असल्या ह्या चिमुकल्या फलाटाचे मला विलक्षण आकर्षण आहे. तिथे एखाद-दोन येणाऱ्या आणि एखाद-दोन जाणाऱ्या एवढ्याच पाशिंजर गाड्या थांबाव्या. भुकेची वेळ झाल्यावर पाळण्यातले तान्हे जसे चुळबुळते, तसे गाडी येण्या-जाण्याच्या सुमाराला थोडेसे जागून झोपणारे स्टेशन हवे ! सकाळच्या पाशिंजरला कोण आले न् सांजच्याला कोण गेले, हे साऱ्या गावाला कळावे. असली जवळीक असलेला फलाट, आणि "काय पाटीलऽ, आकाताई चालल्या का सासरी ?" म्हणणारा स्टेशनमास्तर आणि ''अगऽ आन्सूये, पोराला कुंची बांधावी का न्हाइ नीट ? वारं कसं झणाणतंय - सर्दी भरली म्हंजी मऽग ?” म्हणणारा निळ्या कपड्यांतला, कपाळाला बुका न् गळ्यात तुळशीमाळ घातलेला पोर्टर हवा. मग मास्तरसाहेबांस्त्री पाटलाच्या पोरीचा भर फलाटावर वाकून नमस्कार बडावा, आणि "अष्टपुत्रा सौभाग्यवती भव" म्हणताना जमशेटपूर किंवा असल्याच दूरच्या ठिकाणी दिलेल्या आपल्या मुलीच्या आठवणीने मास्तर आपले गहिवरणे दडवायला "सेवण्टीन अप लेट आहे आज..." म्हणत खिडकीशी आलेल्या माणसाला तिकीट द्यायला निघून जावेत. असल्या आपुलकीचा फलाट !
गावंढी माणसे शब्दांचे टोचणारे कोपरे काय सुरेख घासतात. प्लॅटफॉर्मचा 'फलाट' करतील. स्टेशनाचं 'ठेसन' झाल्याबरोबर त्याला प्राण आला. ठेसनाला जीव आहे. 'स्टेशन' हे टाइमटेबलातल्या नामावळीत ठीक आहे. पण 'ठेसन' म्हटल्यावर तिथे तहेतऱ्हेच्चे भाव दाटतात. "पोचल्याबराब्बर कार्ट टाकायचं बरं अंतुल्या, इसरायचं न्हाई..." इथपासून "बराय... बघू पुन्हा केव्हा जमतं ते. सध्या लीव्ह-बीव मिळवायची म्हणजे देअर आर हंड्रेड अँड वन् डिफिकल्टीज..." इथपर्यंत असंख्य भाव दाटतात. काही बोलके, काही मुके- म्हणून अधिक बोलके, लोकांच्या अनवाणी आणि पायताणी तळव्यांची भृगुचिन्हे मिरविणाऱ्या ह्या फलाटांनी काय काय म्हणून पाहिले असेल ! कान लावून फलाटाचे बोलणे ऐकता आले पाहिजे.
- पु. ल. देशपांडे
काही अप - काही डाउन
हसवणूक
0 प्रतिक्रिया:
Post a Comment