Saturday, July 25, 2020

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत. या पार्श्वभूमीवर पुलंच्या वैचारिक लेखनाकडे वाचकांचे लक्ष वळवावे या हेतूने हा लेख लिहीत आहे. ‘एक शून्य मी’ हे पुलंचे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले आहे (सन २००१). हे पुस्तक माझ्या संग्रही असून ते माझे अत्यंत लाडके पुस्तक आहे. हा पुलंच्या नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या वैचारिक लेखांचा संग्रह आहे. त्याचा अल्पपरिचय करून देण्यासाठी हा लेख.

या संग्रहात एकून २० लेख संकलित केलेले आहेत. त्यातून पुलंनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा धांडोळा घेतला आहे. त्या सर्व लेखांचा आढावा घेण्याचा माझा इरादा नाही. त्यापैकी मला खूप भावलेल्या ४ लेखांचा परिचय या लेखात करून देतो. एक वाचक म्हणून मला त्यांत काय आवडले ते सांगतो. त्या लेखांची शीर्षके अशी आहेत:

१. मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
२. छान पिकत जाणारे म्हातारपण
३. धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
४. एक शून्य मी

• मराठी दृष्टीकोनातून मराठी माणूस
हा लेख मुळात १९६२मध्ये ‘अमृत’ मासिकात प्रसिद्ध झालेला आहे. हा लेख ‘मराठीपणा’चे जे काही खास गुणधर्म आहेत त्यांच्यावर नेमके बोट ठेवतो. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हे कमीपणाचे आणि इंग्रजीत बोलणे हे प्रतिष्ठेचे हा समज तेव्हाही दिसून येई. त्या अनुषंगाने लेखात एक प्रसंग दिला आहे. पुलंची एक मराठी आडनावाची विद्यार्थिनी सारखे इंग्रजी बोले. तिचे वडील मराठी व आई पंजाबी होती. पण तिला या दोन्ही भाषा येत नव्हत्या. त्यावर पुलंनी तिला एकदा त्याचे कारण विचारले. त्यावर ती, “शीः ! मराठी की गडीनोकरांची भाषा आहे”, असे उत्तरते. त्यावर पुलं तिला “मग तुझ्या आईने गड्यानोकराशी का लग्न केले?” असे विचारून निरुत्तर करतात. महाराष्ट्रातील उच्चभ्रू समाजात मराठी बोलण्याची लाज हा बराच जुना विषय असल्याचे यातून जाणवते.

मराठी माणसाचे काही ठाम गैरसमज, कुरकुरायचे नेहमीचे विषय, व्यवहारातील वागणूक, सांस्कृतिक आवडी आणि काही आवडीचे सिद्धांत या सर्वांचा सुरेख परामर्श या लेखात घेतला आहे. १९६०च्या दशकात साधारण मराठी माणसाचे चित्र म्हणजे कारकुनीत खूष आणि व्यापार-उद्योगात मागे असे होते. ही पार्श्वभूमी पुलंसारख्या लेखकाला अगदी पोषक ठरली. मराठी दुकानदार हे या भूतलावरचे एक अजब रसायन असल्याचे त्यांनी अतिशय रंजकपणे वर्णन केले आहे.
“मराठी माणसाला हसण्याचे वावडे नाही. पण याला अपवाद म्हणजे मराठी दुकानदार आणि मराठी सर्कारी हापिसर !” हे वाक्य त्यांचे निरीक्षण किती मार्मिक होते याची साक्ष आहे. आजही ही परिस्थिती बदलली आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल !
मराठींच्या काव्यशास्त्रविनोद आणि संगीतावरील प्रेमाचे पुलंनी दिलखुलास कौतुक केले आहे. तसेच मराठी माणसाच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे त्यांनी आदराने वर्णन केले आहे. ते लिहिताना त्यांच्यासमोर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा ताजा इतिहास होता. त्याचाही त्यांनी अभिमानाने व कौतुकाने उल्लेख केला आहे.

• छान पिकत जाणारे म्हातारपण
हा १९९२मध्ये ‘शतायुषी’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख आहे. सर्वसाधारणपणे ‘म्हातारपण’ म्हटले की डोळ्यांसमोर एक प्रकारचे सुकलेपण आणि असहायता डोळ्यांसमोर येते. परंतु सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास म्हाताऱ्याना कसे छानपैकी ‘पिकत’ जाता येते, याचे खास पुलं-शैलीतील वर्णन यात वाचायला मिळते. म्हाताऱ्या माणसाला आपण पिकले पान म्हणतो. पण झाडावरचे पिकले पान आणि म्हातारपण यातील फरक पुलंनी फार छान स्पष्ट केला आहे. झाडाच्या पानाला भावना, स्वार्थ, सुखदुःख, अहंकार आणि वासना असे काहीही नसते. पण म्हाताऱ्याना मात्र या सर्व गोष्टींपासून मुक्त होणे जाम जमत नाही.

माणूस जसा मोठा होत जातो तसे त्याच्याकडील अनुभवांची शिदोरी वाढत जाते. त्याचबरोबर आपल्या जगण्यात आणि भवतालात बरेच बदल होत जातात. जीवनशैली झपाट्याने बदलत जाते. तरीही आपल्या तारुण्यात आपण जे काही अनुभवले तेच योग्य होते असा सूर बहुतेक म्हातारे काढतात. त्यातूनच “आमच्या वेळी....” या पालुपदाचा जन्म होतो आणि मग ते घरातील इतरांना छळू लागते ! त्याच्या जोडीला भर पडते ती “हल्लीची पिढी बिघडली” या रेकॉर्डची. सतत असे सूर काढणाऱ्यांना आपणच बाप म्हणून वाढवलेली ही पिढी आहे याचा विसर पडतो, याची जाणीव लेखक करून देतो.
काळाबरोबर बदलणे आणि नव्याला आपलेसे करणे हा म्हातारपण सुसह्य होण्याचा मूलमंत्र आहे, हे या लेखातून छान सांगितले आहे. म्हाताऱ्या मंडळींचे खरे काम म्हणजे घराला आनंद पुरवणे. ज्या कुटुंबांत वृद्ध हे काम करतात ते आपले वार्धक्य आनंदाने साजरे करतात, हा लेखातील संदेश तर लाजवाब आहे. एका आजोबांचे प्रसंगचित्र मुळातून वाचण्यासारखे आहे. तसेच आपली शारीरिक वा कौटुंबिक दुख्खे चव्हाट्यावर आणून स्वतःविषयी सहानुभूती मिळवू नये, असेही सुचवले आहे. आजीआजोबा होण्याच्या मार्गावर असलेल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख आहे.


• धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही
हा लेख ‘बुलेटीन’ या नियतकालिकात १९८९मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. लेखाच्या शीर्षकातले पहिले दोन शब्द हे भयंकर नाजूक आहेत हे आपण जाणतो. या विषयांवर लिहायचे म्हणजे तारेवरची कसरत असते. अर्थातच पुलंनी ती लीलया पेलली आहे. लेखात सुरवातीस भारतीय समाज हा जात, धर्म वा पंथ यांच्या विळख्यात किती घट्ट अडकला आहे याची खंत व्यक्त केली आहे. आपल्याला वैचारिक श्रमांचा तिटकारा तर आहेच आणि त्याच्या जोडीला निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभावही आपल्यात दिसतो. आपण सदैव वास्तव नाकारत जगतो आणि सारा हवाला देवावर नाहीतर दैवावर टाकून मोकळे होतो. तथाकथित पुरोगाम्यांनी बुद्धीप्रामाण्य वाढीस लावण्यासाठी किंवा समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडशी पाउल टाकलेले नाही, हे ते परखडपणे नोंदवतात.

लेखातील एका परिच्छेदात पुलंनी बाबासाहेब आंबेडकरांबद्ल अतिशय आदराने लिहीले आहे. समाजातील विखारी जातीयतेने अस्वस्थ झाल्याने पुलंनी आंबेडकरांचे लेखन आणि त्यांचे खैरमोडे यांनी लिहिलेले चरित्र आवर्जून वाचले. त्या चरित्रातील बाबासाहेबांच्या “मला मायभूमी कुठे आहे?” या वाक्याने आपण अंतर्बाह्य हादरून गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या लेखाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यात पुलंनी त्यांची देवधर्माबद्दलची भूमिका सुस्पष्ट केली आहे. ती त्यांच्याच शब्दात देतो:

.....“ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा ह्यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.”....
   
(चित्रसौजन्य : अक्षरधारा)

एका परिच्छेदात त्यांनी संत आणि शास्त्रज्ञ यांची तुलना केली आहे. भारतात संतांची संख्या भरपूर आहे. पण, त्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ अधिक संख्येने जन्मायला हवे होते असे ठामपणे लिहिले आहे. यासंदर्भातले त्यांचे पुढचे वाक्य बहुचर्चित असल्याने ते नोंदवतो:

“ मला कुठल्याही संतापेक्षा अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो”...

समाजात मुरलेल्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यावर त्यांनी कोरडे ओढले आहेत. तसेच काही अंधश्रद्धाना शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. या सगळ्यावर चिंतन केल्यावर त्यांना प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटल्याचे दिसते. या लेखाला त्यांच्या आत्मचरित्राचा स्पर्श झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक जीवनात ते खूप आनंदी व समाधानी होते. पण आजूबाजूस दृष्टीस पडणारे दुखः, दैन्य आणि विसंगती पाहून त्यांना स्वतःचे जगणेच सामाजिकदृष्ट्या असंबद्ध वाटत असल्याचे नमूद करून ते हा लेख संपवतात.

• एक शून्य मी
हा लेख ‘मटा’ च्या दिवाळी अंकात १९७४मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पुस्तकाची तब्बल १४ पाने व्यापून राहिलेला हा लेख त्याचा कळसाध्याय म्हणायला हरकत नाही. किंबहुना त्यामुळेच त्याचे शीर्षक पुस्तकाला दिले गेले असावे. इथल्या सर्व लेखांपैकी मला तो जास्त प्रभावी आणि अंतर्मुख करणारा वाटतो. तेव्हा यावर थोडे विस्ताराने लिहितो.
लेखाच्या शीर्षकावरून पुलंना काय म्हणायचे असावे याचा अंदाज सुजाण वाचकाला येतो. मानवी जीवनातली निरर्थकता ही या लेखाची मध्यवर्ती कल्पना आहे. लेखाची सुरवातच मोठी आकर्षक व मार्मिक आहे. जेव्हा आपली एखाद्या परीचिताची कुठेही भेट होते तेव्हा आपसूक विचारला जाणारा प्रश्न असतो, “काय चाललंय सध्या?”. तसा हा प्रश्नच बर्ऱ्यापैकी निरर्थक आणि बरेचदा त्याला मिळणारे उत्तर देखील ! हा संवाद खास त्यांच्याच शब्दात देतो:

...’ सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या ?” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छवास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही.’....

हे वाचून क्षणभर आपण स्मितहास्य करतो पण दुसऱ्याच क्षणी सुन्न होतो. हे प्रश्नोत्तर आपल्याला खूप काळ विचार करायला आणि कठोर आत्मपरीक्षण करायला लावते.

पुलंचे सारे आयुष्य संगीत, साहित्य आणि नाटकांना वाहिलेले होते. त्यातून मिळणाऱ्या आनंदात ते रममाण होत असत. पण समाजात आजूबाजूला नजर टाकता जे काही दिसे त्याने ते खूप अस्वस्थ होत. त्यांना सारेच कसे अपरिचित नि अनोळखी भासत होते. शहरी जीवनातली सामाजिक विषमता त्यांना बोचत असे. पुणे ते मुंबई हा नियमित प्रवास डेक्कन क्वीनने करताना आलेले अनुभव त्यांनी विषादाने लिहीले आहेत. कल्याण ते मुंबई या टप्प्यात ट्रेनच्या डब्यातले आणि बाहेर दिसणारे वातावरण किती विरोधाभासी असते ते त्यांनी छान रंगवले आहे. किंबहुना ते एका मध्यमवर्गीयाचे मुक्त चिंतन आहे. या ट्रेनच्या डब्यात जी सूट-बूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची सूज असलेली संस्कृती आहे त्यात तर आपण मोडत नाहीच. त्याचबरोबर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या लोकलच्या त्या जीवघेण्या गर्दीत जमा होण्याचीही आपली ताकद नाही, याची ते कबुली देतात.

हा लेख लिहिताना त्यांनी महानगरी समाजातल्या विविध आर्थिक स्तरांना समोर ठेवले आहे. उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि दरिद्री लोक या प्रत्येकाचे विश्व किती भिन्न आणि एकमेकापासून अलिप्त आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवते. यातील एका वर्गाचे सारे सुख कुठलेही प्रश्न न पडण्यात आहे तर विचार करणाऱ्या माणसाकडे प्रश्नचिन्हांखेरीज काहीच नाही, हा विरोधाभास ते नोंदवतात. एकीकडे त्यांना मुंबईच्या एका प्रतिष्ठित देवळातली दर मंगळवारची वाढती रांग दिसते तर दुसरीकडे एका हॉटेलच्या बाहेर रोज मध्यरात्री तिथले उरलेले अन्न मिळवण्यासाठी लागलेली भुकेलेल्ल्यांची रांग. मग या दोन रांगापैकी काय खरे, काय खोटे हे प्रश्न त्यांना छळतात.

आर्थिक व सामाजिक विषमतेनंतर त्यांनी वैचारिक विषमतेचाही आढावा घेतला आहे. समाजातील विविध स्तरांत असलेली वैचारिक दरीही त्यांना खोल वाटते. ज्या माणसांच्या धर्माच्या कल्पनेशी आपले कुठेच नाते जमत नसेल तर ते आपले धर्मबांधव कसे? आणि ज्यांच्याशी आपले कुठलेच वैचारिक साम्य नाही, ते केवळ एकाच देशात राहतात म्हणून देशबांधव तरी कसे?” हे प्रश्न ते वाचकांसमोर ठेवतात.
आजही हे दोन प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतात आणि आपण अस्वस्थ होतो. लेखातली पाच पाने देव, कर्मकांड, नवस, अंधश्रद्धा आणि ढोंगबाजी यांना वाहिली आहेत. ती मुळातूनच वाचण्यात मजा आहे. ती वाचल्यानंतर पुलं हे ‘विचारांती नास्तिक’ झालेले गृहस्थ आहेत याची खात्री होते.

एकंदरीत गरीबी-श्रीमंतीतला विसंवाद त्यांना खूपच खटकत असल्याचे दिसते. या संदर्भातला एक प्रसंग मननीय आहे. तो या लेखाचा कळसबिंदू म्हणायला हरकत नाही. पुलं एका किराणा दुकानात गेलेत. तिथे गोड्या तेलासाठी मोठी रांग होती. आता त्या रांगेतल्या एका फाटक्या कपड्यातील मुलीचा नंबर लागतो. ती दुकानादारापुढे छोटी मातीची पणती ठेऊन दहा पैशांचे तेल मागते. त्यावर तो म्हणतो की दिवाळी अजून लांब आहे तरी पणती कशाला आणलीय? त्यावर ती धिटाईने सांगते की तिला ‘खायालाच’ १० पैशांचे तेल हवे आहे. त्यावर तो नकार देतो. मग पुलं मध्यस्थीने त्याला विचारतात की कमीतकमी किती पैशांचे तेल तो देऊ शकेल. त्यावर तो १५ पैसे म्हणतो. मग ते वरील ५ पैशांची सोय करतात आणि त्या मुलीला अर्धी पणतीभर तेल मिळते. याचा खोल परिणाम स्वतःवर कसा झाला ते त्यांनी विषादाने लिहीले आहे. या घटनेनंतर एखाद्या दिवाळीत पणत्यांची आरास पहिली, की ती १० पैसेवाली मुलगी त्यांना प्रकर्षाने आठवते. जणू तिचा प्रचंड आक्रोश त्यांना ऐकू येतो आणि ते हतबुद्ध होतात.

अशा असंख्य अनुभवांतून जाताना त्यांना अनेक प्रश्न मनाशी पडले होते, अस्वस्थता आली होती. शेवटी ते जगणे म्हणजे तरी काय या मूलभूत प्रश्नापाशी येऊन ठेपतात. असा मूलगामी विचार करता करता ते एकदा प्रश्नचिन्हाकडेच ( म्हणजे ?) निरखून पाहतात आणि त्यांना उत्तर मिळते ! या चिन्हाच्या आकड्याखालीच असलेले ‘टिंब’ म्हणजेच ‘शून्य’ हेच कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असते असे सांगून ते या सुंदर लेखाची सांगता करतात.

तर असा हा ‘शून्याचा’ लेख. यात पुलंनी स्वतःला शून्य संबोधणे हा त्यांचा विनय आहे. मात्र हा लेख (आणि एकूणच हे पुस्तक) वाचताना आपल्याला त्या शून्याचा अर्थपूर्ण प्रवास घडतो, हे नक्की.

पुलंच्या निधनानंतर प्रकाशित झालेले हे पुस्तक मी आवडीने विकत घेऊन संग्रही ठेवले आहे. दर सहा महिन्यांतून मी त्यातला एखादा लेख पुनःपुन्हा वाचतो आणि तृप्त होतो. हे वाचन माझ्यासाठी एखाद्या ‘बूस्टर’ सारखे असते. त्यातल्या भाषेची खुमारी, लेखनातील सहजता, दंभावर प्रहार आणि वाचकाला अंतर्मुख करण्याची क्षमता हे सर्व काही लाजवाब आहे. तुमच्यातील काहींनी हे पुस्तक वाचले असेलच. तेव्हा तुमचेही प्रतिसाद जाणून घेण्यास उत्सुक !
************************************************************
• टीप: हा मर्यादित पुस्तक परिचय करून देताना या लेखात जे काही विचार आणि मते लिहीली आहेत ती सर्वस्वी पु ल देशपांडे यांची आहेत याची नोंद घ्यावी.
• पुस्तक संदर्भ : एक शून्य मी , मौज प्रकाशन, पाचवी आवृत्ती, २००६. साभार !

- कुमार
मुळ स्रोत-- https://www.maayboli.com/node/69050

1 प्रतिक्रिया:

Unknown said...

Sundar! Nakki he pustak ghewoon wachen