Leave a message

Thursday, June 25, 2015

मनोहारी आठवण

मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो होता, त्याच्या एका बाजूला रवींद्रनाथ टागोर अन्‌ दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता...

फ्लॅटच्या दारावरील ‘पु. ल. देशपांडे’ ही वळणदार आणि रंगीत अक्षरं पाहूनच मन रोमांचित झालं अन्‌ बेल वाजवली. दार उघडायला साक्षात सुनीताबाई! तोच करारी चेहरा, डोळ्यांवर चष्मा, रुपेरी केस, फिकट रंगाची साडी, चेहऱ्यावर अत्यंत शांत भाव! माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडं पाहून विचारलं, ‘कोण हवंय आपल्याला?’

‘‘मी साताऱ्याहून आलो आहे. हे पुलंचंच घर ना! मी पुलंच्या फोटोंचं दर्शन घ्यायला आलो आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे ना! दुपारच्या वेळी त्रास दिल्याबद्दल क्षमस्व,’’ एका दमात मी संपूर्ण स्पष्टीकरण दिलं. फ्लॅटचं दार उघडून ‘या’ असं म्हणत हॉलमध्ये बसण्याची त्यांनी खूण केली आणि हळूहळू आतील खोलीच्या दिशेनं गेल्या. हॉलमध्ये मोठ्या टीपॉयवर ‘पुलं’चा प्रसन्न फोटो ठेवलेला होता. फोटोला हार घातलेला होता आणि थोडी फुलं फोटोपुढे ठेवलेली होती. भिंतीवर एका बाजूला गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा फोटो, तर दुसऱ्या बाजूला चार्ली चॅप्लिनचा फोटो होता. ‘पुलं’च्या फोटोसमोर दोन क्षण डोळे मिटून शांत बसलो. नेमकं त्या वेळी शेजारच्या फ्लॅटमधून कुमार गंधर्वांचं गाणं ऐकू आलं. खरंच गाणं चालू होतं की तसा भास झाला हे मला कळलं नाही; परंतु तो क्षण पकडून ठेवावासा वाटला. अर्थात, तसा तो क्षण कायमस्वरूपी मनात जपला गेलाच. तोपर्यंत हातात पाण्याचा तांब्या-भांडं आणि एका डिशमध्ये फळं घेऊन सुनीताबाई हॉलमध्ये आल्या. शांतपणे खुर्चीत बसत, ‘काय करता आपण?’ विचारलं. यावर भाबडेपणानं, ‘पुलंची पुस्तकं वाचतो’ या माझ्या उत्तरावर मंद हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी येत जा. अलीकडे माझी तब्येत ठीक नसते.’’ त्यानंतर बहुतेक प्रत्येक वर्षी ‘पुलं’च्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी भांडारकर रस्त्यावरील ‘मालती-माधव’ या इमारतीमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये जाण्याचा योग आला. ‘पुलं’च्या जाण्यानंतर सुनीताबाई मनानं खचल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वतःचं लेखन आणि ‘पुलं’च्या अप्रकाशित लेखांचं प्रकाशन करण्याचं काम सुरू ठेवलं होतं. पुलंवरं लोकांनी अमाप प्रेम केलं. सुनीताबाई देखील सिद्धहस्त लेखिका, अभिनेत्री, संवेदनशील व्यक्ती. याहीपेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे ‘पुलंची पत्नी’! अर्थात, सुनीताबाईंनीदेखील त्यांची ही ओळख मनापासून निभावली. ‘पुलं’मधील कलाकाराला पूर्णपणे मोकळीक देऊन त्यातील ‘व्यवहार’ पाहण्याचं किचकट आणि अवघड काम त्यांनी केलं. परंतु, हे करताना स्वतःच्या विचारांतील आणि वागण्या-बोलण्यातील स्पष्टपणादेखील ठाम ठेवला. त्यांच्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातील ‘पुलं’च्या स्वभावाचं थोडं स्पष्ट शब्दांत त्यांनी केलेलं विश्‍लेषण वाचून मी थोडंसं चिडूनच पत्र लिहिलं होतं. एका सामान्य आणि अनोळखी वाचकाचं पत्र म्हणून त्या त्याकडं दुर्लक्ष करू शकल्या असत्या; परंतु सविस्तर आणि मुद्देसूद उत्तर पाठवून त्यांनी सुखद धक्का दिला होता. शिवाय, वाचन कायम सुरू ठेवण्याचा सल्लादेखील दिला होता.

३ जुलै हा सुनीताबाईंचा जन्मदिन. उत्तम लेखिका म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहीलच; पण त्याचबरोबर ‘पुलं’सारख्या प्रतिभावान लेखकाला अप्रत्यक्षपणे प्रेरणा देणारी सहचरिणी म्हणून देखील त्यांची आठवण कायम राहील. स्वतः ‘पुलं’देखील विनोदानं म्हणायचे, ‘आमच्या घरात मी ‘देशपांडे’, तर ही ‘उपदेशपांडे’!’ या जगाचा निरोप घेतानादेखील सुनीताबाई मनाला चटका लावून गेल्या. त्या दुर्दैवी दिवशी आकाशवाणीवरील सकाळच्या बातम्यांत त्यांच्या निधनाची बातमी सांगितली गेली आणि वैकुंठ येथे साडेआठ वाजता अंत्यसंस्कार असल्याचं कळलं. अनेकजण वैकुंठकडे धावले; परंतु अगदी काही मिनिटं उशीर झाल्यानं माझ्याप्रमाणेच अनेकांना त्यांचं अंतिम दर्शन झालं नाही. आयुष्यभर वेळेचा काटेकोरपणा पाळलेल्या सुनीताबाईंनी जातानादेखील वेळ काटेकोरपणे पाळली होती. वैकुंठभूमीतील त्या अग्नीतून धुरांचे लोट हवेत विरत होते. त्यातील एका उंच जाणाऱ्या नादबद्ध लकेरीकडे पाहत उपस्थितांपैकी एक ज्येष्ठ नातेवाईक महिला म्हणाल्या, ‘‘पोहोचली सुनीता भाईंकडे!’’ सर्वांचेच डोळे पाणावले.

आजही भांडारकर रस्त्यावरून जाताना ‘मालती-माधव’ इमारतीवर लावलेल्या नीलफलकाकडं पाहून जुन्या आठवणी पुन्हा जिवंत होतात.या दांपत्यानं आपल्याला ‘मनोहरी’ आठवणी दिल्या, त्या कायम तशाच राहतील.

डॉ. वीरेंद्र ताटके
बुधवार, १० जून २०१५
सकाळ (मुक्तपीठ)

3 प्रतिक्रिया:

Unknown said...

छान लिहलं आहे सर.

Akshay Samel said...

Heart touching ! really good !

हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :) said...

हे एकदम भारी . डोळ्यासमोर मायबोली आली.. :)

a