Tuesday, June 12, 2018

पुलंचे बहुरुपी खेळ - आरती नाफडे

पु.ल. आपल्यातून गेलेत त्याला आता दीड तप झालं. २०१९ हे पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे.
१२ जून पुलंचा स्मृतिदिन. काळ कितीही लोटला तरी स्मृती जागृत ठेवण्याचं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात व अभिनय कौशल्यात आहे. आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण बोटावर मोजण्याइतकेच पण ते भरभरून कसे जगायचे हे शिकवणारे पु.ल. सर्वसामान्य आहेत.

पुलंचं बहुजिनसी व्यक्तिमत्त्व होतं. कलागुण, अभिनय, वाकचातुर्य ही नैसर्गिक वैशिष्ट्यं त्यांना जन्माबरोबरच प्राप्त झाली व प्रसंगानुरूप ती प्रत्ययास येत गेली. पुलंची वयाच्या दहाव्या वर्षी मौंज झाली. ज्या भटजींनी मौंज लावली त्यांच्या समोर मौंज कशी लावली याची हुबेहूब नक्कल केली. पुलंचा वन मॅन शो कुटुंबातच कौतुकाचा विषय होता. बालपणी आजोळी कारवारमधील सदाशिवगडला मुक्कामी गेले असता चादरीचा सरकता पडदा लावून व एक पैसा तिकीट ठेवून नकला, गोष्टी, गाणी, पेटीवादन असा व्हेरायटी एन्टरटेन्मेंट प्रोग्राम करून पाच-सहा आणे उत्पन्न मिळवल्याची आठवण त्यांनी लिहून ठेवली आहे.

आपल्या समोरील गर्दीतील माणसांना हसवणं, त्यांच्या मनावर अधिराज्य करणं व हे सर्व आपणास साधू शकतं हा दुर्दम्य विश्वास ही यशाची पहिली पायरी त्यांनी लहान वयातच जिंकली. पुढे याच आत्मविश्वासाचं विकसित रूप म्हणजे पुलंचे बहुरूपी खेळ. १९६१ मध्ये ‘बटाट्याची चाळ’चा पहिला जाहीर प्रयोग त्यांनी मुंबईत केला. पुलं रंगमंचावर एकटे उभे राहून एक मफलर एवढीच सामग्री हाताशी घेऊन आपल्या बोलण्यानं अभिनयानं, गाण्यानं लोकांना तीन तास सतत हसवत असत.

१६ सप्टेंबर १९६२ ला ‘वाऱ्यावरची वरात’ या बहुरूपी खेळाचा पहिला प्रयोग त्यांनी अनेक होतकरू, हौशी व हरहुन्नरी नटमंडळींना घेऊन सादर केला. नाटकाच्या पूर्वार्धात पाच सुटे विनोदी प्रसंग आणि उत्तरार्धात ‘एका रविवारची कहाणी’ असणारी ही रम्य वरावरात दहा-बारा वर्ष मराठी माणसांची गर्दी खेचत होती. १६ फेब्रुवारी १९६४ रोजी पुलंनी ‘असा मी असामी’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा बहुरूपी खेळ सुरू केला. धोंडो भिकाजी कडमडेकर हा मध्यमवर्गीय चाकरमानी माणूस तुळशी वृंदावनापासून कॅक्टसपर्यंतचा आपला प्रवास कसा करतो याचं रसभरीत वर्णन आहे. थोडक्यात जुन्या पिढीचा माणूस नवयुगाला कसं तोंड देतो हे फार विनोदी पद्धतीने दाखवलेलं होतं. यानंतर ‘ववटवट’ व ‘हसवणूक’ हे खेळ याच धर्तीवर पुढे आले.

पुलंचे बहुरूपी धाटणीचे हे पाच खेळ बघण्यासाठी प्रेक्षक खूप गर्दी करीत असत. ते सोनेरी दिवस महाराष्ट्रातील जनता विसरू शकत नाही. नाट्यगृहाबाहेर पाटी असे एएका व्यक्तीला चारच तिकिटे मिळतील. काही वेळा जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वीच प्रयोग हाऊसफुल्ल होई. भली मोठी रांग, फ्री पासेसला मनाई, लहान मुलांना प्रवेश नाही. सुनीताबार्इंचा नियम फार कडक असे. खेळातील कलावंत रांगेत उभे राहून घरच्यांसाठी तिकिटे काढीत.

या खेळांना विशिष्ट साहित्यिक वा वाङ्‌मयीन चौकट नव्हती. विनोदी प्रसंगांची मालिका आणि तिला संगीताची जोड असं लोभसवाणं स्वरूप असे. या प्रयोगांनी मराठी रंगभूीची नाटकाची रूढ बंदिस्त चौकट खुली केली. नाटकातील मुक्तपणा, प्रसन्नपणा, सुखद वातावरण प्रेक्षकाला भावत असे. तीन घटका हसण्यासाठी प्रेक्षक सगळे त्रास निमूटपणे सहन करीत असत.

पुलंच्या बहुरूपी खेळाचे वैशिष्ट्य हे होते की, खेळ यशाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर असताना ते नव्या खेळाची रचना व पूर्वतयारी सुरू करत. एकाच वेळी ‘चाळ,’ ‘वरात’ आणि ‘असामि’ हे दमदार खेळ यशस्वीपणे चालू असण्याचा कालखंड महाराष्ट्राने अनुभवला व टिपला आहे.

लेखन, दिग्दर्शन, मुख्य भूमिका, गाणं, वाद्यवादन, संयोजन अशा सगळयाच भूमिकांना न्याय देणं व त्या पूर्ण ताकदीने पेलणं हे काम काही साधं नाही. अवघडच पण पुलंनी ते सर्व उचलून धरलं याचा साक्षीदार महाराष्ट्रातील जनता आहे.

त्यांचे हे बहुरूपी खेळ म्हणजे हास्याची कारंजी, हास्याची लयलूट. त्यांच्या प्रतिभेला व अभूतपूर्व नवनिर्मितीशील आविष्काराला त्रिवार वंदन. माणूस यशाच्या शिखरावर असताना समोरच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करत असतानाच उंच सिंहासनावरून पायउतार होणं व यशाच्या शिखरावरचे खेळ स्वेच्छेने बंद करणं हे फार अवघड काम पुलंनी केलं.शरीर पूर्वीइतकं साथ देईना. त्यातील चपळता कमी होऊन थकवा जाणवू लागताच पुलंनी आपले सर्व बहुरूपी खेळ १९७४ पासून बंद केले. फार मोठा निर्णय पण सहजतेने अमलात आणला

पुलंनी जीवनात काहीच अवघड ठेवलं नाही. सगळंच सहज व सरळ करत गेले. अवघा महाराष्ट्र व मराठी माणूस हळहळला.

पुलंनी आपल्या ‘अनामिका' या संस्थेच्या परिचय पत्रिकेमध्ये लिहिलं होतं, ‘सदभिरूची न सोडता समोरच्या प्रेक्षकांपुढे हसू आणि आसूचे खेळ करून दाखवणे, त्यांची करमणूक करणे एवढाच नम्र भाव मनाशी बाळगून अनामिकेचे कलावंत उभे आहेत. गर्दी खेचायला सदभिरूचीच्या मर्यादा सोडण्याची काहीही आवश्यकता नाही हे आमच्या कार्यक्रमांना झालेल्या गर्दीने सिद्ध केले आहे. शेवटी मागणे एकच-सेवा करावया लावा देवा हा योग्य चाकर.

हा चाकर मधली काही दशकं रसिकांच्या मनावर किती मोहिनी टाकून होता. रसिकांच्या भावविश्वाचा सम्राट बनला हा इतिहास सर्वश्रुत आहे.

पुलंच्या बहुरूपी ढगांच्या पाच खेळांनी पुढच्या अनेक पिढ्यांना शिकण्यासारख्या अनमोल गोष्टी सांगितल्या आहेत. पुलंच्या प्रत्येक खेळामागे फार मोठी साधना, तप व कष्ट होते. खेळातील भूमिका वठवताना पाठांतराचा संस्कार कायम जपला पाहिजे या बाबतीत ते फार आग्रही होते. पाठांतर उत्तमच हवं. एकही शब्द इकडे तिकडे करून चालणार नाही. ते नेहमी म्हणत, ‘‘पाठांतराशिवाय प्रयोगाला उभं राहणं म्हणजे हातात लगाम न घेता घोड्यावर बसण्यासारखं आहे." प्रत्येक प्रयोग आखीव रेखीव असावा यासाठी जातीने लक्ष घालत व झटत. ‘‘मला शंभरावा प्रयोगही पहिलाच वाटायचा" असं म्हणत असत व तशी उत्कटता दर प्रयोगात बाळगत. नाटकाच्या प्रयोगातील सच्चाई, खरेपणा व वास्तव जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत. 'वाऱ्यावरची वरात'मध्ये मालतीने हातावर मेंदी काढली असल्याने नवऱ्याला रिसिव्हर आपल्या कानाशी धरायला लावते. या दृश्यात प्रत्येक वेळी खरी मेंदी लावावी मग प्रत्येक प्रयोगात एक शर्ट रंग लागून वाया गेला तरी चालेल, अशा मताचे पुलं होते.

पुलंच्या अंगी नाना कला होत्या व कुठली कला कुठे चपखल बसेल, चांगला परिणाम दाखवेल याचं झान त्यांना फार उत्तम होतं म्हणून प्रत्येक प्रसंग रंगत असे. कार्यक्रमात तांत्रिक बिघाडाने टेप बंद पडला तर वाचनाने सांधा जोडता यावा यासाठी निवेदनाची छापील प्रत हातात घेऊन सुनीताबाई मायक्रोफोनजवळ उभ्या असत. ‘बटाट्याची चाळङ्क या प्रयोगात सुरुवातीचं निवेदन टेप केलं होतं. एकदाच अशी अडचण आली तेव्हा टेप कुठं थांबली आणि प्रत्यक्ष वाचन कुठे सुरू झाले हे लोकांना कळलंही नाही. संभाव्य अडथळे व त्यासाठी दूरदृष्टीने केलेली उपाययोजना खूप काही शिकवून जाते. पुलंचा जीवनपट व त्यातील चढता आलेख बघितला तर माणूस आपल्या जीवनात कशी रंगीबेरंगी बाग फुलवू शकतो, त्यातील फुलांनी समाजजीवन पण कसं आनंदित व सुसह्य करू शकतो व फुलांचा सुवास जीवनानंतरही पसरत जातो व इतरांना आल्हाददायी ठरू शकतो. पुलंचं जीवन याचं साक्षात प्रमाण आहे.

पुलं म्हणतात, ‘‘मला रोज व्यंगचित्राच्या कल्पना सुचत. कारण माझी व्यंगचित्रकार होण्याची इच्छा होती. ती मी रंगमचांवर पूर्ण करून घेतली. बहुरूपी खेळ म्हणजे स्वत:च्या शरीरातून उभे केलेली व्यंग्यहास्यचित्रंच." पुलंनी व्यक्त केलेले व्यंगहास्यचित्रांचं मनोगत मराठी रंगभूीला कदापि विसरता येणार नाही.

आरती नाफडे
तरुण भारत (नागपुर)
१० जून २०१८

1 प्रतिक्रिया:

स्नेहल अखिला अन्वित said...

पु.ल. च्या आठवणी कितीही वाचल्या तरी छानच वाटतात.
चांगला संग्रह
https://hallaagullaa.blogspot.com/
माझ्या या ब्लॉगला जरूर भेट द्या