उत्तम विनोदी ग्रंथ होईल. एका चोरीच्या प्रकरणातला पंचनामा मला वाचायला मिळाला होता. त्यात हवालदारासाहेबांनी पहिलेच वाक्य लिहिले होते - “चोरट्यांनी मालकांची परवानगी न घेता घराच्या दक्षिण दिशेच्या खिडकीतून प्रवेश केला होता.” मी हवालदारांना विचारले, "अहो हवालदारसाहेब, चोर कधी आगाऊ परवानगी घेऊन, 'आपली हरकत नसेल, तर थोडीशी चोरी करावी म्हणतो' अशी विनंती करून गज वाकवायला घेतात का ?” हवालदारांनी मला, “फालतू बकबक नाय पायजे" म्हणून चारचौघांपुढे बजावले आणि अशा थाटात माझ्यावर नजर रोखली की मालकाची परवानगी न घेता त्या दक्षिणेच्या खिडकीतून शिरलेला चोर मीच असेन अशी त्याला शंका आली की काय, असे मला वाटायला लागले.

जमिनीच्या कज्ज्यात सातबाऱ्याच्या उताऱ्याचे जे स्थान, तेच फ़ौजदारी कज्यात पंचनाम्याचे. पण खरी गोम आहे ती म्हणजे पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही ठोकणारे पंच न्यायालयात चक्क उलटतात ते. खोटी साक्ष देणे हा परदेशात फार मोठा गुन्हा मानला जातो. आपल्याकडे पंचनाम्यात एक आणि कोर्टापुढल्या जबानीत नेमके त्याच्या उलट हा प्रकार वैध मानला जातो. त्यामुळे 'पंचनामा' हा प्रकार खऱ्याखोट्याची फारशी चाड बाळगणारा नाही अशीच सर्वांची कल्पना असते. असल्या ह्या नुसत्या बोटावरची थुंकी चालवण्यासारख्या खेळात गुन्हेगार सुटण्याची शक्यताच अधिक दिसल्यावर पोलिसांना वैफल्याची भावना आली, तर त्यात नवल नाही.

अशा परिस्थितीत कायद्याबद्दलचा आदरच नाहीस व्हायला लागला आहे. आपण वेळोवेळी लोकशाही आणि लोकशाहीतल्या नागरिकस्वातंत्र्याच्या घोषणा देत असतो. पण ह्या स्वातंत्र्याच्या योग्य वापरासाठी आपल्या कर्तव्याला जागण्याची अट स्वतःवर लादून घ्यायला तयार नसतो. तिथे फक्त स्वार्थच पाहतो.

(मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर श्री. वसंतराव सराफ ह्यांना १८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाठवलेल्या पत्रातून)
पुस्तक - गाठोडं

संपूर्ण पत्र वाचण्यासाठी खालील लिंकवरून पुस्तक मागवा.


0 प्रतिक्रिया: