शिव्यांचे थोडेसे सोडावॉटरच्या बाटलीसारखे आहे. पहिल्यांदा बूच उघडल्यावर जो फासकन आवाज होतो तो खरा ! पहिली शिवी ही खरी बाकीच्या शिव्यांत तो जोर ओसरत जातो. मग उरते खारटसारखे पाणी. भांडणातदेखील पहिली शिवी ज्या जोशात जाते, तितकी इंटेन्सिटी पुढल्या शिव्यांत राहत नाही. मग् मुख्यार्थाच्या दृष्टीने नंतरच्या शिव्या कितीही प्रतिभासंपन्न असोत. असल्या शिव्या घाव नाही करत; थोडीफार करमणूकच करतात. म्हणून नुसते शिव्यांचे भांडण पाहताना लोक विनोदी नाटक पाहिल्यासारखे हसतात. (विनोदी नाटकांना शिव्याही देतात.) एक शिवी परिणाम साधून जाते; अनेक शिव्या हसवून जातात. भांडण पेटवणारी पहिली शिवी कचकावून जायला हवी.
----
अरे देशपांड्या,
तुझा मराठी दुकानदारावरचा लेख वाचला. साल्या, आमच्या दुकानी येऊन बघ. बेरडा, (ती जातीयवाचक शिवी देणे गैर आहे, असे मला वाटले.) आम्हांला विनोद करता येत नाही काय? कोंबडीच्या, (ही ठीक आहे.) आमच्या दुकानी सदैव हाश्यकल्लोळ चालू असतो. येऊन बघ. तुझे तंगडे मोडून तुला परत पाठवू. कळावे.
आपला नम्र (हे आणि वर!)
एक मराठी दुकानदार.
(खरोखर असे पत्र आले होते. ही केवळ माझी कल्पना नव्हे.)
खरे तर त्या मराठी दुकानदाराने मला आपला पत्ता द्यायला हवा होता. मी निदान वेष पालटून तरी त्याच्या दुकानातला हास्य नव्हे, हाश्यकल्लोळ ऐकून आलो असतो आणि शनवारवाड्यासमोर मराठी व्यापारी जगताची माफी मागितली असती. बाकी तंगडीबिगडी तोडण्यात पटाईत असणाऱ्या ह्या दुकानदाराच्या दुकानी विनोदसुद्धा जरासा भारी दर्जाचा चालत असणार. हा दुकानदार बहुधा किराणा-भुसार असावा. कारण पत्र हिशोबाच्या
वह्यांच्या शाईत होते, एवढेच नव्हे तर त्याला हिंगाचा वास येत होता. (लोकांना हलकासा सेंटचा शिडकावा केलेली, जाईच्या पाकळ्या घातलेली पत्रे-आम्हांला हिंगाच्या वासाची! विनोदी लेख लिहा, विनोदी लेख लिहा-!) 'लेका, तुला हिंग लावून कोणी विचारणार नाही' ह्या वावप्रचारची सदरहू दुकानदाराला माहिती नसावी. मी डोळ्यांपुढे “कोणीतरी आणि मंडळी-किराणा व भुसार मालाचे व्यापारी. आमचे दुकानी अस्सल केशर, भूतछाप हिंग, शिंगाडे व जानवी जोड मिळतील...” वगैरे सचित्र मजकूर उभा करू लागलो. किराणा-भुसार दुकानात येणारा तो साबणबार, हिंग, अगरबत्ती, तूप, रॉकेल, गोडेतेल, केरसुण्या, गोणपाटे आणि पापड असल्या सुगंधी द्रव्यांतून निर्माण होणारा संयुक्त वास दरवळू लागला आणि मला तो हाश्यकल्लोळही ऐकू येऊ लागला.
तंगडी मोडायची भीती होती म्हणून मी माझ्या आत्म्यालाच तिथे पाठवले.
“एक नारळ द्या हो—” गि-हाईक.
“सोम्या, गि-हाईकाला नारळ दे—” तंगडमोड मराठी दुकानदार.
“चांगला द्या हं—”
“आमच्या नारळाचं खोबरंच नव्हे, तर करवंटीदेखील टिकाऊ असते—ठेऊन द्या—उपयोगाला येईल.” (स्मित हास्य.)
“फोडून द्या हं—”
“सोम्या नारळ फोड त्यांच्या पायांशी आणि पावलांवर पाणी टाकून तीर्थ घे—हा: हा: हा:! (सोम्या आणि मालकांचा हाश्यकल्लोळ.) काय हवांय?”
“वीस ग्राम जिरं—”
“सोम्या, ह्यांना जिरं देऊन जिरव रे ह्यांची.”
(खो: खो: खो: खो:!)
“मालक, काड्याची पेटी—”
“सोम्या, साहेबांना काडी लाव.”
(हशा, हाश्यकल्लोळ, खो: खो:, सर्व काही.)
- मी आणि माझे पत्रकार
पुस्तक - अघळपघळ
पुलंची पुस्तके खरेदी करण्यासाठी खाली काही ऑनलाईन दुवे
Wednesday, August 17, 2022
मी आणि माझे पत्रकार
Labels:
PL Deshpande,
Pula,
Pula Deshpande,
pulaprem,
अघळपघळ,
पु.ल.,
पु.लं.,
पुलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिक्रिया:
Post a Comment